You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुषमा स्वराज: जस्ट वन ट्वीट अवे, असा नवा पायंडा त्यांनी पाडला
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना पासपोर्ट कार्यालयाचा पदभार होता ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे. ४ वर्षं ज्या सुषमा स्वराज यांच्यासोबत काम केलं, आज त्यांच्याच आठवणींना उजाळा देताना मुळे गहिवरले होते. मुळे यांनी बीबीसी मराठीशी केलेली खास बातचीत.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आत्ताच त्यांचं दर्शन घेऊन आलो. अगदी दीड महिन्यापूर्वीच त्यांना भेटलो होतो. माझ्या मुलीला यावर्षीच्या UPSC परीक्षेत यश मिळालं, त्यांनी तिला आशीवार्द दिले. त्या मंत्रिमंडळात नव्हत्या, कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती म्हणून अत्यंत मोकळेपणाने ४०-४५ मिनिटं त्या गप्पा मारत होत्या. एरवीदेखील मी कधी त्यांची मनःशांती ढळलेली पाहिलेली नाही. अत्यंत प्रेमाने त्या दिवशी त्या माझ्याशी आणि माझ्या मुलीशी बोलल्या. इतक्या लवकर हे असं काही होईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती. कदाचित त्यांनाही असं वाटलं नसावं. त्यामुळे प्रचंड अनपेक्षित काहीतरी घडल्याचा धक्का आहे. "
ट्विटर आणि सुषमाजी
सुषमा स्वराज यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, "गेली ४ वर्षं मी त्यांच्यासोबत काम करत होतो. एकही आठवडा त्यांना भेटल्याशिवाय गेला नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला जवळून पाहता आले.अनेकदा राजकारणी लोक जनतेच्या समस्यांबद्दल बधीर होतात. पण स्वराज मात्र त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आणि तिची समस्या याला व्यक्तिगत वेळ देऊन काम करण्यावर त्यांचा भर असायचा. विदेशात असणाऱ्या तीन-साडेतीन कोटी भारतीयांपैकी कोणीही ट्वीट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकत होतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा जनतेसाठी वापर करणाऱ्या देशातल्या त्या पहिल्या मंत्री होत्या. कारण त्यासाठी आवश्यक असणारा एक संवेदनशील स्वभाव त्यांच्याकडे होता. प्रत्येकाच्या अडचणीविषयी त्यांना कळवळा होता. आणि हा कळवळा कृत्रिम नव्हता, मातृस्वाभाविक होता. त्यामुळे जिथे भारतीय संकटात, तिथे सुषमाजी असं एक समीकरण तयार झालं होतं...जस्ट वन ट्वीट अवे, असा नवा पायंडा त्यांनी पाडला"
सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून प्रतिसाद देत अनेकांची सुटका केली. पण त्यासोबतच त्यांनी केलेली एक महत्त्वाची गोष्ट ज्ञानेश्वर मुळ्ये सांगतात. ते म्हणतात, "अनेक लोकांना त्यांनी सोडवलं. पाकिस्तानातून गीता नावाच्या मूकबधीर मुलीला सोडवलं, इराकमध्ये अडकलेल्या फादर पॉलना आणलं. पण यासोबतच अनेक जणांची पद्धतशीर रितीने सुटका करता येईल, अशी यंत्रणा सुषमाजींनी विदेश मंत्रालयात उभी केली. त्याचा परिणाम म्हणजे आज जगामध्ये भारतीय माणूस कुठेही अडकला, तर भारत सरकार त्याला सुरक्षित परत आणू शकतं. ही एक मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. यापुढे कोणीही परराष्ट्र मंत्री असेल, तरी त्यांना भारतीयांना परदेशातून सोडवून आणण्यासाठी निधी उपलब्ध नाही, किंवा अन्य सरकारी नियमांचा अडथळा येणार नाही. सुषमाजींनी प्रत्येक भारतीयाला विदेशात सुरक्षा आणि आश्वस्तपणा देण्याचं बहुमूल्य काम केलेलं आहे."
"कुलभूषण जाधव यांच्या निर्णयामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतीयांच्या बाजूने वळवण्यामध्ये विदेश मंत्री म्हणून त्यांचं काम आहेच. पण त्यासोबतच मानवीय दृष्टीकोन ठेवून भारताची बाजू त्यांनी सर्वांना प्रभावीपणे सांगितली."
पासपोर्ट प्रक्रियेत सुधारणा
"सर्वसामान्यांच्या दृष्टीने सुषमा स्वराज यांनी घडवून आणलेला महत्त्वाचा बदल म्हणजे पासपोर्ट सेवेमध्ये झालेली सुधारणा ८०-९० कार्यालयांपासून आज देशभरामध्ये ५१० पासपोर्ट कार्यालयं आहेत. देशात ४५० नवी कार्यालयं सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट होती. लोकांच्या खूप तक्रारी होत्या पासपोर्ट सेवेविषयी. पासपोर्टसाठी अर्ज करणं लोकांना हिमालयाचा प्रवास वाटायचं. ते त्यांनी सोपं करून टाकलं."
'बॉस' सुषमा स्वराज
"नियमांमधले बारकावे आणि उणिवा शोधून काढून त्यावर नवी नियमावली बनवणं हा त्यांचा छंद होता. त्यांची बारीक नजर असायची सगळ्यावर. जगातले सगळे भारताचे राजदूत आहेत, त्यांना त्या नावानिशी ओळखायच्या आणि स्वतः फोनही करायच्या. अधिकाऱ्यांना त्या नेहमीच प्रेमाने वागवत. मी त्यांना कधीही अधिकाऱ्यांवर भडकलेलं पाहिलेलं नाही. अगदी रागावलेलं असतानाही त्यांच्या आवाजात एक प्रेमळ सूर असायचा. एकप्रकारचं प्रेमळ फटकारणं असायचं ते. त्यात तिरस्कार नसायचा. "
"त्यांचा कामाचा उरक प्रचंड होता. सकाळी त्यांच्याकडे गेलेली फाईल संध्याकाळी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या टेबलवर परत यायची. ऑफिसमधला त्यांचा दिवस सकाळी १० नंतर सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत त्या ऑफिसमध्ये बसायच्या. एकाच बैठकीत ३-४ तास त्या न थकता बसत. ५ मिनिटांचंही मध्यांतर घेत नसत. त्या मुद्द्यावर चर्चा होऊन, निर्णय घेऊनच त्या पुढे जात."
पर्सनल टच
"विदेश मंत्रालयामध्ये आम्ही ५ सचिव होतो. ज्याचा कुणाचा निरोप समारंभ असेल, तर त्या अधिकाऱ्याला बाकीच्या ४ अधिकारी आणि त्यांच्या जोडीदारांसोबत त्या खास जेवणासाठी निमंत्रित करत. त्या अधिकाऱ्याला काय आवडतं, तो ज्या भागातला आहे तिथले खास पदार्थ याची चौकशी करून स्टार्टर्सपासून ते डेझर्टपर्यंतचा मेन्यू त्या स्वतः ठरवत. मी निवृत्त झालो तेव्हा माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला 'किंडल' भेट दिलं होतं."
निवडणूक न लढवण्याचा निर्णय
"यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी ६ महिन्यांपूर्वीच आम्हाला सांगितलं होतं. किडनी ट्रान्सप्लांट नंतर डॉक्टरांनी त्यांना धुळीपासून दूर रहायला सांगितलं होतं. निवडणूक लढवायची असेल तर प्रचारासाठी सभा घेताना ते करावं लागणार होतं. म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना हे एकच पथ्य होतं. पण राजकारण निवृत्तीविषयी कधीच चर्चा झाली नाही. तसं त्यांच्या मनातही नसावं. मनाने त्या कट्टर राजकारणी होत्या. राजकारणातल्या डावपेचांची त्यांना कल्पना होती. पण त्या कधीही राजकारणातल्या अनिष्ट प्रथांमागे लागल्या नाहीत. त्यांचं राजकारण शुद्ध होतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)