सारा अली खानचं वजन एकेकाळी 96 किलो होतं

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

साराने लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र तिचं वजन तब्बल 96 किलो होतं त्यामुळे आपल्याला कधी अभिनय करता येईल अशी तिला आशा नव्हती. शाळा कॉलेजात तिला सगळे मोटी-मोटी म्हणून चिडवत असत.

सारा अली खान आता केदारनाथ आणि सिम्बा अशा दोन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करीनाकडून काय शिकणार सारा?

ती म्हणते, "तसं तर करीना सगळ्याच गोष्टी उत्तम पद्धतीने करू इच्छिते. मात्र एक गोष्ट मी तिच्याकडून शिकू इच्छिते. तो म्हणजे कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणं. मला आशा आहे की मी एक दिवस हे नक्की शिकेन."

करीना कपूरने साकारलेली कभी खुशी कभी गम मधली 'पू'ची भूमिका साराला प्रचंड भावली. ही 'पू'च आपल्या वडिलांची दुसरी बायको बनेल असा विचारही कधी तिने केला नव्हता.

अभिनेत्री होण्याचं लहानपणीच ठरवलं

बीबीसी एशिया नेटवर्कच्या हारून रशीद यांच्याशी चर्चा करताना सारा अली खान म्हणाली, "23 वर्षांपासून मी हे स्वप्न पाहिलं आहे. मी चार किंवा पाच वर्षांची असेल, तेव्हाच मी अभिनेत्री होण्याचं ठरवलं.

लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न असलेल्या साराने अॅक्टिंग स्कूलच्या मुख्याध्यापकांना फोन कॉलवरच गाणं ऐकवलं होतं आणि आई वडिलांच्या आवडत्या अॅक्टिंग स्कूलमध्ये तिला प्रवेश मिळाला.

सारा सांगते, "कॉलेज सुरू व्हायच्या सुरुवातीला मी अभिनेत्री व्हायचा निर्णय पक्का केला. तेव्हा वजन कमी करणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. मात्र मी मनात पक्कं ठरवलं होतं. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापर्यंत मी वजन कमी करायला सुरुवात केली."

ती पुढे सांगते, "मी केदारनाथ चित्रपटाला होकार दिला खरा, मात्र जेव्हा मी शूटिंग सुरू केलं तेव्हा मला कळलं की मला किती मेहनत करावी लागेल ते. ट्रेलरमध्ये एक सीन आहे. तिथे मी गंगेत अंघोळ करताना दिसते. तेव्हा तिथे प्रचंड थंडी होती. जीव जातो की काय असं मला वाटलं. सेटवर असताना मात्र मला काम करतोय असं वाटलंच नाही. सगळं व्यवस्थित पार पडलं. सेटवरून घरी आल्यावर मग कळायचं की तब्येत खराब झाली आहे, कधी पाय दुखतात आहे असं कळायचं. कॅमेऱ्यासमोर मात्र हे कधी जाणवलं नाही.

लवकरच सारा दोन चित्रपटांत दिसणार आहे. एक अभिषेक कपूरचा केदारनाथ आणि दुसरा रोहित शेट्टीचा सिम्बा. केदारनाथ हा सिनेमा तीन आठवड्यानंतर 28 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)