You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किसान मुक्ती मार्च : दिल्लीत काल दिवसभरात काय काय घडलं?
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी आहे. सरकारने शेतकऱ्यांवर 10 टक्के लक्ष दिलं असतं तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं, अशा टीका विरोधी पक्षाने 'किसान मुक्ती मार्च'मध्ये केली.
विविध राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदान ते संसद मार्ग असा 'किसान मुक्ती मार्च' हा मोर्चा काढला. शेतीसंकटावर चर्चा करून आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला हमी भाव जाहीर करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
देशभरातील दोनशेवर शेतकरी संघटनांच्या हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे या चळवळीकडे काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या 'लाँग मार्च'ची पुनरावृत्ती म्हणून पाहिलं जात होतं
शहरातील मध्यमवर्गीयांना शेतकऱ्यांप्रति जाणीव व्हावी, याकरिता 'नेशन फॉर फार्मर' ही चळवळ राबवण्यात येत आहे.
शुक्रवारी या मोर्चातील ठळक घडामोडी अशा -
सायंकाळी 4. 10 - सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर टीका केली. "सरकारची पीक विमा योजना फसवणूक आहे. सरकारला उद्योगपतींची जितकी काळजी आहे, त्याच्या 10 टक्केही काळजी शेतकऱ्यांची केली तरी शेतकऱ्यांना आंदोलन करायची वेळ येणार नाही," असं ते म्हणाले. पीक विमा योजनेमध्ये एक हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खिशात गेले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
दुपारी 4. 00 - राहुल गांधी यांची सरकारवर टीका
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी आणि युवकांचा अपमान करणारं आहे, काँग्रेस सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, असं ते म्हणाले.
दुपारी 2.30 - पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद
सरकार शेतकऱ्यांप्रति स्वतःची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाहीये, अशी तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मोर्चात बोलताना मांडली.
"बिल कसं असावं यावर आम्ही चर्चा केली. मी आश्वासन देतो की लोकसभेत, राज्यसभेत आम्ही प्रयत्न करू, जोपर्यंत बिल संमत होत नाही, तोपर्यंत मी तुमच्या संघर्षात तुमच्याबरोबर आहे," असं पवार यावेळी म्हणाले.
यावेळी गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी उपस्थित होते.
दुपारी 2.30 - केजरीवाल शेतकऱ्यांना भेटणार?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मार्चमध्ये सहभागी शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिल्याची बातमी NDTVने दिली आहे.
दुपारी 12.15 - राजू शेट्टी मोर्चात सहभागी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मोर्चाला संबोधताना केली. संसदेच्या या अधिवेशनात कर्जमाफी आणि हमीभाव ही बिलं पारित करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सकाळी 11 वाजता - पारंपरिक पोशाखात शासन दरबारी शेतकरी
सकाळी 10.00 वाजता - शेतकरी मार्च संसदेकडे रवाना
सकाळी 8.00 वाजता - रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची तयारी
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत देशभरातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी रामलीला मैदानावर रात्र काढली. काहींनी आपली पोटापाण्याची सोयही केली होती.
या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शेतकऱ्यांची आंदोलनं ही सकारात्मक बाब आहे. गेल्या 20 वर्षांत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आंदोलनं केल्याने त्यांना लोकशाही मार्गाने हक्कासाठी लढा देता येत आहे."
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीसुद्धा गुरुवारी रामलीला मैदानावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या "गेल्या वर्षी देशभरातल्या 200 शेतकरी संघटनांनी एकत्र येत 2 विधेयकांचे मसुदे तयार केले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि पिकांना हमीभाव यांचा समावेश आहे. ही विधेयकं संमत करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी आमची मागणी आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)