#5मोठयाबातम्या : IL&FSला वाचवण्यासाठी मोदी सरकारकडून 'सत्यम फॉर्म्युला'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. IL&FS संकट : कंपनीच्या बचावासाठी मोदी सरकारकडून 'सत्यम फॉर्म्युला'

सुमारे ९१ हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) IL&FSला वाचवण्यासाठी केंद्र सरकार पुढे आल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. ही कंपनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरकारने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये (NCLT) याचिका दाखल केली होती.

सोमवारी NCLT ने IL&FS संचालक मंडळ बरखास्त करुन नवीन मंडळ स्थापण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सहा सदस्यीय नवीन मंडळास मंजुरी दिल्याचं वृत्त आहे. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक हे कंपनीचे अध्यक्ष होतील. त्याचबरोबर सेवानिृवत्त आयएएस अधिकारी विनित नायर, मालिनी शंकर, नंदकिशोर, SEBIचे माजी प्रमुख जी.एम.वाजपेयी, ICICI बँकेचे माजी अध्यक्ष जी सी चतुर्वेदी आदींना संचालक मंडळात स्थान देण्यात आलं आहे.

2.कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यावर बंदी

येत्या शारदीय नवरात्रोत्सपासून अंबाबाई मंदिरात महिला तसेच पुरुषांना पूर्ण कपड्यांतच प्रवेश देण्याचा निर्णय निर्णय सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व देवालयांना हळहळू टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू केला जाईल, असं समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं त्याची सुरुवात अंबाबाई मंदिरातील देवस्थानपासून येत्या नवरात्रोत्सवापासून म्हणजेच १० ऑक्टोबरपासून होणार आहे.

3.प्रिया दत्त यांची सचिवपदावरून उचलबांगडी

माजी खासदार प्रिया दत्त यांची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिव पदावरून उचलबांगडी झाल्याची बातमी सकाळने दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा केली आहे. तसे अधिकृत पत्र दत्त यांना पाठवण्यात आलं असून या पत्रात त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा करण्यात आली आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच एक बैठक झाली. यावेळी निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्याने त्याला विरोध करत जोरदार गोंधळ घातला असल्याचं समोर आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

4.राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण नाही, शरद पवारांचा यूटर्न

राफेल विमान खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली नसल्याचं स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे. तसंच राफेल विमानाच्या खरेदीसंदर्भात विरोधकांची जेपीसीची मागणी पंतप्रधानांनी मान्य करावी, अशी मागणीही शरद पवारांनी केली. ते राष्ट्रवादीच्या बीडमधील मेळाव्यात बोलत होते.

"आम्ही सत्तेत असताना राफेल घेण्याचा निर्णय झाला. पण किंमत ठरली नव्हती. आमच्या काळात राफेलची किंमत साडे सहाशे कोटी होती. मोदींनी ती 1600 कोटी केली. मी त्याचं समर्थन केलं नाही. माझं म्हणणं आहे राफेलची किंमत कशी वाढली याचं स्पष्टीकरण संसदेत द्यावं," असं ते म्हणाले असं बातमीत म्हटलं आहे.

5.गौतम नवलखा यांची नजरकैदेतून सुटका

दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांची नजरकैदेतून सुटका केली असल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. गौतम नवलखा यांच्यासह इतर पाच सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यास नकार दिला होता.

28 ऑगस्टला लागू करण्यात आलेल्या नवलखा यांच्या ट्रांजिट रिमांडवर न्या. एस मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसंच ही रिमांड ऑर्डर अवैध असल्याचा निर्णय दिला, असा या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)