इंडोनेशिया भूकंप : 'माझा नमाजाला गेलेला भाऊ परत आला नाही'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

इंडोनेशियातील सुलवेसू बेटावर दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपाने निर्माण झालेल्या 6 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात परतल्या आहेत. पण या लाटांनी मागं झालेल्या नुकसानाचं चित्र अजून पूर्णपणे समोर आलेलं नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी 832 लोकांचा बळी गेल्याची माहिती दिलेली आहे. पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतं आहे.

सुलवेसू बेटावरील पालू शहराला या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम अजूनही सुरू आहे.

पालूमध्ये एक हॉटेल कोसळले असून त्यामध्ये 60पेक्षा जास्त लोक अडकले आहेत. या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. पण मोठी अवजारं नसल्याने हे काम कठीण बनलं आहे.

जे लोक वाचले आहेत ते त्यांच्या नातलगांचे मृतदेह दवाखान्यांत आणि शवागृहात शोधत आहेत.

शहरातील रस्ते आणि मोकळ्या मैदानांवर मदतीसाठी कँप सुरू करण्यात आले आहेत. हॉस्पिटल कोसळले असल्याने लोकांवर उपचार करण्यासाठी तात्पुरते तंबू उभे करण्यात आले आहेत.

या भूकंप आणि त्सुनामीचा फटका लाखो लोकांना बसला आहे.

'नमाजला गेलेला भाऊ आला नाही'

त्सुनामीच्या लाटांपासून वाचलेल्या एका व्यक्तींनं सांगितलं, "माझी बायको माझ्या जवळच होती. तिचा हात माझ्या हातात होता. पण लाटेच्या तडाख्यात ती माझ्यापासून दूर गेली. पाणी मला फिरवत होतं. मी कसंबसं स्वतःला सावरून एका दुकानावर चढलो. मला माझ्या बायकोची फक्त पर्स मिळाली."

फरीद नावाची एक महिला सांगते, "माझा भाऊ नमाजला गेला आहे, असं मला सांगण्यात आलं. पण तो अजून परत आलेला नाही. आम्ही सगळे मिळून त्याला शोधत आहोत. अल्लाहच्या मनात काय आहे कुणास ठाऊक?"

मदत कार्य कठीण

या भूकंप आणि त्सुनामीमध्ये रस्ते उखडले आहेत. त्यामुळे मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. पण आम्ही सर्वांन मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी संयम बाळगावा, दोन दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष जोको यांनी दिली आहे.

भूकंपाचं केंद्र असलेल्या डोंगाला शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. इथंही रस्ते उखडल्याने मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)