कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारला दिली 7 दिवसांची मुदत, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाले पक्षाचे प्रवक्ते?

Published
वाचन वेळ: 9 मिनिटे

सोशल मीडिया चळवळ 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या समर्थकांचं जंतरमंतरवरील आंदोलन आता संपलं आहे.

दुपारी सव्वाचारच्या सुमारास अभिजीत दिपके जंतर मंतर वरून बाहेर पडले. "पुढच्या आंदोलनाबद्दल नेमकं काय करायचं याची माहिती घेतोय.", असं ते म्हणाले.

भाषणात त्यांनी म्हटलं की, "5 वाजेपर्यंत जर प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर हे आंदोलन देशभर पसरेल." पुढच्या शनिवारी पुन्हा येणार का असं गर्दीला विचारलं आणि मग गर्दीने जोरदार आवाज केला.

आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "आजचं आंदोलन तर फक्त एक ट्रेलर होतं."

त्यांनी एक्सवर लिहिलं, "मी माझ्या आई-वडिलांना भेटायला घरी जात आहे, त्यांना शेवटचं भेटून एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. गेल्या 15 दिवसांत त्यांना खूप त्रास झाला आहे आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावं लागलं. आता मी त्यांना पुन्हा घरी घेऊन जाणार आहे.

"तुमच्या माहितीसाठी, आजचं आंदोलन फक्त एक ट्रेलर होतं. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद!"

7 दिवसांची मुदत

आंदोलनानंतर पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हीडिओ पोस्टमध्ये सौरभ दास म्हणाले, "तुम्हा सर्वांनी पाहिलं की आज जंतरमंतरवर हजारो लोक जमले आणि त्यांनी शांततेत आंदोलन केलं. या सर्व 'कॉक्रोचेस'चे मनापासून आभार."

तर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, "आज जंतरमंतरवर हजारो लोकांची गर्दी जमल्यानंतरही सरकारकडून आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. पंतप्रधानांनीही अद्याप धर्मेंद्र प्रधानांना पदावरून दूर केलेलं नाही."

"ज्यांना वाटत आहे की आज फक्त एक आंदोलन होतं, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा फक्त ट्रेलर होता. आम्ही या सरकारला सात दिवसांचा वेळ देत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्यात देशाच्या लोकशाहीबद्दल थोडीशी जरी जबाबदारी वाटत असेल तर त्यांनी सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पदमुक्त करावं. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू."

दिवसभरात काय काय झालं?

दरम्यान, सकाळी अभिजीत दिपके दिल्लीत पोहचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यांची भेट घेतली होती. यानंतर अभिजीत दिपके यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या समर्थकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे न येता थेट जंतरमंतरवर येण्याचे आवाहन केले होते.

अभिजीत दिपके आज (6 जून) सकाळी भारतात दाखल झाले. यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तसेच समर्थकांना आवाहन केलं.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितलं होतं.

सकाळी अभिजित दिपके समर्थकांशी बोलताना ते म्हणाले होते, "गेल्या 5 ते 10 दिवसांपासून लोक मला विचारत आहेत की, सोशल मीडिया पेज चालवून काय साध्य होणार आहे. कॅमेरा चालू करा आणि त्यांना दाखवा की, जंतर मंतरवर किती झुरळे त्यांच्या घरातून बाहेर आली आहेत."

यावेळेस अभिजित दिपके म्हणाले होते, "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. या देशात, जेव्हा एखादं मूल या सरकारविरोधात आवाज उठवतं, तेव्हा प्रत्येक आईला अशीच भीती वाटते. आपण या सरकारच्या भीतीमध्ये किती दिवस जगायचं?"

आंदोलनाला किती दिवसांसाठी परवानगी?

'सीजेपी' जंतर-मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीपत्रानुसार, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 6 जूनरोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी देण्यात आली.

कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत शांततापूर्व आंदोलन करण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

'पक्षाचे नाव कोणतेही असो, देश हा पक्षापेक्षा मोठा'

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) कडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

योगेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओत त्यांनी कवी विनोद कुमार शुक्ल यांची कविता वाचत म्हटलं , "मी तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण तुमच्या भावना, संताप आणि उद्दिष्ट समजतो. कॉक्रोच जनता पार्टी, त्यांचे नेते किंवा तुम्हा सर्वांना मी ओळखत नसलो तरी एकत्र चालण्याचा अर्थ मला कळतो. मी तुम्हा सर्वांना सलाम करतो."

"देशातील सर्व विरोधी पक्षांना माझे आवाहन आहे की, आज आपले कर्तव्य एकत्र उभे राहण्याचे आहे. पक्षाचे नाव कोणतेही असो, देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. देश वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे," असं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं.

'दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदाच योग्य काम केलं असावं'

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'ला (सीजेपी) आंदोलनाची परवानगी देण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "सीजेपीला आंदोलनाची परवानगी देऊन दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदा योग्य काम केलं असावं."

"आता पाहायचे आहे की, सोशल मीडियावरील पाठिंबा प्रत्यक्ष मैदानातही ताकदीत रूपांतरित होतो का," असंही त्यांनी नमूद केलं.

'कॉक्रोच' म्हणून हिणवणे योग्य नाही- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे. याबद्दलचे ट्वीट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

"दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना 'कॉक्रोच' म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.

सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!" असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'रोज उघड होणारे घोटाळे गंभीर समस्या'

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विचारपूर्वक पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितलं आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, "देशात परीक्षा प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी आणि रोज उघड होणारे घोटाळे ही गंभीर समस्या बनली आहे. नैसर्गिक संसाधनांची लूट सुरू असून अर्थव्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या हाती सोपवली जात आहे."

प्रशांत भूषण पुढे म्हणाले, "देशाचे परराष्ट्र धोरण कमकुवत झाले आहे आणि अमेरिकेवरील अवलंबित्व वाढत आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, माध्यमे आणि इतर संस्थांची विश्वासार्हताही कमी होत आहे."

"आपण सध्या मोठ्या संकटाच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. कॉकरोच जनता पार्टी हा त्या परिस्थितीतून निर्माण झालेला स्वाभाविक प्रतिसाद आहे. या जेन-झेड आंदोलनाच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याला सुज्ञ पाठिंबा तसेच योग्य दिशा मिळण्याची आवश्यकता आहे," असेही त्यांनी नमूद केले.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार काय म्हणाले?

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

बीबीसीसोबत बोलताना ते म्हणाले, "तरुण मुलांना सगळं समजतं. युवा चिडलेला आहे. त्याच्या मनात जो राग होता, त्याचा उद्रेक झालेला आहे. हे वादळ आणखी किती फोफावतं, हे बघावं लागेल. या आंदोलनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की, ते दाबणं किंवा त्याचं शमन करणं हे सरकारसाठी फार धोकादायक ठरू शकतं."

"आधीच लोकांचा विश्वास उडाला आहे, तो आणखी उडेल. तसेच, आमच्यासारखे जे सिनिअर्स येथे आले आहेत, त्यावरून असं लक्षात येतं की हे आंदोलन जरी युवकांचं असलं तरी यातून जो प्रश्न निर्माण झालाय तो फक्त युवकांचा नाही तर देशातल्या संपूर्ण नागरिकांचा आहे. म्हणून आम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहोत."

सीजेपी हा आम आदमी पार्टीची 'बी टीम' असल्याचा आरोप केला जातोय, त्यावर आपलं मत काय? यावर प्रतिक्रिया देताना कुंभार म्हणाले, "हे घडलं सुप्रीम कोर्टात, झुरळ म्हणाल्यानंतर जो काही उद्रेक झाला त्याला कुणाचाही पाठिंबा असण्याचा काही संबंध नाही. मी देखील इथे एक सामान्य नागरिक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित झालो आहे, कुठल्याही पक्षाकडून नव्हे."

हे आंदोलन यशस्वीरित्या पुढे जाईल का? या प्रश्नाला उत्तर देताना देताना कुंभार म्हणाले, "हो जाऊ शकेल! कारण आयोजकांनी आंदोलन शांततेत पार पडण्यासंबंधी काळजी घेतली आहे."

"कुणी तुम्हाला उचकवलं तरी त्याला बळी पडू नका, असं सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. या मुलांना आपलं पुढचं भवितव्य माहिती आहे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आंदोलन करतील याबद्दल काही शंका नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष यांनी काय प्रतिक्रिया दिली?

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका बीबीसीसोबत बोलताना म्हणाले की, "अभिजीत आरामात जंतर-मंतरवर पोहोचतील, तत्पूर्वी ते पार्लियामेंटरी स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन परवानगी घेणार आहेत. त्यानंतर आम्ही जंतर-मंतरवर शांतीपूर्वक प्रदर्शन करणार आहोत, आणि सर्व गोष्टी कायद्याच्या कक्षेत राहुन पार पडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पोलीसही आम्हाला सहकार्य करत आहेत."

या प्रदर्शनात किती लोक उपस्थित राहतील? परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना आशुतोष म्हणाले की, "आजचा दिवस देशाच्या राजकारणातील महत्वाचा दिवस आहे. देशभरातील युवा आज येथे उपस्थित राहतील, संपूर्ण देश याचा साक्षी राहील."

"दिल्ली पोलिसांचं आम्हाला सहकार्य आहे, परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आम्ही शांततेत प्रदर्शन करणार आहोत. या देशातील युवा पीढीवर विश्वास ठेवा. हा गांधींचा देश आहे, तरुणांना माहिती आहे की शांतीपूर्वक प्रदर्शन कसं करायचं हे तरुणांना माहिती आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अभिजीत दिपके यांचं दिल्लीत आगमन, पहिली प्रतिक्रिया देत काय म्हणाले?

अभिजीत दिपके म्हणाले, "मी दिल्लीत दाखल झालो आहे. जंतर मंतर येथे तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे. पुस्तक आणि आपला तिरंगा सोबत आणायला विसरू नका!"

"करुणा आणि कृतज्ञतेची भावना म्हणून पोलिसांना फुले भेट द्या. आपल्याला ही चळवळ प्रेम आणि शांततेने पुढे न्यायची आहे", असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या 'कॉक्रोच इज बॅक' या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली होती.

या व्हीडिओमध्ये सीजेपीचे प्रवक्ते व पत्रकार सौरव दास म्हणाले होते, "अभिजीत दिपके सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचतील. तिथून ते इतर कार्यकर्त्यांसोबत पार्लमेंट स्ट्रिट पोलीस स्टेशनला जातील. तुम्हा सर्वांना तिथे पोहोचण्याची विनंती आहे."

पोलिसांना आंदोलनाची परवानगी मागून त्यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती.

सौरव दास पुढे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडली जाईल आणि त्यानंतर सर्वजण पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमधून जंतरमंतर मैदानावर जातील.

"आम्ही आमचा विरोध पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने व्यक्त करू आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करू," असंही त्यांनी नमूद केलं होतं.

पंतप्रधान मोदींना आवाहन

सौरव दास यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांना शांतता राखण्याचे आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी, आशुतोष रांका यांनी समर्थकांना सोबत तिरंगा ध्वज, पुस्तकं आणि फुलं आणण्याचं तसेच आपल्या कुटुंबीयांनाही सोबत आणण्याचं आवाहन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत त्यांनी म्हटलं, "तुमचे शिक्षणमंत्री अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामुळं आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अनेक प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोट्यवधी मुलं त्रस्त आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदीजी, कृपया धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून लोकशाहीवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ करा."

पोस्टमध्ये लिहिलं होतं, "6 जून, सकाळी 9 वाजता - भेटूया, झुरळांनो. आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ."

आता या छोट्याशा विनोदाचे चळवळीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. शांततेने आणि प्रेमाने निषेध करण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने एकत्र येण्यास सज्ज व्हा.

पण काय करायचं आणि काय नाही करायचं हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे आहेत!

यापूर्वी, अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, दिल्ली पोलिसांच्या परवानगीशिवाय हे आंदोलन कसे होणार, हे अस्पष्ट आहे.

'मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो. जय भीम.'

दीपके यांनी शुक्रवारी (5 जून) सकाळी एक्सवर भारतात रवाना होत असल्याची माहिती देताना म्हटलं, "मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो. जय भीम."

रवाना होण्यापूर्वी एका व्हीडिओ संदेशात त्यांनी लोकांना दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने जमू नये, अशी विनंती केली. यामुळे सामान्य लोक आणि सुरक्षा यंत्रणांना अडचण होऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं.

त्यांनी सांगितलं की, ते थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणार आहेत.

दीपके म्हणाले, "आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, याची काळजी घ्या."

याआधी गुरुवारी, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेला किंवा अव्यवस्थेचं समर्थन केलं जाणार नाही.

याआधी एका पत्रकार परिषदेत सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं होतं, "अभिजीत दीपके 6 जून रोजी सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासह आपल्या समर्थकांना संसद मार्गावर यावं आणि जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी परवानगी मागावी, असं आवाहन केलं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)