बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धांचे 7 चित्रविचित्र किस्से

एकनाथ शिंदे हे ज्योतिषाच्या भेटीला गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे हे त्यांचे आणि सरकारचे भवितव्य काय हे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात गेले होते, अशी टीका त्यांच्यावर झाली.

ईशानेश्वर मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक खरात हे ज्योतिषी आहेत. त्यांच्याकडून शिंदेंनी मार्गदर्शन घेतले असे म्हटले जात आहे.

सरकार मंत्र-तंत्रात अडकले आहे अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

तर शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री ज्योतिषाला भेटण्यासाठी गेले असं म्हणणे हे अयोग्य आहे.

मात्र, या निमित्ताने राजकारणी आणि त्यांचे भविष्य प्रेम तसेच त्यांचे बाबा प्रेम यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. राज्यातील तसेच देशातील काही गमतीशीर किस्से आपण त्यानिमित्ताने पाहू.

2. संध्या देवनाथन : केमिकल इंजिनिअर झाली मेटा इंडियाची हेड

आंध्र युनिव्हर्सिटी मधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या संध्या देवनाथन आता मेटा इंडिया चीफ आणि व्हाईस प्रेसिडेंट बनल्या आहेत.

व्ही. राजेंद्र प्रसाद हे देवनाथन यांचे मित्र आणि बॅचमेट आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, माझ्यासोबत शिकणाऱ्या संध्याला जे यश आज मिळालंय त्यामुळे माझे इतर बॅचमेट्स देखील खुश आहेत.

व्ही. राजेंद्र प्रसाद सध्या अंकपल्लीच्या एएसके कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहेत.

संध्या देवनाथन पुढच्या वर्षी 1 जानेवारीपासून हा पदभार स्वीकारतील. वाचा त्यांचा जीवनप्रवास कसा राहिला..

3. यंदा सोयाबीन, कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती?

गेल्या वर्षी या दोन्ही पिकांना डिसेंबरच्या काळात चांगला दर मिळाल्यानं यंदाही शेतकरी हीच अपेक्षा बाळगून आहेत.

त्यामुळे सध्याचा मार्केटचा ट्रेंड काय सांगत आहे?

सध्या सोयाबीन आणि कापसाला किती दर मिळत आहे?

तसंच यंदा सोयाबीन-कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती असू शकते?

4. मासिक पाळीत अति रक्तस्राव झाल्यावर काय करावे?

गर्भाशयात मांसल गाठी, गाठी, लसिकाग्रंथी तयार असल्यास किंवा स्त्रीबीज कोशात म्हणजेच ओव्हरीमध्ये सिस्ट निर्माण झाल्यास हार्मोनल दोष तयार होऊन हेवी पिरियड्स होऊ शकतात.

काही वेळेस रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असते तेव्हाही हा त्रास होण्याची शक्यता असते. रक्त पातळ होण्यासारखी औषधं घेतली जात असतील तेव्हाही हेवी पिरियडचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

संसर्ग किंवा औषधांमुळेही हा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी जेवणात हिरव्या पालेभाज्या, बीट असे लोहयुक्त पदार्थ खाणे, दररोज तीस ते चाळीस मिनिटे व्यायाम करणे असे उपाय डॉक्टर सुचवतात. अर्थात रक्तस्राव किंवा पाळीसंदर्भातील सर्व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.

5. अफगाणिस्तान : भुकेनं रडणाऱ्या मुलांना झोपवण्यासाठी मी गुंगीची औषधं देतो

अफगाणी लोक त्यांच्या भुकेल्या मुलांना झोपवण्यासाठी गुंगी आणणारी औषधे देत आहेत. इतर जण जगण्यासाठी त्यांच्या मुली व अवयव विकत आहेत.

 

तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता काबीज केल्यानंतर आणि परदेशी निधी गोठवला गेल्यानंतरच्या दुसऱ्या हिवाळ्यामध्ये लाखो लोक भूकबळी जाण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.

“आमची मुले सतत रडत असतात आणि ती झोपत नाहीत. आमच्याकडे अन्न नाही.” अब्दुल वहाब म्हणाला.

“म्हणून आम्ही औषधांच्या दुकानात जातो, गोळ्या घेतो आणि त्यांना देतो. जेणेकरून त्यांनी गुंगी येईल.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)