संध्या देवनाथन : केमिकल इंजिनिअर झाली मेटा इंडियाची हेड

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी
  • Published

आंध्र युनिव्हर्सिटी मधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या संध्या देवनाथन आता मेटा इंडिया चीफ आणि व्हाईस प्रेसिडेंट बनल्या आहेत.

व्ही. राजेंद्र प्रसाद हे देवनाथन यांचे मित्र आणि बॅचमेट आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, माझ्यासोबत शिकणाऱ्या संध्याला जे यश आज मिळालंय त्यामुळे माझे इतर बॅचमेट्स देखील खुश आहेत.

व्ही. राजेंद्र प्रसाद सध्या अंकपल्लीच्या एएसके कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहेत.

संध्या देवनाथन पुढच्या वर्षी 1 जानेवारीपासून हा पदभार स्वीकारतील.

देवनाथन यांच्यासोबत इंजिनिअरिंग पूर्ण करणारे डॉ. व्ही. राजेंद्र प्रसाद बीबीसीला सांगतात की, संध्याने विशाखापट्टणम स्थित आंध्र युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एमबीए करण्यासाठी तिने दिल्ली गाठलं.

आपल्या जुन्या दिवसांची आठवण सांगताना डॉ. प्रसाद म्हणाले, "आमच्या बॅचमध्ये आम्ही एकूण 86 विद्यार्थी होतो. संध्या सुद्धा आमच्यापैकीच एक होती. ती तिथूनच जवळ असणाऱ्या पेडा व्होल्टेअरमध्ये राहायची. कोर्स पूर्ण झाल्यावर संध्या एमबीए करण्यासाठी दिल्लीला गेली. तिच्यासोबत आमच्या बॅचमधले इतर तीन विद्यार्थी एमबीए करण्यासाठी दिल्लीला गेले."

ते पुढे सांगतात, "यानंतर संध्याने इतर बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं आणि आता ती मेटा इंडियाची चीफ बनली आहे. आमच्या बॅचमधील 60 पेक्षा जास्त विद्यार्थी आज परदेशात नोकऱ्या करत आहेत."

जेव्हा संध्याने पहिल्यांदाच व्हॉट्सअॅपवर रिप्लाय केला होता

डॉ. प्रसाद बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "आज आम्ही सगळेच जण वेगवेगळ्या फिल्डमध्ये काम करतोय. पण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही 2018 मध्ये एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपला आम्ही 'एयू केमिकल इंजिनिअरिंग 1994- 1998' असं नाव दिलं."

त्यांनी पुढे सांगितलं की, "संध्याने ग्रुप तर जॉईन केला होता पण त्यावर कधीच काही पोस्ट केली नव्हती. ना कधी तिने कुठल्या पोस्टवर रिप्लाय केला होता. पण जेव्हा ती मेटा इंडियाची हेड झाली तेव्हा आम्ही सर्वांनी तिला शुभेच्छा देण्यासाठी ग्रुपवर मॅसेज केले, तेव्हा तिने पहिल्यांदा आभार मानण्यासाठी ग्रुपवर रिप्लाय केला होता."

संध्याने शुभेच्छांच्या त्या व्हॉट्सअॅप मेसेजवर काय रिप्लाय केला होता हे डॉ.राजेंद्र यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

डॉ. राजेंद्र सांगतात, "संध्याने आभार मानताना लिहिलं होतं की, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. मी तुमच्या मॅसेजेसना उत्तर देऊ शकले नाही कारण बऱ्याचदा माझा फोन सायलेंट मोडवर असतो. भारतासाठी काम करताना मला खूप सन्मानित झाल्याचं वाटतंय.

री - युनियनसाठी आमंत्रण

डॉ. राजेंद्र सांगतात की, "2015 मध्ये संध्याने एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यात तिने विशाखापट्टणमला आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्याविषयी काहीच अपडेटस नव्हत्या. 2018 मध्ये आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला."

ते सांगतात, "1994- 1998 ची केमिकल इंजिनिअरिंगची बॅच यावर्षी 25 वर्ष पूर्ण करते आहे. त्यामुळे आम्ही री-युनियन फेस्टिव्हलचं आयोजन करण्याचं ठरवलं. याच दरम्यान, आमची बॅच मेट संध्याची मेटा इंडियाची हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे."

डॉ. राजेंद्र सांगतात, "संध्या आता सिंगापूरमध्ये आहे. जानेवारीमध्ये ती भारतात येईल आणि पदभार स्वीकारेल. त्यावेळी आम्ही तिला री युनियन फेस्टिव्हलसाठी बोलावू."

सहा वर्षांत मेटाची इंडिया हेड

संध्या देवनाथन 1 जानेवारी 2023 पासून मेटाच्या व्हाईस प्रेसिडेंट आणि इंडिया हेड अशी जबाबदारी स्वीकारतील. याआधी इंडिया हेड म्हणून काम करणाऱ्या अजित मोहन यांनी राजीनामा दिला आहे. संध्या त्यांची जागा घेतील.

2016 मध्ये संध्या मेटामध्ये नोकरीला लागल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या कामात सातत्य ठेऊन वरच्या पदापर्यंत मजल मारली. संध्या देवनाथन यांच्या नियुक्तीबाबत मेटा इंडियाने एक निवेदन प्रसिद्ध केलंय.

मेटा इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "संध्या देवनाथन कंपनीच्या इंडिया चार्टरचं नेतृत्व करतील. भारतात आपला महसूल वाढावा यादृष्टीने मेटा भारतातील आघाडीचे ब्रँड, निर्माते, जाहिरातदार आणि भागीदार यांच्यासोबत आपली धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवत आहे."

एयुच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातील असोसिएट प्रोफेसर्सने देखील संध्या देवनाथन यांचं अभिनंदन केलं आहे.

देवनाथन यांचं अभिनंदन करताना ते म्हणाले की, "आमच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये शिकलेल्या आणि आता मेटा इंडियाची हेड झालेल्या संध्या देवनाथन यांचं अभिनंदन."