You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपने प्रज्ञा सिंह ठाकूरांचं तिकीट का कापलं? मोदी त्यांच्यावर का नाराज आहेत?
मध्य प्रदेशातील भोपाळमधून लोकसभा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना यावेळी भाजपाने तिकीट दिलेलं नाही.
भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मध्य प्रदेशातील 24 जागांचाही समावेश होता.
या जागांमध्ये भोपाळच्या जागेचाही समावेश होता. तिथे प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याऐवजी माजी महापौर आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली गेली आहे.
नथुराम गोडसेबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तिकीट मिळालं नाही की काय असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. याबाबत मनातून त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असं वक्तव्य त्यावेळी मोदींनी केलं होतं.
प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?
त्या म्हणाल्या, “मी कधीही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. मी फक्त सत्य सांगितलं. राजकारणात राहून सत्य सांगणं चुकीचं असेल तर मला वाटतं की खरं बोलण्याची सवय लावली पाहिजे. जे सत्य आहे ते समाजाला सांगायला हवं.
त्या पुढे म्हणाल्या, “प्रसारमाध्यमातील लोक त्याला वादग्रस्त वक्तव्य म्हणायचे मात्र जनता त्याला सत्य मनते. आमच्या जनतेने मला खरं ठरवलं. विरोधकांच्या हातात कोलीत मिळालं. आमच्या मानकांपेक्षा वेगळा शब्द बोलले असेल तर माननीय पंतप्रधानांना म्हणावं लागलं की मनाने कधीच माफ करणार नाही. त्यासाठी मी आधीच माफी मागितली होती.”
“कोणाला दुखावण्याचा माझा कधीच उद्देश नसतो. पंतप्रधानांना वाईट वाटलं म्हणून ते म्हणाले की मनाने ते कधीच माफ करणार नाही. मला त्यांना दुखावण्याचा अजिबात उद्देश नव्हता. त्यानंतर मी त्यांना कधीच दुखावलं नाही.”
“तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाचा आहे आणि त्यांचा निर्णय सर्वतोपरि आहे. आमच्याकडे पक्ष सगळ्यांत महत्त्वाचा आहे. त्यांचा निर्णय सहज स्वीकारला जातो. आलोक शर्मांना माझ्या शुभेच्छा आहेत. 2019 मध्येही मी तिकीट मागितलं नव्हतं मात्र तेव्हाही तो पक्षाचा निर्णय होता,” त्या म्हणाल्या.
मोदी काय म्हणाले होते?
प्रज्ञा ठाकूरांच्या वक्तव्यावर मोदी म्हणाले होते, “गांधीजी असो वा गोडसे, त्यांच्याबाबत जे बोललं आहे ते अतिशय वाईट आणि घृणास्पद आहे. सभ्य समाजात अशा प्रकारची भाषा योग्य नाही. म्हणून असं करणाऱ्या लोकांना 100 वेळा विचार करावा लागेल. दुसरं म्हणजे त्यांनी माफी मागितली ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्यांना मी मनाने माफ करू शकणार नाही.”
2019 मध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळमधून दिग्विजय सिंह यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. ही लढत रंगतदार झाली होती. कारण एका बाजूला दोनवेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह होते आणि 30 वर्षं भाजपचा गड असलेल्या भोपाळ जागेवर प्रज्ञा सिंह होत्या.
मध्य प्रदेश लोकसभा जागांच्या बाबतीत सहावं मोठं राज्य आहे. एकूण 29 जागांपैकी 10 जागा अनुसुचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. 19 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 2019 भाजपने इथे 28 जागा जिंकल्या होत्या.
नथुराम गोडसेला म्हणाल्या होत्या देशभक्त
खासदार झाल्यावर प्रज्ञा ठाकूर आपल्या कामापेक्षा वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत राहिल्या.
लोकसभेत SPG विधेयकावर चर्चा सुरू होती. डीएमके खासदार ए. राजा यांनी नाथुराम गोडसेच्या एका विधानाचा उल्लेख केला ज्यात ते गांधींना का मारलं याची कारणं सांगत होते. तेव्हा प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “तुम्ही एक देशभक्ताचं उदाहरण अशा पद्धतीने देऊ शकत नाही."
या वक्तव्यावर भाजपने सारवासारव करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरून हटवलं. 2019 मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदीय दलाच्या बैठकीत भाग घेण्यास त्यांना मनाई करण्यात आली होती.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत प्रतिक्रिया दिली होती, “नाथुराम गोडसेंना देशभक्त म्हणणं तर दूरच त्यांचा देशभक्त म्हणून विचार जरी कोणी करत असेल तर आमचा पक्ष त्याची निंदा करत आहे.”
हे विधान संसदेच्या रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलं होतं. विरोधी पक्षांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि प्रज्ञा ठाकुरांवर कारवाईची मागणी केली होती.
“दहशतवादी प्रज्ञा ठाकूर यांनी दहशतवादी गोडसेला देशभक्त म्हटलं. हा संसदेच्या इतिहासातला दु:खद दिवस आहे,” असं राहुल गांधी यांनी त्यावेळी एक्स वर लिहिलं होतं.
या वक्तव्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील दाव्यांवरूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली.
हेटस्पीच आणि हत्यारं ठेवण्याचा सल्ला
कोव्हिड आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या, “गोमूत्र पिण्यामुळे कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो आणि फुप्फुसांचं संरक्षणही होतं. मी आरोग्यासंबंधी काही अडचणींना तोंड देतेय तेव्हा मी तेच घेतलं होतं. त्यानंतर मला कोरोनासाठी कोणतंच औषध घेण्याची गरज नाही.”
खासदार असताना हेट स्पीच देण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. डिसेंबर 2022 मध्ये त्या म्हणाल्या की हिंदूंना त्यांच्या रक्षणासाठी हत्यारं ठेवायला हवीत.
“आपल्या घरी हत्यारं ठेवायला हवेत. अगदीच काही नाही तर भाजी कापायच्या चाकूला धार करून ठेवायला हवी. प्रत्येकाला आत्मरसंरक्षणाचा अधिकार आहे. कोणी आपल्या घरात येऊन हल्ला करत असेल तर त्याचं सडेतोड उत्तर द्यायला हवं,” असं त्या म्हणाल्या.
या वक्तव्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती.
वादग्रस्त विधानांबरोबरच संसदेत त्यांची प्रगती पाहिली असता त्या फार सक्रिय नव्हत्या.
पीआरएस लेजिस्लेटिव्हच्या अहवालानुसार त्यांची लोकसभेत उपस्थिती 66 टक्के होती. इतर खसादारांची ती सरासरी 79 टक्के आहे. त्याच्या तुलनेत ती 13 टक्के कमी आहे. खासदार म्हणून त्यांनी 19 चर्चांमध्ये भाग घेतला. त्यांनी एकही खासगी विधेयक सादर केलं नाही.
खासदार असताना त्यांनी संसदेत फक्त 36 प्रश्न विचारले. इतर खासदारांच्या प्रश्नांची राष्ट्रीय सरासरी 210 आहे.