You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉक्रोच जनता पार्टीचे 3 प्रवक्ते कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेली कॉक्रोच जनता पार्टी आज (6 जून) दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत.
अधिकृत माहितीनुसार, अभिजीत दीपके यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे.
'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आज (6 जून) सकाळी भारतात दाखल झाले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती देत समर्थकांना आवाहन केलं.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, 4 जूनरोजी पार्टीने (सीजेपी) आपल्या 3 प्रवक्त्यांची घोषणा केली होती. पक्षाच्या अधिकृत 'कॉकरोच इज बॅक' या एक्स अकाऊंट वरून करण्यात आलेल्या पोस्टनुसार, हे तिघेही आंदोलनाची भूमिका जनतेसमोर आणि माध्यमांसमोर मांडणार आहेत.
शोध पत्रकार सौरव दास यांच्याकडे मुख्य प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर 'कॉक्रोच इज बॅक'नुसार राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि मॅकेंझी या जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीत काम केलेले आशुतोष रांका हेही पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहणार आहेत.
पक्षाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सीजेपी भारतातील राजकीय चर्चेची दिशा बदलण्यासाठी कटिबद्ध आहे आणि हे काम नव्या पिढीतील नेत्यांच्या माध्यमातून पुढे नेले जाणार आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने नियुक्त केलेले हे 3 प्रवक्ते कोण आहेत, ते जाणून घेऊया.
सौरव दास (मुख्य प्रवक्ता)
कॉक्रोच जनता पार्टीनुसार, "एक्सवरील @SauravDassss या नावाने ओळखले जाणारे सौरव दास हे अनुभवी पत्रकार आहेत.
कायदा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक विषयांवरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी तपास, विश्लेषण आणि वार्तांकन केले आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये इंडिया गेट येथे झालेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दास यांचाही समावेश होता."
कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या माहितीनुसार, सौरव दास यांच्या @SauravDassss या एक्स अकाउंटच्या प्रोफाइलमध्ये अमेरिकन लेखक नॉर्मन कझिन्स यांचं एक प्रसिद्ध वाक्य लिहिलं आहे. त्याचा अर्थ, "मृत्यू ही आयुष्यातील सर्वात मोठी हानी नसते. आपण जिवंत असतानाच आपल्या आत काहीतरी संपून जाणं, हीच खरी मोठी हानी असते."
आपल्या प्रोफाइलमध्ये त्यांनी स्वतःची ओळख शोध पत्रकार तसेच कायदा, न्यायव्यवस्था आणि धोरणविषयक विषयांवर काम करणारे म्हणून करून दिली आहे.
एक्सवर त्यांचे 90,200 फॉलोअर्स आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सौरव दास यांनी एक्सवर लिहिलं, "कॉक्रोच जनता पार्टीत मुख्य प्रवक्ता म्हणून सहभागी होत असल्याने मी खूप उत्साहित आहे. एक क्षण असा येतो, जेव्हा देशातील तरुण पिढीला ते नाराज आणि संतप्त असल्याची जाणीव होते."
"कारण त्यांना चांगल्या भविष्याची आशा दाखवण्यात आली होती. पण ते भविष्य कुठे गेलं, असा प्रश्न विचारल्यावर त्यांची थट्टा करण्यात आली, त्यांना उपदेश देण्यात आला आणि दुर्लक्षित करण्यात आलं. आता तो क्षण आला आहे आणि ही परिस्थिती बदलण्याची वेळही आली आहे."
"आता आम्ही बोलणार. आता देशाचं भविष्य आम्हीच लिहिणार!"
विजेता दहिया
@VijetaDahiya या एक्स अकाऊंटवरील विजेता दहिया यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करताना कॉकरोच इज बॅकने म्हटलं आहे की, "राजकीय संशोधन आणि धोरणात्मक विश्लेषणाचा चांगला अनुभव असलेले विजेता दहिया प्रवक्तेपदाची भूमिका स्वीकारत आहेत."
"ते लेखक, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्माते असून अनेक यूट्यूब क्रिएटर्ससाठी संशोधन आणि कंटेंट तयार करण्याचे कामही त्यांनी केले आहे."
त्यांनी 'पॉवर ऑफ युनिव्हर्स' आणि 'टू हेल विथ दॅट जॉब' ही दोन बेस्ट-सेलिंग पुस्तके लिहिली आहेत.
तसेच, त्यांनी हरियाणवी चित्रपट 'दरारें' आणि 'ओपरी पराई'चे लेखन आणि त्यांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांचे शिक्षण प्रतिष्ठित दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून (डीटीयू) झाले आहे.
विजेता दहिया यांच्या प्रोफाइलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की, "राजकीय लोकशाही टिकून राहण्यासाठी समाजातही खरी लोकशाही म्हणजेच सामाजिक लोकशाही असणं गरजेचं आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे असे जीवन ज्यात स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांचा आदर केला जातो."
'एक्स'वर त्यांचे सुमारे 5 हजार फॉलोअर्स आहेत.
आशुतोष रांका
आशुतोष रांका हे @AshutoshRanka या एक्स हँडलवर सक्रिय आहेत. पक्षाने सांगितले आहे की, "आशुतोष रांका हे पक्षाच्या संचार (कम्युनिकेशन) टीममध्ये सामील झाले आहेत. ते आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत."
"त्यांनी लंडनमध्ये मॅकेंझी अँड कंपनीमध्ये रणनीतिक व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले असून, तिथे त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना त्यांच्या कामकाज आणि आर्थिक रणनीतींबाबत सल्ला दिला आहे."
"ते गेल्या वर्षी भारतात परत आले आणि जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि युवकांशी संबंधित अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले. यामध्ये डोलचा पूर, अमायरा आत्महत्या प्रकरण आणि नीट पेपर लीक प्रकरण यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे."
त्यांच्या एक्स हँडलवर फ्रेंच तत्त्वज्ञ रोमन रोलँड यांचं एक वचन लिहिले आहे. त्याचा अर्थ असा की, 'या जगात असं एकच ठिकाण आहे जिथे माणसांच्या जगण्याशी जोडलेली सर्व स्वप्नं अगदी सुरुवातीपासूनच जपली आहेत, आणि ते ठिकाण म्हणजे भारत.'
'एक्स'वर त्यांचे सुमारे 3 हजार फॉलोवर्स आहेत.
सोनम वांगचूक यांचा मिळाला पाठिंबा
यापूर्वी मंगळवारी (2 मे) कॉक्रोच जनता पार्टीला एका मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा मिळाला होता.
लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे की, जर 5 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर ते 6 जूनला सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होतील. कॉक्रोच इज बॅक या एक्स हँडलवरून त्यांचा हा व्हीडिओ रिपोस्ट करण्यात आला होता.
"प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक हे 6 जून रोजी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होतील," असं त्यात म्हटलं आहे.
याआधी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होतं की, ते 6 जूनला भारतात परत येतील आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील.
अभिजीत दिपके सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी बोस्टन विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)