टीम इंडियाची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावली

Published

चेन्नई इथे झालेल्या लढतीत फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. विजयासाठी मिळालेल्या 270 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 248 धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 फरकाने जिंकली. अॅडम झंपाला सामनावीर तर मिचेल मार्शला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

270 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची स्थिती 197/6 अशी झाली होती. ट्वेन्टी20 क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्या वनडेत शून्यावर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा जोडीने 33 धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. फिरकीपटू अॅडम झंपाने हार्दिकला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 40 धावा केल्या. हार्दिक बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने सामन्याची सूत्रं हाती घेतली. पण झंपाला मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न मार्कस स्टॉइनसच्या हातात जाऊन विसावला. जडेजा बाद होताच ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का झाला. ऑस्ट्रेलियातर्फे झंपाने 4 तर अगरने 2 विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 65 धावांची खणखणीत सलामी दिली. शॉन अबॉटने ही जोडी फोडली. रोहित शर्मा 30 धावा करुन बाद झाला. थोड्या वेळात फिरकीपटू अडम झंपाने गिलला पायचीत केलं. त्याने 37 धावांची खेळी केली.

के.एल.राहुल आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. झंपाने राहुलला अबॉटकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याने 32 धावा केल्या. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजाऐवजी बढती देण्यात आलेला अक्षर पटेल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अर्धशतकासह खेळपट्टीवर स्थिरावलेला विराट कोहली अगरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 54 धावा केल्या.

पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सलग तिसऱ्या वनडेत सूर्यकुमार शून्यावर बाद झाला. दोन चेंडूत दोन खमके फलंदाज तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.

चेन्नईतल्या करो या मरो लढतीत आश्वासक सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. त्यांचा डाव 269 धावांतच आटोपला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने 68 धावांची सलामी दिली. हार्दिकने हेडला कुलदीपकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याने 33 धावांची खेळी केली. काही मिनिटात हार्दिकने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला तंबूत परतावलं. स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. आणखी काही मिनिटात हार्दिकनेच मिचेल मार्शला त्रिफळाचीत केलं. त्याने 47 धावांची खेळी केली. बिनबाद 68 वरून ऑस्ट्रेलियाची अवस्था 85/3 अशी झाली.

मालिकेत पहिल्यांदाच अंतिम अकरात समावेश झालेल्या डेव्हिड वॉर्नरला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. वॉर्नरने 23 धावांची खेळी केली. मात्र कुलदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न हार्दिकच्या हातात जाऊन विसावला.

धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मार्नस लबूशेनही बाद झाला. कुलदीपनेच त्याला बाद केलं. अलेक्स कॅरे आणि मार्कस स्टॉइनस जोडीने सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या स्टॉइनसला अक्षर पटेलला तंबूत धाडलं. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या कॅरेला कुलदीपने त्रिफळाचीत केलं. त्याने 38 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. एकाक्षणी पाहुणे 300चा टप्पा सहज ओलांडतील असं वाटत असताना हार्दिक-कुलदीपसमोर ऑस्ट्रेलियाने शरणागतीच पत्करली.

हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

मुंबईत झालेल्या पहिल्या वनडेत भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांतच आटोपला. भारतीय संघाने अवघड खेळपट्टीवर संघर्ष करत हे लक्ष्य पार केलं.

विशाखापट्टण इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवला. मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा डाव 117 धावांतच आटोपला. मिचेल मार्श-ट्रॅव्हिस हेड जोडीने 11 ओव्हरमध्येच हे लक्ष्य गाठलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)