रिचा चढ्ढाची गलवान ट्वीट प्रकरणी माफी पण...

Published

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने गलवान खोऱ्याशी संबंधित भारतीय सैन्याबद्दल एक ट्विट केलं होतं. या ट्विटवर झालेल्या टीकेनंतर तिने माफी मागितली आहे.

माफी मगितल्यानंतर देखील सोशल मीडियात तिच्याविषयी संताप व्यक्त केला जातोय. ट्विटरवर तिला मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागतंय.

लोक आता तिच्या 'फुकरे 3' या चित्रपटाला विरोध करताना दिसतायत.

रिचाने केलेल्या ट्विटनंतर 'बायकॉट फुकरे 3' असा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

फक्त सामान्य लोकच नाही तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर, केके मेनन आणि रणवीर शौरी यांनी देखील ट्विट करून रिचाच्या या ट्विटचा निषेध केलाय. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश राजसारखे अभिनेते तिच्या बचावाखातर आले आहेत. 

प्रकाश राज ट्विट करून म्हणतात की, या प्रकरणात रिचाची बाजू योग्य असल्याचं मला वाटतं. 

रिचाच्या ट्विटवर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी

अनुपम खेर आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, "देशाविषयी वाईट बोलून लोकांमध्ये लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करणं हे भ्याड आणि छोट्या लोकांचं काम आहे. सैन्याचा सन्मान पणाला लावण्याइतकी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते?"

अक्षय कुमारनेही ट्विट करून रिचा चढ्ढावर टीका केलीय.

अक्षय कुमार त्याच्या ट्विटमध्ये लिहितो की, "हे बघून खूप दुःख होतं. आपण आपल्या सशस्त्र दलांप्रती आभारी असलं पाहिजे. ते आहेत म्हणून आज आपण सर्वजण आहोत."

केके मेनन ट्विट करतात की, "सैनिक आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतात. आपण निदान त्यांच्याप्रती निष्ठा आणि प्रेम तरी ठेवूच शकतो. जय हिंद. वंदे मातरम"

रणवीर शौरीने ट्विट केलंय की, "नाकारलेल्या नेत्यांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या बौद्धिक गटात फिट बसण्यासाठी  सैन्याची खिल्ली उडवणं, एक नागरिक म्हणून मूर्खपणाचं आणि बेजबाबदार कृत्य आहे. आम्ही जवानांचे सदैव ऋणी राहू."

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री लिहितात की, "मला या वृत्तीचे आश्चर्य वाटत नाही. ती खरोखरच भारतविरोधी आहेत. त्यांच्या मनात जे असतं ते ओठांवर आलंय."

रिचाच्या 'फुकरे 3' चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी

रिचाच्या या ट्विटमुळे संतप्त झालेल्या काही युजर्सनी रिचा चढ्ढाच्या 'फुकरे 3' या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचं आवाहनही केलंय.

एक ट्विटर यूजर लिहितो की, "आपल्या सैन्याचं जगभरातून कौतुक होत असतं. आपले सैन्य शूर आहे. 'फुकरे 3' या चित्रपटाला बॉयकॉट करा.

रिलॅक्स मित्रांनो, फुकरे 3 लवकरच रिलीज होईल, पण रिकामे थिएटर रिचा चढ्ढाला हाय करतील. रिचा चढ्ढाच्या गँगला धडा शिकवायलाच हवा. यासाठी फुकरे 3 बॉयकॉट करा कारण यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय चांगला नाही. 

रिचाच्या मदतीला आलेले सेलिब्रिटी

प्रकाश राजसारख्या काही कलाकारांनी रिचाचा बचाव केला. तसेच अक्षय कुमारच्या त्या ट्विटवर खरपूस समाचार घेतला.

प्रकाश राज लिहितात की, "अक्षय कुमार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती... सर तुमच्यापेक्षा रिचा चढ्ढा आपल्या देशासाठी अधिक प्रासंगिक आहे."

या आधीही प्रकाश राज यांनी रिचाच्या गलवान ट्विटवर लिहिलं होतं की, "रिचा आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला काय म्हणायचं आहे ते आम्हाला समजलंय."

नेमकं प्रकरण काय आहे?

खरं बघायला गेलं तर भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, भारतीय सैन्य पीओके परत घेण्यासाठी तयार आहे.

द्विवेदी यांचं हे ट्विट रिट्विट करत रिचा चढ्ढा म्हणाली, "गलवान तुम्हाला हाय करत आहे. (Galwan Says hi)"

काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, "पाकिस्तानने पीओकेमध्ये ज्या कुरापती केल्या आहेत त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तानचे 'अत्याचार' सुरू आहेत. याचीही किंमत त्यांना मोजावी लागेल.

"आम्ही काश्मीरच्या विकासाचं काम सुरू केलंय. मात्र भारतीय सैन्य तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ते गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पोहोचत नाहीत."

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)