शिवाजी महाराजांविषयी पायल रोहतगीचं वादग्रस्त ट्वीट आणि माफीनामा - सोशल

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आपल्या विधानांमुळे कायम वाद ओढवून घेणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी यांनी आता शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

पायल रोहतगी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, की शेतकरी कुटुंबात जन्म घेणं आणि शूद्र असणं हा काही गुन्हा नाही. शिवाजी महाराज क्षत्रिय होते, असं काही लोकांचं म्हणणं आहे, तेसुद्धा ठीक आहे. पण हिंदुंनी त्यांच्या राजाविषयीच्या खऱ्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं?

"शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र शेतकरी कुटुंबात झाला होता. पण नंतर त्यांनी मुंज केली आणि पत्नीसोबत पुनर्विवाह केला, जेणेकरून त्यांना क्षत्रिय होता येईल. मगच ते राजे झाले," असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पायल यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पायल यांच्या ट्वीटला उत्तर देताना मोहन जाधव यांनी लिहिलंय, "शेतकऱ्याचा मुलगा असणं किंवा शूद्र असणं काही गुन्हा नाही. पण तुम्हाला इतिहास माहिती नसेल आणि तुम्ही महापुरुषांविषयी चुकीचं लिहिलं असेल, तर तो मात्र गुन्हा आहे. तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही तो वाचायला हवा."

पायल यांना मराठा आरक्षणाविषयी उत्तर देताना मोहन यांनी लिहिलंय, "आजही बहुतेक मराठा कुटुंबं शेती करतात आणि गरीब आहेत. यामुळे उच्च शिक्षणासाठी मोठी फी भरू न शकणाऱ्या मराठा लोकांसाठी आरक्षणाची मागणी आहे. सध्याच्या आरक्षण पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. त्यांचा तुम्ही अभ्यास करावा."

मनोज साळुंके यांनी लिहिलं आहे, की महाराजांनी कधीच कुठल्या स्त्रीचा अपमान केला नाही. मी त्यांचाच अनुयायी आहे. त्यामुळे तुमचा अपमान अजिबात करणार नाही. तुम्हाला जर महाराजांचा इतिहास माहीत नसेल, तर नका ना जगापुढे आपल्या प्रगल्भ ज्ञानाचं प्रदर्शन मांडू."

पायल रोहतगी यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी केलेल्या टीकेनंतर त्यांनी आपल्या ट्वीटबद्दल माफी मागितली.

त्यांनी म्हटलं, "मी फक्त शिवाजी महाराजांविषयी मला पडलेला एक प्रश्न उपस्थित केला होता. मला ते खालच्या जातीचे आहेत, असं म्हणायचं नव्हतं. पण मला प्रश्न उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाहीये. मी सर्व मराठी लोकांची माफी मागते."

पायल रोहतगी यांच्या ट्वीटनंतर राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी यात उडी घेतली आहे.

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अटक न केल्यास महाराष्ट्र पेटवू, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

"पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा 'बिग बॉस' कोण आहे?" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

"महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पायलनं अपमान केला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी पायल कोणत्याही थराला जाऊ शकते. मात्र, तिच्याकडून छत्रपती शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा 'बिग बॉस' कोण? हे शोधायला हवं," असं त्यांनी म्हटलंय.

तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं की, पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. मुख्यमंत्री पायल रोहतगीवर कारवाई करणार नसतील, तर याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन करेल.

याआधी पायल रोहतगी यांनी राजा राममोहन रॉय यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं.

"राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांची चमचेगिरी करत होते. त्यांनी सती प्रथा बंद केली नाही. त्यांच्या काळात ती बंद झाली होती. त्यांनी फक्त ही प्रथा बंद करण्याचं श्रेय लाटलं."

या ट्वीटनंतरही वाद निर्माण झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)