तुम्ही लहानाचे मोठे कुठे झालात, यावरून ठरतं तुमचं व्यक्तिमत्त्व; पाहा कसं ते

    • Author, मिरियम फ्रँकेल
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

तुमचं संगोपन दुसऱ्या एखाद्या ठिकाणी झालं असतं, तर तुम्ही एक वेगळी व्यक्ती असता का? तुमचं व्यक्तिमत्व वेगळं राहिलं असतं का?

'निसर्ग विरुद्ध संगोपन' या जुन्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचा तुमच्या अस्मितेवर, व्यक्तिमत्वाच्या संदर्भात काय अर्थ होतो, या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये वाढत्या संशोधनाची मदत होते आहे.

कोलकात्याजवळच्या एका लहानशा गावातील दुपारची उष्णतेची वेळ होती. प्रौढ, मोठी माणसं झोपलेली होती. मी आणि माझी चुलत बहीण, मोहरीच्या तेल घातलेले मुरमुरे खात बसलो होतो. त्यावेळेस ती माझ्याकडे वळून म्हणाली, "स्वीडनमध्ये लोक गाय आणि डुक्कर खातात हे खरं आहे का?"

मी त्यावेळेस फक्त 10 वर्षांचा होते. त्या प्रश्नाला उत्तर देताना होकारार्थी मान डोलावताना मला लाज वाटली. "मग ते कुत्रे आणि मांजरसुद्धा खातात का?" तिनं पुढचा प्रश्न विचारला. तो प्रश्न अगदी तर्कसंगत होता. जर तुम्ही चार पायांचा सस्तन प्राणी खात असाल, तर मग इतर प्राणी का नाही खाणार?

माझी आई भारतीय आहे. मात्र स्वीडनमध्येच वाढले. या विषयावर यापूर्वी मी कधी विचार केला नव्हता. त्या काळात शाकाहार दुर्मिळ होता. विशेषकरून युरोपमध्ये तो दुर्मिळ होता. स्वीडनमधील मुलांना गाईकडे अन्न म्हणून पाहण्याची सवय होती. तर दुसऱ्या बाजूला, माझ्या चुलत बहिणीचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम होतं. ती अडचणीत किंवा धोक्यात असणाऱ्या प्राण्यांना वाचवायची. ती अजिबात मांसाहार करत नसे.

मी भारताला भेट दिली, तेव्हा असे अनेक क्षण आले, ज्यात मला जाणवलं की आपण ज्याप्रकारे विचार करतो, एखादी गोष्ट अनुभवतो आणि वागतो, या सर्व गोष्टींच्या जडणघडणीमध्ये संस्कृतीची भूमिका किती मोठ्या प्रमाणात असते.

जर मी भारतातच वाढले असते तर माझी नीतीमूल्यं वेगळी असती का? माझी विनोदबुद्धी वेगळ्या प्रकारची असती का? माझे स्वप्न, छंद आणि आकांक्षा वेगळ्या राहिल्या असत्या का? मी आज जी व्यक्ती आहे मी तशीच राहिले असते का?

यासारख्या प्रश्नांचा वैज्ञानिक आणि तत्वज्ञ सामना करत आहेत. आता अभ्यासाचं एक नवीन क्षेत्र या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा शोध घेत आहे. ते म्हणजे क्रॉस कल्चरल सायकोलॉजी म्हणजे आंतर-सांस्कृतिक मानसशास्त्र.

निसर्ग विरुद्ध संगोपन

एका अर्थानं, प्रत्येक मानवाचा डीएनए अद्वितीय असतो. आपण कुठेही गेलो, तरी या डीएनएची मूलभूत रचना (एकंदर विचार करता) बदलत नाही.

मात्र आपण जे आहोत किंवा असतो ते फक्त डीएनएमुळेच नसतं, असं झियादा अयोरेच म्हणतात. त्या नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठात मानसोपचार-जनुकशास्त्रज्ञ (सायकॅट्रिस्ट जेनेटिसिस्ट) आहेत. त्यांचा जन्म युगांडामध्ये झाला होता. अयोरेच 3 वर्षांच्या असताना कॅनडात गेल्या. त्यांचं बहुतांश आयुष्य यूकेमध्ये गेलं आहे. नंतर काही वर्षांपूर्वी त्या नॉर्वेमध्ये स्थलांतरित झाल्या.

"मी ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या सर्व ठिकाणांनी ज्या विविध मार्गांनी माझ्या दृष्टीकोनावर प्रभाव टाकला, त्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर, मला अंतर्ज्ञानानं असंच वाटतं की या गोष्टींचा माझ्यावर नक्कीच परिणाम झाला असता, प्रभाव पडला असला," असं अयोरेच म्हणतात.

याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी, वैज्ञानिक अशा अभ्यासांचा आधार घेतात किंवा वापर करतात, ज्यात एकसमान जुळ्यांची, ज्यांचे डीएनए जवळपास समानच असतात, तुलना भिन्न जुळ्यांशी केली जाते. या भिन्न जुळ्यांमधील सरासरी निम्मी जनुकीय रचना (जिनोम) समान असते.

अशा प्रकारे, जर एकसमान जुळ्यांमध्ये भिन्न जुळ्यांच्या तुलनेत एखादं वैशिष्ट्य समान असण्याची शक्यता कमी किंवा अधिक असेल, तर त्यावरून असं दिसतं की त्या वैशिष्ट्यावर पर्यावरण किंवा सभोवतालच्या वातावरणापेक्षा जनुकीय रचनेचाच अधिक प्रभाव असतो.

Quote -

"तुमचा डीएनए जरी तोच असता, तरीदेखील जर तुमचा जन्म तैवानमध्ये झाला असता आणि तुम्ही तिथेच लहानाचे मोठे झाले असता, तर त्या स्थितीत तुमचा मेंदू सध्या जसा आहे त्यापेक्षा वेगळा असता" - चिंग-यू हुआंग

व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांमध्ये अनुवांशिकतेचा किती प्रभाव असतो?

जगभरातील 1.4 कोटी जुळ्यांमधील जवळपास 17,000 वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांवर जवळपास 50 वर्षे अभ्यास करण्यात आला. यामध्ये शिक्षण आणि राजकीय मतं, धारणांपासून ते मानसिक आजारांपर्यंतच्या विविध मुद्द्यांचा समावेश होता. या अभ्यासाबाबत 2015 मध्ये एक मोठं विश्लेषण करण्यात आलं. यातून वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला की, अनुवांशिकतेचा सरासरी फक्त 50 टक्के फरकांवर प्रभाव असतो.

"आपण जे आहोत तसे आपण निसर्ग आणि आपलं संगोपन या दोन्ही घटकांच्या संयोगातूनच होतो. त्यातून आपल्या धारण, श्रद्धा आणि संस्कृतींना आकार मिळतो. त्यामुळे असंच कॉम्बिनेशन किंवा संयोग आपल्याला इतर ठिकाणी आढळणार नाही," असं अयोरेच म्हणाल्या.

अर्थात, पर्यावरणामुळे काही वैशिष्ट्यांची जडणघडण इतरांच्या तुलनेत अधिक होते. संशोधनातून असं आढळून आलं आहे की बुद्ध्यांक (आयक्यू) सरासरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुवांशिक असतो.

यात एक पूर्वसूचना अशी आहे की अनुवांशिकतेची बालपणाच्या तुलनेत आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात मोठी भूमिका असते. तर व्यक्तिमत्वातील ढोबळमानानं 40 टक्के वैशिष्ट्यांवर अनुवांशिकतेचा प्रभाव असतो. त्यामुळेच त्यांच्यावर पर्यावरणाचा अधिक प्रभाव असतो.

(याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाच्या मोकळेपणापैकी 40 टक्के भाग तिच्या अनुवांशिकतेमुळे आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण लोकसंख्येतील स्वभावाच्या मोकळेपणातील जवळपास 40 टक्के फरक अनुवांशिकतेमुळे स्पष्ट करता येतो.)

अयोरेच या जरी स्वभावानं बऱ्यापैकी बहुर्मुख किंवा मनमोकळ्या असल्या, तरीदेखील त्यांचं म्हणणं आहे की नॉर्वेमधील वातावरण त्यांना सवय असलेल्या खुल्या आणि मनमोकळ्या वर्तनाला फारसं अनुकूल नाही. उदाहरणार्थ, ओस्लोच्या रस्त्यांवर एखाद्या अनोखळी व्यक्तीशी सहजपणे किंवा उत्स्फूर्तपणे बोललं जाण्याची शक्यता खूपच कमी असते. यामुळे त्यांच्या स्वभावात बदल झाल्याचं त्या सांगतात.

"यूकेमध्ये राहत असतानाची मी आणि आता नॉर्वेमध्ये राहत असलेली मी, तुम्ही जर माझ्या या रुपांमध्ये तुलना केली, तर असं म्हणता येईल की आता मी पूर्वीपेक्षा कमी मनमोकळी राहिले आहे," असं अयोरेच म्हणाल्या.

मात्र त्यांची जनुकीय रचना लक्षात घेता, त्यांचा मनमोकळा स्वभाव कधीही पूर्णपणे नाहिसा होण्याची शक्यता नाही. त्या आजही नकळतपणे, अधिक उत्स्फूर्त संवादांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांकडे, क्रियांकडे ओढल्या जातात.

"आपल्या जनुकीय किंवा अनुवांशिक वैशिष्ट्यांशी सुसंगत वातावरणाचा आपण शोध घेत असतो," असं अयोरेच म्हणाल्या.

याउलट, हे मिश्रण कालांतरानं आपल्या मेंदूची जडणघडण करतं. त्यातून आपला स्वत:चा विकास होतो, आपण जे आहोत तसं घडण्यात मदत होते. जसजसं आपण अनुभव आत्मसात करतो, तसतसं आपल्या चेतासंस्थेतील मार्ग तयार होता आणि दृढ, मजबूत होतात, असं चिंग-यू हुआंग यांना वाटतं. त्या नॅशनल तैवान विद्यापीठात आंतर-सांस्कृतिक मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात की आपल्या जडणघडणीमध्ये संस्कृती हा 'अत्यंत महत्त्वाचा भाग' असतो.

"जर तुम्ही तैवानमध्ये वाढला असता, तर तुम्ही वेगळीच व्यक्ती राहिला असता. जरी तुमचा डीएनए तोच असला तरीदेखील जर तुम्ही तैवान जन्मला असता आणि तिथेच लहानाचे मोठे झाला असता, तर तुमचा मेंदू खूप वेगळा असता," असं त्यांनी मला आत्मविश्वासानं सांगितलं.

'रोममध्ये असताना': आंतर-सांस्कृतिक मानसशास्त्र

व्हिव्हियन विग्नोलेस, ससेक्स विद्यापीठात आंतर-सांस्कृतिक मानसशास्त्रज्ञ आहेत. ते याच्याशी सहमत आहेत.

"मला वाटतं की या विषयाच्या जनुकीय बाजूबद्दल लोक अति-उत्साही होतात. तुमची जनुकीय रचना कशीही असली, तरीदेखील त्या जनुकांना व्यक्त होण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव दिसण्यासाठी, तुम्हाला एका विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते," असं ते म्हणाले.

लोक स्वत:कडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात, याला संस्कृती आकार देते, ही मूलभूत कल्पना आता मानसशास्त्रात चांगलीच प्रस्थापित झाली आहे. तरी 20 व्या शतकाच्या मध्यावर काही मानसशास्त्रज्ञांना मात्र याबाबत आश्चर्य वाटलं होतं, असं विग्नोलेस म्हणाले.

दीर्घकाळापासून वैज्ञानिकांनी असं गृहित धरलं होतं की मानवी स्वभाव किंवा मानसशास्त्र हे वैश्विक स्वरुपाचं असतं. तसंच अमेरिका आणि युरोपमध्ये मानवी वर्तनाबाबत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जगभर लागू पडतात.

मात्र इतर प्रदेशातील मानसशास्त्राचा अभ्यास करून आणि त्यांची तुलना करून, विग्नोलेस आणि इतरांना आढळलं आहे की असं नसतं, वस्तुस्थिती तशी नसते.

उदाहरणार्थ, प्रयोगांमधून दिसून आलं आहे की, पाश्चात्य देशांमधील लोक अधिक व्यक्ती-केंद्रित असतात. ते स्वत:कडे प्रामुख्यानं त्यांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांच्या आधारे पाहतात. उदाहरणार्थ आपण विनोदी, स्मार्ट किंवा दयाळू आहोत. त्याउलट जपानमधील लोक अधिक समूह किंवा समाज-केंद्रित असतात. ते स्वत:ची ओळख त्यांच्या सामाजिक भूमिकांच्या आधारे करून देतात. उदाहरणार्थ, ते वडील आहेत किंवा विद्यार्थी आहेत.

Quote -

"या दृष्टीकोनातून, जरी तुमची स्मृती पुसली गेली, तरीदेखील तुम्ही तीच व्यक्ती राहाल" - फिलिप गॉफ

संस्कृतीचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम

लोकांच्या मेंदूच्या स्कॅनची तुलना करणारा एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये पाश्चात्य लोकांच्या मेंदूचा स्व-जागरुकतेसाठी जबाबदार असलेला भाग स्वत:बद्दल विचार करताना सक्रिय झाला. तर चिनी लोकांमद्ये तोच भाग त्यांच्या आईबद्दल विचार करताना सक्रिय झाला.

अशाच चाचण्यांमध्ये, हुआंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही मुद्दे जाणून घेतले. म्हणजे इंग्लंडमधील वांशिकदृष्ट्या चिनी स्थलांतरितांची मुलं (जे लोक पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, हाँगकाँग, तैवान, व्हिएतनाम आणि मलेशियाच्या विविध भागांमधून इंग्लंडमध्ये आले होते) अधिकाराकडे, स्थलांतरित नसलेल्या इंग्लिश मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं पाहतात का. तसंच ते आयुष्यभर तैवानमध्ये राहिलेल्या मुलांपेक्षा वेगळ्या दृष्टीनं पाहतात का.

या तिन्ही गटांमधील सर्व मुलं त्यांच्या पालकांचं ऐकण्याची शक्यता समान होती. मात्र इंग्लंडमध्ये वाढलेल्या चिनी स्थलांतरितांच्या तुलनेत, तैवानमधील मुलं सुरुवातीला जरी अनिच्छुक असली तरीदेखील पालकांचं म्हणणं ऐकण्याची शक्यता अधिक होती.

हुआंग म्हणतात की, तैवानच्या आणि चीनच्या संस्कृतीत पालकांचा आदर करणं आणि त्यांचं म्हणणं ऐकणं, आज्ञापालन करणं, याला दिलं जाणारं महत्त्व, हे यामागचं कारण असू शकतं. तर ज्या मुलांची कुटुंबं इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाली होती, त्यांच्यावर यूकेच्या संस्कृतीचा प्रभाव होता. त्यामुळे कदाचित ती अधिक व्यक्तीवादी किंवा व्यक्ती-केंद्रित बनली असावीत.

असाच एक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास 2022 मध्ये करण्यात आला. यात 22 देशांमधील व्यक्तिमत्वांमधील स्वभाव वैशिष्ट्यांच्या चाचण्यांची तुलना करण्यात आली. या अभ्यासातून आढळून आलं की ज्या देशांच्या संस्कृतीमध्ये स्वयं-शिस्तीवर अधिक भर दिला जातो त्या देशांमधील लोकांनी कर्तव्यनिष्ठा आणि संघटन या निकषांवर अधिक गुण मिळवले. हे देश म्हणजे अल्बानिया, भारत, जर्मनी, फ्रान्स, हाँगकाँग आणि चीन.

तर अधिक समतावादी, लवचिक आणि व्यक्ती-केंद्रित संस्कृती असलेल्या देशांमध्ये सहमती आणि अनुभवासाठीचा खुलेपणा अधिक प्रमाणात दिसून आला. असे देश म्हणजे कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, यूके, आयर्लंड, नॉर्वे आणि फिलीपिन्स.

संशोधकांच्या हे अलीकडेच लक्षात आलं आहे की, पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्मारकवादी असण्याची शक्यता अधिक असते. यात स्वत:ला एखाद्या स्मारकाप्रमाणे स्थिर आणि अपरिवर्तनीय मानलं जातं, असं विग्नोलेस म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला, पूर्व आशियातील देशांमध्ये, सामान्यपणे आढळणाऱ्या लवचिक संस्कृतीमध्ये स्वत:ला अधिक जुळवून घेणारा, आकार देता येणारा मानलं जातं.

आणखी एक सांस्कृतिक फरक म्हणजे, लोक संदर्भाकडे किती लक्ष देतात. एका अभ्यासात त्यात सहभागी झालेल्या लोकांना पाण्याखालील दृश्यांच्या मालिकेचे वर्णन करण्यास सांगण्यात आलं. त्यातून आढळलं की पाश्चात्य देशांमधून सहभागी झालेल्यांनी वैयक्तिक स्वरुपाच्या वस्तूंवर अधिक लक्ष केंद्रित केलं. तर जपानमधून सहभागी झालेल्या लोकांनी व्यापक संदर्भांवर भर दिला. उदाहरणार्थ, आजूबाजूच्या पाण्याचा रंग किंवा वेगवेगळ्या वस्तू एकमेकांशी कशाप्रकारे संबंधित आहेत.

"पाश्चात्य संस्कृतींमध्ये, विशेषकरून उत्तर अमेरिकेतील संस्कृतीमध्ये लोक एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं श्रेय परिस्थितीऐवजी त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांना देण्याची अधिक शक्यता असते," असं विग्नोलेस म्हणाले.

एखाद्या दंतवैद्याच्या प्रतीक्षा कक्षात, एखादा पाश्चात्य व्यक्ती जेव्हा एखाद्या चिंताग्रस्त दिसणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो, तेव्हा तो व्यक्ती त्याचा दात काढण्याच्या संदर्भात चिंताग्रस्त आहे, असा अर्थ न लावता, पाश्चात्य व्यक्ती त्याच्याकडे एकंदरित चिंताग्रस्त व्यक्ती म्हणून पाहण्याची अधिक शक्यता असते, असं विग्नोलेस म्हणाले.

अर्थात, हे निष्कर्ष नेहमीच सावधगिरीनं स्वीकारले पाहिजेत. कारण या क्षेत्रात भूमिका बजावणारं वर्तन, व्यक्तिमत्व, संस्कृती आणि इतर अनेक प्रभाव यांना वेगळं करणं अतिशय कठीण आहे. तसंच या क्षेत्रात अजून बरंच संशोधन व्हायचं बाकी आहे, असं विग्नोलेस म्हणतात.

उदाहरणार्थ, वाढत्या संशोधनातून दिसून येतं की, व्यक्तीवाद विरुद्ध समूहनाद यांच्यातील पूर्व-पश्चिम असा टोकाचा किंवा परस्परविरोधी दृष्टीकोन ही 'खूपच सोपं करून पाहण्याची' बाब आहे. तसंच यातील अनेक चाचण्यांमध्ये जो समूहवाद दिसून येतो, तो कदाचित संस्कृतीपेक्षा आर्थिक विकासाचंच एक वैशिष्ट्य असण्याची शक्यता आहे, असं विग्नोलेस म्हणतात.

तसंच, एखाद्या देशातील व्यक्तिवादाचं मोजमाप करताना, त्या देशातील विशिष्ट गट किंवा व्यक्तींमधील महत्त्वाच्या फरकांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. या विषयातील अनेक अभ्यास हे, वस्तुनिष्ठ प्रमाणित स्वरुपाच्या चाचण्यांऐवजी लोकांकडून स्वत:हून नोंदवण्यात आलेल्या प्रतिसादांवर अवलंबून असतात. ते नेहमीच अचूक नसतात.

या कोड्याबाबत तत्त्वज्ञानावर आधारित दृष्टीकोन

कदाचित, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आपण तीच व्यक्ती राहू का, हा शेवटी एक तात्विक प्रश्न आहे. हा प्रश्न स्व या संकल्पनेचीच तपासणी, चिकित्सा करणारा आहे.

यासंदर्भात 2020 मध्ये इंग्लिश बोलणाऱ्या तत्त्वज्ञांचं एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातून दिसून आलं की प्रत्येक व्यक्ती हा एक विशिष्ट प्राणी असतो. तो विशिष्ट शुक्राणू आणि अंडी यातून जन्माला आलेला असतो. एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना किंवा स्मृती यातून ती व्यक्ती घडत नसते, या मताला 19 टक्के तत्त्वज्ञांनी पाठिंबा दिला.

"या दृष्टीकोनातून, जरी तुमच्या स्मृती नष्ट झाल्या किंवा पुसल्या गेल्या, तरीदेखील तुम्ही तीच व्यक्ती राहाल," असं फिलिप गॉफ म्हणतात. ते डरहम विद्यापीठात तत्त्वज्ञ आहेत.

त्याचप्रमाणे, जवळपास 14 टक्के लोकांनी अशा सिद्धांतांना पाठिंबा दिला, ज्यात स्व हा जैविक नसून आत्म्यासारख्या एखाद्या गोष्टीत सामावलेला आहे. आपण कुठेही लहानाचे मोठे झालो तरी, त्यामधूनच आपली खरी ओळख निर्माण होते. खरं तर, अभ्यासातून दिसून येतं की अनेक लोकांना वाटतं की त्यांचा एक 'खरा स्व' आहे. जो मूलत: नैतिकदृष्ट्या चांगला आहे आणि ते कुठे आहेत, यावर त्यामध्ये बदल होता कामा नये.

मात्र, एखाद्या व्यक्तीची मूळ ओळख, त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीतून देखील तयार होते, असं इतर तत्त्वज्ञांना वाटतं. या सिद्धांताला सामाजिक रचनावाद (सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम) असं म्हटलं जातं.

यात खरं तर, राजकारणाची देखील भूमिका असते, असं दिसतं. संशोधकांनी याबाबत एक अभ्यास केला. त्यात त्यांनी वेगवेगळी राजकीय मत असलेल्या लोकांना, इतर पुरुषांकडे आकर्षित होणाऱ्या एका ख्रिश्चन पुरुषाच्या नैतिकतेचं मूल्यमापन करण्यास सांगितलं. जे लोक स्वत:ला उदारमतवादी मानत होते, त्यांना वाटलं की तो माणूस त्याच्या खऱ्या स्वभावानुसार वागतो आहे. तर जे लोक स्वत:ला सनातनी किंवा परंपरावादी मानत होते, त्यांना वाटत होतं की तो त्याच्या खऱ्या म्हणजे ख्रिश्चन असण्याच्या वृत्तीविरोधात जातो आहे.

'कदाचित कोणतंही स्पष्ट उत्तर नसावं'

गॉफ यांना स्वत:ला वाटतं की पेशी आणि कणांमध्ये एकप्रकारची 'मूलभूत एकता' असते. चेतना या रचनेतच समाविष्ट असते. त्यामुळेच आपण कुठेही लहानाचे मोठे झालो, तरीदेखील आपण जे आहोत ते त्या रचनेतून ठरत असतं. मात्र जसजसं आपण मोठे आणि परिपक्व होत जातो, तसतसं कालांतरानं यात बदल होत असावा.

"एखादी 'व्यक्ती' किंवा 'मी' म्हणजे काय याच्या या निव्वळ मानवी संकल्पना आहेत," असं गॉफ म्हणतात.

"खूपच वेगळ्या परिस्थितीत असणारी ती व्यक्ती म्हणजे मी असेन की नाही" या प्रश्नाचं कदाचित कोणतंही साध, स्पष्ट उत्तर नसावं, असं ते पुढे म्हणाले.

जे लोक एकापेक्षा अधिक संस्कृतीत लहानाचे मोठे झाले आहेत, त्यांची ही तीव्र भावना असते की माणसांची जडणघडण ही मुख्यत: त्यांच्या सभोवताच्या सामाजिक वातावरणातून झालेली असते. ही भावना त्यांच्या मनातून पुसून टाकणं कठीण असतं.

समजा मी कोलकात्याच्या सीमेवरील त्या गावातच जर माझं सगळं आयुष्य घालवलं असतं तर मी नक्की कोण असते, किंवा काय बनले असते हे नेमकेपणानं सांगता येणं कठीण आहे. तरीदेखील त्याची स्पष्ट चिन्हं किंवा पुरावे दिसून आले असते, असं मला खात्रीनं वाटतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.