'डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या मुलाच्या शिश्नाचा मोठा भाग काढण्यात आला, आता केवळ अंडकोष शिल्लक'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिराज
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(सूचना : या बातमीतील काही माहिती विचलित करू शकते.)
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथे एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप झाला आहे.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 10 वर्षांच्या मुलाच्या जननेंद्रियाचा (शिश्नाचा) काही भाग काढण्याची शस्त्रक्रिया (पेनेक्टॉमी) करावी लागल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.
याप्रकरणी पालकांनी मागील महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
परंतु, तक्रार करून 1 महिना उलटूनही संबंधित डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत मुलाचे पालक, व्यापारी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 7 जुलैला कराईकुडी येथे आंदोलन केले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 'वैद्यकीय सेवेतील निष्काळजी'पणाच्या आरोपांची आरोग्य विभागाचे सहसंचालक चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी बीबीसी तमिळला दिली.
चौकशीचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर संबंधित डॉक्टरांवर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला 10 वर्षांचा मुलगा आहे.
"डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे माझ्या मुलाच्या शिश्नाचा मोठा भाग काढावा लागला. त्यामुळे त्याच्या भविष्यासंदर्भात मोठी चिंता निर्माण झाली आहे," असे मुलाच्या आईने म्हटलं.
बीबीसी तमिळशी बोलताना मुलाच्या आईने म्हटलं, "आमचा एकच मुलगा आहे. त्याच्या शिश्नावर सतत खाज येत होती. त्यामुळे मे महिन्यात आम्ही त्याला कराईकुडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं."
"त्याच रुग्णालयात त्याचा जन्मही झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याच्या शिश्नाच्या पुढील भागाची कातडी (फोरस्किन) शस्त्रक्रियेद्वारे काढली," असं सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "डॉक्टरांनी आम्हाला घाबरण्याची गरज नाही, ही नेहमीची एक साधी शस्त्रक्रिया आहे; पण ती त्वरीत करावी लागेल, असं सांगितलं. आम्ही शस्त्रक्रियेसाठी तयार झालो. 21 मे रोजी माझ्या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली."
"परंतु, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हे कराईकुडी येथील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयातील असल्याचे आम्हाला नंतर सांगण्यात आले," असं त्यांनी नमूद केलं.
त्या म्हणाल्या, "दुसऱ्या दिवशी आम्हाला मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. आठवडाभरात तो पूर्ण बरा होईल, असंही डॉक्टर म्हणाले. पण, घरी आल्यानंतर काही दिवसांतच मुलाच्या शिश्नात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्याला लघवी करतानाही खूप त्रास होऊ लागला."
"मुलाचं शिश्न काळं पडलं होतं. त्याला लघवी करताना असह्य असा त्रास होत होता, तो वेदनेने तडफडत होता. आम्ही त्याला खासगी रुग्णालयात नेलं तेव्हा, शिश्नाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात आलं."
"जिथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्याच डॉक्टरांच्या रुग्णालयात मुलाला घेऊन जाण्यास आम्हाला सांगितलं. आम्हाला या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फिरवलं गेलं," असा आरोप मुलाच्या आईने केला.

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणाल्या, "त्यानंतर दुसऱ्या खासगी रुग्णालयात 27 मे रोजी माझ्या मुलावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. 2 दिवसांमध्ये तो बरा होईल, काळजी करू नका, असं डॉक्टर म्हणाले होते. पण, 28 मे रोजी सकाळी अचानक मुलाला लगेचच मदुराईला घेऊन जाण्यास सांगितलं. संसर्ग वाढल्याचे ते आम्हाला म्हणाले."
"त्यांनी आम्हाला मदुराईतील एका ठराविक रुग्णालयातच मुलाला घेऊन जाण्याचा आग्रह केला. परंतु, आमचा त्यांच्यावरील विश्वास उडाला होता. त्यामुळे आम्ही मुलाला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेलं आणि तिथे त्याला आपत्कालीन विभागात दाखल करून उपचार सुरू केले."
"माझ्या मुलाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या शिश्नाचा भाग काळा पडला असून त्याला संसर्ग झाला आहे. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून शिश्नाचा मोठा भाग काढावा लागेल. तसं केलं नाही, तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो," असं मुलाच्या आईने बीबीसी तमिळला सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मुलाचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं, या विचाराने आम्ही या शस्त्रक्रियेला होकार दिला."
यानंतर, कराईकुडीतील 2 खासगी रुग्णालयांमधील 2 डॉक्टरांविरोधात मुलाच्या पालकांनी 6 जूनला पोलिसांकडे आणि शिवगंगा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत गेल्या महिन्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर यांनी स्पष्टीकरण दिले होते.
ते म्हणाले होते, "मुलावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही सोपी आणि नेहमी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. पण, त्याला आलेली समस्या ही 10 लाख रुग्णांपैकी एकालाच जाणवते. ही दुर्मीळ घटना आहे. ही एक वैद्यकीय दुर्घटना आहे. या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास संबंधित डॉक्टर तयार आहेत."
डॉ. श्रीधर पुढे म्हणाले, "मुलाच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल. मुलाच्या पालकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल वैद्यकीय संघटना खेद व्यक्त करते. मुलाचे संपूर्ण शिश्न काढण्यात आलेले नाही. फक्त त्याचा काही भाग काढण्यात आला असून, प्लास्टिक सर्जरीद्वारे सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रोसर्जरी) करण्यात आली आहे."
या प्रकरणातील कराईकुडी येथील संबंधित खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी फोनवरून संपर्क साधून त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांनी 'याबाबत 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने आधीच स्पष्टीकरण दिले आहे,' असं सांगितलं.
'शिश्नाचा मोठा भाग शस्त्रक्रियेत काढला'
परंतु, मुलाच्या आईने सांगितलं, "तक्रार दाखल केल्यानंतरही खासगी रुग्णालयांकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. माझ्या मुलाच्या शिश्नाचा मोठा भाग काढून टाकण्यात आला. आता केवळ अंडकोष शिल्लक आहे."

"माझा मुलगा अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. तो आता घराबाहेरही पडत नाही. खेळायला गेल्यावर त्याच्या वयाची मुलं त्याची चेष्टा करतात, चिडवतात अशी त्याची तक्रार असते. तो कोणाशीही बोलत नाही आणि नेहमी एका जागी शांत बसून राहतो," असं त्या म्हणाल्या.
"इतक्या लहान वयात या मोठ्या नुकसानाला माझा मुलगा कसा सामोरा जाईल, हेच आम्हाला समजत नाही," असं त्याच्या आई अत्यंत व्यथित होऊन म्हणाल्या.
घेराव आंदोलन
"पोलिसांकडे तक्रार करून 1 महिना उलटला तरी संबंधित डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे 7 जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि व्यापारी संघटनांसोबत मिळून आम्ही घेराव आंदोलन केलं," असं मुलाच्या आईने सांगितलं.
यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिवाजी गांधी म्हणाले, "या मुलाचं भविष्यच अडचणीत आलं आहे. मात्र, अजूनही डॉक्टरांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आम्ही घेराव आंदोलन केलं. परंतु, पोलिसांनी आम्हालाच ताब्यात घेऊन संध्याकाळपर्यंत रोखून ठेवलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "यातील एका डॉक्टरवर यापूर्वीही काही आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण आता अधिक वेळ न लावता गांभीर्याने हाताळले पाहिजे."
या पार्श्वभूमीवर, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांनी केलेल्या घेराव आंदोलनानंतर 10 जुलै रोजी कराईकुडीतील सर्व खासगी रुग्णालयांनी आंदोलन केलं.
डॉक्टर आणि रुग्णालयांना योग्य सुरक्षा मिळावी, या मागणीसाठी त्यांनी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद ठेवून निषेध नोंदवला.
पोलीस काय म्हणतात?
या प्रकरणाबाबत बीबीसी तमिळशी बोलताना दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयेंद्र बिद्री म्हणाले, "या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित प्रकरण असल्याने 'उपचारात निष्काळजीपणा' झाला आहे का, हे आधी निश्चित करावं लागेल."
"याचा निर्णय केवळ पोलिसांच्या तपासातून घेता येणार नाही. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या सहसंचालकांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांची चूक आढळून आल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल," असंही ते म्हणाले.
गव्हर्नमेंट स्टॅन्ली मेडिकल कॉलेजमधील जनरल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. चंद्रशेखर यांनी सांगितलं, "पेनेक्टॉमी म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे शिश्न काढण्याची प्रक्रिया. रुग्णाच्या आजाराच्या स्थितीनुसार डॉक्टर शिश्नाचा काही भाग किंवा संपूर्ण शिश्न काढू शकतात. शिश्नावर परिणाम करणाऱ्या काही आजारांवर उपचार करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते."
ते पुढे म्हणाले, "विशेषतः शिश्नाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. कराईकुडीतील या मुलाच्या बाबतीत शिश्नाला होणारा रक्तपुरवठा थांबणे किंवा गंभीर जिवाणू संसर्गामुळे तेथील पेशी खराब झाल्या असण्याची शक्यता आहे. अशावेळी संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरू नये, यासाठी शिश्नाचा काही भाग काढून टाकावा लागला असेल."
परंतु, या प्रकरणात अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी आरोग्य विभागाचा अहवाल येणं आवश्यक आहे, असे डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























