पोस्टमनने लोकांची पत्रं घरी का लपवून ठेवली? अखेर कुत्र्यामुळे समोर आला प्रकार

पत्रे आणि सेंथिलकुमार (उजवीकडे)
फोटो कॅप्शन, पत्रे आणि सेंथिलकुमार (उजवीकडे)
    • Author, झेवियर सेल्वाकुमार
    • Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

तामिळनाडूतील तिरुप्पूर जिल्ह्यातील वेल्लाकोइल येथील एका पोस्टमनने लोकांना आलेली पत्रे त्यांना न देता अनेक वर्षे स्वतःच्या घरीच ठेवली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित पोस्टमनला निलंबित करण्यात आले आहे. तसेच, ही पत्रे संबंधित पत्त्यांवर पोहोचवण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एक काळ असा होता की, लोक पोस्टमनची आतुरतेने वाट पाहायचे. पोस्टमन प्रेम, मैत्री आणि भावना यांनी भरलेली पत्रे घेऊन यायचा. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयातील प्रवेश किंवा नोकरीच्या संधींसारखे भविष्य बदलवणारी, घडवणारी महत्त्वाची माहितीही पत्रांतून मिळायची.

परंतु, आता सर्व काही डिजिटल झालं आहे. माहितीची देवाणघेवाण ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेचच होते.

आजही केंद्र आणि राज्य सरकारांची अधिकृत पत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, लग्नाची आमंत्रण पत्रिका, शुभकार्यांची पत्रिका आणि कायदेशीर समन्स हे टपाल सेवेद्वारे संबंधित व्यक्तींपर्यंत पाठवले जातात.

कुत्र्याच्या चाव्यामुळे समोर आला पत्रांचा साठा

तिरुप्पूर जिल्ह्यातील वेल्लाकोइल येथे एक टपाल कार्यालय आहे. त्या कार्यालयात 4 पोस्टमन कार्यरत आहेत. त्यात सेंथिलकुमार हा एक आहे.

सेंथिलकुमार नगरपरिषद परिसर आणि आसपासच्या भागात लोकांपर्यंत पत्रे पोहोचवण्याचे काम करत असे. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, तो अनेक वर्षांपासून वेल्लाकोइलच्या काही ठराविक भागांमध्येच पत्रांचे वितरण करत होता.

त्याचं घर कांगायम नगरपालिकेतील थट्टन थोट्टम येथे आहे. त्याच्या घराशेजारी पलनियम्मल यांची रिकामी जागा आहे आणि त्या सध्या त्याच्या समोरच्या घरामध्ये राहतात.

24 जूनला पलनियम्मल या त्या रिकाम्या जागेवर गेल्या. त्यावेळी सेंथिलकुमारने पाळलेले 5 कुत्रे त्यांच्या मागे लागले आणि त्यांना चावण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या.

याची माहिती मिळताच पलनियम्मल यांची मुलगी शिवकामी आणि जावई करुप्पासामी तिथे आले आणि त्यांनी त्यांना उपचारासाठी लगेचच सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी वेल्लाकोइल पोलीस ठाण्यात आणि नगरपालिका कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली.

आता हे उघड झाले आहे की, तो अनेक वर्षांपासून नागरिकांची पत्रे न वाटता साठवून ठेवत होता.

फोटो स्रोत, Handout

फोटो कॅप्शन, आता हे उघड झाले आहे की, तो अनेक वर्षांपासून नागरिकांची पत्रे न वाटता साठवून ठेवत होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

करुप्पासामी पोलीस तिथे गेले असता त्यांना काही आधार कार्डांची पत्रे आणि इतर टपाल आजूबाजूला विखुरलेले दिसले. त्यांनी याची माहिती टपाल विभागाला दिली.

पोस्ट खात्याचे अधिकारी सेंथिलकुमारच्या घरी आले आणि त्यांनी तपासणी केली. त्यावेळी लपवलेली अनेक पत्रे त्यांना सापडली. ही सर्व पत्रे त्यांनी 7 पोत्यांमध्ये भरली. ती सर्व पत्रे तिरुप्पूर मुख्य पोस्ट ऑफिसमधील डिव्हिजनल पोस्ट कार्यालयात नेली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोस्टमन सेंथिलकुमारला ताबडतोब निलंबित करण्यात आले आहे.

बीबीसी तमिळने प्रत्यक्ष वेल्लाकोइलला जाऊन परिस्थिती जाणून घेतली.

सेंथिलकुमार वेल्लाकोइल सब-पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता. हे ऑफिस कांगायम हेड पोस्ट ऑफिस अंतर्गत येते.

बीबीसीने या सब-पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर सुंदरमूर्ती यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

ते म्हणाले, "सेंथिलकुमार येथे पोस्टमन म्हणून काम करत होता. पण त्याने घरी पत्रे जमा करून ठेवली याबाबत आम्हाला कोणतीही तक्रार आली नव्हती."

"तिरुप्पूर डिव्हिजनल पोस्टमास्तर ऑफिसला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येऊन सर्व पत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. सध्या याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे याबाबत मी अधिक काही सांगू शकत नाही."

सेंथिलकुमार ज्या भागात पत्रे वाटायचा त्या भागातून आतापर्यंत कोणतीही तक्रार आली नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितलं, "आमच्याकडे याबाबत आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही."

सेंथिलकुमार दररोज किती पत्रे हाताळायचा आणि नोंदी कशा ठेवल्या जात होत्या? यांसारख्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

लपवून ठेवण्यात आलेली पत्रे

फोटो स्रोत, Handout

फोटो कॅप्शन, लपवून ठेवण्यात आलेली पत्रे

लोक काय म्हणत आहेत?

सेंथिलकुमार ज्या भागात पत्रे वाटायचा त्या भागांची बीबीसीने पाहणी केली. विशेषतः वेल्लाकोइल नगरपालिकेतील मुथूर सलाई, कचेरी वलासू आणि इंदिरा नगर या ठिकाणी भेट दिली.

तिथे बीबीसीने अनेकांशी संवाद साधला. बहुतेक लोकांनी त्याला ओळखतही नसल्याचे सांगितलं आणि त्यांना पत्रे मिळाली नाहीत याबाबत कोणती तक्रारही नसल्याचे ते म्हणाले.

कचेरी वलासू भागातील राज यांनी बीबीसीला सांगितलं, "मी त्याला मागील 4-5 वर्षांपासून ओळखतो. तो कधी कधी पत्त्याबाबत शंका असल्यास विचारायला यायचा. आम्ही शक्य तितकी त्याला मदत करायचो."

"काही दिवस त्याच्यासोबत एक महिलाही मदतीसाठी यायची. त्याच्या घरात इतकी पत्रे सापडली हे आम्हाला सोशल मीडियावरून समजलं."

इंदिरा नगरमध्ये फर्निचरचं दुकान असणाऱ्या वलारमथी म्हणाल्या, "माझ्या माहितीनुसार, तो अनेक वर्षांपासून या परिसरात काम करत होता. आम्हाला कधीतरीच पत्रे येतात आणि तो तीही देत असत."

"आमच्याकडे पत्रे कुरिअरने जास्त येतात, त्यामुळे पत्र किंवा टपाल गायब झाल्याचे आमच्या लक्षात आलं नाही. आमच्या ओळखीतील कोणीही अशा प्रकारची तक्रार केलेली नाही," अशाच प्रकारची मतं इतर अनेक लोकांनीही व्यक्त केली आहेत.

सेंथिलकुमारचे घर असलेली गल्ली
फोटो कॅप्शन, सेंथिलकुमारचे घर असलेली गल्ली

अनेकांना बसला फटका

वकील शिवकामी यांनी सांगितलं की, वेल्लाकोइलमधील 2 वकिलांनी तक्रार केली होती की, त्यांची न्यायालयाशी संबंधित काही पत्रे त्यांना मिळाली नाहीत.

या 2 वकिलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरे वकील विजय यांनी बीबीसीशी संवाद साधला.

विजय यांनी सांगितलं, "तो आमच्या भागाचा पोस्टमन आहे. मागील 6-7 वर्षांपासून आम्हाला अनेक पत्रे मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. विशेषतः आमच्यासारख्या वकिलांसाठी, जेव्हा आम्ही कोणाला रजिस्टर्ड पोस्ट पाठवतो, तेव्हा त्याची पोचपावती मिळणे आणि ती न्यायालयात सादर करणे गरजेचे असते."

पण पोस्टमन सेंथिल अनेकदा ती देत नसत. काही दिवसांनी विचारले तर तो 'सॉरी, मी विसरलो' असं सांगून ती पत्रे देत असत.

विजय यांनी सांगितलं की, आधारकार्ड, पॅनकार्ड, सरकारी पत्रे, पट्टा प्रमाणपत्रे, बँक पासबुक, डेबिट कार्ड यांसारखी अनेक महत्त्वाची कागदपत्रे लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा मोठा फटका बसला असावा. त्यामुळे या प्रकरणाची लोकांमध्ये जाऊन सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी ठामपणे मागणी केली.

वेल्लाकोइल येथील पोस्टमन सेंथिलकुमारच्या घरातून त्याने लोकांना न वाटलेली 7 पोती पत्रे ताब्यात घेण्यात आली. बीबीसीने त्याच्या त्या घरीही प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.

कोइम्बतूरच्या मुख्य रस्त्यावरील थट्टन थोट्टम येथे सेंथिलकुमारचं घर एका गल्लीमध्ये आहे. त्या घरापर्यंत फक्त त्या गल्लीतूनच जाता येतं. गल्लीमध्ये प्रवेश करताच 3 कुत्रे जोरजोरात भुंकत होते, यामुळे भीती वाटते.

सेंथिलकुमारच्या घरातील कुत्र्याने पलनियम्मल यांचा चावा घेतल्यानंतरच हा पत्रे लपवण्याचा प्रकार सर्वांसमोर आला.

24 जून रोजी कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती देताना पलनियम्मल यांनी आपल्या पायावरील जखमही दाखवली.

पलनियम्मल

फोटो स्रोत, Handout

फोटो कॅप्शन, पलनियम्मल

बीबीसीशी बोलताना पलनियम्मल म्हणाल्या, "त्याच्या घराजवळ आमची एक रिकामी जागा आहे. ती स्वच्छ करायला मी गेले होते. तेव्हा सेंथिलकुमारच्या घरातील 5 कुत्रे माझ्या मागे धावत आले आणि त्यांनी मला चावण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका कुत्र्याने माझा चावाही घेतला."

"मी हातातील लोखंडी बादलीने इतर कुत्र्यांना हुसकावून लावलं. पण थोड्याच वेळात मी बेशुद्ध पडले. कुत्र्याच्या चाव्यामुळे आतापर्यंत मला 12 इंजेक्शन्स घ्यावी लागली आहेत. अजूनही रात्री कुत्रे सतत भुंकतात, त्यामुळे आमची झोपही पूर्णपणे होत नाही."

पलनियम्मल यांना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळताच त्यांची मुलगी शिवकामी आणि जावई करुप्पासामी यांनी तिथे धाव घेतली. त्यांनी पलनियम्मल यांना उपचारासाठी लगेचच सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी या कुत्र्यांबाबत नगरपालिका कार्यालयात तक्रार केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नगरपालिका अधिकारी कुत्रे पकडण्यासाठी तिथे आले, पण स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्राणीमित्र असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने फोन करून त्यांना परत पाठवले.

करुप्पासामी यांनी बीबीसीला सांगितलं, "नगरपालिकेचे अधिकारी कुत्रे पकडण्यासाठी आले होते, पण ते कुत्र्यांना न पकडताच परत गेले. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली."

"पोलीस चौकशीसाठी आले असता आमच्या रिकाम्या जागेत आधारकार्ड आणि पॅनकार्डची अनेक पत्रे विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते. काही एटीएम कार्डची पत्रे तर जळालेल्या अवस्थेत होती. मी स्वतः तिरुप्पूर डिव्हिजनल पोस्टमास्तर कार्यालयाला फोन करून तक्रार केली आणि त्यांना पुरावेही पाठवले."

करुप्पासामी पुढे म्हणाले, "कांगायम हेड पोस्ट ऑफिसचे अधिकारी तपासणीसाठी आले असता त्यांना घरात येऊ दिलं गेलं नाही. नंतर पोलीस संरक्षणासह घराची झडती घेतली असता सेंथिलकुमारने मोठ्या प्रमाणात पत्रे जमा करून ठेवली होती. ही पत्रे 7 पोती इतकी झाली. त्यात बहुतांश आधारकार्ड आणि पॅनकार्डसारखी केंद्र सरकारशी संबंधित पत्रं होती."

त्या परिसरात राहणाऱ्या अपर्णा यांनी सांगितलं, "घरात कुत्रे पाळणं ही अडचण नाही. पण त्यांनी पाळलेले सर्व कुत्रे रस्त्यावर अनेक लोकांच्या मागे धावतात आणि त्यांना चावण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून मुलांना रस्त्यावर खेळताही येत नाही."

"पोस्ट विभागाचे अधिकारी येऊन तपासणी करून पत्रे नेल्यानंतरच इतके कुत्रे नेमके कशासाठी पाळले होते, हे लोकांना समजलं. अजूनही त्यांच्या घरासमोर 3 कुत्रे आहेत. त्यामुळे त्या गल्लीत कोणालाही जाता येत नाही."

निवृत्त शिक्षिका वसंता यांनी सांगितलं, "घरात एक कुत्रा पाळणं समजू शकतो. पण त्यांनी 5 कुत्रे पाळले आहेत, त्यामुळे रस्त्यावरील लोकांना नेहमीच भीती असते."

"मी 70 वर्षांची आहे. अनेकदा ते कुत्रे माझ्या मागे लागतात आणि त्यामुळे मला पळावं लागतं. याबाबत मी सेंथिलकुमारच्या पत्नीला विचारलं असता ती माझ्याशी खूप उद्धटपणे बोलली. त्यामुळे मी आता तिच्याशी बोलतही नाही."

लोहार

जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

बीबीसीने सेंथिलकुमारची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली असता त्याचे घर बंद होते. त्याच्याशी मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो नंबर सध्या तात्पुरता बंद असल्याचे समजलं.

दरम्यान, पलनियम्मल यांच्या बाजूने सेंथिलकुमारच्या कुटुंबाने पाळलेल्या कुत्र्यांबाबत वेल्लाकोइल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बीबीसीने वेल्लाकोइल पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष चौकशी केली असता पोलीस उपनिरीक्षक दुरैसामी म्हणाले, "या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पण त्याच्या घरी पत्रे जमा करून ठेवण्यात आल्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या बाबतीत चौकशी केलेली नाही आणि कोणता गुन्हाही नोंदवलेला नाही."

या प्रकरणाबाबत बीबीसी तमिळने तिरुप्पूरचे डिव्हिजनल पोस्टमास्तर पट्टाभिरामन यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, "हे सतत घडलेलं दिसत नाही. त्याने वेळोवेळी काही पत्रे वितरित न करता तशीच ठेवली आहेत. नेमकी किती पत्रे आहेत, याची अद्याप गणना केलेली नाही. परंतु, बहुतेक पत्रे 2022, 2023 आणि 2024 मधील आहेत. अलीकडच्या दिवसांत वितरित करायची कोणतीही पत्रे त्यात नव्हती."

"जर पासपोर्ट किंवा सरकारी नोकरीच्या मुलाखतीची पत्रे यांसारखी महत्त्वाची पत्रे पोहोचली नसती, तर नक्कीच तक्रारी समोर आल्या असत्या. सेंथिलकुमारने न पोहोचवलेल्या पत्रांमध्ये बहुतांश आमंत्रण पत्रे आणि फारशी महत्त्व नसलेली पत्रे होती", असं त्यांनी म्हटलं.

त्यात मोठ्या प्रमाणात आधारकार्ड किंवा पॅनकार्ड संबंधित पत्रं होती, हे मात्र त्यांनी फेटाळून लावलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या पत्रांबाबत लोक तक्रार करत नाहीत अशीच काही पत्रे सेंथिलकुमारने वितरित केलेली नव्हती.

राज

फोटो स्रोत, Handout

डिव्हिजनल पोस्टमास्तर पट्टाभिरामन म्हणाले, "सेंथिलकुमारला पक्षाघाताचा झटका आला होता. तरीही तो कधी कामावर गैरहजर राहिला नाही. तो पत्रांची नोंद करून ती घेऊन जात असत. जी पत्रे त्याला महत्त्वाची वाटत नसत, ती तो घरी ठेवत असत."

"आमच्या प्राथमिक चौकशीत त्याने हेच सांगितलं आहे. पुढील टप्प्यात जर कोणाकडून तक्रार आली, तर आम्ही ती स्वीकारून पुन्हा त्याची चौकशी करू."

ते पुढे म्हणाले की, सेंथिलकुमारच्या घरातून जप्त केलेली सर्व पत्रे योग्य क्रमाने नोंदवली जातील आणि संबंधित लोकांपर्यंत पोहोचवली जातील. त्यानंतर त्या लोकांचं म्हणणंही जाणून घेतलं जाईल.

तसेच, यापूर्वी नागरिकांकडून एखादी जरी तक्रार आली असती, तरी हा प्रकार यापूर्वीच थांबवता आला असता, असेही त्यांनी म्हटलं.

सध्या ही पत्रं संबंधित लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी असिस्टंट डिव्हिजनल पोस्टमास्तर पलानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पलानी यांनी बीबीसीला सांगितलं, "ही पत्रं संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे काम 3 जुलैपासून सुरू झाले आहे. पत्रे साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस येताच सेंथिलकुमारला तात्काळ निलंबित करण्यात आलं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे."

कारवाई केवळ पोस्टमन सेंथिलकुमारवरच नाही, तर त्याच्या विरोधातील तक्रारी असूनही तातडीने चौकशी आणि कारवाई न करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही झाली पाहिजे, अशी मागणी वकील विजय यांनी केली आहे.

बीबीसीशी बोलताना विजय म्हणाले, "त्याने किती पत्रे न पोहोचवता घरी लपवून ठेवली होती, हे आता समोर आलं आहे. याबाबत मी येथील पोस्टमास्तरांकडे तक्रार केली होती. तसेच तिरुप्पूर डिव्हिजनल पोस्टमास्तर ऑफिस आणि चेन्नईतील वरिष्ठ पोस्ट अधिकाऱ्यांकडेही ऑनलाइन तक्रार पाठवली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता झालेल्या या निष्काळजीपणासाठी वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे."

बीबीसीने याबाबत कोईम्बतूरचे रिजनल पोस्टमास्तर जनरल सर्वणन यांना विचारलं असता ते म्हणाले, "सेंथिलकुमारविरोधातील चौकशी नुकतीच सुरू झाली आहे. टपाल सेवेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही असते."

"त्याच्या भागातून यापूर्वी कोणाकडून तक्रार आली होती का, याचीही तपासणी केली जाईल. तक्रार आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल. चौकशी अहवाल आल्यानंतर नेमकी चूक कुणाची आहे, हे स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)