17 वर्षांच्या मुलाच्या पोटावर होते पाय आणि नितंब, AIIMS मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

    • Author, शर्लिन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

दिल्लीतील डॉक्टरांनी एक अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. एका 17 वर्षीय किशोरवयीन मुलाच्या पोटावर जन्मत: लगडून असलेल्या आणि त्याच्याच आधारावर वाढत असलेल्या दुसऱ्या एका शरीराच्या भागाला म्हणजेच 'परपोषी जुळ्या'ला काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

वाढलेल्या अवयवांमुळे या मुलाची अनेक जण चेष्ठा करत असत. या शस्त्रक्रियेमुळे आपला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे अशी प्रतिक्रिया मुलाने दिली.

शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अशाप्रकारच्या शरीराच्या भागाला 'पॅरासायटिक ट्विन' असं म्हणतात.

पॅरासायटिक ट्विन म्हणजे काय ते आणखी थोडं सोप्या शब्दात समजून घेऊ.

पॅरासायटिक ट्विन हा शरीराला जोडून असलेला पण पूर्णपणे न वाढलेला अविकसित स्वरूपाचा भाग असतो. हा भाग त्याच्या वाढीसाठी वा तग धरुन राहण्यासाठी मुख्य शरीराच्या पोषणावरच अवलंबून असतो.

म्हणूनच, त्याला 'परपोषी' म्हणजेच 'पॅरासायटिक' असं म्हटलं जातं.

अशा स्वरूपाचं प्रकरण आढळणं अतिशय दुर्मिळ असतं. अगदीच आकडेवारीसहित सांगायचं झालं तर एका लाखामागे एखादं प्रकरण हे अशा स्वरूपाचं सापडू शकतं.

या प्रकरणातील 'पॅरासायटिक ट्विन'चं स्वरूप कसं होतं?

या 17 वर्षीय किशोरवयीन मुलाच्या पोटावर पाय, नितंब असे भाग होते. त्याच्या छातीच्या बरगड्यांच्या आधारावर हा भाग तग धरुन होता.

या मुलावर दिल्लीतील 'AIIMS' हॉस्पिटलमध्ये दोन तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि हा परपोषी भाग काढून टाकण्यात आला. या शस्त्रक्रियेचं नेतृत्व डॉ. असुरी कृष्णा यांनी केलं.

त्यांनी सांगितलं की, ही शस्त्रक्रिया फारच आव्हानात्मक होती. याचं मुख्य कारण म्हणजे या मुलाचं वय कमी होतं.

डॉ. कृष्णा बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "संपूर्ण जगभरात आजवर वैद्यकीय इतिहासासंदर्भातील जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पॅरासायटिक ट्विन्सवर शस्त्रक्रिया झाल्याची फक्त 40 ते 50 प्रकरणंच नोंदवण्यात आलेली आहेत. या प्रकरणांमध्येही, लहान मुलांवरच शस्त्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत."

अशा प्रकारची प्रकरणं कशी हाताळायची याची माहिती वैद्यकीय इतिहासात पुरेशा प्रमाणात नोंद नसल्यामुळे आम्हा डॉक्टरांच्या टीमला स्वत: कौशल्यावर, माहितीवर आणि अंतर्ज्ञानावर अवलंबून रहावं लागलं, असंही त्यांनी नमूद केलं.

'पॅरासायटिक ट्विन' म्हणजे काय?

जेव्हा मुख्य शरीरावर एखाद्या ठिकाणी दुसरा गर्भ तयार होतो आणि तो विकसित होऊ लागतो तेव्हा अशा प्रकारचा 'पॅरासायटीक ट्विन' तयार होतो.

या 17 वर्षीय किशोरवयीन मुलाच्या पोटावर दोन पूर्णपणे वाढलेले पाय, नितंब आणि जननेंद्रियही विकसित झालेलं होतं.

या सगळ्या वाढीव भागाचं वजन जवळपास 15 किलो इतकं होतं.

हा सगळा भाग या मुलाच्या पोटावर लगडलेला होता.

विशेष म्हणजे, या वाढलेल्या भागाला संवेदनाही होत्या. या पायालाही स्पर्श तसेच वेदनाही जाणवायच्या. या भागाचंही तापमान बदलू शकायचं.

थोडक्यात, हा वाढलेला भाग मुख्य शरीरावरच अवलंबून असल्याने तो शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच कार्यरत होता.

डॉ. कृष्णा यांनी म्हटलं की, या प्रकरणात सर्वांत आधी हा वाढलेला भाग शरीराच्या मुख्य भागाशी कुठे आणि कशाप्रकारे आतून जोडला गेलेला आहे हे तपासण्याचं मुख्य काम आम्ही केलं.

स्कॅनिंग आणि तपासणीनंतर, डॉक्टरांना असं आढळलं की, हा वाढीव भाग मुख्य शरीराच्या छातीच्या हाडाशी (Breastbone) जोडलेला होता.

या वाढलेल्या भागाला छातीशी जोडल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताचा पुरवठा होत होता.

"मात्र, हा वाढीव भाग मुख्य शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांशी जसे की, यकृत अथवा मूत्रपिंडाशी फारसा जोडलेला नव्हता," असंही डॉ. कृष्णा यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, त्यांना या मुलाच्या पोटात एक मोठी गाठ (Cyst) देखील आढळली.

कशी पार पडली शस्त्रक्रिया?

ही शस्त्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली. शस्त्रक्रियेच्या पहिल्या भागामध्ये पॅरिसायटिक ट्विनचा हा अतिरिक्त भाग काढण्यात आला.

त्यानंतर या मुलाच्या पोटात वाढलेली ही गाठ काढण्यात आली.

त्यामध्येही शरीरातील अवयवांच्या आजूबाजूला पसरलेल्या गाठीचा भाग काढण्यात आला.

रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ आणि प्लॅस्टिक सर्जनसह डॉक्टरांच्या पथकाने साधारण अडीच तासांत ही प्रक्रिया पूर्ण केली.

"मुख्य शरीर आणि लगडलेला भाग यांच्यामध्ये सामायिक असलेल्या रक्तवाहिन्या, नसा तसेच उतींना वेगळं करावं लागलं. हे सगळं करताना मुख्य शरीराच्या कोणत्याही भागाला तसेच कोणत्याही महत्त्वाचा अवयवाला नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी लागली."

ही शस्त्रक्रिया करताना, या मुलाचा रक्तदाब धोकादायकपणे फारच कमी झाला होता. कारण, पॅरासायटिक ट्विनकडे 30 ते 40 टक्के रक्त वाहून जात होतं.

मात्र, अशा संभाव्य परिस्थितीसाठी आम्ही आधीपासूनच तयारीत होतो आणि आम्ही तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. सध्या हा मुलगा आरोग्याच्या दृष्टीने सुस्थितीत असून शस्त्रक्रियेनंतर इतर कोणतीही गुंतागूंत निर्माण झालेली नाहीये, असं डॉ. कृष्णा यांनी सांगितलं आहे.

'माझ्यासाठी एक नवं जगच खुलं झालंय'

हा मुलगा मुळचा उत्तर प्रदेशमधील उन्नावचा आहे. अर्थातच, त्याच्या पोटावर लगडलेल्या वाढीव शरीरामुळे त्याच्याकडे लोक विचित्र नजरेने पहायचे. अनेक जण त्याच्या माघारी त्याच्याविषयी उलटसुलट चर्चा करायचे तसेच त्याची चेष्टाही करायचे.

लोकांच्या विचित्र नजरा आणि होणारी चेष्टा या सगळ्याचा परिणाम त्याच्या मानसिक स्थितीवर होत होता.

त्यातून तो अधिकाधिक एकलकोंडा आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालला होता.

"मला कुठेही प्रवास करता यायचा नाही तसेच कोणतंही शारीरिक काम देखील करता यायचं नाही," अशी प्रतिक्रिया या मुलाने 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

या सगळ्यामुळे इयत्ता आठवीनंतर आपल्याला शाळाही सोडावी लागली असल्याचंही या मुलानं सांगितलं आहे.

आता शस्त्रक्रियेनंतर आपण उत्साही असून पुढचं आयुष्य इतर लोकांसारखंच सक्रियपणे घालवण्याची इच्छा असल्याचं या मुलाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

"चांगलं शिक्षण घेऊन नोकरी मिळण्याची मला आशा आहे. माझ्यासाठी एक नवं जगच खुलं झालं आहे," असंही हा मुलगा सांगतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)