महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ; हा नेमका प्रकार काय?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ दिसल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एक गरोदर महिला शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

सोनोग्राफी केल्यानंतर संबंधित महिलेच्या पोटात जे बाळ आहे, त्या बाळाच्याही पोटात बाळ दिसून आलं.

सदर महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती बुलढाणा आरोग्य विभागानं बीबीसी मराठीला दिली.

नेमकं काय घडलं?

बुलढाणा जिल्ह्यातील एक 32 वर्षीय महिला गरोदरपणाच्या 8 व्या महिन्यात सोनोग्राफीसाठी शासकीय रुग्णालयात आली.

तिथं तपासणीनंतर या महिलेच्या पोटात जो गर्भ आहे, त्या गर्भातही एक गर्भ असल्याचं दिसून आलं.

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या टीमनं पुन्हा सोनोग्राफी केली, तेव्हाही बाळाच्या पोटातील गर्भ स्पष्टपणे दिसून आला.

बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. भागवत भुसारी यांनी या घटनेविषयी बीबीसी मराठीला माहिती दिली.

डॉ. भुसारी यांनी सांगितलं, "सदरील महिलेच्या पोटात बाळ असल्याचं आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं सोनोग्राफी चाचणीनंतर लक्षात आलं. तसं पाहिलं तर याला बाळ म्हणता येत नाही, कारण ते गर्भाचं मांस (fetus mass) असतं. एकप्रकारे तो मांसाचा गोळा असतो. ते जिवंत बाळ नसतं, त्याचं हृदय धडधडत नसतं. फक्त ते दिसायला बाळासारखं असतं म्हणून त्याला बाळ म्हटलं जातं.

"या गोळ्याला रक्ताचा पुरवठा होत असतो म्हणून त्याची वाढ होत असते. वैद्यकीय भाषेत याला Fetus in Fetu असं म्हटलं जातं."

बुलढाणा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचं डॉ. भुसारी यांनी सांगितलं.

संबंधित महिलेची डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता असून डिलिव्हरीनंतरच बाळाच्या पोटातील गोळा कसा काढायचा, याबाबत ठरवलं जाईल, असं डॉ. भुसारी यांनी पुढे सांगितलं.

Fetus in Fetu म्हणजे काय?

महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, वैद्यकीय भाषेत याला Fetus in Fetu (गर्भातील गर्भ) असं म्हटलं जातं.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, Fetus in Fetu ही एक दुर्मिळ आणि जन्मजात विसंगती आहे. यामध्ये बाळाच्या शरीरात एक अविकसित गर्भ तयार होतो.

साधारणपणे पोटात जे बाळ वाढीच्या अवस्थेत असतं, त्या बाळाच्या पोटामध्ये एका गाठीच्या रुपात हा गर्भ दिसून येतो. पण त्याची वाढ ही बाळाच्या वाढ ज्या पद्धतीने होते, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने होत असते.

सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर सांगतात, "Fetus in Fetu या स्थितीतली बाळं ही जुळी बाळं असतात. पण त्यापैकी एकात काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे ते वाढत नाही आणि मग ते दुसऱ्या बाळाच्या पोटात जातं. पण यात घाबरण्यासारखं काही नाहीये. बाळाच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्या पोटातला गोळा काढून टाकला जातो."

छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला सांगतात, "Fetus in Feto या स्थितीत बाळाच्या पोटात गोळा असतो, पण त्याची बाळाप्रमाणे वाढ होत नाही. बाळासारखे टिश्यूज म्हणजे केस, दात, डोळे त्या गोळ्यामध्ये सापडतात. शस्त्रक्रिया करुन किंवा दुर्बिणीद्वारे तो गोळा काढता येतो. यादरम्यान बाळाला काही धोका नसतो. केवळ गोळा पोटातून काढला जातो."

Fetus in Fetuचं प्रमाण अत्यंत दुर्मिळ असून दर 5 लाखांत एक घटना अशी आढळते.

Fetus in Fetu ची जगभरात 200 पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेल्याचंही नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या वेबसाईटवरील संशोधनात म्हटलंय.

उपचार काय?

Fetus in Feto (गर्भातील गर्भ) या अवस्थेवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते आणि गर्भ काढून टाकल्यानंतर रुग्ण बरा होतो.

डॉ. नंदिता पालशेतकर सांगतात, "गरोदर महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात बाळ असेल, तर ते साधारणपणे 14 आठवड्यांनंतरच्या सोनोग्राफीमध्ये दिसून येऊ शकतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचं पोट दुखत असल्यास, त्याला मळमळ झाल्यास किंवा उलटी आल्यास ते त्रास देऊ शकतं. अशावेळी बाळाला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केल्यास याबाबतचं निदान करता येऊ शकतं."

गरोदरपणाच्या काळात महिलांची सोनोग्राफी टेस्ट केली जाते, त्यावेळेस गर्भातल्या गर्भाबाबत लक्षात येऊ शकतं. तसंच बाळाच्या जन्मानंतर त्याचं पोट फुगलेल्या अवस्थेत दिसलं, तर त्यावेळीही सोनोग्राफीच्या माध्यमातून Fetus in Feto ची अवस्था दिसून येते.

भारतात याआधीही समोर आली प्रकरणं

Fetus in Fetu च्या अवस्थेत बहुतेकदा बाळाच्या पोटात एकच गर्भ आढळून आला आहे. पण, काही केसेसमध्ये एकापेक्षा जास्त गर्भ असल्याचंही समोर आलं आहे.

भारतात याआधीही Fetus in Fetuची काही प्रकरणं समोर आली आहेत. एप्रिल 2023 मध्ये, बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये एका 14 दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या बाळाच्या पोटातून 3 गर्भ काढण्यात आले होते.

या बाळाला जन्मापासूनच पोटदुखी, कावीळ आणि श्वसनाचा त्रास होता. बाळाला दवाखान्यात अॅडमिट केल्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर मग ही Fetus in Fetu ची केस असल्याचं स्पष्ट झालं.

या तीन गर्भांनी बाळाचे मूत्रपिंड आणि पित्तनलिकेच्या जागेत बदल झाला होता. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हे 3 गर्भ काढून टाकण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

2022 मध्ये, बिहारच्या मोतीहारी इथे एका 40 दिवसांच्या बाळाच्या पोटात गर्भ विकसित होत असल्याचं दिसून आलं होतं.

बाळाचे पोट फुगल्यामुळे आणि तो व्यवस्थित लघवी करू शकत नसल्यामुळे बाळाचे पालक त्याला दवाखान्यात घेऊन आले होते. तिथल्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन केल्यानंतर बाळाच्या पोटात गर्भ असल्याचं स्पष्ट झालं होतं.

त्यानंतर त्या नवजात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तब्येत स्थिर असल्याकारणानं त्याला घरी पाठवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

पश्चिम बंगालच्या कोलकात्यातही ऑक्टोबर 2024 मध्ये Fetus in Fetu ची केस समोर आली होती.

एका 3 दिवसांच्या बाळाच्या पोटात 2 जुळे गर्भ असल्याचं यावेळी आढळून आलं होतं. हे गर्भ काढून टाकण्यासाठी या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा मृत्यू झाला होता.

आम्ही आतापर्यंत Fetus in Fetu च्या काही केसेस बघितल्या आहेत. पण, यावेळी पहिल्यांदा नवजात बाळाच्या पोटात जुळे गर्भ असल्याचं आम्ही पाहिलं. यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत अवघड गेलं, असं दवाखान्यातील डॉक्टरांनी सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)