You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईसह महाराष्ट्रातही आंदोलन तीव्र, आदित्य ठाकरेंनी आंदोलनातूनच लावला दिपकेंना फोन
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन अजून सुरूच आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथे आजही (शुक्रवार) तीव्र आंदोलन करण्यात आले. मुंबई, नागपूर येथे आंदोलक युवक मोठ्या संख्येने आले होते.
मुंबई येथील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे, मनसे युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
'लाठीचार्ज करणाऱ्यांचे 'फ्रेंड' होणार का?'
यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांसमोर भाषण केलं. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, असं आवाहन त्यांनी आंदोलक युवकांना केलं.
"हे देशाचं आंदोलन आहे. अभिजित दिपके, सोनम वांगचूक यांच्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. आपण सर्वजण त्यांच्यासाठी उभे आहोत.
सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवलं आहे, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. इथले लोक पंतप्रधानांना दिसले पाहिजे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी देशातील युवकांना 'फ्रेंड्स' (मित्र) म्हणून संबोधलं होतं.
"लाठीचार्ज करणाऱ्यांचे, अश्रू धूर सोडणाऱ्यांचे, पेपर फोडणाऱ्यांचे, संविधानावर अत्याचार करणाऱ्यांचे, हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का?", असा सवाल त्यांनी आंदोलकांना केला.
देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्यामध्ये न राहता परदेशात जाणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का, असा सवालही त्यांनी केला.
रॅलीत सहभागी झालेल्या आंदोलकांच्या हातात तिरंगा, पंतप्रधान मोदींवर टीका करणारे बॅनर्स होते. त्यांच्याकडून केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात 'जब जब मोदी डरते है, पुलिस को आगे करते है', 'राजीनामा द्या', अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलकांमध्ये महिलांची संख्याही मोठी होती.
नागपुरात सीजेपीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद
नागपूरमधील संविधान चौकातही सीजेपीच्या आंदोलनात युवक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा निर्धार आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केला.
या आंदोलनात नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदीची आई नीलम चतुर्वेदी याही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सरकारवर टीका केली.
नीलम चतुर्वेदी म्हणाल्या की, "ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना न्याय मिळायला पाहिजे, नाहीतर हे आंदोलन असंच सुरू राहील. नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्यांनी पेपर फोडले त्यांना फाशी व्हायला पाहिजे."
"लाठीचार्ज सरकारवर झाला तर त्यांना कसं वाटेल. नेता निवडून आम्हाला काय मिळालं? आमच्या मुलांचे जीव गेले. पेपर लीक होऊ नये, मुलांचे जीव जाऊ नयेत. सरकारला काहीच करायचं नसेल तर आमची मुलं तरी परत आणून द्या," असं त्यांनी म्हटलं.
आमच्या घरी कोणीच आलं नाही. आमची साधी विचारपूसही केली नाही. न्याय मिळाला नाहीतर, या आंदोलनात आपण रोज येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, नागपुरात मागील 2 दिवसांत 200 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरूवारी दिवसभर लहान-लहान गटाने तरुण संविधान चौकात जमत होते. एका गटाला ताब्यात घेतलं की दुसरा गट यायचा. रात्रीपर्यंत एकूण 150 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. बुधवारी 50 जणांना ताब्यात घेतलं गेलं होतं. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं. दिल्ली येथील 'संसद चलो' आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी निषेध केला.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हीडिओवरही आंदोलक विद्यार्थ्यांनी भाष्य केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.