You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
200 लिटर तेलात दोन थेंबही ठरू शकतात घातक? 'या' वनस्पतीच्या तेलामुळे 6 जणांचा मृत्यू
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"दोन आठवड्यांत माझ्या आई-वडिलांसह आमच्या कुटुंबातील 6 जणांवर मी अंत्यसंस्कार केले. आता माझ्यात अजिबात हिंमत उरलेली नाही."
वडील, आई, पत्नी, दोन बहिणी आणि भावाला गमावल्याचे दुःख अनुज महतो यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील सिक्का गावात एकाच कुटुंबातील 6 जणांचा 'एपिडेमिक ड्रॉप्सी' (Epidemic Dropsy) या आजारामुळे मृत्यू झाला.
पलामू जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अनिल कुमार श्रीवास्तव यांनी या मृत्यूंचे कारण स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, "मोहरीच्या तेलामध्ये 'आर्गेमोन मेक्सिकाना'ची (Argemone Mexicana-मराठीत सत्यनाशी किंवा पिवळा धोतरा) भेसळ झाली होती. हे भेसळयुक्त तेल जेवणात वापरल्यामुळे या कुटुंबाला एपिडेमिक ड्रॉप्सी आजार झाला आणि त्यातच त्या सर्वांचा मृत्यू झाला."
काही दिवसांच्या अंतराने वडील, मोठी बहीण, भाऊ, लहान बहीण, पत्नीचा मृत्यू
19 जून रोजी कुटुंबात सर्वात आधी कुटुंबाचे प्रमुख कुलदीप महतो यांचे निधन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनुजची बहीण आणि कुलदीप महतो यांची मोठी मुलगी बबिता कुमारी हिचा मृत्यू झाला.
आपले वडील आणि बहीण यांच्या निधनाची बातमी ऐकताच बंगळुरूमध्ये काम करणारे अनुज महतो आपल्या मूळ गावी परत आले.
"माझ्या वडिलांना आणि मोठ्या बहिणीला शेवटचे पाहू शकलो नाही, याचे दुःख आयुष्यभर राहील. मी फक्त त्यांच्या अंत्यसंस्कारांचे विधी करू शकलो. पण त्यांच्या पाठोपाठ माझी पत्नी, लहान बहीण, भाऊ आणि आई सुद्धा मरण पावतील, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती" असं अनुज महतो म्हणाले.
अनुज महतो यांची 18 वर्षांची बहीण इंदू कुमारी 26 जूनला आणि अनुज यांची पत्नी श्वेता देवी 28 जूनला रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयात मरण पावले.
बहीण आणि पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने खचलेले अनुज आपल्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन घरीच थांबले.
त्यांची बहीण मनीता देवी या त्यांच्या आई आणि भावावर उपचार सुरू असलेल्या रिम्स रुग्णालयात थांबून राहिल्या.
यानंतर 29 जून रोजी अनुज यांचे भाऊ नकुल महतो यांचा मृत्यू झाला. तर 8 जुलैच्या सकाळी त्यांच्या आई लाखो देवी यांनीही प्राण सोडले.
फक्त एकच जण आजारातून वाचले
या कुटुंबात जे लोक आजारी पडले होते त्यापैकी फक्त सुनील महतो हे एकटेच यातून बरे झाले. आईच्या अंत्यसंस्काराला आले असताना त्यांचा पाय अजूनही सुजलेला असल्याचे सर्वांना दिसत होते. त्यांचे डोळे पिवळे झाले होते.
"मी आता ठीक आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात काही दिवस मला मळमळल्यासारखे वाटत होते. उलट्या झाल्या. त्यानंतर अशक्तपणा जाणवू लागला. नंतर माझ्या पायांना सूज आली आणि शौचातून रक्त पडू लागले. तेव्हा माझ्या मेव्हण्यांनी मला पलामू सदर रुग्णालयात दाखल केले," असे सुनील महतो म्हणाले.
सुनीलचे मेव्हणे दीपक देव वर्मा यांनी सांगितले की, सुरुवातीला घरातल्या लोकांना मळमळ होत होती. उन्हाळ्यामुळे किंवा उष्णतेमुळे असे होत असावे असे वाटून त्यांनी लिंबू पाणी आणि थंड गोष्टी खाणे-पिणे सुरू केले. परंतु त्यानंतर सर्वांच्या पायांना सूज आली.
खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वांवर उपचार करण्यात आले. परंतु मूळ आजार नेमका कोणता आहे हे कोणालाही ओळखता आले नाही, असे ते म्हणाले.
मोहरीच्या तेलात 'आर्गेमोन मेक्सिकाना'ची भेसळ झाल्याचे सिद्ध
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 29 जून रोजी अनुजच्या घरातून मोहरीच्या तेलासोबतच पीठ, डाळी, तांदूळ आणि पाणी यांचे नमुने तपासणीसाठी नेले होते, अशी माहिती सिव्हिल सर्जन अनिल कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
"सर्व रुग्णांमध्ये सुरुवातीला उलट्या, शौचातून रक्त पडणे, पायांना सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसून आली होती. हे पाहून मला खाद्यपदार्थांवर, विशेषतः मोहरीच्या तेलावर संशय आला. घराच्या दुसऱ्या भागात आर्गेमोनचे तेल सापडल्याने माझा संशय आणखी बळावला,' असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
"मी मोहरीसोबतच बाकीच्या सगळ्या पदार्थांची तपासणी करून घेतली. तेव्हा मोहरीमध्ये आर्गेमोनची भेसळ झाल्याचे निष्पन्न झाले. नमुने गोळा करत असताना मला समजले की, या भागातील प्रत्येक घरात गायी आणि बैलांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आर्गेमोनच्या तेलाचा वापर केला जातो," असे अनिल कुमार यांनी सांगितले.
घरातील अन्नपदार्थांची दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी सिव्हिल सर्जन यांच्यामार्फत मेडिकल कॉलेजच्या बायोकेमिस्ट्री लॅबमध्ये करण्यात आली. तर दुसरी तपासणी स्टेट फूड टेस्टिंग लॅबमध्ये करण्यात आली.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार जीवासाठी अतिशय घातक समजले जाणारे आर्गेमोन तेल या खाण्याच्या पदार्थांमध्ये सापडल्याचे लॅब रिपोर्टमध्ये सिद्ध झाले आहे.
ते म्हणाले, "मला आधीपासूनच संशय होता की हे एपिडेमिक ड्रॉप्सीचेच प्रकरण आहे. मोहरीच्या तेलात आर्गेमोनची भेसळ झाल्यानेच त्या कुटुंबातल्या 6 लोकांचा जीव गेला. हे दोन्ही अहवालांतून स्पष्ट झाले आहे.
यानंतर गावातील इतर लोकांच्या आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी सिक्का गावात एक अन्न सुरक्षा पथक पाठवण्यात आले.
त्यांनी सांगितले की, तिथल्या 195 कुटुंबांतील 1,378 लोकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात आली. यातील 56 लोकांचे रक्ताचे नमुने तपासले गेले. पण सुदैवाने त्यांच्यात ड्रॉप्सीचे कोणतेही लक्षण आढळले नाही.
'हा संसर्गजन्य रोग नाही'
"एपिडेमिक ड्रॉप्सी हा काही संसर्गजन्य आजार नाही.. आर्गेमोन मिश्रित मोहरीचे तेल खाण्यात आल्यामुळे हा आजार होतो," असे अनिल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.
त्यांनी मोहरीचे तेल बाजारातून विकत घेतले नव्हते तर स्वतः पिकवलेल्या मोहरीपासूनच घरी तेल तयार केले होते, असे त्या कुटुंबाचे म्हणणे आहे.
"आर्गेमोनच्या बिया मोहरीच्या दाण्यांपेक्षा आकाराने जरा मोठ्या असतात. त्यामुळे त्या मोहरीमध्ये कशा काय मिक्स झाल्या, याचे नक्कीच आश्चर्य वाटते," असे अपोलो हॉस्पिटलच्या माजी आहारतज्ज्ञ आणि अन्न सुरक्षा तज्ज्ञ निवेदिता शर्मा म्हणाल्या.
"मोहरीच्या तेलात कटैला (आर्गेमोन मेक्सिकाना) बियांचे तेल मिसळले होते असे सगळे जण म्हणत आहेत. मी सुद्धा तेच तेल वापरले होते. मग.. मला काहीच कसे झाले नाही?" असा सवाल मनीता देवी यांनी विचारला.
"यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, तिच्या शरीरात गेलेल्या आर्गेमोन मेक्सिकानाचे प्रमाण कदाचित कमी असावे. किंवा पचनशक्ती चांगली असल्यामुळे तिच्या शरीराने तो त्रास सहन केला असावा. अशा परिस्थितीत दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता कमी असते," असे निवेदिता शर्मा म्हणाल्या.
"आजाराची बातमी ऐकल्यानंतर मनीता अक्का येथे आली आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उपचारासाठी आपल्या गावी घेऊन गेली. त्यानंतर ती बराच काळ रिम्स (RIMS) रुग्णालयात होती. त्यामुळे तिने ते तेल कमी प्रमाणात खाल्ले असावे," असे मनीता देवी यांच्या घराशेजारी राहणारे दीपक मेहता म्हणाले.
आर्गेमोन मेक्सिकाना म्हणजे काय?
कटैला म्हणूनही ओळखली जाणारी आर्गेमोन मेक्सिकाना ही गडद हिरव्या रंगाची असते. ही काटेरी पाने आणि पिवळी फुले असलेली एक जंगली वनस्पती आहे. मराठीत त्याला काटेधोतरा किंवा पिवळा धोतरा म्हणतात.
या वनस्पतींच्या बियांपासून निघणाऱ्या तेलामध्ये 'सांग्विनेरिन' (Sanguinarine) नावाचा विषारी पदार्थ असतो.
जेव्हा हे आर्गेमोनचे तेल मोहरीच्या तेलात मिक्स होते तेव्हा जेवणातून हे सांग्विनेरिन माणसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाते आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना खूप मोठे नुकसान पोहोचवते.
या दुष्परिणामाला 'एपिडेमिक ड्रॉप्सी' (Epidemic Dropsy) म्हटले जाते, असे अन्न सुरक्षा तज्ज्ञ निवेदिता शर्मा यांनी सांगितले.
"200 लिटर मोहरीच्या तेलामध्ये जर फक्त दोन थेंब जरी आर्गेमोनचे तेल मिसळले गेले, तरी ते तेल पोटात गेल्यावर माणसाच्या शरीरात लगेच एपिडेमिक ड्रॉप्सीची लक्षणे दिसू लागतात," असे त्यांनी सांगितले.
या स्थितीत फुफ्फुसांना सूज येते आणि रक्तवाहिन्या सुकतात किंवा आकुंचन पावतात, अशी माहिती त्यांनी दिली.
"हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा झाला नाही तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही तर या घातक परिणामांमुळे किडनी रक्त साफ करण्याचे काम बंद करते आणि त्यामुळे किडनी पूर्णपणे फेल होऊ शकते," असे निवेदिता शर्मा म्हणाल्या.
"2011 नंतर भारतात नोंदवले गेलेले एपिडेमिक ड्रॉप्सीचे हे पहिलेच प्रकरण आहे. याआधी 2011 च्या सुरुवातीला पंजाबच्या फतेहगढ परिसरात एका कुटुंबाला एपिडेमिक ड्रॉप्सी आजार झाला होता," असे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले.
या गंभीर आजारामुळे यापूर्वी देखील लोकांचा मृत्यू झाला आहे. 1998 मध्ये दिल्लीत सुमारे 3,000 लोकांमध्ये एपिडेमिक ड्रॉप्सीचे निदान झाले होते ज्यापैकी 60 लोकांचा मृत्यू झाला होता.
आपल्या कुटुंबातील 6 जणांना गमावल्यानंतर अनुज महतो आपल्या मुलासह आणि भावासोबत घरात मागे राहिले आहेत. त्या कुटुंबाने अलीकडेच एक नवीन घर बांधले होते परंतु त्याचे प्लास्टरिंग अजून बाकी होते.
आपल्या घराच्या अंगणात बसलेली मनीता देवी आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या आपल्या आई-वडिलांच्या घराच्या सध्याच्या परिस्थितीमुळे खूप काळजीत आहे.
आपल्या भावाच्या लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी तिच्या वडिलांनी आधीच कर्ज घेतले होते आणि आता कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी देखील कर्ज काढावे लागले, असे तिने सांगितले.
अनुज समोरील सर्वात मोठे आव्हान आता हे कर्ज परत फेडणे हेच आहे.
कर्ज आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर पलामूचे जिल्हा दंडाधिकारी (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) दिलीप प्रताप सिंग शेखावत यांनी प्रतिक्रिया दिली. "त्या कुटुंबाला आर्थिक भरपाई दिली जाईल. तसेच बाधित कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली जाईल," असे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले.
भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आर्गेमोन मेक्सिकानाच्या दुष्परिणामांबद्दल गावागावांमध्ये जनजागृती केली जाईल, असेही शेखावत यांनी सांगितले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.