You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्टेंट बसवल्यावरही हार्ट अटॅकचा धोका असतो का? अँजिओप्लास्टीनंतर लैंगिक संंबंध, व्यायाम, तपासण्यांबद्दल डॉक्टर काय सांगतात?
हृदयासंबंधी काहीही समस्या असेल तर जितकी माहिती आपल्याकडे उपलब्ध असते तितकेच गैरसमजही असतात.
बऱ्याचदा अँजिओप्लास्टी करुन स्टेंट बसवला म्हणजे आपला हृदयविकार बरा झाला अशी एक भावना मनात येते. मात्र स्टेंट काही हृदयविकारासाठी कारणीभूत असणारी मूळ प्रक्रिया थांबवत नसतो. स्टेंट फक्त रक्तवाहिनीत तयार झालेला अडथळा दूर करत असतो.
म्हणूनच रुग्णांनी आणि एकूणच सर्वांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मेद म्हणजे चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचण्याची प्रक्रिया शरीरातील इतर रक्तवाहिन्यांमध्ये सुरू राहू शकते.
त्यामुळे अँजिओप्लास्टी झाल्यावरही रुग्णाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागणार असते. स्टेंट वापरला म्हणजे सगळी चिंता मिटली, आता कसंही वागलं तरी चालेल असं नसतं.
उलट, स्टेंट बसवलेल्या रुग्णांमध्ये भविष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं.
हृदयविकाराचा झटका आलेल्या किंवा स्टेंट बसवलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा इतर हृदयविषयक गुंतागुंत होण्याचा धोका सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असतो.
हा धोका कमी करण्यासाठी एलडीएल कोलेस्टेरॉल, रक्तदाब, रक्तातील साखर, वजन आणि मूत्रपिंडांचं कार्य यांवर नियमित लक्ष ठेवणं आवश्यक असतं.
यासोबतच औषधं नियमित घेणं, मद्य आणि तंबाखूला पूर्णपणे दूर ठेवणं, नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं.
त्यासाठीच अँजिओप्लास्टीनंतर रुग्णांनी नेमकं काय करावं, कोणत्या तपासण्या नियमित कराव्यात आणि कोणती लक्षणे धोक्याचा इशारा देऊ शकतात? याची माहिती आपण इथे घेणार आहोत.
स्टेंट म्हणजे नक्की काय असतं?
अँजिओप्लास्टी दरम्यान बसवली जाणारी स्टेंट ही एक अतिशय बारीक, जाळीसारखी धातूची नळीसदृश रचना (mesh tube) असते.
कोरोनरी रक्तवाहिनीत ब्लॉकेजमुळे निर्माण झालेला अरुंद भाग फुग्याच्या (balloon) मदतीने रुंद केल्यानंतर त्या ठिकाणी स्टेंट बसवला जातो.
रक्तवाहिनी पुन्हा अरुंद होऊ नये आणि हृदयाकडे रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी आधार देणं हे त्याचं काम असतं.
आजकाल बहुतेक ठिकाणी ड्रग-एल्युटिंग स्टेंट (Drug-Eluting Stent - DES) वापरले जातात. या स्टेंटवर विशिष्ट औषधांचे आवरण असतं. हे आवरणं रक्तवाहिनीच्या आतील थराची अतिरिक्त वाढ कमी करण्यास मदत करतं आणि पुन्हा अरुंद होण्याचा धोका कमी करतं.
मात्र स्टेंट हा हृदयविकारावरील कायमस्वरूपी उपचार नाही. तो केवळ ब्लॉकेज असलेल्या भागावर उपचार करतो. त्यामुळे स्टेंट बसवल्यानंतरही कोलेस्टेरॉल नियंत्रण, रक्तदाब, मधुमेह, व्यायाम, आहार आणि औषधे याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.
तज्ज्ञांच्या मते, स्टेंटचे यश केवळ तो बसवण्यात नसून त्यानंतरच्या दीर्घकालीन फॉलो-अप आणि जीवनशैलीतील बदलांवर अवलंबून असतं.
स्टेंट बसवला म्हणजे हृदयविकार बरा झाला का?
अँजिओप्लास्टीबाबतचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे स्टेंट बसवल्यानंतर हृदयविकार पूर्णपणे बरा होतो. प्रत्यक्षात स्टेंट हा केवळ एका विशिष्ट ठिकाणी झालेला अडथळा दूर करतो. मात्र रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया थांबलेली नसते.
त्यामुळे स्टेंट बसल्यानंतरही भविष्यात नवीन ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात किंवा इतर रक्तवाहिन्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात.
याच कारणामुळे कार्डिओलॉजिस्ट 'सेकंडरी प्रिव्हेन्शन'वर भर देतात. म्हणजेच दुसरा हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणं.
यामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल ठराविक लक्ष्यापर्यंत आणणं, रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, मधुमेह असल्यास त्यावर योग्य उपचार करणं आणि डॉक्टरांनी दिलेली रक्त पातळ करणारी तसेच कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे नियमित घेणं यांचा समावेश होतो.
अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, अंजायना आणि ओपन हार्ट सर्जरी म्हणजे नेमकं काय?
हृदयविकारांबाबत बोलताना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, अंजायना आणि ओपन हार्ट सर्जरी हे शब्द वारंवार ऐकायला मिळतात. मात्र अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये या संज्ञांबाबत गोंधळ असतो. या चारही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्यांचा उद्देशही वेगळा असतो. त्यांच्यामधला फरक माहिती असणं आवश्यक आहे.
अंजायना (Angina):
हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यामुळे छातीत दडपण, जडपणा, दुखणं किंवा अस्वस्थता जाणवण्याला अंजायना म्हणतात. हा स्वतंत्र असा आजार नसून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये अरुंदपणा किंवा ब्लॉकेज असल्याचा इशारा असू शकतो. चालणं, जिने चढणं किंवा श्रम करताना ही लक्षणं वाढू शकतात.
अँजिओग्राफी (Coronary Angiography):
ही एक निदान करणारी चाचणी (diagnostic test) आहे. हातातील किंवा मांडीजवळील रक्तवाहिनीतून एक बारीक नळी (catheter) टाकून कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये रंगद्रव्य (contrast dye) सोडलं जातं आणि एक्स-रेच्या मदतीने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का ते पाहिलं जातं. अँजिओग्राफीमुळे ब्लॉकेजचे स्थान आणि तीव्रता समजू शकते.
अँजिओप्लास्टी (Angioplasty):
अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज आढळल्यास काही रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टी केली जाते. यामध्ये ब्लॉकेज असलेल्या ठिकाणी छोटा फुगा (balloon) फुगवून रक्तवाहिनी रुंद केली जाते आणि बहुतांश वेळा तिला उघडी ठेवण्यासाठी स्टेंट बसवला जातो. हा उपचार रक्तप्रवाह सुधारण्यासाठी केला जातो.
ओपन हार्ट सर्जरी / बायपास सर्जरी (CABG):
जेव्हा ब्लॉकेज अनेक ठिकाणी असतात, खूप गंभीर असतात किंवा अँजिओप्लास्टी हा योग्य पर्याय नसते, तेव्हा बायपास सर्जरीचा विचार केला जातो. या शस्त्रक्रियेत शरीरातील इतर रक्तवाहिन्यांचा वापर करून ब्लॉकेजला वळसा घालणारा नवीन रक्तप्रवाहाचा मार्ग तयार केला जातो. बायपास सर्जरी ही ओपन हार्ट सर्जरीच्या प्रकारांपैकी एक असून सर्वसामान्य भाषेत तिला ओपन हार्ट सर्जरी म्हटलं जातं." असे म्हटलं जातं.
थोडक्यात सांगायचं झालं तर, अंजायना हे लक्षण आहे, अँजिओग्राफी ही निदानासाठीची चाचणी आहे, अँजिओप्लास्टी हा उपचार आहे आणि बायपास सर्जरी हा अधिक जटिल ब्लॉकेजवरील शस्त्रक्रियेचा पर्याय आहे.
अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी आपल्या पुढच्या आयुष्यात कोणते नियम पाळणं गरजेचं आहे तसंच रुग्णानं आणि रुग्णाच्या कुटुंबीयांनी कोणत्या शंकांचं निरसन करुन घेतलं पाहिजे याबद्दल आम्ही डॉ. परिन संगोई यांच्याशी चर्चा केली. डॉ. संगोई मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्स येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. बीबीसी मराठीच्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत.
अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी कोणत्या तपासण्या कराव्यात आणि आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं? असं विचारल्यावर डॉ. परिन संगोई म्हणाले, "तपासण्यांचं वेळापत्रक प्रत्येक रुग्णाच्या आरोग्याची स्थिती आणि रुग्णाला असलेल्या जोखमीनुसार बदलतं. मात्र काही गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणं आवश्यक आहे."
"रक्तदाबाची नियमित तपासणी करावी. कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे सुरू केल्यानंतर किंवा त्यामध्ये बदल केल्यानंतर काही महिन्यांनी लिपिड प्रोफाइल तपासावं आणि नंतर परिस्थिती स्थिर झाल्यानंतर ठराविक अंतराने तपासणी करावी. मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी नियमित करावी."
"विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा आधीपासून मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी किडनी फंक्शन टेस्ट महत्त्वाची असते. याशिवाय वजन, कंबरेचा घेर आणि जीवनशैलीच्या सवयींचेही प्रत्येक फॉलो-अपमध्ये मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अनेकदा या गोष्टी प्रयोगशाळेतील तपासण्यांइतक्याच दीर्घकालीन परिणामांवर प्रभाव टाकतात."
ज्यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, अशा रुग्णांसाठी LDL कोलेस्टेरॉलचे लक्ष्य किती असावे? हा एक प्रश्न नेहमीच येतो.
याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. परिन संगोई सांगतात, "ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, त्यांना हृदयविकाराचा धोका अत्यंत जास्त असतो. अशा रुग्णांसाठी LDL कोलेस्टेरॉलची पातळी 55 mg/dL पेक्षा कमी ठेवणे हे उद्दिष्ट असावे. तसेच सुरुवातीच्या पातळीच्या तुलनेत किमान 50 टक्के घट साध्य करण्याचाही प्रयत्न करावा.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हृदयासाठी हितकारक आहार, नियमित व्यायाम आणि प्रभावी कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे यांचा समन्वय आवश्यक असतो. LDL कोलेस्टेरॉल जितके कमी राहील, तितका भविष्यातील हृदयविकाराच्या झटक्याचा किंवा इतर हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंतीचा धोका कमी होतो."
अँजिओप्लास्टीनंतर सर्व रुग्णांना नियमितपणे ECG, 2D इको, TMT, CT अँजिओग्राफी किंवा पुन्हा अँजिओग्राफी करणे आवश्यक असते का? कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत हे कसे ठरवले जाते? असं विचारताच डॉ. परिन संगोई म्हणाले, "फॉलो-अपदरम्यान करावयाच्या तपासण्या रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय तपासणी आणि एकूण जोखमीच्या आधारे ठरवल्या जातात. त्या केवळ नियमितपणे करण्याची आवश्यकता नसते."
"रुग्णाच्या स्थितीनुसार ECG आणि 2D इकोकार्डिओग्राफी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात घट झाल्याची लक्षणं दिसल्यास स्ट्रेस टेस्ट (TMT) करण्याचा विचार केला जातो."
'रुटिन' कधी सुरू करायचा सल्ला दिला जातो?
यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर CT अँजिओग्राफी किंवा पुन्हा कोरोनरी अँजिओग्राफी नियमितपणे करण्याची शिफारस केली जात नाही. छातीत पुन्हा वेदना होणे, लक्षणं वाढणं किंवा तपासणीदरम्यान काही संशयास्पद निष्कर्ष आढळल्यासच या तपासण्यांचा विचार केला जातो.
अँजिओप्लास्टी झाल्यावरही रुग्णानं स्वतःमध्ये काही वेगळी लक्षणं जाणवतात का याकडे सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
त्यातही छातीत वेदना होत असतील तर त्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, असं डॉ. आनंद राव सांगतात. डॉ. आनंद राव हे मुंबईच्या पी.डी. हिंदुजा आणि एमआरसी हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट- इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
ते सांगतात, जर रुग्णाला अँजिओप्लास्टीच्या आधीसारख्याच छातीत वेदना जाणवत असतील तर त्यांनी त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असते. हे लक्षण कदाचित एखाद्या अंतर्गत समस्येचं निदर्शक असू शकतं आणि त्याला तात्काळ वैद्यकीय तपासणीची गरज असू शकते.
बीबीसी मराठीशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि अँजिओप्लास्टीनंतरच्या काळात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली.
प्रश्न- रुग्णानं अँजिओप्लास्टीनंतर 'रुटिन' कधी सुरू करावं?
डॉ. आनंद राव- अँजिओप्लास्टीनंतर रुग्ण कधी काम, प्रवास, व्यायाम आणि इतर दैनंदिन कामे पुन्हा सुरू करू शकतात याचे उत्तर मुख्यतः हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर, विशेषतः डाव्या निलयाच्या (Left Ventricular) कार्यक्षमतेवर अवलंबून असते.
जर हृदयाचे कार्य सामान्य असेल, तर बहुतेक रुग्ण एका आठवड्यापासून दहा दिवसांच्या आत पुन्हा कामावर जाऊ शकतात. त्यांना साधारणपणे नियमित चालण्यापासून सुरुवात करण्याचा आणि हळूहळू अधिक नियमित व्यायामाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.
प्रवास देखील याच कालावधीत साधारणपणे सुरक्षित मानला जातो. मात्र, जर रुग्णाच्या हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी असेल किंवा डाव्या निलयाचा इजेक्शन फ्रॅक्शन (Left Ventricular Ejection Fraction) कमी असेल, तर त्याच्या पुनर्वसनासाठी अधिक वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते.
अशा रुग्णांनी संरचित कार्डियाक रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि व्यायाम, प्रवास किंवा इतर दैनंदिन कामे पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रश्न- अँजिओप्लास्टीनंतर लैंगिक संबंधांचं काय? असा प्रश्न रुग्णांच्या मनात येतो, त्याबद्दल काय सांगाल?
डॉ. आनंद राव- अँजिओप्लास्टीनंतर लैंगिक संबंध पुन्हा सुरू करण्याचा कालावधी मुख्यतः हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर अवलंबून असतो.
जर हृदयाचे कार्य सामान्य असेल, तर बहुतेक रुग्ण प्रक्रियेनंतर सुमारे 10 ते 15 दिवसांनी सुरक्षितपणे लैंगिक संबंध पुन्हा सुरू करू शकतात. मात्र, हृदयाची पंपिंग क्षमता कमी असल्यास, रुग्णांनी प्रथम कार्डियाक रिहॅबिलिटेशन किंवा देखरेखीखाली फिजिओथेरपी करून आपल्या हृदय-रक्तवाहिन्यासंबंधित तंदुरुस्तीत सुधारणा करावी. त्यांनी लैंगिक संबंध पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
जर हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी राहिली, तर स्थिती अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईपर्यंत अधिक शारीरिक श्रम होतील अशी लैंगिक क्रिया टाळावी.
प्रश्न- ताण, चिंता, नैराश्य आणि पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची भीती यांचा पुनर्वसनावर कसा परिणाम होतो आणि रुग्णांनी कोणती मदत घ्यावी?
डॉ. आनंद राव- हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आणि पुनर्वसनाच्या काळात ताण, चिंता आणि नैराश्याचा अनुभव येणे सामान्य आहे.
मानसोपचारतज्ज्ञ, कार्डियाक फिजिओथेरपिस्ट आणि पुनर्वसन तज्ज्ञांचे मार्गदर्शन समाविष्ट असलेला सुनियोजित असा पुनर्वसन कार्यक्रम रुग्णांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे सावरण्यास महत्त्वाची मदत करू शकतो.
याशिवाय, उपचार करणाऱ्या हृदयरोगतज्ज्ञांशी नियमित सल्लामसलत करणे, प्रश्न विचारणे, शंका दूर करणे आणि मार्गदर्शन घेणे यामुळे रुग्णांना त्यांच्या स्थितीबाबत अधिक चांगले आकलन होऊ शकते, आत्मविश्वास वाढू शकतो आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते.
प्रश्न- अँजिओप्लास्टी झालेल्या प्रत्येक रुग्णाला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी एकच सल्ला द्यायचा असेल, तर तो काय असेल?
डॉ. आनंद राव- अँजिओप्लास्टी झालेल्या प्रत्येक रुग्णासाठी सर्वांत महत्त्वाचा सल्ला म्हणजे दीर्घकालीन हृदयाच्या आरोग्याबाबत कटिबद्ध राहणं. यामध्ये डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घेणं, नियमित व्यायाम करणं, कोलेस्टेरॉलची पातळी तपासत राहाणं, हृदयासाठी हितकारक आहाराचं पालन करणं, धूम्रपान आणि अतिमद्यपान यांसारख्या अपायकारक सवयी टाळणे आणि हृदयरोगतज्ज्ञांकडे नियमित फॉलो-अपसाठी जाणं यांचा समावेश होतो.
नियमित रक्ततपासण्या आणि वेळोवेळी आरोग्याचं मूल्यमापन करणे देखील आवश्यक आहे. या गोष्टी आयुष्यभराच्या सवयी म्हणून अंगीकारल्यास भविष्यातील हृदयविकाराच्या घटनांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि एकूण हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
अँजिओप्लास्टीनंतरच्या पुनर्वसनात व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र, तो हळूहळू सुरू करणं आणि रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता, लक्षणं आणि इतर आजार लक्षात घेऊन त्याचा आराखडा ठरवणं आवश्यक असतं. नवी मुंबई इथल्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रशांत पवार यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्याचा सल्ला देतात.
डॉ. पवार सांगतात, " डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतर साधारणपणे आठवड्यातून पाच दिवस दररोज सुमारे 30 मिनिटे वेगाने चालणे किंवा तत्सम मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आठवड्याला किमान 150 मिनिटांचा व्यायाम पूर्ण होतो. याशिवाय, हलक्या स्वरूपाचे स्नायू बळकट करणारे व्यायाम आठवड्यातून दोनदा करता येतात. मात्र व्यायामादरम्यान छातीत दुखणे, असामान्य श्वास लागणे, चक्कर येणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित वाटणे अशी लक्षणे दिसल्यास व्यायाम त्वरित थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."
अँजिओप्लास्टीनंतर काही लोक अनेक वर्षे निरोगी कसे राहतात, तर काहींना पुन्हा ब्लॉकेज का होतात? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
यावर बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. प्रशांत पवार म्हणाले, "स्टेंट बसवल्यावर अनेक वर्षं निरोगी राहाणारे लोक आणि पुन्हा ब्लॉकेज होणारे लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे सातत्य. अनेक वर्षे निरोगी राहणारे रुग्ण हे समजून घेतात की अँजिओप्लास्टीमुळे तातडीचा अडथळा दूर होतो, पण कोरोनरी आर्टरी डिसीजचे व्यवस्थापन आयुष्यभर करावे लागते. ते औषधे नियमित घेतात, तंबाखूपासून दूर राहतात, सक्रिय जीवनशैली पाळतात, संतुलित आहार घेतात, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यांवर नियंत्रण ठेवतात तसेच कोणतीही लक्षणं नसली तरी नियमित फॉलो-अपसाठी येतात. याउलट औषधं वेळेआधी बंद करणं, जोखीम वाढवणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष करणं, वजन वाढू देणं किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं यामुळे पुन्हा ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते. दीर्घकालीन यशाचे गमक म्हणजे रोजच्या जीवनातील शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण सवयी यांचा अंगिकार."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)