You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'भेदाभेद भ्रम अमंगळ' ते 'लव्ह जिहाद': वारी आणि कीर्तनांत 'हिंदुत्व' कसं आलं? वाचा
- Author, प्राची प्रतिभा शिरीष
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
"धर्मासारखं जगा नाहीतर दिवस वाईट येतील! आपल्या मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत"
"सकाळी मांसाहर करून दुपारी वारीत आलात तर आम्ही का स्वीकारायचं?"
"तुम्ही आधी हिंदू आहात मग अमुक एका जातीचे"
ही वक्तव्य आहेत वेगवेगळ्या कीर्तनांमधून केली गेलेली. कीर्तनांमधून अलिकडे मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांची ही फक्त काही उदाहरणं.
'भेदाभेद भ्रम अमंगळ' म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांमध्ये 'धर्म' हा मुद्दा प्रामुख्याने वारंवार मांडला जाताना दिसत आहे.
नेमकं काय घडतंय? वारीच्या माध्यमातून हिंदूत्व आणि धार्मिक द्वेषाचा प्रसार केला जात आहे का याचा आढावा आम्ही घेतला.
अल्लाह देवे अल्लाह दिलावे – अभंग आणि वाद
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात मुक्कामाला होती. शहरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बोर्डवर, 'अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, या अभंगाच्या ओळी लिहिण्यात आल्या होत्या. या ओळींवरून वाद झाला.
हिंदुत्ववादी संघटनांनी हा 'इस्लामी ' प्रचार असल्याचा आरोप केला. तर फक्त 'अल्लाह' असा उल्लेख आला म्हणून या ओळींवर आक्षेप का? असा सवाल पुरोगामी संघटनांकडून विचारण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये वारीत धार्मिक द्वेष वाढताना दिसत आहे त्याचं हे एक उदाहरण.
याबाबत नेमका आक्षेप का आहे, हे सांगताना पंढरपूरचे लेखक आणि किर्तनकार रामकृष्ण वीर दावा करतात की, वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठित आहे.
गेल्या काही काळापासून संप्रदाय आणि संतवचनांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारकरी सांप्रदायाला धर्म ही संकल्पना नाही, तो निधर्मी आहे हे अपप्रचार असल्याचा दावा ते करतात.
बीबीसी मराठीशी बोलताना वीर म्हणाले, "वारकरी संप्रदाय हिंदूधर्माधिष्ठित आहे. मात्र वारकरी सांप्रदायाची वैश्विक आणि व्यापक भूमिका अशी आहे की, उपासना करत असताना 'यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर'. ज्याला उपासना करायची आहे, ज्याला रामकृष्ण हरी म्हणायचं आहे, ज्याला पंढरीच्या वाटेवरती चालायचं आहे असे लोक.
'कंठी मिरवा कृष्ण तुळसी व्रत करा एकादशी', हा छत्रपतींना उपदेश तुकोबरायांनी केलेला आहे.
म्हणजे इकडे तुम्ही कुणी या राजसत्तेत असाल किंवा कुठल्या धर्मात असाल कुणी या इथं आल्यानंतर भगवंताची उपासना करण्यासाठी कोणालाही नाकारलेलं नाहीये. मात्र विविध पंथातले विविध धर्मातले लोक वारकरी संप्रदायात आले म्हणजे वारकरी संप्रदायाचा धर्म बदलतो असं होत नाही ना.
आज कबीर मोमीन लतिफ मुसलमान पण वारकरी संप्रदायात आले.
कबीर महाराजांची भूमिका अशी आहे की मेरा पैगंबर इट पे खडा आहे. ते त्या पांडुरंगाला पैगंबर असं म्हणतात. त्यांनी पैगंबराची उपासना किंवा नमाज वारकरी संप्रदायात केले नाही. त्यांनी अभंग रचना केली."
वीर पुढे सांगतात, "तर मुळात वस्तुस्थिती अशी आहे. इथं प्रत्येकाला यायला परवानगी आहे. इथं आल्यानंतर जे काही संप्रदायाचे जे काही नियम आहेत, जे काही ग्रंथ आहेत ते अधिष्ठानाला धरून. पंढरीची वारी असेल, चंद्रभागेचे स्नान असेल, विधितो हारि कथा असेल या सगळ्या गोष्टींना श्रीकृष्ण भक्तीची जी काही परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये ज्याला ज्याला यायचं असेल त्याच्यामध्ये रममाण व्हायचं असेल तर आम्ही बंधन कोणाला घातलेलं नाही.
मात्र, परवा पुण्यामध्ये असतील किंवा हे गेल्या पाच सहा वर्षापासून प्रकार सुरू आहेत. जसं की 'अल्लाह देवे अल्लाह दिलावे'. ज्या वेळेला साधू संतांकडे अनेक पंथातले लोक जात असतात, त्या वेळेला त्यांना तुकोबारायांनी केलेला तो उपदेश आहे. मग त्या संताला त्या पद्धतीने जर त्यांनी केलेला उपदेश असेल तर तुकोबाराय 'अल्लाह देवे अल्लाह दिलावे' म्हणतात असा त्याचा अर्थ होत नाही ना."
पण खरंच संप्रदाय ही भूमिका सांगतो का? संत तुकोबारायांची पालखी निघते तेव्हा तिचा पहिला विसावा असतो तो अनगडशाह बाबा दर्ग्यावर. वारकरी सांप्रदायात अनेक मुस्लीम कीर्तनकार होऊन गेले. सातत्याने वारी करणाऱ्या मुस्लीम धर्मीयांची संख्याही मोठी असल्याचं कीर्तनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर सांगतात. मुळात धर्माची व्याख्याच आज चुकीच्या पद्धतीने सांगितली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना संविधानावर कीर्तन करणारे श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, "रामायण आणि महाभारत ही दोन्ही धर्मयुद्धं आहेत. मग ही युद्धं कोणामध्ये झाली तर ती कौरव आणि पांडवांमध्ये. मग पांडव हे हिंदू होते तर कौरव मुसलमान, ख्रिश्चन होते का? ते त्यांचे भाऊ होते. हिंदूच होते. रामायण हे धर्मयुद्ध कोणामध्ये झालं तर रामाचे सैन्य हिंदू होतं आणि रावणाचंही सैन्य हिंदूच होतं. मग ही धर्मयुद्धं कशी? हो हे धर्मयुद्ध आहे. पण तुकाराम महाराज सांगतात तो धर्म आहे. सत्य तोच धर्म. संतांच्या मते हा सत्य आणि असत्यातला लढा आहे."
राजकीय पक्ष आणि अध्यात्मिक आघाड्या
हे वाद यापूर्वीही होत होते. पण आता याला पार्श्वभूमी आहे ती राजकीय पक्षांच्या वारीतल्या उपस्थितीचीही. गेल्या काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या अध्यात्मिक आघाड्यांची स्थापना झाली. वारी आणि उरलेला वर्षभरातला काळ या आघाड्या कीर्तनकार आणि वेगवेगळ्या फडांच्या प्रमुखांशी संपर्कात असतात. यापैकी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले वारीसोबत दररोज पायी जात आहेत.
दिंड्यांना काय हवं नको ते पहाणे, वारकर्यांना आवश्यक वस्तूंचं वाटप करणे हे त्यांचं काम. या आघाडीकडून रेनकोट, बूट, पिशव्या, अन्न धान्य, औषधे या सोबतच इतर गोष्टींचं वाटप केलं जातं.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ही अध्यात्मिक आघाडी. दरवर्षी वारीच्या दरम्यान साधारण 25 ते 27 लाख रुपयांचा खर्च वारकऱ्यांसाठी वारी दरम्यान या आघाडीकडून केला जातो.
2019 मध्ये भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचीही स्थापना झाली. आचार्य तुषार भोसले त्याचं नेतृत्व करतात. या दोन्ही आघाड्या वारी सोबतच संपूर्ण वर्षभर कार्यरत असतात. वारकऱ्यांना काय हवं नको ते पाहणं, अडचण, अपघात झाल्यास मदत पोहोचवणं ही कामं या आघाड्यांकडून प्रामुख्याने केली जातात.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आम्ही पोहोचलो तेव्हा धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षयमहाराज भोसले हे वेगवेगळ्या दिंड्यांमधील लोकांसोबत चालत संवाद साधत होते. अध्यात्मिक आघाडीकडून केल्या जाणाऱ्या कामाबद्दल सांगताना त्यांनी ही प्रश्न सोडवण्यासाठीची थेट व्यवस्था असल्याचं स्पष्ट केलं.
जवळपास एकशे पंधरा संप्रदायांसोबत सध्या आघाडी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, " जसं शासन आपल्या दारी होतं. तसं सरकार हे साधुसंतांच्या सेवेकरता आहे. यात मंदिर, आश्रम, त्यांच्या जमिनी किंवा आणखी काही अडचणी असतील तर ते आपण सोडवतो. यासाठी त्यांना आपल्याकडे यावं लागत नाही तर आपली टीम त्यांच्या पर्यंत पोहोचते आणि मग त्यांचे प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत नेत ते सोडवले जातात. शंभर प्रश्न असतील तर त्यातले किमान सत्तर तरी मार्गी लागतात."
या सगळ्या संप्रदाय मठ, मंदिर, या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम भाजपची अध्यात्मिक आघाडी करते.
साधुसंत, सांप्रदायांचे प्रमुख हे हिंदुत्वाचं काम करतात आणि हिंदुत्ववादी विचारधारा समाजात रुजवतात त्यामुळे त्यांच्याशी सातत्याने संपर्क, समन्वय असला पाहिजे या हेतूने भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची स्थापना झाल्याचं आचार्य तुषार भोसले सांगतात.
2016 मध्ये या स्वतंत्र आघाडीची स्थापना झाल्याचं ते सांगतात.
आघाडीच्या कामाविषयी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, "कीर्तनकार किंवा साधुसंत 24 तास धर्मकार्यामध्ये व्यIDJ असतात. काही विरोधी विचारांचे लोक ज्यांना हिंदू धर्म आणि हिंदुत्वाविषयी पोटशूळ असणारे लोक साधुसंत, किर्तनकार आणि त्यांच्या मठमंदिरांना लक्ष्य करतात. त्यांना त्रास देण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना पाठबळ असतं. तसंच अनेक राजकीय विचारधारांचेही असतं.
अनेक संस्था संघटनांचेही असतं. अशावेळी त्यांना जर काही त्रास झाला की मंडळी आमच्याशी संपर्क करतात आणि तात्काळ गृहखातं असेल किंवा त्यांना ज्या विभागाकडून त्रास होत असेल त्या संबंधित मंत्र्यांना संपर्क केला जातो. आणि मला अतिशय अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रचंड धर्मक्षेत्राविषयी आणि हिंदुत्वविषयी आस्था असणारे मुख्यमंत्री असल्यामुळे एका तासाच्या आत सगळे प्रश्न मिटतात"
याचे परिणाम नेमके काय होत आहेत
या दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीबद्दल भूमिका घ्यायची वेळ आली तर आघाड्यांकडून या कीर्तनकारांना, महाराजांना संपर्क केला जातो. राजकीय पक्षांच्या आघाड्यांसोबतच अनेक संघटनाही वारीच्या माध्यमातून संपर्क करत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये किर्तनातून मांडले जाणारे मुद्दे बदलताना दिसत आहेत. सांप्रदाय, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, संतांचे अभंग याभोवती फिरणारी किर्तनं आज मात्र धर्माच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहेत.
अलिकडे कीर्तनांमध्ये दोन प्रवाह दिसत असल्याचं 'होय होय वारकरी' या पुस्तकाचे लेखक आणि कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात.
यात एक प्रवाह विनोदी कीर्तनकारांचा. ज्यांना विचारसरणीशी देणंघेणं नाही तर दुसरा राजकीय पक्षाची विचारसरणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मांडताना दिसतो. यात 'कोडवर्ड' वापरले जात असल्याचं ते सांगतात.
संतांनी 'धर्म' रक्षणाचं काम केलं आणि आमचा अमुक अमुक पक्ष हा धर्मरक्षणाचं काम करतोय. त्याच्यामुळे या पक्षाला मतदान करणं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या विचाराला अनुसरुन आहे. आणि दुसरा एक प्रवाह असं म्हणतोय की संतांनी समता सांगितली, बंधुता सांगितली आणि ती संविधानात आलेली आहे आणि संविधान वाचवणारा आमचा पक्ष आहे. म्हणून आमच्या पक्षाला मतदान केलं तर ते वारकरी संप्रदायाच्या तत्वाला अनुसरून आहे अशी मांडणी केली जात आहे.
अनेकदा कीर्तनाच्या वेळी शेवटी धर्मावर दहा मिनिटं धर्मावर बोला असं सांगितलं जातं, मात्र इथे धर्माची व्याख्या करण्यात फरक असल्याचंही ते स्पष्ट करतात.
बंडगर म्हणाले, "मुळामध्ये काही वेळेला आम्हाला पण किर्तनाच्या ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही कीर्तनामध्ये शेवटी थोडं धर्मावर बोला. मी म्हटलं शेवटी नाही. मी अख्ख कीर्तनच धर्मावर करतो. किंबहुना 'तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले हे तर माझे उरले पाईक' माउली म्हणतात हे धर्म कीर्तनच आहे.
गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, मांसाहार करू नका, पंढरपूरची वारी करा, नामस्मरण करा. खोटं बोलू नका, आई वडीलांची सेवा करा, कुणाला फसवू नका, सगळ्यांशी समतेने प्रेमाने वागा, हे सांगणं म्हणजे धर्म प्रसार नाही का? धर्म प्रसार म्हणजे अमुक एका धर्माचाच द्वेष केला पाहिजे असं नाही ना. धर्माचा प्रसार म्हणजे वारकरी संप्रदायातल्या संतांनी जे अभंग सांगितलेले आहेत त्या अभंगाचा प्रसार करणं."
पण धर्माची ही व्याख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना मान्य होत नाही. धर्माचं रक्षण करणं हेच सांप्रदायाचं पहिलं काम असल्याचं ते सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना प्रल्हाद महाराज बडवेंचे वंशज आशुतोष बडवे म्हणाले, "त्या काळातल्या व्यवस्थेप्रमाणे भगवंताने अधर्माचा नाश करण्यासाठी अधर्मी लोकांना संपवलं आहे. पण आता अधर्मी लोक धर्माचं नाव घेऊन वेगळ्या विषयाने बोलतात. प्रत्यक्ष त्या अधर्माचा विचार करतात तर त्यांचं खंडण करणं म्हणजे तुकोंबारायांच्या उक्तीप्रमाणे धर्माचे पालन करणे.
पाखंड खंडण हे केवळ शब्दाने केलं जातं असं नाही .तुकाराम महाराजांच्या काळात ते हाती शस्त्र घेऊनही कधी करावं लागत होतं. आता हाती शस्त्र घेण्याची भाषा नाही गरज. धर्माच्या रक्षणासाठी त्या अर्थाने जर बोलला गेला तर त्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत."
भक्ती आणि शक्तीचा वाद
हीच शस्त्र -भक्ती आणि शक्तीच्या मिलाफाची आवश्यक्ता असल्याचं सांगत गेल्या काही वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी देखील वारीत उपस्थित राहत आहेत.
दरवर्षी वारीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांचं मार्गदर्शन झाल्यावर हे शिवाजीनगर परिसरात थांबतात. गेली अनेक वर्ष ते संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य देखील करतात. याच भिडेंनी काही वर्षांपूर्वी संतांपेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य केलं होतं. असं वक्तव्य करणारे ते पहिले व्यक्ती नाहीत. यात अलिकडे काही वर्ष महिलाही दिसत आहेत.
सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या वारीत धारकरी म्हणून का सहभागी होता असं विचारल्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवक्ते पराशर मोने यांनी दावा केला की संतांच्या काळातही भक्ती शक्तीचा मिलाफ होता.
ते म्हणाले, "जे आहोत तेच म्हणून आम्ही येणार ना? आम्ही धारकरी आहोत अर्थात आमच्यामध्ये वारकरीपण आहे. पण धारकरी परंपरा आणि वारकरी परंपरा ही दोन्ही महाराष्ट्राची वैशिष्ट्य आहे आणि हे या दोन गोष्टी काही एकमेकांच्या विरुद्ध नाहीयेत. या पूरक आहेत. शिवाजी महाराज हे धारकरी होते. पण तुकाराम महाराज हे वारकरी होते आणि शिवाजी महाराजांच्या कामाला तुकाराम महाराजांचा आशीर्वादच होता."
मनु बद्दलच्या वक्तव्याच्या अनुषंगाने मोने पुढे म्हणाले, "गुरुजींच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, मनु हा राजा होता. मनु क्षत्रिय होता. ज्ञानोबा-तुकोबा हे संत आहे. संत विचारांना क्षात्रतेजाची जोड असली पाहिजे आणि तो विचार म्हणून ते म्हणले की केवळ संत परंपरा असून उपयोग नाही. त्यामध्ये मग अशावेळी या संतांचं रक्षण करण्यासाठी कोणतरी एक क्षात्रतेज घेऊन उभा राहिला पाहिजे ते विचार मनुने दिलेला आहे. म्हणून ते म्हणलेले आहेत. यामध्ये ज्ञानोबा तुकोबा यांचा अपमान करण्याचा कुठल्याही उद्देशाने ते बोललेले नाहीत. शिवाजी महाराजांवर बोलत असताना पदोपदी त्यांच्या तोंडांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांची दाखले असतात हेही आपण बघितलं असेल."
या प्रकरणात बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट करत सोन्नर महाराज म्हणतात, "माझ्या मते यामागे नक्कीच राजकारण आहे. काही लोक आपली राजकीय भूमिका बळकट करण्यासाठी काही वारकरी मंडळींना जवळ करून असा विचार पेरण्याचा प्रयत्न करत असावेत. मात्र खऱ्या वारकऱ्यांनी याबाबत सतर्क राहायला हवं."
"वारकरी संप्रदायाचा विचार हा कधीच एका धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुस्लीम, ख्रिश्चन आणि हिंदू सर्वांनीच तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही आपल्या वर्तमानपत्राच्या मास्टहेडवर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या छापल्या होत्या. यावरूनच हा विचार सर्वसमावेशक असल्याचं स्पष्ट होतं."
"म्हणून वारकरी संप्रदायाला कोणत्याही एका धर्मात बंदिस्त करता कामा नये. हिंदू धर्मातील काही लोकांचा द्वेष करणे मला मान्य नाही, आणि वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचाच आहे असंही मी म्हणणार नाही. हा सर्वांचा आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सर्वांना सोबत घेऊन चालणारा."
"त्यामुळे जो कोणी कोणत्याही धर्माचा द्वेष करतो, तो वारकरी असू शकत नाही. हिंदुत्वाचा द्वेष करणारे असोत, मुस्लिमांचा किंवा ख्रिश्चनांचा द्वेष करणारे असोत, अशा प्रवृत्तीला वारकरी संप्रदायात स्थान नाही. कारण खरे वारकरी कधीही जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाहीत."
'भेदाभेद अमंगळ' म्हणत फक्त 'माऊली' ही ओळख जपत वारकरी संप्रदाय भेदांच्या भिंती तोडत राहिला आहे. सनातनी विरुद्ध पुरोगामी हा वादही संप्रदायासाठी नवा नाही. पण काकड आरतीला म्हणला जाणारा संत तुकोबारायांचा 'पवित्र ते कूळ' अभंग समतेचा आणि सहिष्णूतेचा पाया सांगत राहतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)