You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हत्तीसारखा पाय बघून दुःख होतं, लोकही विचित्र नजरेनं बघतात; कामही मिळत नाही'
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
"हत्तीसारखा झालेला पाय बघून दुःख होते, वाईटही वाटते. लोकही विचित्र नजरेने बघतात. पायाकडे बघितलं तर लोक विचारतात एक पाय बारीक अन् एक पाय ठोकळ का आहे ते. सुजलेल्या पायामुळे काम मिळत नाही," नशिबाला दोष देत शांता निकोडे त्यांची परिस्थिती सांगत होत्या.
शांता निकोडे या चंद्रपूर शहरात राहतात. त्यांना 16 वर्षांपूर्वी फायलेरिया म्हणजेच हत्तीपाय नावाचा आजार झाला आहे.
दैनंदिन काम करताना त्यांना अनेक अडचणी येतात. उभं राहताना, चालताना, झोपतानाही होणारा त्रास संपत नाही.
धान शेतीवर काम करत असताना त्यांना ‘क्युलेक्स’ डासापासून हत्तीपाय आजाराची लागण झाली.
शासकीय रुग्णालयातील तपासणीनंतर त्यांनी औषधोपचार सुरू केला. पण गोळ्या बंद केल्या की पुन्हा पायावर सूज येते आणि पाय ठणकतो.
शांता सांगतात, "यवतमाळमध्ये राहत असताना वडिलोपार्जित शेताजवळ तलाव होता. आम्ही त्या तलावाचे पाणी प्यायचो. त्यामुळं नकळत कधी हत्तीपायाचा डास चावला कळलंच नाही."
"हत्तीपायाच्या सुरुवातीच्या लक्षणामध्ये खूप थंडी वाजून भारी ताप यायचा. अंगावर अनेक गाद्या घेऊनही थंडी जात नव्हती. मग दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नसायचा," शांता पुढे सांगत होत्या.
शांता निकोडे एकट्या नाहीत...
हत्तीपाय आजाराने ग्रस्त शांता निकोडे या एकट्या नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीपाय आजाराचे 10,380 रुग्ण आहेत. त्यात हायड्रोसेल म्हणजेच अंडवृद्धी या आजाराचे 3,067 रुग्ण आहेत.
चंद्रपूर शहरातच राहणाऱ्या उद्धव आसोले यांच्या दोन्ही पायाला हत्तीपाय आजार झाला आहे. एका पायावर सूज येऊन काळा पडला, तर या आजाराचा विळखा दुसऱ्या पायालाही झालाय.
शांता यांच्यासारखाच त्रास उद्धव यांना जाणवतो. चालताना त्रास होणे, वेदना होणे, आणि झोपताना होणारा त्रास नियमित आहे.
उद्धव सांगतात, "मला 15 ते 20 वर्षांपासून हा आजार आहे. आमची यवतमाळ जिल्ह्यात शेती होती. मुलांच्या शिक्षणासाठी चंद्रपूर येथे आलो आणि इथेच या आजाराविषयी माहिती पडले.
“हळूहळू बारीक असलेला पाय हत्तीच्या पायासारखा झाला. त्यामुळं काम होत नव्हते. पायाची सूज सारखी वाढत होती. आता लोकांचे ड्रेस प्रेस करण्याचा व्यवसाय सुरू केला."
आसोले यांना आरोग्य विभागाकडून औषधी सुरू आहेत. पण, 8 ते 15 दिवसातून इतका भयंकर ताप येतो की डॉक्टर कडे गेल्याशिवाय पर्याय नसल्याचं ते सांगतात.
चंद्रपूर जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणात होते. धान शेतीच्या पाण्यात ‘क्युलेक्स’ या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीपायाची रुग्णसंख्या जास्त असल्याचं जाणकार सांगतात.
‘पाय कुठल्याच कामाचा राहत नाही’
हत्तीरोग निर्मूलनासाठी नागपूर येथे हत्तीरोग संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकामार्फत रुग्णांना भेटी देऊन समुपदेशन आणि आरोग्य सेवा पुरवली जाते.
आरोग्य सेवक कैलाश ढोले हे नियमित फिल्डवर असतात. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असतील अशा भागाचा सर्वे करून स्थानिक नागरिकांचे रक्ताचे नमुने ते घेतात. त्यानंतर पॉझेटिव्ह आढळून आलेल्या रुग्णावर औषधोपचार केले जातात.
आरोग्य सेवक ढोले सांगतात, "सर्वाधिक आम्ही रात्रीच्या वेळी सर्वे करतो. रक्ताचे नमुने घेतलेल्या नागरिकांपैकी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णावर आमचा उपचार सुरू होतो. अनेकदा आरोग्य विभागामार्फत दिले गेलेली औषधी रुग्ण खात नाहीत. त्यावेळी आम्ही त्यांचं समुदेशन करतो".
ढोले यांनी हत्तीपाय आजाराने ग्रासलेले गंभीर रुग्ण हाताळले आहेत. त्यांचा अनुभव ते सांगतात, "हा आजार इतका गंभीर आहे की पायांची नीट काळजी घेतली नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतात. हत्तीपायावर सूज येऊन त्यात पस असणारे रुग्ण आम्ही पाहिले आहेत. अनेकांच्या पायावर पुरळ येऊन तो पाय कुठल्याच कामाचा राहत नाही. त्यामुळं आम्ही काळजी घेण्याचं आवाहन करत असतो."
हत्तीरोगात प्रत्येक रुग्णांचे ग्रेड पाडून दिलेले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जातात. चंद्रपूर जिल्ह्यात साधारण पाच ते सहा ग्रेडपर्यंत रुग्ण आहेत. पाचव्या ग्रेडमध्ये पाय भारी फुगलेला असतो. त्यानंतरच्या ग्रेडमध्ये पाय फुटून निघालेला, पस निघत असलेला अशी विचित्र अवस्था झालेली असते.
साधारण ऑगस्ट महिन्यात हिवताप, हत्तीपाय विभागाकडून रुग्ण शोध मोहीम सुरू होते. त्यात नव्या रुग्णांची संख्या कमी आहे. पण ज्यांना अनेक वर्षापासून हत्तीपाय आजार असेल त्यांना सबंधित विभागाकडून एक किट पुरवली जाते.
या किटमध्ये पाय धुण्याचा टब, साबण, नॅपकिन, कॉटन, मलम आणि पावडर यांचा समवेश आहे. रुग्ण याचा उपयोग योग्य पद्धतीने करत आहे की नाही, हे तपासण्यासाठी आठ-पंधरा दिवसातून एकदा आरोग्य सेवकांची चक्कर असते. सबंधित विभागामार्फत रुग्णांना आता नव्याने फूटवेअर दिले जातात.
पण हत्तीपाय सारखीच जशी पायावर सूज येते तशीच हायड्रोसेल म्हणजेच अंडवृद्धीचे रुग्ण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात आढळून आले आहेत. अनेकांवर शस्त्रक्रिया झाली आहे, काही शिल्लक आहेत.
डासांचे अळी अवस्थेत नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे हा प्रयोग सबंधित विभागामार्फत राबवला जातो. त्याचबरोबर कीटकनाशकाची फवारणी करणे, मैला, कचरा, तसेच घाणीच्या ठिकाणांचा योग्य पद्धतीने विल्हेवाट याचाही यामध्ये समावेश असतो.
पूर्व विदर्भात डासांचं प्रमाण सर्वाधिक आढळून येतं. त्याच अनुषंगाने साचलेल्या गढूळ पाण्यात गप्पी मासे सोडले जातात. त्याशिवाय साचलेल्या गढूळ पाण्यात फवारणी सुद्धा करण्यात येते. फिजिकल, बोयालोजिकल आणि केमिकल पद्धतीचा वापर केला जातो. अळी नष्ट करण्याचे काम वर्षभर सुरू असतं.
श्याम निमघडे हिवताप आणि हत्तीरोग नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक आहेत. हत्तीपाय दैनंदिन सर्वेक्षण आणि उपचारासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
ते सांगतात, "आम्ही तीन बाबींवर काम करतो. पहिली म्हणजे, हाय रिस्क भागात रात्रकालिन सर्वेक्षण. त्या भागातून रक्ताचे नमुने घेतले जातात. त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आले, ज्यांच्यामध्ये मायक्रो फायलेरिया रक्तात आढळून आले की त्यांच्यावर पूर्ण औषध उपचार करून जंतू मारले जातात.
"सबंधित भागात रात्रकालीन पथक आणि फायलेरिया सर्वे युनिट असे 15 पथक काम करतात. आधी सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जायची पण रुग्णसंख्या कमी झाल्याने एक तृतीयांश भागात आता ती शिल्लक आहे".
निमघडे यांच्या माहितीनुसार, दोन तृतीयांश भागातील मायक्रो फायलेरियाचा रेशो कमी आल्याने तिथे ही मोहीम राबवली जात नाही. एक पेक्षा जास्त रेट असणाऱ्या भागात ही मोहीम राबवली जाते.
विदर्भ आणि हत्तीरोग
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग या आजाराचे 22,401 रुग्ण आहेत, तर हायड्रोसेल या आजाराचे 5,732 रुग्ण आहेत. हायड्रोसेलच्या एकूण रुग्णांपैकी 1,366 जणांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गडचिरोली
- हायड्रोसेल - 902
- हत्तीरोग - 2796
वर्धा
- हायड्रोसेल - 47
- हत्तीरोग - 1642
भंडारा
- हायड्रोसेल - 205
- हत्तीरोग - 2731
गोंदिया
- हायड्रोसेल - 751
- हत्तीरोग - 730
चंद्रपूर
- हायड्रोसेल - 3067
- हत्तीरोग - 10,380
नागपूर
- हायड्रोसेल - 760
- हत्तीरोग- 4122
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)