55 वर्षांच्या व्यक्तीनं 3 वर्षं घरातच घेतलं स्वतःला कोंडून, अन्न ऑनलाईन मागवलं पण स्वास्थ्य गमावलं

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

महानगरी मुंबईच्या जवळच असणाऱ्या तितक्याच व्यग्र असलेल्या नवी मुंबईतलं ही सत्य घटना आहे. लोकांनी गजबजलेल्या 'सोसायटी'मध्येच हे घडलं आहे.

नवी मुंबईतील एका सोसायटीत मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीनं नैराश्य आल्यामुळे स्वतःला घरातच कोंडून घेतलं होतं. अथक प्रयत्नानंतर या व्यक्तीची सुटका करण्यात आली असून तिच्यावर आता उपचार सुरू आहे.

नवी मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत असत. आपणहून त्यांनी स्वतःला समाजापासून दूर ठेवलं होतं.

कोणत्याही नात्याचा, संवादाचा किंवा बाहेरील जगाशी संबंध न ठेवता, केवळ ऑनलाइन अन्न मागवून ते जिवंत होते. आई, वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर त्यांना एकटेपणा आला आणि त्यातून ते खचल्याचे त्यांची सुटका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

या प्रकरणामुळे, मुंबईसारख्या मोठ्या शहरामधील एकटेपणा आणि नैराश्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

समाजातील एकाकीपणाचा क्रूर चेहरा

नवी मुंबईतील एका इमारतीतल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताना 'SEAL' (Social and Evangelical Association for Love) संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातील दृश्य पाहून धक्का बसला.

घर संपूर्णपणे अस्ताव्यस्त होतं – अनेक वर्षांपासून साफ न केलेलं, मानवी मलमूत्राने भरलेलं आणि त्यात एक खुर्ची सोडल्यास कोणतंही फर्निचर नव्हतं.

"त्यांचं बहुतेक फर्निचर कोणीतरी नेलं असावं," असं संस्थेचे के.एम. फिलीप यांनी सांगितलं.

"ते फक्त त्या खुर्चीवर झोपत असत. त्यांच्या पायाला गंभीर संसर्ग झाला असून त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज आहे. आमच्या पनवेलमधील आश्रमात त्यांना सध्या ठेवण्यात आले आहे," असं फिलीप यांनी सांगितलं.

वैयक्तिक दुःखाचा सामाजिक परिणाम

सदर व्यक्तीचे वडील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होते, तर आई भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार शाखेत नोकरीला होत्या.

गेल्या सहा वर्षांत दोघेही वारले आणि 20 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठा भावानेही आत्महत्या केली होती. या आघातांनी ते मानसिकदृष्ट्या खचले.

स्थानिक रहिवासी आणि सदर सोसायटीचे अध्यक्ष विजय शिबे सांगतात, "ते क्वचितच दरवाजा उघडत असत. कचरा देखील बाहेर टाकत नसत, त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही विनंती करत होतो.

त्यांनी आपल्या पालकांच्या एफडीचे पैसे आपल्या खात्यात वर्ग करून घेतले होते, त्याच पैशांतून ते खर्च करत होते."

'माझं कुणीच नाही...'

पनवेलमधील SEAL च्या आश्रमात असताना बोलताना त्यांनी आपल्या अस्वस्थतेबाबत भावना व्यक्त केल्या.

बीबीसी मराठीशी बोलताना हे गृहस्थ म्हणाले, "माझं आता कुणीही नाही. आई-वडील आणि भाऊ गेले. माझी तब्येतही खराब आहे, त्यामुळे कोणतीही नोकरी मिळण्याची शक्यता नाही."

त्यांच्या या अशा स्थितीबद्दल मानसोपचारतज्ज्ञांनी अधिक माहिती दिली.

डॉ. प्रियांका महाजन, मानसोपचारतज्ज्ञ, सांगतात, "माणूस जेव्हा आपले जवळचे लोक गमावतो, तेव्हा नैराश्य येणं स्वाभाविक आहे. काही जण यातून सावरतात, पण काहींचं दुःख खोल गेलेलं असतं. नैराश्य वाढलं की व्यक्ती समाजातून पूर्णपणे अलग होऊ शकते."

'उघड्या खिडक्या असूनही बंद घरं'

'Harmony Foundation'चे संस्थापक डॉ. अब्राहम मथाई म्हणाले, "अशा गर्दीच्या शहरात माणूस एकटा पडतो, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यांना मदत मिळाली, हे नशिबाने घडलं. पण अशा अनेक जणांचे मृतदेहं उशिरा सापडतात आणि दुर्गंधासोबतच आढळतात."

या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणा आणि सामाजिक संघटना सजग झाल्या.

मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासकीय आणि समाजिक पातळीवर अधिक जागरुकता आणि हस्तक्षेप आवश्यक आहे, असंही सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)