You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात हिंसेचं प्रमाण कमी होतंय का?
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
भारतातील सार्वजनिक जीवनात हिंसा सर्रास आढळू लागली आहे, असे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ थॉमस ब्लोम दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते.
सामान्य भारतीय सार्वजनिक हिंसेला अप्रत्यक्ष पाठिंबा का देतात किंवा प्रत्यक्ष सहभागी का होतात, याचे त्यांना आश्चर्य वाटत होते.
"हा बदल एका सखोल समस्येकडे लक्ष वेधत होता, लोकशाहीची भविष्यातील वीण उसवली जाण्याचा किंवा ती खिळखिळी होण्याचा धोका निर्माण झाला आहे," असं प्रा. हॅन्सेन यांनी त्यांच्या 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या द लॉ ऑफ फोर्स : द व्हायलंट हार्ट ऑफ इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात लिहिलं आहे.
अमेरिकेतील अमित अहुजा आणि देवेश कपूर या दोन राजकीय तज्ज्ञांची मात्र वेगळी मतं आहेत. 'इंटर्नल स्क्रुटिनी इन इंडिया : व्हायलन्स, ऑर्डर अँड द स्टेट' या पुस्तकात ते लिहितात की, ‘व्यापक प्रमाणात होणारी हिंसा भारतात कमी झाली आहे. अधिक नेमकेपणाने मांडायचे तर भारतातील सार्वजनिक आणि खासगी पातळीवर गेल्या दोन दशकात झालेली हिंसा ही त्या आधीच्या दोन दशकांमधील हिंसेच्या तुलनेने कमी आहे.’
आपल्या पुस्तकासाठी संशोधन करताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. अहुजा आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील प्रा. कपूर यांनी भारतातील सार्वजनिक हिंसाचाराच्या अनेक दशकांमधील अधिकृत नोंदींचा अभ्यास केला.
यात निवडणुकीत झालेल्या हिंसाचारापासून ते जात, धर्म, वांशिक हल्ले, दहशतवादी हल्ले आणि राजकीय हत्यांपासून ते अपहरणांपर्यंत अनेक घटनांचा अभ्यास केला.
या सर्वं निर्देशकांचा विचार करता भारतातील हिंसाचाराचं प्रमाण खरंतर कमी झालं आहे. काही बाबतीत तर 1970 ते 2000 या तीन दशकांच्या तुलनेने ते अगदी नगण्य आहे.
काही ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे :
- 2002 मधील गुजरात दंगल, 1984 मध्ये शीखांना लक्ष्य करून झालेली दिल्लीतील दंगल किंवा 1983 मध्ये आसाममधील नेलीमध्ये कथितरित्या बांगलादेशातून बेकायदेशीरपणे स्थलांतर केलेल्यांच्या हत्यांचा विचार करता 2002 नंतर या तीव्रतेच्या वांशिक-धार्मिक दंगली भारतात झालेल्या नाहीत.
- या दंगलींमध्ये तब्बल 6000 माणसे मारली गेली होती. मुझफ्फरनगरमध्ये 2013 मध्ये आणि 2020 मध्ये दिल्लीत झालेली दंगल अशा दोन्ही दंगली मिळून 90 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे. कारण दंगली घडवून आणणाऱ्यांना एक टिचकी मारली तरी ते सक्रिय होतात, असं लेखकाला सूचित करायचं आहे.
- ग्लोबल टेररिझन इंडेक्स (आंतरराष्ट्रीय दहशतवाद निर्देशांक) 2020 नुसार भारतात 2001 पासून दहशतवादी हल्ल्यात 8,749 माणसं मारली गेली. पण 2010 नंतर अशा प्रकारचे हल्ले कमी झाले आहेत. काश्मीर वगळता अशा दहशतवादी हल्ल्यांची संख्या 70% कमी झाली आहे. 2000 ते 2010 मध्ये असे हल्ले 71 होते तर त्यानंतरच्या दशकात अशा हल्ल्यांची संख्या 21 होती.
- भारताच्या फाळणीच्या वेळी उसळलेल्या धार्मिक दंगलींमधील हिंसाचारात दहा लाख माणसं मारली गेली तर एक कोटी माणसं विस्थापित झाली होती.
- 1970 ते 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलींपर्यंतच्या कालावधीत हिंदू-मुसलमानांमधील हिंसाचार फारच भयानक होता. अधिकृत आकडेवारीनुसार त्यानंतर परिस्थिती बऱ्यापैकी स्थिर झाली आहे.
- 2017 ते 2021 या कालावधीत देशात धार्मिक दंगलींच्या 2,900 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे, असं सरकारने संसदेत सांगितलं आहे.
- 1970 पासून शतकाच्या अखेरपर्यंत त्या आधीच्या कालावधीच्या तुलनेने तब्बल पाच पट वाढ दिसून आली. 1990च्या अखेरीपासून यात घट होताना दिसून आली आणि 2009 ते 2017 या कालावधीत काहीशी वाढ झालेली दिसून आली, असं अधिकृत आकडेवारीवरून समजतं.
- निवडणुकीत होणारा हिंसाचार आणि राजकीय नेत्यांच्या हत्यांची संख्याही घटली आहे. दोन पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा राजीव गांधी या दोघांचीही अनुक्रमे 1984 आणि 1991 मध्ये हत्या झाली होती.
- मतदान केंद्रांवरील हिंसा 25% कमी झाली आहे आणि निवडणुकीतील हिंसाचारात झालेल्या मृत्यूंची संख्या 1989 ते 2019 या कालावधीत 70% घटली आहे.
- निवडणुका अधिक चुरशीच्या होणे, मतदारांची संख्या वाढणे आणि मतदान केंद्रांची संख्या दुप्पट होऊनही प्रमाण कमी होणे ही उल्लेखनीय बाब आहे.
- गेल्या तीन दशकांत भारतातील हत्यांचं प्रमाण कमी झालं आहे. भारतात 1990 मध्ये दर 1,00,000 व्यक्तींमागे 5.1 असा हत्या होण्याचा दर होता, तो 2018 मध्ये कमी होऊन 3.1 इतका झाला. पुरुषांच्या हत्यांचं प्रमाण खूपच कमी झालं तर महिलांच्या बाबतीत हा दर कमी होण्याचं प्रमाण मात्र नगण्य आहे.
- 1970 ते 1990 या तीन दशकांत भारतीय प्रवासी विमानांचं अपहरण होण्याच्या 15 घटना घडल्या. 180 प्रवासी असलेल्या दिल्लीहून काठमांडूला जाणाऱ्या विमानाचं डिसेंबर 1999 मध्ये अपहरण झालं होतं. त्यानंतर मात्र विमान अपहरणाची एकही घटना घडलेली नाही.
- गेल्या चार दशकांत भारताचा मोठा भाग चार मोठ्या बंडांनी हादरला होता. 1980च्या दशकात पंजाबमध्ये झालेले बंड, ज्यात 20,000 हून अधिक मृत्यू झाले होते.
- ईशान्य भारत, काश्मीर आणि मध्य-पश्चिम भारतात झालेल्या माओवादी बंडांचाही यात समावेश होतो. यापैकी शेवटची तीन बंड अधिक तीव्र झाले होते.
- पण 2010 पासून हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. 2018 ते 2020 या कालावधीत डाव्या विचारसरणीच्या हिंसाचाराच्या घटना दोन तृतियांश कमी झाल्या आहेत आणि सामान्य नागरिक आणि सैनिकांचे मृत्य होण्याच्या घटना तीन-चतुर्थांश कमी झाल्या आहेत.
- गेल्या दोन दशकांत जातीवर आधारित संघर्ष वाढला असला तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जातीय हिंसाचाराची वारंवारता कमी झाली आहे.
वेगवेगळ्या प्रकाराच्या हिंसाचाराच्या घटनांचं प्रमाण कमी होण्यासाठी विविध कारणं आहेत.
“राज्यांची क्षमता वाढल्याने बंडखोरी, दंगली आणि निवडणुकीदरम्यान होणारा हिंसाचार कमी झाला आहे. निमलष्करी दलाचा वाढलेला वापर, टेहळणीसाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा उपयोग, मोबाइल फोन टॉवर उभारणे, पोलीस ठाण्यांभोवती संरक्षक भिंती उभारणे, हिंसाचारग्रस्त भागांमध्ये नवीन रस्ते आणि वाढवलेल्या आरोग्य तसंच शिक्षणाच्या सुविधा यामुळे या हिंसाचाराची धग कमी करण्यास मदत झाली आहे,” असे प्रा. अहुजा आणि कपूर म्हणतात.
राज्यांची वाढलेली क्षमता तसंच राजकीय सामंजस्यपणा यामुळे हिंसाचार आटोक्यात येण्यास जास्त मदत झाली आहे. तसंच हिंसाचार पुन्हा उफाळून येणार नाही याची घेण्यात आलेली काळजीसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील विमानतळांवर वाढविलेल्या सुरक्षा उपाययोजनांमुळे विमानांच्या अपहरणाचे प्रमाण कमी झाले आहे.
भारतात बंदूक बाळगण्याविषयी असलेल्या काटेकोर कायद्यांमुळे हत्यांचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतं. (भारतातील 36 लाख बंदुकीच्या परवान्यांपैकी 60% परवाने उत्तरप्रदेश, पजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये जारी करण्यात आले आहे. अर्थात, अवैध आणि चोरट्या मार्गाने हत्यारं आणली जातातच.)
पण एक चिंताजनक बाब आहे - महिलांसंदर्भातील वाढती हिंसा
महिलांसंदर्भातील हिंसा ही बहुधा खासगी ठिकाणी होत असल्यामुळे आणि त्याची नोंद होत नसल्यामुळे महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी तितकीशी विश्वासार्ह नाही.
पण महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेची नोंद होण्याचं प्रमाण निश्चितच वाढलं आहे. भारतातील दर तीनपैकी एका महिलेला तिच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेला सामोरे जावं लागतं.
पण दर 10 पैकी केवळ एक महिला या गुन्ह्यांची औपचारिक तक्रार करते. डिजिटल माध्यमांमध्ये महिलांच्या शोषणाची प्रकरणं वाढीस लागली आहेत. हुंडाबळी, ऑनर किलिंग आणि ॲसिड हल्ल्यांचं प्रमाणही वाढतच आहे.
प्रा. अहुजा आणि प्रा. कपूर त्यांच्या कामामध्ये काही महत्त्वाची टिप्पणी जोडतात.
एक म्हणजे, पुराव्याचा अभाव हा अभावाचा पुरावा असतो, असं नाही. उदा. “हिंसा आणि अपमानामुळे महिला, दलित आणि मुसलमानांसारख्या धार्मिक अल्पसंख्यांना मिळणाऱ्या संधी कमी होतात.”
त्याचप्रमाणे जातीयवादामुळे होणाऱ्या सार्वजनिक हिंसाचाराच्या नव्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे : आंतरधर्मीय विवाह किंवा गायींची तस्करी रोखण्यासाठी धमकावणे वा जमावाकडून हल्ल्याच्या घटना ही चिंतेची बाब झाली आहे. “झुंडहल्ल्यांसारखे सार्वजनिक हिंसाचाराचे नवे प्रकार आता देशात कर्करोगाप्रमाणे वाढत आहेत,” असे प्रा. अहुजा आणि कपूर म्हणतात.
हॅन्सेनच्या मुद्याला दुजोरा देताना ते म्हणतात की, सामान्य माणसं सार्वजनिक हिंसाचाराचं समर्थन का करत आहेत आणि त्यात सहभागी का होत आहेत, ही काळजीची बाब आहे.
यामुळे राज्यावरील नियंत्रण कमी होतं आणि हिंसेवर नियंत्रण मिळविण्याची राज्याची क्षमताही कमकुवत होते. ऑनलाइन आणि रस्त्यावरील झुंडींना स्वैराचारी वागण्याची जणु परवानगीच दिली आहे. या सगळ्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि हिंसेवर नियंत्रण मिळविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते.
त्याचप्रमाणे, हिंसाचार कमी होणे हे तो पुन्हा सुरू होणारच नाही, याची खात्री देता येऊ शकत नाही, असं ते म्हणतात.
जर बेकारी वाढली, असमानता वाढली आणि राजकीय समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना केली नाही तर सामाजिक एकोप्याला हादरा बसला तर हिंसा वाढू शकते. हिंसेची दहशत कमी करण्यासाठी भारताला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागतील, असं ते म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)