दोन विमानांची हवेत टक्कर, पाहा धडकी भरवणारा व्हीडिओ

Published

दोन विमानांची हवेत टक्कर होण्याच्या घटनेबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? अमेरिकेत ही गोष्ट घडली आहे.

विमानांच्या कवायतींच्या प्रदर्शनांदरम्यान महायुद्धातील दोन विमानांची आपसांत टक्कर झाली. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही टक्कर घडली.

या घटनेचे फुटेजही समोर आले आहे. त्यात दोन विमान थेट एकमेकांना भिडले आणि नंतर जमिनीवर कोसळले आहेत. टक्कर झाल्यावर आगीचा डोंब उसळला. अमेरिकेतील टेक्सासमधील डल्लास या ठिकाणी जुन्या दुर्मीळ विमानांच्या कवायतीचे प्रदर्शन होते. या दरम्यान बोईंग बी- 17 फ्लाइंग फोट्रेस या विमानाने आपला सहभाग नोंदवला. आणि या विमानाची टक्कर पी-63 किंग कोबरा या दुसऱ्या विमानाला झाली.

अमेरिकेतील केंद्रीय उड्डयन प्राधिकरणाने म्हटले आहे की या प्रकाराची संपूर्ण चौकशी केली जाईल. अमेरिकेतील संरक्षण सेवार्थींच्या स्मरणार्थ दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अंदाजे चार ते सहा हजार लोक हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहत होते. डल्लासच्या महापौरांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे व्हीडिओ पाहणे हे दुःखदायक आहे. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. या घटनेत नेमकी किती जणांना दुखापत झाली आहे किंवा काय मनुष्यहानी झाली आहे याबाबत अद्याप माहिती नाही.

नाझी फौजांचा विमानांनी उडवला होता धुव्वा

कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर माहिती होती की अनेक विमानांनी कवायतींमध्ये सहभाग घेतला आहे. B-17 बॉम्बर या विमानामुळे मित्र पक्षांना महायुद्धात जर्मनीतील नाझी फौजांविरोधात विजय मिळाला होता. या घटनेतील दुसरे विमान P-63 किंग कोब्रा आहे. हे विमान देखील द्वितीय महायुद्धात वापरण्यात आले होते. पण हे विमान केवळ सोव्हियत संघाकडून वापरण्यात आले होते. महायुद्धातील विमानांची क्षमता कशी होती, त्यावेळी ते कसे काम करत होते हे दाखवण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम होतो असे संकेतस्थळाने सांगितले आहे.