You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संमोहनातून आपल्याला खरंच दुसऱ्याकडून हवं ते करून घेता येऊ शकतं का?
- Author, सुभाषचंद्र बोस
- Role, बीबीसी तमिळ
- Published
तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी नेटफ्लिक्सवर स्ट्रेनजर थिंग्ज किंवा 7th सेंस हे चित्रपट पाहिले असतील. यात जो संमोहनाचा प्रकार दाखवला आहे, तोही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे.
आपण जे काही ऐकलंय त्याप्रमाणे एखादी व्यक्ती दृष्टीद्वारे समोरच्या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवते. मग संमोहीत व्यक्तीच्या अचेतन मनाला प्रश्न विचारून माहिती जाणून घेता येते.
पण संमोहन म्हणजे नक्की काय? एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवता येतं का? मनोविकार तज्ञांचं याविषयी काय म्हणणं आहे?
दरवर्षी 4 जानेवारीला जागतिक संमोहन दिवस साजरा केला जातो. संमोहन आणि त्याचे फायदे याबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.
भारतासह विविध देशांमध्ये हे वैद्यकीय उपचार अगदी तळातल्या यादीत आहे.
संमोहन म्हणजे काय?
संमोहन म्हणजे काय आणि त्याचे काही फायदे आहेत का? किंवा चित्रपटांमध्ये पाहिल्याप्रमाणे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवू शकतो का?
याविषयी आम्ही काही तज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावर समुपदेशन आणि मानसोपचार संमोहन चिकित्सक असलेल्या सोशिना सरवानन म्हणतात, "आपलं मन दोन गटात विभागलं जातं. एक म्हणजे चेतन मन आणि दुसरं म्हणजे अचेतन मन. लहानपणापासून घडलेल्या सर्व गोष्टी या अंतर्मनात साठवल्या जातात.
"उदाहरणार्थ तुम्ही 4 वर्षांचे असताना तुम्हाला कुत्रा चावला असेल तर तुमची भीती तुम्ही 40 वर्षांचे होईपर्यंत कायम राहील. ही भीती घालवण्यासाठी अंतर्मनाशी संपर्क साधून त्या आठवणीत दुरुस्ती करून उपचार करता येऊ शकतात.
"संमोहन म्हणजे एखाद्या चार वर्षांच्या मुलाशी बोलण्यासारखं आहे. तुम्ही त्या मुलाशी बोलून त्यांना वास्तविकता सांगू शकता. जेणेकरून 40 वर्षांची ती व्यक्ती आता कुत्र्याला सामोरे जाऊ शकते."
माणसांवर नियंत्रण ठेवता येतं का?
अनेक चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की, संमोहन करुन एखाद्यावर नियंत्रण ठेवता येतं, त्यांच्याकडून हवं ते करवून घेता येतं. हे खरं असतं का? असं विचारलं की बऱ्याचदा हे खोटं असल्याचं सांगितलं जातं.
संमोहन म्हणजे अर्धवट झोपेत असलेला व्यक्ती. झोप आणि जागं असण्यातील एक अवस्था. सोशिना सांगतात की, संमोहित व्यक्तीला तुम्ही जे काही बोलता किंवा बाहेर जे काही घडतं ते सर्व माहित असतं.
ईस्टर्न हिप्नोटिक्समध्ये एखाद्यावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धती असू शकतात. त्याविषयी फार माहिती उपलब्ध नाही. मात्र पाश्चात्य आणि भारतीय परंपरेत बहुतेकदा क्लिनिकल हिप्नोटिझमचा वापर केला जातो.
मानसोपचारतज्ज्ञ राधिका मुरुगेसन म्हणतात की, "संमोहन म्हणजे तुम्ही एखाद्याच्या मेंदूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता. संमोहन म्हणजे तणाव किंवा चिंतेच्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीचं मन शांत करणं आणि त्याची समस्या सोडवणं."
किलपक्कम सरकारी रुग्णालयाच्या संचालक आणि डॉक्टर पूर्ण चंद्रिका म्हणतात की, "आपण अनेकदा असं ऐकलंय की त्याने अमुक एकाचं ब्रेनवॉश केलं. पण संमोहनात असं करता येत नाही. जर तुमचा मेंदू समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याला सहकार्य करत असेल तरच तुम्हाला संमोहित करता येतं.
"किंबहुना त्यावर पूर्ण नियंत्रण देखील मिळवता येत नाही. त्यांना तुम्ही एखादी गोष्ट करण्याचे आदेशही देऊ शकत नाही."
चित्रपटांमुळे संमोहनाबद्दल कोणती प्रतिमा तयार झाली आहे?
राधिका मुरुगेसन म्हणतात की, चित्रपटांमुळे मानसिक आरोग्याबाबत अनेक गैरसमज निर्माण होतात. संमोहनही त्याला अपवाद नाही.
त्या सांगतात, "चित्रपटांमध्ये संमोहन वास्तवाच्या विरुद्ध दाखवलं जातं. यामुळे लोकांची दिशाभूल होते. विशेषत: माझ्याकडे येणारे लोक मला अगदी विचित्र प्रश्न विचारतात. जसं की, तुम्ही माझ्या प्रेयसीच्या आठवणी पुसून टाकू शकता का? तुम्ही माझ्या मुलीला संमोहित करू शकता का? किंवा माझ्या मुलीचं कोणावर प्रेम आहे हे शोधू शकता का?
"अशा सगळ्या गोष्टी ते विचारतात. थोडक्यात चित्रपट पाहून त्यांचा गैरसमज होतो, पण प्रत्यक्षात अशा गोष्टी करता येत नाहीत."
राधिका मुरुगेसन म्हणतात की, त्याचप्रमाणे रंगमंचावर जे संमोहनाचे खेळ दाखवले जातात ते देखील संमोहन आहे असं अनेकांना वाटतं. पण, त्यातलं काहीही खरं नसतं. क्लिनिकल हिप्नोटिझममध्ये बरेच फरक आहेत.
अंधश्रद्धा आणि संमोहन उपचार
भूतप्रेताचा संबंध मानसशास्त्राशी आहे. आणि यावर दीर्घकाळ वाद सुरू आहे. संमोहनशास्त्रात यावर उपाय आहे का असं विचारलं असता राधिका म्हणतात, हे व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून आहे.
त्या म्हणतात की, "ही भुतं येतात त्यांच्याशी बोलतात. काहीजण म्हणतात की, त्यांना ही भुतं त्रास देत नाहीत. अशा प्रकारे ते त्यांच्या मनातील समस्या वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. सुरुवातीच्या टप्प्यावर संमोहन चिकित्साद्वारे उपचार केले जातात. आपण केवळ उपाय शोधू शकतो. पण मानसिक समस्या असलेल्या लोकांना उपचार देता येत नाहीत."
संमोहन नेमकं कशासाठी केलं जातं?
अनेक लोक त्याचा विविध कारणांसाठी वापर करतात. सोशिना सांगतात की, "भूतकाळातील विविध आघात बरे करण्यासाठी याचा वापर केला जातो.
"जे लोक माझ्याकडे येतात त्यांना मी पहिली शिफारस करते ती त्यांनी आपलं मन साफ करून घेतलं पाहिजे. याद्वारे मी प्रथम त्यांना त्यांच्या मनात असलेल्या भीतीपर्यंत घेऊन जाते. त्यानंतर हळूहळू त्यांचं वास्तव समजून देण्याचा प्रयत्न करते."
राधिका मुरुगेसन म्हणतात की, यामुळे ताणतणाव, वेदना, दुःख, धूम्रपान, कोणतीही गंभीर समस्या कमी करण्यासाठी मदत होते.
त्या पुढे सांगतात की, "संपूर्ण भारतात लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. या लोकांना मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही त्रास आहेत. पोटाशी संबंधित समस्या याचंच एक उदाहरण आहे. सकाळी उठल्याबरोबर त्यांना पोटात काहीतरी जाणवतं. याला आयबीएस आजार म्हणतात."
संमोहन उपचाराला पर्याय आहे का?
मानसशास्त्रज्ञ मोहन बालकृष्णन यांनी यो-झेन हा संमोहन उपचाराचा उत्कृष्ट आणि पर्यायी प्रकार असल्याचं सांगितलं.
ते म्हणतात की, योगा हा संमोहन उपचाराला पर्याय आहे.
विशेषत: जी मुलं शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात, तर अशा समस्या असल्यास या गोष्टी एका दिवसात बऱ्या करता येतात.
जे लोक जन्माच्या वेळी कोणत्याही मानसिक समस्यांशिवाय जन्माला आले होते, मात्र पुढच्या आयुष्यात त्यांना विविध घटनांमुळे त्रास झाला आणि त्यातून मानसिक समस्या निर्माण झाल्या अशा लोकांनाही बरं करता येतं.
या उपचारासाठी सरकारी दवाखाने का नाहीत?
बहुसंख्य भारतीय सरकारी रुग्णालयांमध्ये संमोहन उपचार उपलब्ध नाहीत. मात्र प्रशिक्षित व्यावसायिकाला संमोहन उपचार करण्याची परवानगी आहे. आम्ही किलपॉक सरकारी मनोरुग्णालयाच्या संचालक डॉ. पूर्ण चंद्रिका यांना यामागचं कारण विचारलं.
त्यावर डॉ. पूर्ण चंद्रिका म्हणाल्या, "संमोहन ही जुनी उपचार पद्धती आहे. पण आपण त्याही पुढे आलो आहोत. आपण फार्माकोलॉजिकल थेरपी, नॉन-फार्माकोलॉजिकल थेरपी, सीबीटी यासारख्या विविध प्रकारच्या उपचारांचा वापर सुरू केला आहे. संमोहन उपचार पद्धतीवर वाद आहेत. पण त्याकडे प्रभावी उपाय म्हणून पाहता येत नाही."
बालपणीचे आघात, चिंता यासह काही गोष्टींसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे काही शारीरिक आजार औषधोपचारानेच नियंत्रित करता येतात. तर स्किझोफ्रेनियासारखे मानसिक आजार केवळ गोळ्यांनीच नियंत्रित करता येतात.
संमोहनाचा उपयोग केवळ मनात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे कोणत्याही समस्येवर ताबडतोब किंवा दीर्घकालीन उपचार करता येत नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा व्यायाम म्हणून अंमलात आणता येईल, पण संपूर्ण उपचार पद्धती म्हणून याकडे पाहता येणार नाही, असं त्या म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)