जेल की म्युझिक स्टुडिओ? एका कुख्यात तुरुंगाची अजब गोष्ट!

'एम्परेर' हा या जेलमधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या 'सा न्गांडो' या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओला यूट्यूबवर 24,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

फोटो स्रोत, Artists Equity

फोटो कॅप्शन, 'एम्परेर' हा या जेलमधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या 'सा न्गांडो' या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओला यूट्यूबवर 24,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
    • Author, वेडाएली चिबेलुशी आणि टॉम ब्रूक
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

कॅमेरून देशातल्या दुआला शहरात 'न्यू बेल' हा एक खूपच कुख्यात तुरुंग आहे. हा तुरुंग म्हणजे एका शहरात वसलेलं दुसरं छोटं शहरच वाटतं.

या तुरुंगात त्यांची स्वतःची टॅक्सी सेवा म्हणजे गर्दीतून धावत जाऊन निरोप पोहचवणारे कैदी आहेत. या तुरुंगाकडे स्वतःची कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे पथक आहे (सुरक्षारक्षक कमी पडल्यावर व्यवस्था सांभाळणारे मजबूत कैदी) आणि स्वतःची बाजारपेठही आहे जिथे दुकानांच्या रांगेत कैदी तळलेली कसावा आणि 'बेनेट' पेस्ट्रीसारखे स्वादिष्ट पदार्थ विकतात आणि खरेदी करतात.

थोडक्यात काय तर न्यू बेलमधील कैद्यांनी जेलच्या शिथिल नियमांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला आहे.

या मानसिकतेचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजे 'जेल टाइम रेकॉर्ड्स'. जेलच्या आवारातच सुरू असलेला एक म्युझिक स्टुडिओ आणि म्युझिक लेबल जे अत्यंत हुशार कैद्यांना छोटे स्टार बनवत आहे.

जेलच्या आत आणि बाहेर ज्याची प्रचंड दहशत आहे असा गँगस्टर 'एम्परेर' याने पूर्णपणे जेलमध्येच शूट केलेल्या गाण्याच्या व्हीडिओला युट्यूबवर 24 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या जेलमधल्या कैद्यांच्या गाण्यांचे चाहते आता थेट दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि अर्जेंटिनापर्यंत तयार झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच 'जेल टाइम रेकॉर्ड्स'ने न्यू बेल जेलच्या अंगणात कैद्यांसाठी एका मोठ्या संगीताच्या मैफिलीचे (कॉन्सर्टचे) आयोजन केले होते.

'जेल टाइम रेकॉर्ड्स'चे सह-संस्थापक आणि माजी कैदी स्टीव्ह हॅपी यांनी बीबीसीच्या 'टॉकिंग मूव्हीज' कार्यक्रमात सांगितलं, "हे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं एक साधन आहे. या माध्यमातून आम्ही खरोखर मैत्री आणि प्रेम एकमेकांशी वाटून घेऊ शकतो आणि आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवू शकतो."

"आम्ही आता जेलच्या त्या चार भिंतींचा विचारच करत नाही. आम्हाला आमचे स्वातंत्र्य सापडले आहे," असंही ते नमूद करतात.

राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षारक्षक पथकात माजी सैनिक असलेले 'स्टोन' (उजवीकडे), 'जेल टाइम रेकॉर्ड्स'मध्ये रॅपर आणिसंगीतनिर्मिती करतात.

फोटो स्रोत, Artists Equity

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षारक्षक पथकात माजी सैनिक असलेले 'स्टोन' (उजवीकडे), 'जेल टाइम रेकॉर्ड्स'मध्ये रॅपर आणि संगीतनिर्मिती करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'जेल टाइम रेकॉर्ड्स'चा स्टुडिओ अगदीच साधा आहे. एका कॉम्प्युटरच्या खोलीला जोडून असलेली एक लहानशी, दमट आणि उकाड्याची रेकॉर्डिंग रूम.

स्टुडिओचेच नाव देण्यात आलेल्या एका लोकप्रिय माहितीपटानुसार हीच जागा कैद्यांना मोकळा श्वास घेण्याची आणि स्वतःतली कला दाखवण्याची संधी देते.

हॅपी आणि त्यांच्यासोबत 'जेल टाइम रेकॉर्ड्स'च्या सह-संस्थापक असलेल्या इटालियन कलाकार डियोन रोच यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे शूटिंग न्यू बेल जेलमध्ये सलग 6 वर्षे चालले.

गेल्या महिन्यात न्यूयॉर्कच्या 'ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट माहितीपट' यासह तब्बल 3 पुरस्कार पटकावले.

या फिल्ममध्ये, स्टोन नावाचा कैदी मायक्रोफोनमध्ये रॅप गाताना दिसतो- "दगडाचं मन, हे एक युद्ध आहे. माझ्या भावना काचेसारख्या फुटून विखुरल्या आहेत."

"मी जेलच्या दरवाजासारखा आतून पूर्ण बंद झालोय. पायाखाली कसलाच आधार उरलेला नाही, मी माशासारखा निसटून चाललोय."

कॅमेरूनच्या 'प्रेसिडेंशियल गार्ड'मध्ये पूर्वी सैनिक असलेला स्टोन दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी न्यू बेल जेलमध्ये 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा तो ठामपणे करतो.

या माहितीपटात स्टोन आपल्या लहान मुलगी मायराला फोन लावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण बऱ्याचदा त्याचा फोन लागतच नाही. पुन्हा एकदा मायराशी बोलणं न झाल्यामुळे तो आपल्या घरच्या एका माणसाला व्हॉईस मेसेज पाठवून सांगतो, "खूप दिवस झालेत. तिने अधूनमधून माझा आवाज ऐकला पाहिजे. म्हणजे ती तिच्या बाबांना विसरणार नाही."

फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या 'जेल टाइम रेकॉर्ड्स'चा कार्यक्रम जवळून आणि नीट पाहता यावा यासाठी कैदी चांगली जागा पकडण्याची धडपड करत आहेत.

फोटो स्रोत, Artists Equity

फोटो कॅप्शन, फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या 'जेल टाइम रेकॉर्ड्स'चा कार्यक्रम जवळून आणि नीट पाहता यावा यासाठी कैदी चांगली जागा पकडण्याची धडपड करत आहेत.

'हार्ट ऑफ स्टोन'चा म्युझिक व्हीडिओ हा नेहमीसारखाच 'जेल टाइम रेकॉर्ड्स'च्या खास स्टाईलमध्ये बनवला आहे. यातली प्रॉडक्शनची क्वालिटी दर्जेदार आहे, गोष्ट खिळवून ठेवणारी आहे आणि जेलमधले बाकीचे कैदी कलाकार आणि क्रू मेंबर्स म्हणून यात सहभागी झाले आहेत.

न्यूझीलंडचे ऑस्करविजेते डायरेक्टर तायका वाईटिटी आणि त्यांची पत्नी गायिका रीटा ओरा या दोघांनी या डॉक्युमेंट्रीसाठी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिलं आहे.

तायका म्हणतात, "त्या तुरुंगामधून तयार होऊन बाहेर येणारं संगीत खरंच अप्रतिम आहे."

"सुधारण्याची संधी आणि कलेची ताकद काय असते, हे यातून दिसून येतं. विचार करा यातले काही लोक तर जन्मठेप भोगत आहेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट किती मोलाची असेल. मला वाटतं स्वतःची कला आणि भावना मांडण्यासाठी असं एक माध्यम मिळणं ही खूप मोठी आणि माणुसकीची गोष्ट आहे," असंही ते नमूद करतात.

'जेल टाइम रेकॉर्ड्स'ची सुरुवात 2018 मध्ये झाली. जेव्हा डियोन रोच यांनी न्यू बेल तुरुंगात सामाजिक काम करणाऱ्या एका एनजीओसोबत स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

कैद्यांसाठी चाललेल्या एका डान्स क्लासमध्ये काही रॅपर्सच्या ग्रुपने माईक हातात घेतला आणि अनपेक्षितपणे फ्रीस्टाईल रॅपिंग करायला सुरुवात केली.

त्यांचं हे कौशल्य पाहून रोच इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी थेट तुरुंग अधिकाऱ्यांकडे तुरुंगात एक स्टुडिओ सुरू करण्याची परवानगी मागितली.

तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर रोच यांनी स्टुडिओचे निर्माते आणि साऊंड इंजिनिअर म्हणून काम पाहण्यासाठी स्टीव्ह हॅपी यांची मदत घेतली.

हॅपी सांगतात की, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर काय करायचं, यावरून घरात भांडण झालं आणि याच वादामुळे ते न्यू बेल जेलमध्ये पोहोचले.

"या भांडणात हायकोर्टात न्यायाधीश असलेल्या त्यांच्या काकूने हॅपी यांच्यावरच वडिलांच्या हत्येचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये पाठवलं. पण 2 वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली", अशी माहिती 'जेल टाइम रेकॉर्ड्स'ने दिली.

न्यू बेल जेलमध्ये पूर्वी कैदी असलेले स्टीव्ह हॅपी (उजवीकडे) यांनी डीओन रोच (मध्यभागी) यांच्यासोबत मिळून या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं आहे आणि तायका वाईटिटी (डावीकडे) हे याचे कार्यकारी निर्माते होते.

फोटो स्रोत, Getty Images for Tribeca Festival

फोटो कॅप्शन, न्यू बेल जेलमध्ये पूर्वी कैदी असलेले स्टीव्ह हॅपी (उजवीकडे) यांनी डीओन रोच (मध्यभागी) यांच्यासोबत मिळून या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं आहे आणि तायका वाईटिटी (डावीकडे) हे याचे कार्यकारी निर्माते होते.

2022 मध्ये हॅपी, रोच आणि तिथल्या कैद्यांनी मिळून 'जेल टाइम व्हॉल्यूम 1' नावाचा एक म्युझिक अल्बम रिलीज केला.

'जेल टाइम रेकॉर्ड्स'च्या नियमांनुसार अल्बमच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यापैकी अर्धा हिस्सा कलाकारांना देण्यात आला आणि उर्वरित रक्कम पुन्हा म्युझिक लेबलमध्येच गुंतवली गेली.

न्यू बेल जेलमधलं भयंकर वातावरण बघता हा स्टुडिओ चालू राहणं तिथल्या अनेक कलाकारांसाठी खूप गरजेचं आहे.

2022 मध्ये 'ह्युमन राइट्स वॉच'ने एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, न्यू बेलच्या जुनाट आणि पडक्या भिंतींच्या आत क्षमतेपेक्षा चारपट जास्त म्हणजेच जवळपास 4,700 कैदी राहत होते.

मानवाधिकार संघटनांच्या मते, तुरुंगामधली अती गर्दी आणि अस्वच्छतेमुळे 4 वर्षांपूर्वी तिथे कॉलराची साथ खूप वेगाने पसरली होती. यात कमीत कमी 6 कैद्यांचा मृत्यू झाला होता.

न्यू बेल जेल हे तिथल्या मारामारी आणि हिंसाचारासाठीही ओळखलं जातं. 2008 मध्ये काही कैद्यांनी पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात 16 कैदी मारले गेले होते.

इतकेच नव्हे तर कैदी आपापसातही एकमेकांवर हल्ले करतात आणि दहशत पसरवतात. विविध गुन्ह्यांसाठी 10 वर्षांची शिक्षा भोगणारा गँगस्टर 'एम्परेर' एका गोंधळलेल्या तरुण कैद्याला धमकावून त्याची गळ्यातली साखळी आणि चपला हिसकावून घेताना या डॉक्युमेंट्रीत दाखवलं आहे.

दुआलाच्या एका पारंपरिक प्रमुखाचा मुलगा असलेला 'एम्परेर' आणि गंभीर गुन्हे केलेले इतर कैदी या 'जेल टाइम रेकॉर्ड्स'च्या उपक्रमामुळे हिरो ठरत आहेत का, असा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा रोच यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही करत असलेली ही प्रक्रिया मूलतः पुनर्वसनाची प्रक्रिया आहे."

"आम्ही कोणाबद्दलही आधीच काही मत न बनवता तुरुंगात प्रवेश करतो आणि या प्रकारच्या कामासाठी हाच एकमेव मार्ग असू शकतो."

"इतर कोणत्याही सर्जनशील प्रक्रियेप्रमाणेच संगीत हेसुद्धा स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहे. आपण भूतकाळात केलेल्या कृत्यांचा स्वीकार करणे आणि आशेने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील उद्देश आहे."

जेजेने तिच्या 'ॲफ्रोबीट्स' शैलीतील गाण्याचे रेकॉर्डिंग 'न्यू बेल जेल'च्या महिला विभागातील आवारात केले.

फोटो स्रोत, Jail Time Records

फोटो कॅप्शन, जेजेने तिच्या 'ॲफ्रोबीट्स' शैलीतील गाण्याचे रेकॉर्डिंग 'न्यू बेल जेल'च्या महिला विभागातील आवारात केले.

तुरुंग प्रशासनाचेही या बाबतीत असेच मत असल्याचे दिसून येते.

"तुरुंग प्रशासनाने या उपक्रमाचे खरोखरच उत्साहाने स्वागत केले. कॅमेरून हा संगीताची प्रचंड आवड असलेला देश आहे. तिथे प्रत्येकालाच संगीताची आवड आहे," असं हॅपी यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षीच्या कार्यक्रमाला तुरुंगाच्या प्रमुखांनी स्वतः हजेरी लावली होती आणि त्यांनी कलाकारांसोबत डान्सही केला.

तुरुंग प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे 'जेल टाइम रेकॉर्ड्स'चे काम खूप चांगले चालले आहे आणि 'न्यू बेल जेल'च्या महिला विभागातल्या महिलांसह इतर अनेक कैद्यांना यामुळे संधी मिळत आहे.

'जेल टाइम रेकॉर्ड्स'ची पहिली महिला कलाकार ठरलेल्या 'जेजे'ने 2022 मध्ये 'शो मी द वे' या गंभीर आणि भावूक ॲफ्रोबीट्स गाण्याद्वारे पदार्पण केले होते.

"मला कोणी रस्ता दाखवला नाही, मला कोणीच मदत केली नाही, मी हे सर्व एकटीने केले," असं गाणं गाणारी जेजे तिच्यावर अन्याय करणाऱ्या काकाचे पैसे चोरून पळून गेल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आली होती.

महिलांच्या विभागासोबत काम करण्यासोबतच 'जेल टाइम रेकॉर्ड्स'ने आपला उपक्रम न्यू बेल आणि कॅमेरून देशाच्या सीमापलीकडेही नेला आहे.

रोच आणि हॅपी यांनी 2023 मध्ये तिथून तब्बल 1,000 मैल म्हणजेच 1,600 किलोमीटर लांब बुर्किना फासोची राजधानी असलेल्या वागाडुगू येथील सेंट्रल जेलमध्ये एक नवा स्टुडिओ सुरू केला.

जसा न्यू बेलचा मूळ स्टुडिओ यशस्वी झाला, तसंच यश पुढेही मिळावं, अशी 'जेल टाइम रेकॉर्ड्स'ला आशा आहे. या स्टुडिओचं स्वतःचं म्युझिक लेबल आहे, व्हीडिओ बनवणारी टीम आहे आणि आता तर एक पुरस्कार मिळालेली डॉक्युमेंट्रीसुद्धा आहे.

या डॉक्युमेंट्रीचा शेवट एका 'स्मरण' प्रसंगाने होतो. 'जेल टाइम रेकॉर्ड्स'चा उपक्रम सुरू असताना ज्या 6 कैद्यांचा मृत्यू झाला त्यांना दिलेली ती एक भावपूर्ण आदरांजली आहे.

न्यू बेल जेलमध्ये सगळीकडे फक्त अंधार आणि निराशाच दिसत असली, तरी हॅपी सांगतात की संगीताने कैद्यांसाठी "उज्ज्वल भविष्याकडे नेणारा आशेचा किरण ठरत आहे."

ते म्हणतात, "आधी त्यांच्या डोक्यात एक हट्टी विचार असायचा की, हे संपूर्ण जग आपल्याविरुद्ध आहे. पण आता त्यांना स्वतःची किंमत कळू लागली आहे."

"समाजात आपलंही एक स्थान आहे, असं आता त्यांना वाटायला लागलं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)