'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आलेल्या विठाबाई; राज कपूर यांची ऑफर नाकारली, पण तमाशा सोडला नाही

विठाबाई नारायणगावकर

फोटो स्रोत, PRADNYA DAYA PAWAR

    • Author, अमृता कदम
    • Role, BBC News Marathi producer
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

"शिंगणापूर यात्रेमध्ये तमाशा होता, खूप गर्दी होती. आईचे दिवस भरले होते. तिने सावळा मामाला म्हटलं की, माझे नऊ महिने नऊ दिवस भरत आले आहेत. कसं करायचं? मामांनी म्हटलं की, बरोबर आहे. पण एवढी यात्रा होऊ दे आणि मग तू दवाखान्यात भरती हो.

आईने पण विचार केला की, ठीक आहे. पहिले दोन दिवस तिला काहीच त्रास झाला. तिसऱ्या दिवशी मात्र बोर्डावर नाचत असतानाच तिला कळा सुरू झाल्या. ती तशीच नाचतानाच मागे गेली राहुटीमध्ये. आम्ही स्टेजवर नाचत होतो.

राहुटीमध्ये पडदा होता. पडदा म्हणजे साडीचा होता. तिथे तिची डिलिव्हरी झाली. बाहेर पब्लिक कालवा करत होती, की विठा कुठे आहे, विठा कुठे आहे, विठा कुठे आहे आणि इकडे ही कळा देत होती.

त्या सगळ्या गोंधळातच तिचं बाळंतपण झालं. तिथं कुठे कैची आणि बाकी गोष्टी असणार होत्या... तिनं दगडानेच नाळ ठेचली. लोक बाहेर गोंगाट करत होते, आपल्या मुली बाहेर एकट्या आहेत ही काळजी तिला होती. ती आली आणि नाचलीही.

मग तिनं पब्लिकला सांगितलं की, मला मुलगा झालाय...दहा मिनिटांचं बाळ आहे. मामा त्या गुंडाळलेल्या बाळाला घेऊन आला. तिनं ते बाळ दाखवलं. ते पाहिल्यावर, 'ताई, आम्ही तुझा तमाशा नंतर पाहू' असं म्हणत पब्लिकही शांतपणे उठून गेली."

ज्येष्ठ लावणी कलाकार मंगला बनसोडे त्यांच्या आई विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या बोर्डावरच झालेल्या बाळंतपणाचा प्रसंग सांगत होत्या.

श्रद्धा कपूर हिची मुख्य भूमिका असलेल्या ईठा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. यामध्ये साजशृंगार केलेल्या 'ईठा'ला कळा सुरू झाल्याचं दृश्य पाहिल्यावर अनेकांना हे खरंच असं घडलं होतं का? ही 'ईठा' होती तरी कोण? असे प्रश्न पडले.

विठाबाई

फोटो स्रोत, PRADNYA DAYA PAWAR

तमाशाचा फड गाजवणाऱ्या, तमाशा- लावणीला आपलं सर्वस्व देणाऱ्या, त्यासाठी अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या, ज्यांना रसिकांनी तमाशासम्राज्ञी हे बिरूद दिलं त्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरांची ही गोष्ट.

त्यांच्या बाळंतपणाचा प्रसंग ऐकताना, वाचताना एकीकडे हा बाईंचा कणखरपणा आहे, असं वाटलं. पण त्याचबरोबर एक बाई नाळ कापून बोर्डावर उभी राहते, याकडे तिचं कौतुक म्हणून पाहायचं की हतबलता, तिची कला म्हणून पाहायचं की गरज, तिचा नाच बघण्यासाठी समोर असलेल्यांकडे प्रेक्षक म्हणून पाहायचं की केवळ पुरूष? असेही प्रश्न माझ्या मनात आले.

लावणीकडे लोककला म्हणून पाहत असलो तरी कलाकारांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेचं काय, विठाबाईंनाही आयुष्यात लोकप्रियता, मान-सन्मान मिळाले, पण त्याचबरोबर त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाचं काय? असेही प्रश्न पडले. त्यामुळेच विठाबाई नारायणगावकरांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.

वडिलांकडून मिळाला वारसा

विठाबाईचे वडील भाऊ यांचे मूळ गाव आर्वी आणि आडनाव खुडे. पण त्यांची आजी जातीच्या उतरंडीतल्या रिवाजानुसार नारायणगावात दवंडी देण्याचं काम करायची. त्यामुळे जिथं भरला दरा (पोट) तोच गाव बरा असं म्हणत त्यांनी नारायणगावलाच आपलं म्हटलं.

भाऊ यांनी पठ्ठे बापूरावांचा तमाशा पाहून आपणही तमाशा काढायचा असं ठरवलं. घरातलं सोनं-नाणं विकून त्यांनी आपला पुतण्या बापूसोबत तमाशा सुरू केला. नाव ठेवलं 'भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ'. जातीची जाणीव म्हणून मांग आणि ज्या गावात आपल्याला उपजीविका मिळाली त्या गावाचे ऋण म्हणून नारायणगावकर.

बारा कलाकारांचा हा फड गावोगाव फिरू लागला. तीन-चार वर्षांतच या फडाची आर्थिक घडी चांगली बसली.

विठाबाई

फोटो स्रोत, PRADNYA DAYA PAWAR

1935 साली जुलै महिन्यात भाऊंचा फड पंढरपुरात होता. त्यांची दुसरी पत्नी शांता हिचे दिवस भरत आले होते. तीही फडासोबतच होती. रात्री तमाशाला सुरूवात झाली आणि त्याचवेळी शांताला कळा सुरू झाल्या. मुलगी झाली. शांताबाईंचं हे चौदावं अपत्य. पंढरपुरात जन्म झाला म्हणून मुलीचं नाव विठा ठेवलं.

भाऊंनी विठाला शाळेत घातलं होतं, पण त्या गाणी, कविता, गवळणी यातच जास्त रमत. वयाच्या आठव्या वर्षी विठाबाईंना भाऊंनी मामा वरेरकर यांच्या कलापथकात दाखल केलं.

तेराव्या वर्षापर्यंत त्या मामांच्या कलापथकात होत्या. तिथून त्या आपल्या वडिलांच्या तमाशात आल्या. तोपर्यंत भाऊंच्या तमाशात कोणी स्त्री कलाकार नव्हती. इथून भाऊ-बापूच्या तमाशाचं एक नवीन पर्व सुरू झालं.

एकीकडे भाऊंचं वय वाढत होतं आणि दुसरीकडे गाणं आणि नृत्य या दोन्हीत पारंगत असलेल्या विठाबाईंचा बोलबोला होत होता. सोबतीला त्यांच्या दोन बहिणी केशर आणि मनोरमाही होत्याच.

1957 साली भाऊंचं निधन झालं. भाऊंच्या निधनानंतर काही वर्षांनीच त्यांच्या तमाशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार होता.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

1961 साली राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या कलाकारांकडून नामांकन मागवण्यात आली.

काही ज्येष्ठ मराठी कलाकारांनी भाऊ-बापू तमाशाकडूनही अकादमीच्या नामांकनाचा फॉर्म भरून घेतला. त्यानंतर त्यांना दिल्लीत प्रयोग सादर करायला बोलावलं.

राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांनी भरलेल्या दालनात विठाबाईंनी आपली कला सादर केली. त्यावर्षीच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी भाऊ-बापूच्या तमाशाची निवड झाली.

आरपार लयीत प्राणांतिक या पुस्तकाचं मुखपृष्ठ

फोटो स्रोत, PRADNYA DAYA PAWAR

फोटो कॅप्शन, आरपार लयीत प्राणांतिक या पुस्तकाचं मुखपृष्ठ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुढच्याच वर्षी विठाबाईंच्या तमाशाला आणखी एक मान मिळाला. 1962 साली भारत-चीन युद्ध सुरू झालं होतं. एकीकडे जखमी सैनिकांच्या शुश्रूषेसाठी डॉक्टर-सेवाभावी पथकं नेफा आघाडीवर जात होती, तर दुसरीकडे या कठीण काळात सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेक कलाकारही तिथे जात होते.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने विठाबाईंनाही नेफा आघाडीवर कला सादर करण्याबद्दल विचारलं. अंगावर पिणारी तान्ही लेक मागे ठेवून विठाबाई आणि भाऊ-बापू (मांग) नारायणगावकरांचा तमाशा नेफा आघाडीवर पोहोचला.

तीन महिन्यांची बाळंतीण असलेल्या विठाबाईंनी गोठवणाऱ्या थंडीत पंधरा दिवस नेफा आघाडीवर मनोरंजन करत सैनिकांचं मनोधैर्य वाढवलं.

बाळंतपणानंतर काही दिवसांतच नेफा आघाडीवर जाणाऱ्या विठाबाईचा कणखरपणा एवढा अचाट होता की, बाळाला जन्म दिल्यानंतर तिथेच दगडाने नाळ ठेचून पुन्हा बोर्डावर नाचायला उभ्या राहिल्या.

लेखाच्या सुरूवातीलाच विठाबाईंच्या थोरल्या कन्या आणि लावणी कलाकार मंगला बनसोडेंनी हा सगळा प्रसंग सांगितला आहे. मंगलाताई म्हणाल्या की, तिचा देहच वेगळा होता. तिनं कधीच नाजूकपणा केला नाही. ती धीट होती.

कदाचित म्हणूनच वडील-चुलत भावाने उभ्या केलेल्या तमाशात फूट पडल्यानंतरही विठाबाई स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभ्या राहू शकल्या.

तमाशातली फूट

भाऊ यांच्यानंतर काही वर्षांनी बापूंचंही निधन झालं होतं. पण तमाशाचं नाव भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर असंच होतं. फडाचे व्यवहार विठाबाईंचे चुलत भाऊ सावळा पाहायचे.

विठाबाईंचे पती मारूती सावंत हेदेखील फडाच्या आर्थिक बाबींमध्ये लक्ष घालायला लागले होते. त्यावरून फडात कुरबुरी वाढायला लागल्या आणि शेवटी विठाबाईंनी आपण, आपल्या मुली सावळा यांच्या फडात राहणार नसल्याचं सांगितलं.

विठाबाईंसोबत त्यांची बहीण केशर बाहेर पडली. पण त्यांची आई, भावांसह इतर कुटुंबियांनी सावळा यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

तमाशातली फूट

फोटो स्रोत, PRADNYA DAYA PAWAR

सिनेमाची ऑफर आणि राज कपूर यांची दाद

विठाबाईंनी जोमाने आपला फड उभा केला. सोबत बहीण आणि त्यांच्या मुली- मंगला, मालती, संध्या पण होत्याच. त्यांनी आपल्या तमाशाला नाव दिलं, कै. भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर संचालित विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ.

विठाबाईंचा तमाशा गर्दी खेचत असतानाच सावळा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विठाबाईंच्या तमाशाच्या नावाला आक्षेप घेतला. त्यांनी भाऊ-बापूचं नाव वापरू नये म्हणून गोंधळ केला. पंच बसले, शेवटी विठाने केवळ आपल्या वडिलांचं नाव तमाशाला लावावं, बापूचं लावू नये हा तोडगा निघाला. विठाबाईंच्या तमाशाचं नवीन नाव ठरलं, विठा भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ.

या नवीन बोर्डाकडून विठाबाई 'रक्तात न्हाली कुऱ्हाड' हा वग सादर करू लागल्या. यातली मुख्य भूमिका त्या करायच्या.

पुण्यातल्या नेहरू स्टेडिअममध्ये एकदा विठाबाईंनी हा वग सादर केला होता, त्यावेळी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.ल.देशपांडे यांनी म्हटलं होतं की, 'विठा, तुझं काम पाहून मी धन्य झालो.'

विठाबाईंनी त्यांच्या उमेदीच्या काळात काही सिनेमातही काम केलं होतं. सर्वसाक्षी, उमज पडेल तेव्हा, छोटा जवान या सिनेमांत त्यांनी काम केलं होतं.

त्यांना सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या, अगदी राज कपूर यांनीही विठाबाईंना सिनेमाची ऑफर दिली होती. पण जोपर्यंत माझा प्रेक्षक, माझे चाहते आहेत, तोपर्यंत कला सादर करणार. सिनेमात गेले तर माझं एकटीचंच नाव होईल. पण तमाशामुळे माझ्यासोबतच्या पाच-पन्नास कलाकारांची घरंही चालतील असा विचार करून त्यांनी सिनेमात काम केलं नसल्याचं मंगला बनसोडे यांनी सांगितलं.

अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांच्यासोबतचा अजून एक किस्सा मंगला बनसोडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितला.

"तमाशाचं एक अधिवेशन होतं. तिथे राज कपूर यांचा सत्कार होता. आमची आई साधी नऊवारी साडी नेसून आली. तिने गवळण म्हटली. ती तिनं काळी तीनला घेतली, एकदम उंच पट्टीत. पेटीवाल्यालाही पटकन लक्षात आलं नाही. ते राज कपूरना खूप आवडलं.

त्यानंतर सगळ्यांनी राज कपूरचा सत्कार केला. आईनेही केला. ते जायला निघाले तेव्हा आई म्हणाली- ए भाई, जरा देख के चलो! राज कपूरने त्याला दाद देत टाळ्या वाजवल्या. त्यांनी म्हटलं की, विठा तुझा आवाज खूप चांगला आहे."

राज कपूरने आईला सत्यम शिवम सुंदरमच्या आधी एका सिनेमाची ऑफर दिली होती. राज कपूर आम्हाला स्टुडिओतही घेऊन गेले होते, अशी आठवणही मंगला बनसोडेंनी सांगितली.

जेव्हा तमाशा न पाहताच परतले प्रेक्षक

विठाबाईंची लोकप्रियता गावा-खेड्यांमध्ये होतीच. मुंबई-पुण्यातही त्यांचा तमाशा गाजत होता. 1971 मध्ये दिवाळीच्या दरम्यान मुंबईत विठाबाईंचा प्रयोग होता. पहिला प्रयोग राणीच्या बागेतल्या अण्णाभाऊ साठे खुल्या सभागृहात झाला.

त्यानंतर अंधेरी इथल्या मैदानात विठाबाईंचा खेळ होता. पण खेळाच्या आधी पावसाची चिन्हं दिसू लागली. विजांचा कडकडाट सुरू झाला. तिकीट विक्री कशी सुरू करायची असा प्रश्न पडला.

पण रसिकांनी तिकीटविक्री सुरू करा. खेळ सुरू झाला तर ठीक नाहीतर आम्ही विठाला ही भाऊबीजेची ओवाळणी दिली असं समजू असं म्हटलं.

गण सुरू झाला आणि पावसाला सुरूवात झाली. प्रेक्षकांनी भाऊबीज-भाऊबीज म्हणत विठाबाईंचा तमाशा न पाहताच मैदान सोडलं.

आर्थिक ओढाताण

विठाबाईंचा नवीन तमाशा जोमात होता.

अनेकदा रसिक विठाबाईंच्या तमाशाला दौलतजादा करायचे. स्टेजवर पैशांचा एवढा खच पडायचा की, त्यात त्यांना नाचणं मुश्किल व्हायचं. त्यांच्या तिकीटाचा गल्ला पोत्यात पायाने दाबून दाबून भरला जायचा, अशाही आठवणी सांगितल्या जायच्या.

पण विठाबाईंच्या वाट्याला यातून कोणतंही आर्थिक स्थैर्य आलं नाही. सावळा यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर विठाबाईंच्या तमाशाचा सगळा आर्थिक व्यवहार मारुती सावंत हेच पाहात होते.

विठाबाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

विठाबाईंनी स्वतःचा तमाशा काढून दहा वर्षं झाली होती. पण विठाबाईंच्या आर्थिक अपेष्टा संपत नव्हत्या. त्यांची थोरली मुलगी मंगला यांनी त्यांचे पती रामचंद्र बनसोडेंसोबत स्वतःचा वेगळा फड काढला होता.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, आपण केलेला आंतरजातीय विवाह वडिलांना मान्य नसल्यामुळे आपल्याला आईपासून वेगळं व्हावं लागलं.

1982 साली विठाबाई मारूती सावंत यांच्यापासून वेगळ्या झाल्या. हाती पैसा नाही, डोक्यावर कर्जं, मुली स्वतंत्र झालेल्या आणि पन्नाशीकडे झुकणारं वय यात त्यांनी कसाबसा फड सुरू ठेवला होता. पण आता गोष्टी पूर्वीसारख्या नव्हत्या.

1986 मधली गोष्ट... ज्या विठाबाईंचा ताफा लक्झरी बसमधून प्रवास करायचा, त्याच विठाबाई पंधरा-वीस कलाकारांसह एसटीने मुंबईत कार्यक्रम करण्यासाठी निघाल्या होत्या. तिथे त्यांची नीट राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती.

त्यांच्या या सगळ्या परिस्थितीची दखल घेत 'लोकसत्ता' दैनिकाचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी स्तंभात त्याबद्दलचा लेख लिहिला. हा लेख छापून आल्यानंतर सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला.

पण विठाबाईंच्या तमाशाची घडी पुन्हा बसलीच नाही. त्याला अनेक कारणं होती. मुलींनी स्वतंत्रपणे सुरू केलेले फड, कर्ज, वाढतं वय आणि तब्येतीची झालेली हेळसांड. अखेर ज्या फडासाठी जीवाचं रान केलं, तोच फड बंद करावा लागला. 1990 साली विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळाचं अस्तित्त्व संपलं.

फड बंद झाल्यावर विठाबाई वडिलांच्या गावी नारायणगाव इथं जाऊन राहिल्या.

तमाशा बंद झाल्यानंतर काही महिन्यांतच विठाबाईंना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. काही वर्षांपूर्वी भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळाचाही गौरव याच पुरस्काराने झाला होता. आता भाऊ यांच्या लेकीलाही तो सन्मान मिळाला. पण पुरस्काराने परिस्थिती बदलली नाहीच.

अखेरचे दिवस

विठाबाईंना 1998 साली हृदयविकाराचा पहिला आणि तीव्र झटका आला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती.

त्यांच्यावर उपचारासाठी सरकारी पातळीवरून मदत मिळाली, अनेकांनी वैयक्तिकरित्याही मदतीचा हात पुढे केला. त्यातून त्या वाचल्या, पण त्यांच्या तब्येतीच्या अनेक कुरबुरीही सुरू झाल्या.

मधल्या काही काळात त्यांना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला होता. नारायणगावात ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत छोटं घर बांधून झालं होतं.

आयुष्यभर पायात चाळ बांधून लोकांना रिझवणाऱ्या विठाबाईंच्या आयुष्यातली हीच काय ती मालमत्ता. पण त्यांची 'कमाई' त्यापेक्षा मोठी होती, अनेकांच्या आयुष्यात आपल्या कलेने पेरलेला आनंद, तमाशाला त्यांनी दिलेलं वलय, त्याचा झालेला गौरव आणि हजारो रसिकांकडून मिळालेली तमाशासम्राज्ञी ही उपाधी.

हीच कमाई मागे ठेवत 15 जानेवारी 2002 साली जगाचा निरोप घेतला.

लावणी प्रातिनिधिक छायाचित्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लावणी कलावंताचे प्रातिनिधिक छायाचित्र

त्यांच्या अखेरच्या दिवसांबद्द्ल बीबीसी मराठीशी बोलताना मंगला बनसोडे यांनी म्हटलं की, आई आजारी होती. तिचे हाल झाले तसे. आम्ही बहीण-भावंडं जे ते आपापल्या पोटापाण्यासाठी इकडे-तिकडे गेले होते.

बहिणीकडून- भावाकडून तिला पैसे पोहोचत होते. पण तिला नवऱ्याचा आधार नसल्याने ती खचून गेली होती.

त्यांनी पुढे सांगितलं की, "माझ्या आईला देवीचा नाद होता. त्यामुळे ती मंगळवार-शुक्रवार जोगवा मागायची. पण अनेकांनी लिहिलं की, भीक मागायची अशा प्रकारे प्रसिद्ध केलं. ते चुकीचं आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याच्या वृत्तांचंही त्यांनी खंडन केलं.

मंगला बनसोडे यांनी म्हटलं की, अनेक ठिकाणी यूट्यूबवर आलंय की, तिच्या मयतीला पैसे नव्हते. हे सगळं चूक आहे.

विचार करा तिला आठ अपत्यं होती. आठ अपत्यांपैकी एक मुलगा, एक मुलगी तिच्या मयतीला पैसा देऊ शकत नव्हते का? माझा धाकटा भाऊ तेव्हा हजर होता, भावजय होती. त्यामुळे पैसे गोळा करून अंत्यसंस्कार केले हा केवळ समज आहे.

तमाशा क्षेत्रातली 'लोहस्त्री'

"विठाबाई नारायणगावकर हे नाव तमाशा क्षेत्रात एवढं मोठं का आहे, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. "

लोककलेच्या अभ्यासक सुखदा खांडगे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, "विठाबाई जशा लावणी नृत्यात सरस होत्या, तशाच वगनाट्यांतील भूमिकांमध्येही त्यांनी वेगळी छाप सोडली.

मुंबईची केळेवाली, आईचं काळीज, रायगडची राणी, रक्तात न्हाली कुऱ्हाड ही त्यांची गाजलेली वगनाट्ये होती. नृत्य, अदाकारी आणि गायन या तिन्ही अंगांनी त्यांनी लावणी फुलवत ठेवली.

तमाशाच्या बोर्डावर रुपेरी पडद्यावरील लावणीला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. इतकंच नव्हे तर हिंदी चित्रपटातील नृत्यप्रधान गीते त्यांनी तमाशाच्या रंगमंचावर आणली.

मुजऱ्यानंतर गवळणीत त्या 'दिवस उगवुनी किती वर आला', 'तू ग ऐक नंदाच्या नारी', 'श्रीरंगासारंगधरा', 'सोळा हजारात देखणी' अशा नृत्यप्रधान गवळणी सादर करत आणि त्यांना लोकमान्यता मिळवून देत."

लावणी प्रातिनिधिक छायाचित्कर

फोटो स्रोत, Getty Images

सुखदा यांच्या विठाबाईंबद्दलच्या वैयक्तिक आठवणीही आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी माझ्या बालपणात खोलवर रुजलेल्या स्मृती आहेत. लोककलावंत, लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि माझे वडील प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्याशी विविध प्रसंगी झालेल्या संवादांतून विठाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू माझ्यासमोर उलगडत गेले.

माझे वडील बोलताना सांगायचे की विठाबाईंच्या काळात दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, कांताबाई सातारकर, काळू-बाळू असे नावाजलेले फड होते. पण त्या साऱ्यांमध्ये विठाबाईंचे वैशिष्ट्य विलक्षण वेगळे होते.

त्या केवळ पारंपरिक लावणी सादर करत नसत, तर त्यांच्या तमाशावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव स्पष्ट जाणवत असे. नेफा आघाडीवर त्यांनी तमाशा सादर केला, तेव्हा 'लग जा गले' हे हिंदी चित्रपटातील गीत त्यांनी रंगमंचावर सादर केले."

सुखदा यांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटलं की, "माझ्या बालपणी अनेक व्यासपीठांवर मी विठाबाईंना प्रमुख पाहुण्या म्हणून पाहिलं आहे. त्यांचे तीक्ष्ण नाकीडोळी, डोळ्यांतली चमक, भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि रंगमंचावरची अविस्मरणीय उपस्थिती अजूनही डोळ्यांसमोर ताजी आहे. लावणी सादर करताना त्यांची देहबोली, अंगाची कमान, पदन्यास आणि अदाकारी यांची सांगड इतकी प्रभावी असे की प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होत."

विठाबाई नारायणगावकर या तमाशा क्षेत्रातील खऱ्या अर्थाने 'लोहस्त्री' होत्या. त्यांच्या काळात त्यांनी स्त्रीकलावंतांच्या नेतृत्वाला एक वेगळी ओळख दिली आणि आजही संगीतबारी तसेच ढोलकी फडाच्या तमाशात अनेक महिला प्रभावीपणे वर्चस्व गाजवताना दिसतात, असं सुखदा सांगतात.

ईठा की विठा?

सुरूवातीला उल्लेख केल्याप्रमाणे विठाबाईंच्या आयुष्यावर 'ईठा' हा सिनेमा येत आहे. या सिनेमात विठाऐवजी ईठा असं नाव वापरल्यानं तसंच 'विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर' ऐवजी 'विठाबाई भाऊ गावकर' असा उल्लेख केल्यामुळे अनेकांनी आक्षेप घेतले.

विठाबाईंच्या कन्या मंगला बनसोडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, मी माझ्या आईसोबत असताना खेडेगावातले लोक, काही कार्यकर्ते लोक ईठा, ईठीच म्हणायचे. तुम्ही आता विठा म्हणता. माझं असं म्हणणं आहे की, ईठा म्हणा किंवा विठा म्हणा, माझ्या आईचा सिनेमा निघतोय याचाच मला अभिमान आहे.

पण खरंच हे नाव बदलल्याने काहीच फरक पडत नाही का? विठाची ईठा करणं आणि जातीय वाद टाळण्यासाठी नावातून मांग या शब्दाचा उल्लेख काढणं यातून एक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भही नाकारले जात आहेत.

लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी याबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिताना म्हटलं की, बहुजनांची कला आणि जातवास्तवाचं अभिन्नत्व यातलं डायनॅमिक्स नष्ट होतं विठाबाईच्या नावातून 'भाऊ', 'मांग' आणि 'नारायणगावकर' हे शब्द वगळणाऱ्यांकडून. विठाबाईच्या वाट्याला भयाण शोषण, अनेक जीवघेणी संकटं येऊनही तिची जिजीविषा कधीच आटली नाही. अवघी रग, धग एकवटून लोककलेला, लावणीला एका आधुनिक मिथकाप्रत नेणारी विठाबाई..!

तिच्या नावातला 'मांग' शब्द काढल्याने आख्खी सामाजिक- सांस्कृतिक इमारतच कोसळून पडते, हे तिच्यावर चित्रपट निर्माण करणाऱ्यांना कळत नाही असं अजिबात नाही.

'मांग' शब्द काढून टाकून केवळ 'ईठा' म्हणणं म्हणजे तळागाळातून आलेल्या एका अस्सल प्रतिभाशाली कलावंत स्त्रीचं अ-सामाजिकीकरण करणं. तिच्या प्रतिकाराला, संघर्षाला, तिच्या सामाजिक लोकेशनला छाटून व्यक्तिगत करणं."

Yogiraj Bagul

फोटो स्रोत, Yogiraj Bagul

या शोषण करणाऱ्या व्यवस्थेची जाणीव विठाबाईंनाही होती. प्रवरानगरला झालेल्या दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जे भाषण केलं, त्यातून हे स्पष्ट होतं.

त्यांनी म्हटलं होतं,

जन्मापासून आम्ही खालचे म्हणूनच हिणवल्या गेलो. त्याकाळी आम्हा म्हारा-मांगाच्या हातात डफडं, गळ्यात गाणं आणि पायात चाळ व्हते. दुसऱ्यासाठी वाजवायचं-गायचं, त्यांना रिझवायचं-नाचायचं अन् अख्खा जनम त्यांच्यासाठी नासवायचा. पण खरं सांगू? आज मला लई बरं वाटतंय. मी लोकाम्होरं गायले, नाचले अन् त्यांला आनंद दिला. आमी दुःखात राहिलो, पण लोकांना सुख दिलं. स्वतः दुःखात राहून लोकांना सुख देणं ही पण एक कला आहे. टीचभर खळगी भरण्यासाठी आमी हातात डफडं-तुणतुणं घेतलं आणि पायात चाळ बांधले...

भारत-चीनच्या लढाईत जवानांची करमणूक करण्यासाठी मी नेफा आघाडीवर गेले होते. तिथं आमच्या रक्ताचे जवान गारठ्याच देशासाठी लढत होते. देशाच्या रक्षणासाठी आमच्या महारा-मांगाच्या जवाणांनी लढायचं, पण गावाच्या वेशीतून मातर आमच्या नवरदेवाला जाऊ द्यायचं नाही, अशी आमच्या लोकांची रहारीत...!

ही रहारीत तथाकथित खालची जात म्हणून, बाई म्हणून, त्यातही तमाशात नाचणारी बाई म्हणून विठाबाईंच्या वाट्याला जास्तच आली, त्यामुळेच सरकारी पुरस्कार, मानसन्मान मिळूनही त्यांना उपेक्षाही चुकली नाही...

विठाबाईंबद्दल प्रज्ञा दया पवारांनी आरपार लयीत प्राणंतिक ही दीर्घ कविता लिहिली आहे. ती कविता विठाबाईंचं जगणं मांडतानाच सगळ्या शोषित-वंचित बाईपणांच्या भोगांवरही बोट ठेवत जाते.. ते कवेत घेत विठाबाईंची प्रतिमा अजून व्यापक होते...

विठाबाई!

तुझ्या थकल्या भागल्या सुरकुतल्या देहानं

एकदा ये परत तमाशाच्या फडावर

आता झडून जाऊ दे अखेरचाच कलगी-तुरा

काय हाय मागणं जरा इच्याकर की बंद्या रुपयाला...

एकदा तरी म्हण गाणं

तुझ्या फक्त तुझ्या जिनगानीचं

वाहत्या साकळत्या नात्याचं

तुझ्या भोगवट्याचं

दुखल्या खुपल्याचं

तुझ्याच आदि-अंताचं...

एकदाच कर मायबाये ठसकेबाज अदाकारी

जितिजागती

बाईपासून सुरू होऊन

बाईपणात संपणारी

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरणीची!

संदर्भ-

  • तमाशा विबाबाईंच्या आयुष्याचा- योगीराज बागूल
  • आरपार लयीत प्राणांतिक - प्रज्ञा दया पवार

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

तमाशा

फोटो स्रोत, Yogiraj Bagul