सूर्यकुमार यादवचं दणदणीत शतक, मुंबईचं गुजरातसमोर 219 धावांचं लक्ष्य

Published

फलंदाज सूर्यकुमार यादवच्या दणदणीत शतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोर 219 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे.

इंडियन प्रीमीअर लीगमधील मुंबई आणि गुजरात या संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.

नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा मुंबईचे सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं.

दोघांनी सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करत धावांचा वेग कायम ठेवला.

पॉवरप्लेमधील पहिल्या 6 षटकांत मुंबईची धावसंख्या शून्य बाद 61 अशी होती.

IPL च्या यंदाच्या सिझनमध्ये लयात न दिसलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यालाही या सामन्यात चांगला सूर गवसल्याचं दिसून आलं.

मुंबईची घोडदौड मोठ्या धावसंख्येच्या दिशेने होत आहे, असं वाटत असतानाच गुजरातचा राशिद खान याने त्यांची वाट अडवली.

राशिदने सातव्या षटकात रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रोहितने 18 चेंडूंत 30 तर किशनने 20 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या.

यानंतर मागच्या सामन्यातील अर्धशतकवीर नेहल वढेराही झटपट बाद झाल्याने मुंबईची धावसंख्या 9 षटकांत 3 बाद 88 अशी झाली होती.

मात्र, दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने धावांचा रतीब घालणं सुरूच ठेवलं. सूर्याने गुजरातच्या सगळ्याच गोलंदाजांना चोप देत धावफलक हलता ठेवला.

एका बाजूने राशित खान मुंबईवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतानाही सूर्यकुमारने आपली फटकेबाजी सुरू ठेवली.

नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करत सुर्याने आपलं अर्धशतक 31 चेंडूंमध्ये पूर्ण केलं.

19 षटके पूर्ण झाली तेव्हा सूर्यकुमार यादव 44 चेंडूंमध्ये 87 धावांवर नाबाद होता.

विसाव्या षटकात कॅमेरून ग्रीनने एक धाव काढून सुर्यकुमार यादवला स्ट्राईक दिली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत सुर्याने गोलंदाज अल्झारी जोसेफवर हल्ला चढवला.

सुर्याने दुसऱ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. पण त्याची भरपाई त्याने चौथ्या चेंडूवर षटकार मारून केली.

19.4 षटके पूर्ण झालेली असताना सुर्यकुमार यादव 95 धावांवर खेळत होता.

दरम्यान, पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत सुर्याने आपली धावसंख्या 97 वर नेली.

यानंतर पुढच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव काय करणार याची उत्सुकता सर्वांना होती.

शतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमार यादवला शेवटच्या चेंडूवर किमान 3 धावा करणं गरजेचं होतं.

पण सूर्याने त्याच्या पठडीतील खास स्वीप शॉट खेळून लेग साईटला षटकार खेचला आणि आपलं शतक पूर्ण केलं.

सूर्यकुमारने एकूण 49 चेंडूंमध्ये 11 चौराक आणि 6 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या.

आपल्या IPL करिअरमधलं सूर्यकुमार यादवचं हे पहिलंच शतक आहे.

मुंबईचा डाव संपला तेव्हा धावफलकावर 5 बाद 218 धावा लागल्या होत्या.

मुंबईकडून 219 धावांचं लक्ष्य मिळाल्यानंतर गुजरातचे वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल हे फलंदाजीला उतरले आहेत.

हे वाचलंत का?