डोनाल्ड ट्रम्प यांना रक्तवाहिन्यांचा नेमका कोणता आजार आहे आणि तो किती गंभीर आहे?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

    • Author, जॅकलिन हॉवर्ड
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. गुरुवारी (17 जुलै) व्हाइट हाऊसनं जाहीर केलं की, डोनाल्ड ट्रम्प यांना 'क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी' नावाचा रक्तवाहिन्यांशी संबंधित त्रास आहे.

दैनंदिन न्यूज ब्रीफिंग दरम्यान, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याबाबतची माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, 79 वर्षीय ट्रम्प यांच्या पायांमध्ये सूज दिसून आल्यानं त्यांनी डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांना हा त्रास असल्याचं निदान झालं.

अलीकडे ट्रम्प यांच्या हाताच्या मागच्या बाजूला जखमांचे डाग असलेले फोटोही समोर आले होते. व्हाइट हाऊसनं सांगितलं की, या डागांचा त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या त्रासाशी काहीही संबंध नाही, तर हे सतत हस्तांदोलनामुळे आलेली सूज किंवा निळसर खुणा आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना झालेल्या आजाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत.

क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी म्हणजे काय?

व्हाइट हाऊसचे डॉक्टर कॅप्टन शॉन बार्बाबेला यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या आरोग्याची ही समस्या 'सौम्य आणि सामान्य' आहे. खासकरून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ही समस्या अनेकदा दिसून येते.

जेव्हा पायातील शिरांमधून रक्त परत हृदयाकडे नीट जाऊ शकत नाही, तेव्हा क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी ही समस्या होते. त्यामुळे रक्त पायात जमा होतं आणि पायाला सूज येऊ शकते.

वय वाढल्यानंतर शिरांमधील झडपा कमजोर होतात. त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, EPA

याची लक्षणं कोणती असतात?

क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सीमुळे पायांत रक्त साचतं, त्यामुळे सूज येते. जशी अलीकडील फोटोमध्ये ट्रम्प यांच्या टाचा आणि पायात दिसली होती.

"ही स्थिती काही वेळा गंभीर आजारांशी संबंधित असू शकते, पण केवळ ही स्थिती फारशी धोकादायक नाही आणि खूपच सामान्य आहे," असं वेक फॉरेस्ट विद्यापीठातील व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉ. मॅथ्यू एडवर्ड्स यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.

"त्यांच्या वयाच्या गटातील सुमारे 10 ते 35 टक्के लोकांना ही समस्या येते," असं त्यांनी सांगितलं.

अलीकडे ट्रम्प यांच्या हाताच्या मागच्या बाजूला जखमांचे डाग असलेले फोटोही समोर आले होते.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अलीकडे ट्रम्प यांच्या हाताच्या मागच्या बाजूला जखमांचे डाग असलेले फोटोही समोर आले होते.

तज्ज्ञ सांगतात की, या आजाराचा धोका वाढवणाऱ्या इतर कारणांमध्ये जास्त वजन असणं, पूर्वी रक्ताच्या गाठी झाल्याचा इतिहास असणं आणि दीर्घकाळ उभं राहण्याची गरज असलेली नोकरी करणं यांचा समावेश होतो.

ट्रम्प यांच्या डॉक्टरांनी काय सांगितलं?

ट्रम्प यांचे डॉक्टर शॉन बार्बाबेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायांमध्ये सूज दिसल्यानंतर, काळजीपोटी व्हाइट हाऊसच्या वैद्यकीय पथकानं त्यांची तपासणी केली.

डॉ. बार्बाबेला यांनी लिहिलं की, ट्रम्प यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांना 'क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी' ही समस्या असल्याचं आढळून आलं. ते म्हणाले की, ही एक 'सौम्य आणि सामान्य' स्थिती आहे.

ते पुढे म्हणाले, "सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या शरीरात खोल शिरांमध्ये गाठी म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) किंवा धमनीविषयक आजाराची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत."

 डोनाल्ड ट्रम्प यांना 'क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी' नावाचा नसांशी संबंधित त्रास आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांना 'क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी' नावाचा नसांशी संबंधित त्रास आहे.

डॉ. बार्बाबेला यांनी सांगितलं की, तपासणीत ट्रम्प यांचं हृदय सामान्य आहे आणि ते व्यवस्थित काम करत आहे. त्यांनी असंही सांगितलं की, हृदय निकामी होण्याची, मूत्रपिंड कमजोर होण्याची किंवा कोणत्याही मोठ्या आजाराची लक्षणं आढळलेली नाहीत.

डॉ. बार्बाबेला यांनी सांगितलं की, ट्रम्प यांच्या हाताच्या मागील बाजूला सूज आणि काळे-निळे डाग दिसले आहेत, जे अलीकडच्या काही फोटोमध्ये दिसले होते. काही वेळा ते मेकअपने झाकलेलेही होते.

क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी

फोटो स्रोत, Getty Images

बार्बाबेला म्हणाले, "हे सौम्य त्वचेच्या (सॉफ्ट टिश्यू) त्रासाशी सुसंगत आहे, जे सतत हस्तांदोलन आणि कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजेच हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या अ‍ॅस्पिरीनमुळे होतं."

या निवेदनाच्या शेवटी असं म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 'तब्येत उत्तम आहे'.

ही अवस्था ट्रम्प यांच्यावर कशी परिणाम करू शकते?

अमेरिकेतील व्हॅस्क्युलर सर्जरी सोसायटीने सांगितलं की, ही समस्या असलेल्या व्यक्तीच्या पायात जडपणा, सूज आणि वेदना जाणवू शकतात.

काही वेळा, ही समस्या असल्यास पायात वेदनादायक पेटके किंवा आकडी, खूप जास्त ताण येणं आणि जखमा (अल्सर) देखील होऊ शकतात.

कस्टम-मेड, मेडिकल-ग्रेड कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज (विशेष प्रकारचे सॉक्स) वापरल्याने ही स्थिती नियंत्रित ठेवता येते. तज्ज्ञ असंही सांगतात की, रुग्णांनी रात्री झोपताना पाय उंच ठेवावेत आणि त्वचेला मऊ ठेवण्यासाठी लोशन वापरावे.

ट्रम्प यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काय म्हटलं?

एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळातील पहिली वार्षिक वैद्यकीय तपासणी केली.

डॉ. बार्बाबेला यांनी एका निवेदनात सांगितलं, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे हृदय, फुफ्फुसं, मेंदू आणि एकूण शरीराची कार्यक्षमता चांगली आहे."

त्या आरोग्य तपासणीत असं समोर आलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी काही औषधं घेतात, रोसुवास्टॅटिन आणि इझेटिमिब. तसेच हृदयविकार टाळण्यासाठी अ‍ॅस्पिरीन आणि त्वचेच्या समस्येसाठी मोमेटासोन क्रीम वापरतात.

ट्रम्प यांच्या पायांमध्ये सूज दिसून आल्याने त्यांनी डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेतली आणि त्यावेळी त्यांना हा त्रास असल्याचं निदान झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांच्या पायांमध्ये सूज दिसून आल्याने त्यांनी डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेतली आणि त्यावेळी त्यांना हा त्रास असल्याचं निदान झालं.

ट्रम्प नेहमीच त्यांच्या चांगल्या आरोग्याचं कौतुक करतात आणि एकदा तर त्यांनी स्वतःला 'इतिहासातला सर्वात निरोगी राष्ट्राध्यक्ष' असं म्हटलं होतं.

पहिल्या वार्षिक आरोग्य तपासणीनंतर ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं, "एकूणच माझी तब्येत मला चांगली वाटली. माझं हृदय चांगलं आहे."

कोणते उपचार उपलब्ध आहेत?

उपचारांमध्ये रक्तप्रवाह सुधारण्यावर आणि लक्षणं कमी करण्यावर भर दिला जातो. पाय वर करून ठेवणं, विशेष प्रकारचे सॉक्स (कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स) घालणं आणि नियमित व्यायाम करणं यामुळे सूज कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारू शकतं.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मेडिसिन स्कूलनुसार, उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • औषधोपचार : ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो अशी औषधं दिली जातात आणि यासोबतच कॉम्प्रेशन थेरपी वापरली जाते. अ‍ॅस्पिरिनसारखी औषधं पायावर झालेल्या जखमा (अल्सर) भरून येण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. कधीकधी शरीरातील जास्त पाणी बाहेर टाकण्यासाठी मूत्रवर्धक औषधं (डाययुरेटिक्स) दिली जातात, पण हे फक्त हृदय किंवा मूत्रपिंडांच्या समस्येमुळे सूज आल्यास वापरली जातात.
  • एंडोव्हेन्स लेझर अब्लेशन किंवा रेडिओफ्रिक्वेन्सी अब्लेशन (आरएफए) : ही एक साधी शस्त्रक्रिया असते जिथे गरम लेझर किंवा रेडिओ लहरींचा वापर करून प्रभावित नस बंद केली जाते. त्यामुळे पायात रक्त साठत नाही आणि रक्तप्रवाह सुधारतो.
  • स्क्लेरोथेरपी : या उपचारात विशेष औषधाची इंजेक्शन दिली जातात, जे खराब नसांमध्ये दिल्यावर त्या बंद होतात. त्यामुळे शरीर त्या नसांना हळूहळू शोषून घेतं आणि रक्तप्रवाह चांगल्या नसांमार्गे सुरू होतो.
  • शस्त्रक्रिया : अतिशय गंभीर अवस्थांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते. यात दोन मुख्य प्रकार आहेत.
  • लिगेशन : खराब झालेली नस बांधून टाकतात, जेणेकरून त्यामधून रक्तप्रवाह थांबतो.
  • व्हेन स्ट्रिपिंग : जर नस किंवा तिचे झडप खूप खराब झाले असतील, तर ती संपूर्ण नस काढून टाकली जाते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)