अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्टला संपलेली? वैद्यकीय अधीक्षकांनी काय सांगितलं?

अमरावती जिल्हा रुग्णालय आग
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, अमरावती
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला सोमवारी सकाळी आग लागली.

प्राथमिक माहितीनुसार, 24 ऑगस्टला पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका कक्षात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या आगीत होरपळून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

आता या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष समिती गठन करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुख तथा आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत या स्वतः अमरावतीत दाखल झाल्या आहेत.

या उच्चस्तरीय बैठकीत व्हेंटिलेटर स्फोटाचे मूळ कारण, रुग्णालयाचे प्रलंबित राहिलेले फायर ऑडिट, PWD कडून झालेली दप्तरदिरंगाई आणि प्रत्यक्ष घटनेच्या वेळची परिस्थिती या सर्व गंभीर मुद्द्यांवर तपास होईल.

आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समितीही या घटनेच्या तपासासाठी गठित करण्यात आलीये.

दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत संपली असल्याचं समोर आलं आहे. जून महिन्यात या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र देण्यात होतं. त्यांच्याशी वारंवार संवाद देखील सुरू असल्याचं स्पष्टीकरण वैद्यकीय अधीक्षक विनोद पवार यांनी दिलं आहे.

'मी माझ्या बायको-बाळाला शोधत होतो, सकाळी सात वाजता बाळ दगावल्याचं सांगितलं'

"माझ्या पत्नीची डिलिव्हरी रविवारी (23 ऑगस्टला) सकाळी झाली. बाळ कमी महिन्याचं असल्याने त्याला NICU मध्ये दाखल केलं होतं. मुलगा झाला म्हणून मी खूप खूश होतो. पहाटे तीनपर्यंत मी तिथेच होतो. माझ्यासोबत माझा मित्र होता. त्यावेळी एक बाई जोराने ओरडली. सिक्युरिटीला विचारल्यावर कळलं काय झालं ते," स्वप्नील बारगे सांगत होते.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला सोमवारी (24 ऑगस्ट) सकाळी आग लागली.

स्वप्नील यांच्या बाळाचा या आगीत मृत्यू झाला.

आग लागली तेव्हा बारगे हॉस्पिटलमध्येच होते.

त्यांनी सांगितलं, "मी माझ्या बाळाला आणि बायकोला शोधत होतो. मग नंतर कळलं की त्याला सुपरमध्ये नेलंय. सहा-सातच्या दरम्यान बाळ दगावल्याचं सांगितलं."

स्वप्नील बारगे
फोटो कॅप्शन, स्वप्नील बारगे

जिल्हा रुग्णालयातील NICUची क्षमता 39 लहान बाळांना ठेवण्याची आहे. आगीची घटना घडताच चिमुकल्यांना डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं. मात्र, तीन चिमुकल्यांचा यादरम्यान जीव गेला.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

दुर्घटनेनंतर 36 बाळांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं.

त्यांची प्रकृती ठीक असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवारी (24 ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना दिली होती. .

या घटनेबद्दल माहिती देताना अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी म्हटलं होतं की, पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्या वॉर्डात 9 बालकं होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहा बालकांना सुखरूप बाहेर काढलं. पण तीन बालकांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश आलं.

'आम्हाला नीट माहिती दिली नाही,' रुग्णालय प्रशासनावर आरोप

'इथं जे डॉक्टर आहेत, ते नेमकं काय झालं हे स्पष्टपणे सांगत नाहीयेत. फक्त तुमच्या मुलांना इथून हलवावं लागेल, एवढंच सांगताहेत,' असा आरोप इथे दाखल करण्यात आलेल्या बाळाच्या नातेवाईकांनी दुर्घटनेनंतर केला.

'बाळ आठ दिवसांपासून इथं अॅडमिट होतं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता...आता आमच्या बाळाच्या अंगावर दोन ठिकाणी चट्टे उठलेत, त्याला भाजलंय. त्याची प्रकृती नाजूक आहे,' असंही त्यांनी म्हटलं.

रुग्णाचे नातेवाईक

तस्लिम खान यांची मुलगी NICU मध्ये अडमिट होती.

पहाटे आम्हाला फोन आला, आग लागल्याची माहिती मिळाली. इथे आल्यावर कोणीही नीट काही सांगितलं नाही. आम्ही शोधत पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये गेलो, असं तस्लिम यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आलं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

अमरावतीमधील दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे, अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली, असंही त्यांनी म्हटलं.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.

जुन्या बिल्डिंगमध्ये काही दोष होते, म्हणून या नवीन बिल्डिंगचं नियोजन केलं. त्यात मोठ्या प्रमाणावर बेड्स उपलब्ध करून दिले. NICU ची व्यवस्था केली. पण इथे जर इनव्हर्टर सप्लाय किंवा कनेक्शन सप्लायमधे हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला माफ करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सप्लायर कोण होता, इनव्हर्टरमध्ये दोष होता का, व्हेंटिलेटरमध्ये दोष होता का याची चौकशी व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन