भारत-पाकिस्तान संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, '5 लढाऊ विमानं पाडली गेली होती'

फोटो स्रोत, Anna Moneymaker/Getty
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळून जवळपास दोन महिने झाले असले तरी त्याबाबतच्या चर्चा मात्र अद्याप सुरूच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं या संघर्षावर भाष्य करताना दिसून येतात.
ट्रम्प यांनी शुक्रवारी याबाबत नवा दावा केला आहे. मे महिन्यात झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात 'पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती,' असं त्यांनी म्हटलं आहे.
परंतु, ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलं नाही की, कोणत्या देशाची किती लढाऊ विमानं पाडली गेली. त्यांनी हे वक्तव्य शुक्रवारी (18 जुलै) रात्री व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत झालेल्या डिनरप्रसंगी केलं.
यापूर्वी पाकिस्ताननेही भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता. परंतु, भारताने हा दावा नेहमीच फेटाळला आहे.
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षा दरम्यान भारताची लढाऊ विमानं पाडल्याच्या प्रश्नांना 31 मे रोजी उत्तरं दिली होती. त्यांनी पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगून तो फेटाळला होता.
याशिवाय डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केली, असा दावा करत आले आहेत.
ट्रम्प हेही म्हणाले होते की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानला व्यापार थांबवण्याची धमकी दिली होती, आणि त्यानंतर दोन्ही देश संघर्षविरामाला तयार झाले होते.
खरं तर, मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारत आणि पाकिस्तानमधील सैन्य तणावाच्या वेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता.
हीच चर्चा अमेरिकेने शस्त्रसंधी घडवून आणल्याप्रमाणे सादर केली, आणि ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर संघर्षविरामाची घोषणा केली होती.
शस्त्रसंधी पूर्णपणे दोन्ही देशांमधील परस्पर निर्णय होता, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच एका मुलाखतीत सांगितलं होत.
ट्रम्प यांनी काय म्हटलं?
शुक्रवारी रात्री व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसमोर ट्रम्प यांनी सांगितलं की, अमेरिकेने अनेक युद्धं थांबवली आहेत आणि ही सगळी युद्धं खूप गंभीर होती.
ते म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान दरम्यानही असंच युद्ध सुरू होतं. तिथं विमानं पाडली जात होती. मला वाटतं की, प्रत्यक्षात पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती. हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आणि एकमेकांवर हल्ले करत होते."
"असं वाटतंय की, ही युद्ध लढण्याची एक नवीन पद्धत आहे. तुम्ही अलीकडे पाहिलंच असेल की आम्ही इराणमध्ये काय केलं. आम्ही त्यांची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट केली."

फोटो स्रोत, Francis Chung/Politico/Bloomberg via Getty
आपल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यापाराचा उल्लेख केला आणि सांगितलं की, त्या माध्यमातूनच आम्ही संघर्ष थांबवला.
ट्रम्प म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढतच होता. परिस्थिती अधिकच गंभीर होत होती, आणि आम्ही ते व्यापाराच्या माध्यमातून सोडवलं.
"आम्ही सांगितलं, तुम्हाला (भारत आणि पाकिस्तान) आमच्यासोबत व्यापार करायचा असेल, पण जर तुम्ही एकमेकांवर हल्ले करत राहिलात, आणि अण्वस्त्र वापरण्याचा विचार केला, तर आम्ही तुमच्यासोबत कुठलाही व्यापार करणार नाही."
लढाऊ विमानं पाडल्याच्या दाव्यांवर भारताचं उत्तर
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे लढाऊ विमानं पाडल्याच्या प्रश्नांवर 31 मे रोजी उत्तरं दिली होती.
तसंच, पाकिस्तानकडून विमानांचं नुकसान झाल्याचा जो दावा करण्यात आला होता, तो त्यांनी साफ फेटाळला होता.
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पत्रकारानं जनरल अनिल चौहान यांना विचारलं की, पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी भारतीय हवाई दलाची एकापेक्षा जास्त विमानं पाडली, तुम्ही याची पुष्टी करू शकता का?

फोटो स्रोत, Getty Images
यावर उत्तर देताना जनरल अनिल चौहान म्हणाले, "जेट पाडलं गेलं की नाही, हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की हे असं का झालं."
यावर पत्रकारानं पुन्हा एकदा विचारलं, "किमान एक जेट तरी पाडलं गेलं होतं, हे खरं आहे का?"
यावर जनरल अनिल चौहान म्हणाले, "चांगली गोष्ट ही आहे की, आम्ही आमच्या टॅक्टिकल चुका ओळखल्या, त्या सुधारल्या आणि दोन दिवसांत त्या अंमलातही आणल्या. त्यानंतर आम्ही सर्व लढाऊ विमानं उडवली आणि दूरच्या लक्ष्यांवर निशाणा साधला."
पत्रकारानं पुन्हा विचारलं, "पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी भारताची सहा लढाऊ विमानं पाडण्यात यश मिळवलं होतं. त्यांचा हा दावा बरोबर आहे का?"
त्याला उत्तर देताना जनरल अनिल चौहान म्हणाले, "हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. पण जसं मी आधीही सांगितलं, ही माहिती फारशी महत्त्वाची नाही. खरं महत्त्वाचं हे आहे की, विमानं का पडली आणि त्यानंतर आपण काय केलं. हेच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे."

भारतानं नाकारले होते दावे
नुकतंच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथे क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी ते गेले होते. त्या वेळी त्यांनी शस्त्रसंधी पूर्णपणे द्विपक्षीय होती, हे 'न्यूजवीक' या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
मुलाखतीदरम्यान जयशंकर यांना विचारण्यात आलं, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेनंतर भारतानं स्पष्ट केलं की, भारत-पाकिस्तानमधील कोणत्याही वादात तिसऱ्या देशाच्या मध्यस्थी मान्य नाही.
परंतु, ट्रम्प यांनी अनेक वेळा सांगितलं की संघर्ष थांबवण्यासाठी व्यापाराचा एक उपाय म्हणून वापर केला गेला. तर याचा भारत-अमेरिका व्यापार कराराच्या चर्चांवर काही परिणाम झाला का?"
यावर एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं, "मी तुम्हाला सांगू शकतो की, 9 मेच्या रात्री जेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली, त्यावेळी मी त्या खोलीत उपस्थित होतो.
त्यांनी सांगितलं होतं की, जर आम्ही काही गोष्टी मान्य केल्या नाहीत, तर पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. पण पंतप्रधान मोदींवर पाकिस्तानच्या धमक्यांचा काहीही परिणाम झाला नाही. उलट, त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले की, भारताकडून त्याला नक्कीच उत्तर दिलं जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
एस. जयशंकर यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून एक राष्ट्रीय सहमतीचा विचार आहे की, पाकिस्तानसोबतचे सर्व प्रश्न आपसांतच म्हणजेच द्विपक्षीय पद्धतीनं सोडवायचे आहेत.
एस. जयशंकर म्हणाले, "ही गोष्ट त्या रात्रीची आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे, त्याच रात्री पाकिस्ताननं आमच्यावर जोरदार हल्ला केला होता. आम्ही लगेचच प्रत्युत्तर दिलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मार्को रुबियो यांनी मला फोन करून सांगितलं की, पाकिस्तान चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला फक्त तेच सांगू शकतो जे मी स्वतः अनुभवलं आहे. बाकी तुम्ही समजू शकता."
जून महिन्यात पंतप्रधान मोदी जी-7 परिषदेसाठी कॅनडामध्ये गेले होते आणि तिथूनच त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.
या चर्चेची माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं होतं की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं की, पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी ही पूर्णपणे द्विपक्षीय होती आणि त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता.
विक्रम मिस्री यांनी हेही सांगितलं होतं की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट केलं होतं की, शस्त्रसंधीसाठी अमेरिकेशी व्यापार करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.
संघर्षावर आतापर्यंत कोणते दावे?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा असा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी घडवून आणला आणि दोन्ही देशांना आण्विक युद्धाकडे जाण्यापासून रोखलं.
ट्रम्प यांच्या या दाव्याला पाकिस्तानने पाठिंबा दिला होता. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते, "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. शस्त्रसंधी घडवून आणण्यात वॉशिंग्टनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
याशिवाय संघर्षाच्या काळात पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता.
पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं होतं की, "आत्तापर्यंत मी हे निश्चितपणे सांगू शकतो की, पाच भारतीय विमानं, ज्यात तीन राफेल, एक एसयू-30 आणि एक मिग-29 यांचा समावेश आहे आणि एक हेरॉन ड्रोन पाडण्यात आले आहे."
त्यावेळी भारतानं या दाव्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, नंतर भारताकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले होते.
याशिवाय, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील भारतीय दूतावासात कार्यरत असलेल्या डिफेन्स अटॅच (एखाद्या देशाच्या दूतावासात काम करणारा सशस्त्र दलाचा अधिकारी) यांच्या वक्तव्यानेही खूप लक्ष वेधून घेतलं होतं.

फोटो स्रोत, EPA/PTV
जकार्ता येथील भारतीय दूतावासात नियुक्त असलेले नौदल अधिकारी कॅप्टन शिव कुमार 10 जून रोजी जकार्तामधील एका विद्यापीठातील सेमिनारमध्ये सहभागी झाले होते.
या सेमिनारमध्ये सादरीकरण करताना भारताचे डिफेन्स अटॅच यांनी कथितरित्या सांगितलं होतं की, 'राजकीय नेतृत्वाच्या' आदेशामुळे आणि काही 'अडचणीं'च्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाला सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर हल्ला करता आला नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कॅप्टन शिव कुमार यांनी सांगितलं की, 'आम्ही काही विमानं गमावली, आणि हे घडलं कारण राजकीय नेतृत्वाकडून लष्करी तळं किंवा त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला करू नये म्हणून अडथळे निर्माण करण्यात आले होते.'
"परंतु, नंतर आम्ही आमची रणनीती बदलली आणि मग थेट लष्करी ठिकाणांकडे वाटचाल केली. सर्वात आधी आम्ही शत्रूच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवर (एअर डिफेन्स) हल्ला करून तिला निष्प्रभ केलं.
त्यामुळेच आम्ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आणि ब्राह्मोस मिसाइल्सचा वापर करून प्रभावी हल्ले करू शकलो."
या वक्तव्यानंतर भारतीय दूतावासाने स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की, "आम्ही माध्यमांमध्ये काही अशा बातम्या पाहिल्या आहेत, ज्या एका सेमिनारमध्ये डिफेन्स अटॅच यांच्या सादरीकरणाशी संबंधित आहेत.
त्यांच्या वक्तव्याला मूळ संदर्भापासून वेगळं करून दाखवण्यात आलं आहे, आणि माध्यमांतील वृत्तामध्ये त्यांचं बोलणं चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























