न्यूझीलंडमध्ये आयपीएल स्टाईल थरार; शेवटच्या चेंडूवर षटकार अन् सुपर ओव्हर

Published

देशभरात आयपीएलचे वारे वाहत असताना दूरवर ऑकलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंड-श्रीलंका या लढतीत अद्भुत थरार अनुभवायला मिळाला.

सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला टाय करण्यासाठी षटकाराची आवश्यकता होती. इश सोधीने सहज षटकार लगावला आणि न्यूझीलंडने सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये मात्र श्रीलंकेनेच बाजी मारली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 196 धावांचा डोंगर उभारला. चरिथ असालंकाने 41 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. कुशल परेराने नाबाद 53 धावांची खेळी केली. वानिंदू हासारंगाने 11 चेंडूत 21 धावांची खेळी केली.

या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था 2/3 अशी झाली होती. पण कर्णधार टॉम लॅथम आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. लॅथमचा पूलचा फटका बदली खेळाडूच्या हातात जाऊन विसावला.

लॅथम बाद झाल्यावर मार्क चॅपमन-मिचेल जोडीने चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. हासारंगाने चॅपमनला बाद करत ही जोडी फोडली.

त्याने 23 चेंडूत 33 धावांची खेळी केली. दासून शनकाने मिचेलला बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकलं. त्याने 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मिचेल बाद होताच न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली. पण भारतीय वंशाच्या रचीन रवींद्रने चामिका करुणारत्नेच्या 18व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. 18व्या षटकात अॅडम मिल बाद झाला आणि दहाच धावा झाल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला 13 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र बाद झाला.

इश सोधीने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन-दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर बाय मिळाली. पाचव्या चेंडूवर शिपलेने एक धाव घेत सोधीला स्ट्राईक दिला. टाय करण्यासाठी न्यूझीलंडला षटकाराची आवश्यकता होती. शनकाच्या चेंडूवर षटकार ठोकत सोधीने सामना टाय करुन दिला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 8 धावा केल्या. महेश ठिकसानाने नीशाम आणि चॅपमनला बाद केलं. विजयासाठी मिळालेलं 9 धावांचं लक्ष्य श्रीलंकेने चरिथ असालंकाच्या तडाखेबंद षटकाराच्या बळावर पार केलं.

या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

2012 मध्ये न्यूझीलंड-श्रीलंका लढत टाय झाली होती. त्यावेळीही श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला नमवलं होतं.

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामना टाय होण्याची ही 25वी वेळ आहे.

न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू आयपीएलसाठी रवाना झाल्याने त्यांचे दुसऱ्या फळीतले खेळाडू या मालिकेत खेळत आहेत. संघाचं नेतृत्व टॉम लॅथमकडे सोपवण्यात आलं आहे.

दुसरीकडे श्रीलंकेच्या संघातील वानिंदू हासारंगा आणि महेश ठिकसाना या मालिकेनंतर आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल होतील.

या दौऱ्यात कसोटी मालिकेत श्रीलंकेला पराभवाला सामोरं जावं लागलं. एकदिवसीय मालिकाही न्यूझीलंडनेच जिंकली. ट्वेन्टी20 मालिकेत मात्र श्रीलंकेने विजयी सुरुवात केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)