You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोन्ही इंजिनं फेल, कॅप्टननं केलं नदीवर लँडिंग, 155 प्रवासी बचावले, काय होती 'मिरॅकल लँडिंग'ची गोष्ट?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
विमानाने टेक-ऑफ केलं आणि काही मिनिटांतच अचानक पक्ष्यांचा थवा येऊन धडकला. विमानतळाकडे परत फिरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरणार असं लक्षात येताच पायलटनं चक्क विमान नदीत उतरवलं आणि आश्चर्यकारकरीत्या विमानातले सर्व 155 लोक सुखरूप बचावले.
ही घटना घडली 2009 साली अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात. हे अपघातग्रस्त विमान होतं यूएस एअरवेज फ्लाईट 1549, न्यूयॉर्कच्या हडसन नदीत हे विमान उतरलं म्हणून या घटनेला 'मिरॅकल ऑन द हडसन' असंही म्हणतात. या अभूतपूर्व वॉटर लँडिंग केलेल्या विमानाचे कॅप्टन होते चेस्ली सलनबर्गर ऊर्फ सली.
तुम्ही कदाचित 'सली' नावाचा सिनेमा पाहिला असेल, टॉम हँक्स यांनी ज्या कॅप्टन सलीची भूमिका केली तो खराखुरा अमेरिकन पायलट होता.
15 जानेवारी 2009 ची ही घटना. न्यूयॉर्कच्या लग्वार्डिया एअरपोर्टवरून नॉर्थ कॅरोलिनाकडे निघालेल्या या विमानाने टेकऑफनंतर काही मिनिटांतच इमर्जन्सी लँडिंग केलं.
उड्डाणानंतर दोन मिनिटांतच, पक्ष्यांचा एक थवा विमानाला आदळला आणि दोन्ही इंजिन फेल झाली. सलनबर्गर यांनी लग्वार्डियाला मेडे कॉल दिला आणि आपण विमानतळाकडे परतत असल्याचं सांगितलं - पण ते शक्य दिसत नव्हतं.
जवळच्या टीटरबरो एअरपोर्टचा पर्यायही निकाली निघाला. सलनबर्गर यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपण हडसन नदीवर पाण्यात लँड करणार असल्याचं सांगितलं. हे अत्यंत दुर्मिळ आणि जोखमीचं होतं.
पक्ष्यांना धडकल्यानंतर साधारण साडेतीन मिनिटांनी विमान नदीत उतरलं. विमानाचा मागचा भाग आधी टेकला आणि त्याला पाण्याचा जबरदस्त दणका बसून विमानात पाणी जायला लागलं. पण विमानाचे तुकडे झाले नाहीत. इमर्जन्सी दरवाजे आणि पंखांवरून प्रवासी विमानाबाहेर आले.
पाण्यावर तरंगणारं विमान आणि दोन्ही बाजूंच्या पंखांवर उभे असलेले प्रवासी हे दृश्य जगानं पाहिलं.
कडाक्याच्या थंडीत बचाव मोहीम
जानेवारीची कडाक्याची थंडी होती, बाहेरचं तापमान साधारण -7 अंश सेल्सियस होतं. हडसन नदीच्या पाण्याला चांगला जोरही होता.
विमान नदीत आदळल्यानंतर काही मिनिटांतच जवळपासच्या फेरी बोट्स आणि इतर नावांनी तिकडे मोर्चा वळवला. त्यांच्या या तातडीच्या प्रतिसादाचा मोठा फायदा झाला.
150 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्सपैकी एकाच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. एकूण 78 लोकांना वैद्यकीय उपचार दिले गेले, पण ते किरकोळ स्वरुपाचे होते.
या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या बीबीसी प्रतिनिधींनी तेव्हा म्हटलं होतं की, प्रवाशांचं नशीब, पायलटचं कौशल्य आणि तातडीचं बचावकार्य यामुळे या सर्व लोकांची निसटती सुटका झाली.
विमानात पाणी शिरत असल्यामुळे ते नदीत बुडायला लागलं होतं, पण टग बोट्सनी त्याला अटकाव केला आणि ते पूर्णपणे नदीत बुडू दिलं नाही.
न्यूयॉर्कचे तेव्हाचे महापौर माईक ब्लूमबर्ग यांनी सांगितलेलं, "पायलटने विमान नदीत उतरवण्याचं काम मोठ्या खुबीने केलं. मी त्यांच्याशी सविस्तर बोललो. सर्व लोक उतरल्यानंतर त्यांनी दोन वेळा पूर्ण विमान तपासलं आणि कुणी अडकलं नाहीय याची खातरजमा केली."
कॅप्टन सलनबर्गर यांचं या घटनेसाठी खूप कौतुक झालं. त्यांनी केलेल्या कामगिरीची वाहवा झाली, पण मुळात अशी परिस्थिती ओढवलीच कशी हा प्रश्नही होताच.
अमेरिकेचा वाहतूक नियामक नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड अंतर्गत या प्रकरणाची चौकशी केली गेली. पण या चौकशीतही विमान नदीत लँड करण्याचा निर्णयच योग्य होता, असा निष्कर्ष निघाला.
काही दिवसांतच हे विमान नदीतून काढून अमेरिकेतल्या कॅरोलिनाज एव्हिएशन म्युझियममध्ये ते ठेवलं गेलं.
कॅप्टन सली कोण आहेत?
कॅप्टन सलनबर्गर यांनी वयाच्या 16 व्या वर्षी हवाई उड्डाणाचं प्रशिक्षण सुरू केलं. ते अमेरिकेच्या वायुसेना अकादमीतून प्रशिक्षण घेऊन 1973 साली उत्तीर्ण झाले. यानंतर ते अमेरिकेच्या वायुसेनेत लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले.
1980 साली ते खासगी हवाई वाहतूक क्षेत्रात पायलट म्हणून आले आणि मार्च 2010 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी हडसन नदीत केलेलं हे लँडिंग जगातलं सर्वात प्रसिद्ध इमर्जन्सी लँडिंग म्हणून ओळखलं जातं.
हडसन नदीमधल्या इमर्जन्सी लँडिंगपूर्वी सली यांच्या नावावर 20,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. सुमारे 40 वर्षं ते वैमानिक होते. जो बायडन यांनी त्यांची इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेवर अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)