You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियन सैन्य राजधानी कीव्हमध्ये शिरण्याच्या टप्प्यावर - झेलेन्स्की
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले. राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रं हल्ले झाल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
लाईव्ह कव्हरेज
शशि थरूर यांचं ट्वीट चर्चेत
रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशि थरूर यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.
या ट्वीटमध्ये शशि थरूर यांनी युद्ध थांबवण्यासाठी भावनिक साद दोन्ही देशांना घातली.
यासंदर्भात थरूर यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये युक्रेनचा झेंडा खांद्यावर घेतलेला एक पुरुष रशियन झेंडा खांद्यावर घेतलेल्या महिलेला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.
दोन्ही देशांतील संघर्ष संपुष्टात येऊन प्रेम आणि शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा थरूर यांनी व्यक्त केली आहे.
प्रथम कीव्हचा ताबा, नंतर संपूर्ण युक्रेनवर कब्जा, अशी रशियाची योजना - वेबसाईटचा दावा
सर्वप्रथम राजधानी कीव्हचा ताबा मिळवायचा. त्यानंतर संपूर्ण युक्रेनवर कब्जा करायचा, अशी रशियाची योजना असल्याची माहिती युक्रेनच्या काऊंटर इंटेलिजन्सच्या सूत्रांनी दिली आहे.
युक्रेनस्का प्रावदा वेबसाईटशी बोलताना त्यांनी रशियाच्या योजनेबाबत सविस्तर माहिती सांगितलं. पण या माहितीची पुष्टी करता येणार नाही. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी कीव्हच्या प्रमुख विमानतळावर तसंच विमान वाहतूक नियंत्रण कक्षावर ताबा मिळवणं, सीमेवर हल्ले चढवून सैनिकांचं लक्ष विचलित करणं, आपल्या 10 हजार सैनिकांना राजधानी कीव्हमध्ये घुसवणं, अशा योजनांवर रशिया काम करत आहे.
यादरम्यान कीव्हमध्ये अफरातफरी, गोंधळ निर्माण व्हावा यासाठी वीजपुरवठा बंद करणं, संपर्काची माध्यमे बंद पाडणं, या गोष्टीही केल्या जाऊ शकतात. युक्रेनच्या सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं अवघड व्हावं यासाठी शरणार्थींना पलायन करण्यासाठी भाग पाडून रस्त्यावर गोंधळ उडवणं हासुद्धा रशियाच्या योजनेचा भाग असणार आहे.
या कालावधीत युक्रेनच्या सरकारी इमारती, कॅबिनेट आणि संसदेवर कब्जा करणं, देशाच्या नेतृत्वाला रशियाच्या अटी मान्य करण्यास भाग पाडणं, यानंतर रशियन समर्थक नेत्यांना पुढे करत जर्मनीप्रमाणे पूर्व-पश्चिम युक्रेन असे देशाचे तुकडे करणं, ही रशियाची रणनिती असू शकते, अशी माहिती या वेबसाईटने दिली आहे.
भारतीय शेअर बाजारात सुधारणा, आशियाई बाजारांमध्येही तेजी
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. हल्ल्याच्या पहिल्या दिवशी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
तर दुसऱ्या दिवशी आशियाई बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे भारताच्या शेअर बाजारातही चांगली सुधारणा दिसून आली आहे.
आज सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची वाढ पाहायला मिळाली तर निफ्टीचा आकडा 16 हजारांच्या पार गेला आहे.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सेन्सेक्समध्ये 2700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. तर निफ्टी 815 अंकांनी खाली आली होती.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 13.44 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कच्च्या तेलाची किंमतही प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा जास्त गेली आहे. आशियाई बाजारांत तेजीया सर्व घडामोडींमध्ये दुसऱ्या दिवशी आशियाई बाजारात तेजी पाहायला मिळाली.
रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर जपानचा निकेई निर्देशां 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात 1.2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
नाटोमध्ये कोणकोणते देश आहेत?
मोदी सरकारच्या धोरणात्मक चुका महागात पडतील - राहुल गांधी
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर भारतीय माध्यमांतील काही बातम्यांच्या हेडलाईन शेअर करत हल्लाबोल केला आहे.
सरकारच्या धोरणात्मक चुका प्रचंड महागात पडतील असं राहुल गांधींनी लिहिलं आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळंच चीन आणि पाकिस्तान एकत्र आल्याचं राहुल गांधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हटलं होतं.
दोन्ही देश एकत्र आल्यानं भारतासाठी धोका असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल यांच्या वक्तव्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच्या हेडलाईन शेअर करत, त्यांचं म्हणणं कशाप्रकारे खरं ठरलं हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते करत आहेत.
भारत आणि चीनचं नातं सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्थितीत असल्याचं सध्या युरोपच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं होतं.
एका हेडलाईनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. इम्रान खान यांना असं विचारण्यात आलं होतं की, चीन पाकिस्तानला रशियाबरोबर जाण्यास मदत करेल का? त्याचं उत्तर देताना इम्रान खान यांनी होकार देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.
त्यानंतर 23 फेब्रुवारीला इम्रान खान युक्रेनच्या संकटादरम्यान रशियाला रवाना झाले आणि दोन्ही देश एकमेकांच्या जवळ येत असल्याचं म्हटलं जात आहे.
मोदी सरकारच्या चुकांमुळं आतापर्यंत चीन आणि पाकिस्तानच जवळ आले होेते, पण आता रशिया आणि पाकिस्तानही जवळ येत असल्याचं राहुल यांना म्हणायचं आहे.
क्षेपणास्त्र हल्ला झाल्याच्या वृत्ताला झेलेन्स्कींचा दुजोरा
पहाटे एका पाठोपाठ अनेक क्षेपणास्त्रं हल्ले झाल्याच्या वृत्ताला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दुजोरा दिला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजता हल्ले झाल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
रशियानं लष्करी आणि नागरी परिसर अशा दोन्ही ठिकाणी हल्ले केल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं यापूर्वीच नागरिकांना लक्ष्य करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण, यापूर्वी आम्ही दिलेल्या बातम्यांनुसार राजधानी कीव्हमध्ये सकाळी काही स्फोट पाहायला मिळाले आहेत.
यात काही हल्ले निवासी इमारतींवरही झाले असल्याचं समोर येत आहे. वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना पुन्हा एकदा रशियाचा हा क्रूर हल्ला थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
"सकाळी हल्ला झाला तेव्हा आम्ही एकटेच आमच्या देशाचं संरक्षण करत होतो. कालप्रमाणेच आजही जगातील काही बड्या शक्ती या लांबूनच या सर्वाकडे पाहत आहेत," असं झेलेन्स्की यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं.
"रशियावर लावलेले निर्बंध त्यांना मान्य आहेत का? आम्ही आमच्या आकाशाकडे पाहतो आणि आमच्याच भूमीवर राहतो, हे पुरेसं नाही का?"
पुतिन यांचा हल्ला नाटोपर्यंत पोहोचल्यास आम्हीही तयार : अमेरिका
पुतिन युक्रेनमधील सरकारला पायउतार करण्याचा प्रयत्न करतील याच्याशी सहमत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अंटनी ब्लिंकन यांनी म्हटलं आहे. हा रशियाच्या योजनेचा भाग असल्याचं एबीसीला दिलेल्या मुलाखतीत ब्लिंकन यांनी म्हटलं.
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर मोठ्या शहरांवर हल्ला करून युक्रेनला घेराव घातला जाईल, असंही ब्लिंकन म्हणाले. रशियाचा हल्ला युक्रेनच्या पुढंही होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
पण नाटो राष्ट्रांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाटोच्या एका देशावरचा हल्ला म्हणजे सर्व देशांवरचा हल्ला ठरेल, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.
नाटोच्या राष्ट्रांच्या प्रत्येक इंच भूमीचं संरक्षण होईल, याबाबत बायडन यांची भूमिका स्पष्ट आहे, पुतिन यांनी हल्ल्याची कक्षा युक्रेनच्या बाहेर वाढवली तर आम्ही सज्ज आहोत, असं ब्लिंकन म्हणाले.
रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला तो क्षण...
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा दुसरा दिवस : आतापर्यंतच्या घडामोडी
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. युरोपात अनेक दशकांनंतर अशाप्रकारचं प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं आहे.
याबाबतचे आतापर्यंतचे अपडेट्स :
- शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्फोट झाले आणि रशियाचं एक जेट पाडल्याचंही वृत्त आलं.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्की यांनी शत्रूंनी राजधानीत प्रवेश केल्याचं म्हटलं आहे.
- पूर्व युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहेत. पण उत्तर आणि काळा सागरच्या दक्षिणेलाही युद्ध पेटलं आहे.
- उत्तरेला किरोणोत्सर्ग असलेल्या चेर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरातही संघर्ष झाला. रशियानं त्यावर ताबा मिळवला आहे.
- अमेरिकेनं रशियावर युक्रेनच्या सैनिकांना बंदी बनवल्याचा आरोप केला आहे.
- युक्रेनचे हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात पश्चिमेकडे निघाले आहेत. पोलंड आणि रोमानियाच्या सीमेला लागून असलेल्या भागाकडे हे लोक जात आहे.
- युक्रेनमधील बहुतांश लोक हे बंकर आणि अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर राहत आहेत.
- देशाच्या संरक्षणासाठी नागरिकांना शस्त्र हाती घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- युरोपीयन महासंघ, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं शुक्रवारी नवे निर्बंध जाहीर केले आहेत. रशियाच्या बँका आणि कंपन्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
- पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमध्ये सैन्य पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे.
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून बोलले. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना बोलायला सांगितलं होतं.
- रशियाच्या शहरांमध्येही शेकडो लोक या युद्धाच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यापैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे.
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची पुतिन यांच्याशी चर्चा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती विनंती
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी बोलायला सांगितलं होतं, असं मॅक्रॉन म्हणाले. कारण पुतिन झेलेन्स्की यांच्याशी चर्चेला तयार नव्हते.
फोनवर पुतीन यांना स्पष्ट शब्दांत आणि थेट युक्रेनमधील कारवाई तत्काळ रोखण्यास सांगितलं असं मॅक्रॉन म्हणाले. पुतिन यांना झेलेन्स्की यांच्याशी बोलण्याची विनंती केल्याचं, राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी ब्रसल्समध्ये युरोपीयन युनियनच्या परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
झेलेन्स्की यांनी मॅक्रॉन यांना ही विनंती केली होती, कारण पुतिन त्यांच्याशी बोलत नव्हते.
रशिया आणि युक्रेनमध्ये कोणत्या सैन्याची ताकद अधिक जास्त?
युक्रेनमधून नागरिकांची पोलंडकडे धाव
नाटोचे सैन्य सज्ज, मात्र युक्रेनमध्ये जाणार नाही
अमेरिका आणि ब्रिटननं रशियावर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केलीच आहे. त्याचबरोबर रशियाला मदत करणाऱ्या बेलारूसवरही निर्बंध लावले आहेत.
युरोपीयन संघाच्या अधिकाऱ्यांनी रशियन मालमत्ता गोठवणार असल्याचं सांगितलं आहे. युरोपातील आर्थिक बाजारांमध्ये त्यांच्यावर निर्बंध घालणार असल्याचंही ते म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याची विनंती त्यांनी केली.
रशियाच्या-युक्रेनच्या या संकटाच्या पार्शवभूमीवर नाटोच्या हजारो सैनिकांना नाटोचे सदस्य असलेल्या लात्विया, इस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड आणि रोमानिया या देशात तैनात करण्यात आलं आहे.
युरोपीयन संघाचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नेटोनं पूर्व किनाऱ्यावर 100 लढाऊ विमानं सज्ज ठेवल्याचं सांगितलं आहे. मात्र, युक्रेनमध्ये सैन्य तुकड्या पाठवण्याचा विचार नसल्याचंही ते म्हणाले.
अमेरिकेचं लष्कर युक्रेनमध्ये लढणार नाही. मात्र, नाटोच्या सदस्य देशांचं संरक्षण करत राहील, असं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं.
भारताच्या भूमिकेवर बायडन यांची प्रतिक्रिया, मोदी सरकारवर दबाव वाढला
युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेबाबत दबाव वाढत चालला आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप भारतानं रशियाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही.
भारतानं अधिकृत वक्तव्यांमध्ये रशियावर टीका केलेली नाही, किंवा युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं समर्थनही केलेलं नाही. मात्र, ही काही भारताची नवी भूमिका नाही. भारतातील आधीच्या सरकारांनीही रशियाबाबत अशीच भूमिका घेतली होती.
यावेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय समुहापासून अलिप्त राहणं, सोपं ठरणार नाही.
गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाजडन यांना, भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रातील मोठे भागीदार आहेत, तर रशिया प्रकरणी ते एकाच भूमिकेवर आहेत का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर, "अमेरिका आज भारताबरोबर चर्चा करेल. याबाबत अद्याप काहीही ठोस समोर आलेलं नाही," असं बायडन म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांत मतदान झालं तर..
युक्रेनच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांमध्ये संभाव्य मतदानापूर्वी बायडन यांना भारताबाबत हा प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष बायडन रशियावर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा करत होते. त्याचदरम्यान त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
युक्रेनबूाबत भारताची भूमिका अमेरिकेसाठी अडचणीची असल्याचं सांगितलं जात आहे. चीनची वाढती शक्ती रोखण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचं अमेरिकेला वाटतं, त्याचवेळी हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अमेरिकेशी जवळीक वाढली आहे. पण रशियाबरोबरही भारताचे ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. रशिया भारतासाठी अजूनही संरक्षण उपकरणांचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे.
सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांमध्ये भारत हा अस्थायी सदस्य आहे. युक्रेनवर हल्ल्याबाबत रशियाचा निषेध आणि विनाशर्त सैनिक मागे बोलावण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होण्याची शक्यता असल्याचं, रॉयटर्स या वृत्तसंस्थेला बायडन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
रशिया याठिकाणी व्हेटो अधिकार वापरू शकतं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश आहे. स्थायी सदस्यांना व्हेटो अधिकार आहे. म्हणजे रशियाला त्यांच्या विरोधात प्रस्ताव मंजूर होण्यापासून व्हेटोद्वारे रोखता येऊ शकतं.
पण रशियान व्हेटो वापर केला तर अमेरिका रशियाला एकटं पाडण्याचा प्रय्तन करेल. किमान 13 मतं अमेरिकेच्या बाजूने असावी असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. चीन मतदानापासून अलिप्त राहू शकतं, असं सांगितलं जात आहे.
रशिया - युक्रेन संघर्षात रशियाच्या बाजूने कुठले देश आहेत?
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्फोट
युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हमध्ये अनेक स्फोट होत असल्याची वृत्तं येत आहे.
शुक्रवारी पहाटे कीव्हमध्ये दोन मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचं सीएनएनच्या टीमनं म्हटलं आहे. तर तिसरा मोठा स्फोट राजधानीपासून काही अंतरावर झाला आहे.
माजी गृह उपमंत्री अँटोन हराशचेन्को यांनी युक्रेनच्या वृत्तसंस्थेला स्फोटांचा आवाज ऐकल्याची माहिती दिली आहे. क्रूझ किंवा बॅलास्टिक क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचं ते म्हणाले.
मात्र, युक्रेनच्या लष्करानं याबाबत काही माहिती दिलेली नाही.
रशियाला मला संपवायचं आहे - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला मला संपवायचं आहे असं म्हटलं आहे. ''ते (रशिया) युक्रेनच्या प्रमुखांचा खात्मा करून राजकीय दृष्ट्या मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शत्रूच्या निशाण्यावर सर्वात पहिला मी आणि दुसऱ्या क्रमांकावर माझं कुटुंब आहे," असं एका व्हीडिओ मेसेजमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.
झेलेन्स्की कीव्ह मध्ये सरकारी निवासस्थानी राहत असून, त्यांचं कुटुंबही युक्रेनमध्येच असल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी काहीही अधिक माहिती दिली नाही.
शत्रूनं राजधानी कीव्हमध्ये प्रवेश केला असल्याचा इशारा झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
रशिया झेलेन्स्की यांना मेरिकेचा पाठिंबा असलेले राष्ट्राध्यक्ष म्हणतं. झेलेन्स्की यांनी युक्रेनला अमेरिकेचाच एक भाग बनवला असल्याचंही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं आहे.
2014 मध्ये रशियाचा पाठिंबा असलेलं सरकार कोसळल्यानंतर पुतिन युक्रेनमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारांवर नाराज आहेत.
झेलेन्स्की यांना नाटोमध्ये सहभागी व्हायचं आहे. तर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कोणत्याही परिस्थितीत ते होऊ द्यायचं नाही. नाटो हा रशियाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचं पुतिन यांचं मत आहे.
शांततेच्या मार्गाने तोडगा काढा, मोदींचं पुतिनना आवाहन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान वादानंतर सुरु झालेला हिंसक संघर्ष तत्काळ थांबवावा अशी विनंती मोदींनी केली आहे.
युक्रेनबरोबर असलेले मतभेद हे चर्चेच्या माध्यमातून सोडवणं शक्य आहे. त्यामुळं सर्व पक्षांनी चर्चेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून यावर तोडगा काढावा असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंताही पुतिन यांच्यासमोर व्यक्त केली. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी म्हणाले.
दरम्यान, पुतिन यांनी युक्रेन संदर्भात घडलेल्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. दोन्ही देश सामायिक हितांच्या मुद्द्यांवर एकमेकांच्या संपर्कात राहतील यावर या दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ताबा
रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.
त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.
हा परिसर आता सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणं आता कठीण असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे. तीव्र संघर्षानंतर युक्रेननं याठिकाणचा ताबा गमावल्याचं ते म्हणाले.
एका व्हीडिओमध्ये रशियाचे रणगाडे या एकेकाळच्या अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. बीबीसीनं या व्हीडिओची सत्यता पडताळली आहे.
इतिहासातील सर्वात गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता.