मुंबईतल्या घाटकोपर इथल्या राजावाडी हॉस्पिटलमधील एक व्हीडिओ आमदार नितेश राणे यांनी शेअर केला आहे. रुग्णांच्या बाजूला कोरोना मृतदेह ठेवण्यात आल्याचं धक्कादायक दृश्य यामध्ये दिसतं आहे.
मृतदेहाशेजारील बेडवरील रुग्णाचा आवाज व्हीडिओत ऐकू येतो. त्या सांगतात, "हा मृतदेह 10-12 तास झाले तरी इथेच आहे. त्यांनी प्लॅस्टिकमध्ये कव्हर करून ठेवला आहे. बाजूला पेशंट्स आहेत. शेवटी आणखी एक मृतदेह तुम्हाला दिसेल. यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. कोणीही स्टाफ इथं आलेला नाही. मृतदेह ज्यांचा आहे त्या बाई माझ्यासमोर तडफडून गेल्या. पाणी द्यायला कोणी नव्हतं. मी माझ्या बाटलीतील पाणी द्यायचा प्रयत्न केला पण माझ्याकडे ग्लोव्ह्ज नाहीत. सेफ्टी किट नाही. मला मर्यादा आहेत"
त्या पुढे सांगतात, त्या डायबेटिस आणि ब्लड प्रेशर पेशंट होत्या. सरकार प्रयत्न करते आहे. पण सरकार बाहेर जेवढं दाखवतं तेवढं आत होत नाही. हॉस्पिटलमध्ये आत सीसीटीव्ही बसवायला हवेत. पेशंट्सच्या मध्ये मृतदेहाला ठेऊन कसं चालेल? हा कोरोना पेशंटचा मृतदेह आहे. मी बरी व्हायला आले होते. आता असं वाटतंय, घरी गेलेलंच चांगलं.
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हीडिओ शेअर केला होता. आता त्यांनी राजावाडी हॉस्पिटलचा व्हीडिओ शेअर केला आहे. खरंच परिस्थिती बदलली आहे? का आपण आशाच सोडून द्यायची असा सवाल त्यांनी केला आहे.