You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

लॉकडाऊन नसता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली असती -उद्धव ठाकरे

लॉकडाऊन काढला तर आपली स्थिती इटलीसारखी झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोनामुळे ब्राझीलची आरोग्यव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात

    कोरोना संकटामुळे ब्राझीलची आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे. साओ पाऊलो शहराचे महापौर ब्रूनो कोवास यांनी हा इशारा दिला आहे. कोवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील सरकारी रुग्णालयं 90 टक्के भरली आहेत.

    नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमावलीचं कठोर पालन करावं असं आवाहन केलं आहे. लॉकडाऊन आणखी कठोरपणे लागू करण्यासंदर्भात गव्हर्नरांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

    दरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी रविवारी सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम धुडकावत ब्राझिलियामध्ये आपले समर्थक आणि मुलांची भेट घेतली.

  2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारकीची शपथ घेणार

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ आमदार शपथ घेतील. काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे तर भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतील.

    विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 14 अर्ज दाखल करण्यात आले होते. एका उमेदवाराचा अर्ज नामनिर्देशनपत्र अवैध ठरलं होतं. अजित गोपछडे (भाजप), संदीप लेले (भाजप), किरण पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजीराव गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले आणि ही निवडणूक बिनविरोध होईल हे स्पष्ट झालं.

  3. रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली

    ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

    ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन येणार नाही. वयाच्या सतराव्या वर्षी आकाशवाणीवरुन सुरु झालेली विपुल कारकीर्द मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहील. रत्नाकर मतकरींना भावपूर्ण आदरांजली!

    -गजानन कीर्तीकर, खासदार

    ....................

    ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी (वय ८१) यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांच्या जाण्याने बालनाट्य, प्रायोगिक नाटकं, गूढ कथालेखक असं बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

    -रोहित पवार, आमदार

  4. ब्रेकिंग, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

    ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचं काल रात्री निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.

    कथा, कादंबरी, ललित लेखन, नाटक, बालनाट्य, दिग्दर्शन आणि चित्रकला, अशा विविध कलाक्षेत्रांवर ठसा उमटवणारे मतकरी यांची चार दिवसांपूर्वी कोव्हिड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असं सांगितलं जात आहे.

  5. सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहांच्या बाजूला कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होते कारण...

  6. ब्रिटन, स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली

    युरोपात सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीमध्ये एका दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत चालली आहे. सोमवारी इटलीत लॉकडाऊन थोडा शिथिल करण्यात आला.

    ब्रिटनमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. रविवारी ब्रिटनमध्ये 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 24 लाख 49 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 34 हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

    स्पेनमध्ये रविवारी कोरोनामुळे 87 जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात स्पेनमध्ये एका दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं हे सगळ्यात कमी प्रमाण आहे.

    फ्रान्समध्ये रविवारी 4,083 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी अनेकांचा मृत्यू ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या केयर होम्समध्ये झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 28,111 जणांचा मृत्यू झाला आहे.

  7. मुंबईहून गोव्याला गेलेल्या चौघांना कोरोना

    मुंबईहून ट्रेनने गोव्याला गेलेल्या चारजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या चौघांनी रविवारी प्रवास केला होता. या चौघांच्या स्वॉबचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले आहेत. या ट्रेनमधील अन्य 100 जणांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. गोव्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता 26 झाली आहे.

  8. ट्रंप म्हणतात, अमेरिकेत कोरोनाचे आकडे कमी होऊ लागलेत

    अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे असं मत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं. काही अपवाद वगळले तर देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं ट्रंप म्हणाले.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 1,486,376 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर कोरोनामुळे 89,549 जणांचा मृत्यू झाला आहे.

  9. कोरोना अपडेट्स

    गुड मॉर्निंग,

    आठवड्याचा पहिला दिवस. वीकेंड तुम्ही घरीच घालवला असेल अशी आशा करतो. कोरोनाबाबतच्या राज्यातल्या, देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय अपडेट्स तुम्हाला इथं वाचायला मिळतील.

    जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 47 लाखाच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगात सव्वा तीन लोकांनी जीव गमावला आहे.

    भारतातकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 91,000च्या जवळ जाऊन पोहोचली आहे तर 2872लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा आहे.

    राज्यात रविवारी कोरोनाचे 2347 नवे रुग्ण सापडले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053 एवढा झाला आहे. रविवारी कोरोनामुळे 63 जणांचा मृत्यू झाला.

    ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत ब्राझीलने इटली आणि स्पेनला मागे टाकलं आहे.

    ब्राझीलमध्ये 14919 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर आतापर्यंत 816जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या लोकांचीच कोरोना चाचणी घेतली जात आहे.