18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे

गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्रोत सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. पालघर हत्याकांड : साधूंची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

  2. रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीत कोरोना

    जगातली सगळ्यांत मोठी निर्वासितांची छावणी असणाऱ्या बांगलादेशातल्या रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीत 2 शरणार्थींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

    रोहिंग्या रेफ्युजी रिपॅट्रिएशन कमिशनसाठी काम करणाऱ्या एका डॉक्टरने या वृत्ताला दुजोरा दिलाय. गजबजलेल्या कॉक्स बाजार भागात असणाऱ्या निर्वासितांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याचं उघडकीला आलंय.

    संसर्ग झालेल्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

    संसर्ग झालेल्या या लोकांच्या संपर्कात आलेल्या 1900 निर्वासितांनाही तपासणी करण्यासाठी विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे.

    14 मार्चपासून या कॅम्पमध्ये लॉकडाऊन आहे. या कॅम्पच्या परिसरात असणाऱ्या क्लिनिकमध्येच या लोकांवर उपचार करण्यात येणार असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.

  3. कामगारविषयक कायदे बदलताना आधी कामगारांशी बोला - ILO

    संयुक्त राष्ट्रसंघांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (International Labour Organization) भारताला इशारा दिला आहे. कामगार विषयक कायद्यांमध्ये बदल करण्याचा विचार करणाऱ्या भारतातल्या राज्यांनी आधी कामगारांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं ILOने म्हटलंय.

    ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात ILOने म्हटलंय, 'भारतातील काही राज्य कामगार विषयक कायदे शिथील करण्याच्या विचारात आहेत. कोव्हिड-19चा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे करण्यात येणार आहे. पण सरकार, कामगार संघटना आणि उद्योगांच्या चर्चेनंतर याविषयीचे निर्णय घेण्यात यावेत. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगार विषयक धोरणांचंही पालन करण्यात यावं.'

  4. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातला हा सगळ्यात भयानक काळ : ट्रंप सरकारचे माजी अधिकारी

    कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती हा अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातला सगळ्यांत भयानक काळ असल्याचं अमेरिकेचे माजी आरोग्य अधिकारी रिक ब्राईट यांनी काँग्रेसमध्ये म्हटलंय. कोरोना व्हायरससाठीची लस बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विभागाचं नेतृत्त्वं रिक ब्राईट करत होते.

    पण गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ब्राईट यांना पदावरून हटवलं. कोरोना व्हायरसविषयीच्या धोरणांना ट्रंप यांच्यासमोरच विरोध केल्याने आपल्याला या पदावरून दूर करण्यात आल्याचं रिक ब्राईट यांनी यापूर्वी म्हटलं होतं. तर ब्राईट हे 'हेकेखोर अधिकारी' असल्याने त्यांना पदावरून काढल्याचं ट्रंप प्रशासनाने म्हटलं होतं.

    कोरोना व्हायरसविषयी सुरुवातीला सरकार पूर्णपणे निष्क्रीय राहिल्याने अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं ब्राईट यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या आरोग्य विषयक उपसमितीमध्ये बोलताना म्हटलं होतं.

    वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेबद्दल आपण पहिल्यांदा जानेवारी महिन्यातच बोललो होतो, असंही ब्राईट म्हणाले आहेत. हा मुद्दा वरच्या पातळीवर - डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसमध्येही मांडला होता पण त्याला महत्त्वं देण्यात आलं नाही, असं ब्राईट यांनी म्हटलंय.

    अमेरिकेत आतापर्यंत एकूण 85 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्येच व्हायरसमुळे 27,607 लोकांचा मृत्यू झालेला आहे.

    ब्राईट म्हणाले, "कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपण सुरुवातीच्या काळातच कमी करू शकतो आणि हीच योग्य संधी असल्याचा इशारा मी दिला होता, पण कोणीही माझं ऐकलं नाही. कोणतंही धोरण नसल्याने 2020 हे आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वांत भयानक वर्ष ठरू शकतं. कोरोनाविषयी मी सुरुवातीपाूनच प्रत्येक पातळीवर आवाज उठवला होता, पण कोही माझं ऐकलं नाही."

    ब्राईट पुढे म्हणाले, "मला पदावरून हटवण्यात आलं कारण मी काँग्रेसकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचा वापर वैज्ञानिक कारणांसाठी व्हावा यावर भर देत होतो. ज्या औषधांना आणि लशींना कोणतंही वैज्ञानिक महत्त्वं नाही, त्यावर पैसे खर्च करण्याच्या मी विरोधात होतो. मी त्यावेळी याविषयी बोललो होतो आणि आता काँग्रेससमोर मी या सगळ्या गोष्टी सांगत आहे. मी गोष्टी राजकीय दृष्टया न बोलता विज्ञानाच्या दृष्टीकोनातून बोलत आहे."

    क्लोरोक्वीनविषयी आपण एक पत्रं लिहीलं होतं आणि त्यानंतर बायोमेडिकल अॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या संचालक पदावरून आपल्याला हटवण्यात आल्याचं ब्राईट यांनी सांगितलं.

    हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना व्हायरसच्या संसर्गासंबंधी 'गेमचेंजर' ठरणार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं. पण हे औषध फारसं प्रभावी नाही, उलट ते धोकादायक ठरू शकण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

    रिक ब्राईट

    फोटो स्रोत, AFP

  5. या पाच देशात झाले आहेत सर्वाधिक मृत्यू

    कोरोना अपडेट

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंची जगातली संख्या ३ लाखांच्या वर गेलेली आहे. चीनमधून या विषाणूचं संक्रमण सुरू झाल्यापासून जॉन हॉपकिन्स विद्यापीठ जगभरातल्या संक्रमणाच्या आणि बळींच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून आहे.

    या विद्यापीठाच्या डॅशबोर्डनुसार सध्या जगभरातत 44 लाख 26 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर आतापर्यंत 15 लाख लोक उपचार घेऊन बरे झाले आहे.

    जगभरात या 5 देशांत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत.

    1. अमेरिका - 14 लाख 13 हजार रुग्ण, 85,500 पेक्षा जास्त मृत्यू

    2. ब्रिटन - 2 लाख 34 हजार रुग्ण, 33,614 मृत्यू

    3. इटली - 2 लाख 23 हजार रुग्ण, 31, 368 मृत्यू

    4. फ्रान्स - 1 लाख 79 हजार रुग्ण, 27,428 मृत्यू

    5. स्पेन - 2 लाख 29 हजार रुग्ण, 27,300 मृत्यू

  6. जगात वेगाने वाढतंय संक्रमण

    कोरोना व्हायरसमुळे गेलेल्या जगभरातल्या बळींची संख्या आता तीन लाखांच्या पुढे गेली आहे. एकूण 188 देशांतल्या 44 लाख 37 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झालाय.

    गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजे 2 एप्रिलला जगभरातल्या कोरोना बाधितांची संख्या होती 10 लाखांच्या जवळपास.

    फक्त दोन आठवड्यांच्या काळात जगभरातल्या 20 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.

    याशिाय पुढच्या 10 लाखांना हा संसर्ग होण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा कमी काळ लागला आणि 28 एप्रिलला जगभरातल्या कोरोना बाधितांची संख्या वाढून 30 लाख झाली.

    यानंतर 13मे पर्यंत जगभरातल्या कोरोना बाधितांची संख्या वाढून 40 लाखांच्याही पुढे गेलेली आहे.

    kajave

    फोटो स्रोत, Getty Images

  7. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट, पेणमध्ये हजारो गणेशमूर्ती तयार, पण...

  8. 'स्थलांतरित मजुरांना भाडेतत्वावर घरे देणार'

  9. 18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे

  10. राज्यातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पार केला एक हजाराचा टप्पा

    राज्यातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पार केला एक हजाराचा टप्पा, एकूण रुग्णसंख्या 27 हजार 524 वर

    राज्यात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने आता 1 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात 27 हजार 524 रुग्णांना कोव्हिड-19 ची बाधा झाली असून त्यापैकी 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

    गुरुवारी राज्यात 1602 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. तर 44 मृत्यूंची नोंद झाली. तसंच 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

    आतापर्यंत राज्यात 6059 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या 20 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असं प्रशासनानं कळवलं आहे.

    राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्तांना आकडा आता 16 हजार 738 वर पोहोचला आहे. इथं आतापर्यंत 621 मृत्य़ू झाले आहेत. पाठोपाठ पुण्यात 2977 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 166 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

  11. बीबीसी मराठीच्या कोरोना व्हायरस LIVE कव्हरेजमध्ये स्वागत

    आता पर्यतच्या प्रमुख घडामोडी

    • सर्व स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफत धान्य - निर्मला सीतारामन
    • राज्यातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पार केला एक हजाराचा टप्पा, एकूण रुग्णसंख्या 27 हजार 524 वर
    • प्रवाशांना विमानात हॅन्ड सॅनिटायझर नेण्याची परवानगी
    • महिनाभर ग्रीन झोनमध्ये राहिल्यानंतर गोव्यात आढळले 8 रुग्ण
    • मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नियमांचं पालन करावं - राज्यपालांचं पत्र
    • देशात 30 जून पर्यंत रेल्वे बुकिंग रद्द, फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार.

    याआधीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहाण्यासाठी इथं क्लिक करा