You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 17974
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांवर उपचारांच्या 'त्या' व्हीडिओची चौकशी करण्यासाठी समिती
आज दिवसभरात काय घडलं?
नमस्कार मंडळी,
कोरोना व्हायरस संदर्भात जगात, देशात आणि महाराष्ट्रात घडत असलेल्या ताज्या घडामोडी बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.
आजही आपण महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेतले. आता उद्या सकाळी आपली भेट होईल.
पण, टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आज दिवसभरात काय घडलं, त्यावर एकदा नजर टाकूया.
1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 17974 वर पोहोचली.
2.आर्थर रोड जेलमध्ये 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून 26 पोलीस कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला.
3.जपाननं कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवियर वापरण्यास परवानगी दिली आहे.
4.जगभरात आतापर्यंत 37 लाख 17 हजार 144 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर 2 लाख 63 हजार 862 व्यक्तींचा मृत्यू.
5.कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या 3 कोटी 30 लाखांवर पोहोचली.
6.कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर गंगेच्या पाण्यानं उपचार करण्यात यावेत, असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयानं ICMRला दिला होता. ICMRनं तो फेटाळला.
7."परप्रांतीयांची एण्ट्री आणि एक्झिटवर बंधनं हवीत, प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही.परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात परत येतील तेव्हा त्यांची तपासणी करा. राज्य सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे?" - राज ठाकरे
8.परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची अट शिथील करण्यात आली आहे.
शुभ रात्री. उद्या भेटूया.
इस्रायलने शोधलेल्या 'अँटीबॉडी' काय आहेत?
इस्रायलने दावा केलाय की, त्यांनी कोरोना व्हायरसला मारू शकणाऱ्या अँटीबॉडीज विकसित केल्या आहेत आणि तसं करणारा तो जगातला पहिला देश आहे.
पण म्हणजे इस्रायलने नेमकं काय केलंय? हे इतर देशांना का शक्य झालेलं नाही? यामुळे खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा आजची ही सोपी गोष्ट.
आर्थर रोड जेलमध्ये 77 कैद्यांना कोरोनाची लागण
आर्थर रोड जेलमध्ये 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून 26 पोलीस कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे.
एकूण 103 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना सेंट जाॅर्जमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
मृतदेहांसोबत उपचारांच्या 'त्या' व्हीडिओचं नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी (7 मे) सकाळी अनेक वृत्तवाहिन्या एक व्हीडिओ दाखवण्यात आला. सोशल मीडियावरही तो व्हायरल झाला...व्हीडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल. असं काय होतं त्या व्हीडिओत?
महाराष्ट्रात 4 मे पासून 48.14 कोटींची दारू विक्री
महाराष्ट्रात 4 मे पासून 48.14 कोटी रुपयांची दारू विकण्यात आली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं ही माहिती दिली आहे.
3 मे रोजी राज्य सरकारनं कंटेनमेंट झोन वगळता इतर परिसरातली दारूची दुकानं उघडण्यास परवानगी दिली होती. पण, त्यानंतर काही जिल्ह्यांनी या निर्णयाचा फेरविचार केला आणि दुकानं बंद केली आहेत.
जपाननं दिली रेमडेसिवियरच्या वापरास मान्यता
जपाननं कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवियर वापरण्यास परवानगी दिली आहे.
तसंच या महिन्यात ऐविगन या औषधाच्या वापरास मान्यता देण्याचाही विचार करत असल्याचं जपाननं म्हटलं आहे.
अमेरिकेनंतर रेमडेसिवियरच्या वापरास परवानगी देणारा जपान जगातला दुसरा देश आहे.
कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थितीत रेमडेसिवियरचा वापर करण्याची परवानगी अमेरिकेनं गेल्या आठवड्यात दिली होती.
एका अमेरिकी कंपनीनं बनवलेलं रेमडेसिवियर हे औषध इबोलाच्या रुग्णांना दिलं जात होतं. पण, हे औषध वापरून कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, कोरोनाची लस कधी तयार होणार, पाहा हा व्हीडिओ -
#CoronaPodacst : दिवसभरात काय घडलं?
#CoronaPodacst : मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांवर उपचारांच्या 'त्या' व्हीडिओमुळे मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. सर्वपक्षीय बैठकीनंतर परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय म्हणाले? वंदे भारत मोहिमेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना कसं आणलं जाणार मायदेशी? विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती.
दिवसभरात काय घडलं, पाहा बीबीसी मराठीचा हा कोरोना पॉडकास्ट.
जगभरात कोरोनाचे 37 लाख 17 हजार 144 रुग्ण
जगभरात आतापर्यंत 37 लाख 17 हजार 144 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 2 लाख 63 हजार 862 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 12 लाख 26 हजार 420 रुग्ण आढळले असून 73 हजार 323 जणांचा मृत्यू झाला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापाठीनं यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे.
दिल्लीतून 1200 मजुरांना घेऊन मध्य प्रदेशसाठी श्रमिक ट्रेन रवाना
दिल्लीतल्या वेगवेगळ्या शेल्टर होममध्ये राहत असलेल्या 1200 मजुरांना आज संध्याकाळी विशेष बसेसमधून नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आणण्यात आलं.
बीबीसी प्रतिनिधी चिंकी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 75 बसेस रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. प्रत्येक बसमध्ये दहा ते बारा मजूर आहेत. रेल्वे स्टेशन सील करण्यात आलं आहे. बसेससोबत मजुरांसाठी अँब्युलन्सही पाठविण्यात आल्या.
रात्री आठ वाजता या श्रमिक एक्सप्रेस ट्रेन मध्य प्रदेशसाठी रवाना झाल्या. दिल्लीहून मजुरांना घेऊन जाणारी ही पहिली ट्रेन आहे.
उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश पहिलं राज्य आहे, ज्यानं दिल्लीत अडकलेल्या मजुरांना परत बोलावण्याची तयारी दर्शवली.
आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारलाही मजुरांना परत बोलावण्यासंदर्भात संपर्क साधला होता. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही, असं दिल्ली सरकारनं सांगितलं आहे.
धारावीत कोरोनाचे 50 नवीन रुग्ण
मुंबईतल्या धारावीत गुरुवारी कोरोनाचे 50 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 783इतकी झाली आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे इथं 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे आणि मुंबईतून ट्रेन्सची संख्या वाढवणार – राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
त्यांनी मांडलेले मुद्दे –
1.आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या 2 लाख टेस्टिंग केल्या आहेत.
2.मुंबईत आणखी 2 हजार बेड्सची व्यवस्था करणार. आरोग्य सेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर यंत्रणांची मदत घेणार.
3.क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्याचा विचार सरकार करत आहे.
4.पुणे आणि मुंबईतून ट्रेन्सची संख्या वाढवत आहोत. जेणेकरून मजूरांना त्यांच्या गावी पाठवता येईल.
5.आता मजूरांना गावी परत जाण्यासाठी डॉक्टरच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
6.महाराष्ट्रात 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत, ते ऑरेंज झोनमध्ये येऊ नयेत, हा उद्देश आहे.
7.कोरोनाच्या चाचण्यांसाठी दवाखाने मनमानी दर आकारू शकत नाहीत. तसं आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
उत्तर प्रदेशमधील 1,225 मजूरांना घेऊन विशेष रेल्वे नगरहून रवाना
लॉकडाऊनमुळेअहमदनगर जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश मधील 1,225 मजूरांना घेऊन अहमदनगर ते उन्नाव विशेष रेल्वे रवाना झाली.
मजूरांना प्रशासनानं नाष्टा-अन्न पाकीटे, पाण्याची बाटली दिली.
गुरुवारी रात्री 1200 मजूरांना घेऊन विशेष रेल्वे भोपाळकडे रवाना होणार आहे.
दारूच्या दुकानांवर शिक्षकांची ड्यूटी
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात शिक्षकांना दारूच्या दुकानांवर ड्यूटी लावण्याचा प्रकार समोर आला आहे.
मूर्तिजापूरचे तहसीलदार तहसीलदार प्रदीप पवार यांनी यासंबंधीचा आदेश काढला होता.
या आदेशावर प्राध्यापक आणि शिक्षक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे.
अमेरिकेतल्या बेरोजगारांचा आकडा पोहोचला 3 कोटींवर
गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या 32 लाख व्यक्तींनी बेरोजगार म्हणून स्वत:ची नोंद केली आहे. त्यामुळे आता मार्चनंतर अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या 3 कोटी 30 लाखांवर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारांच्या संख्येत घट होत असली तरी ही आकडेवारी अभूतपूर्व असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
एप्रिल महिन्यातील बेरोजगारीच्या आकडेवारीचा रिपोर्ट शुक्रवारी (8 मे) आपल्या समोर येईल.
St Louis US Federal Reserve Bankचे अध्यक्ष जेम्स बुलार्ड यांनी CNBCला सांगितलं की, अमेरिकेच्या इतिहासातील हा कदाचित सगळ्याच वाईट रिपोर्ट असेल.
कोरोनाच्या रुग्णांवर गंगेचं पाणी वापरून उपचार करण्याचा प्रस्ताव ICMRनं फेटाळला
कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर गंगेच्या पाण्यानं उपचार करण्यात यावेत, असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयानं ICMRला दिला होता. ICMRनं तो फेटाळला आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटाची आवश्यकता असल्याचं ICMRनं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी सरकारला परप्रांतीयांच्या मुद्द्यावर काय सूचना दिल्या?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.
या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील आदी नेते उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दा जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ –
मजूरांना गावी जाण्यासाठी आता डॉक्टरच्या सर्टिफिकेटची गरज नाही
आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांना आता डॉक्टरच्या पत्राची सक्ती नाही. स्टेशनवर त्यांची सरकारी डॉक्टर तपासणी करणार आहे. यासाठी पैसे देण्याची गरज नाही, असा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे.
आधी मजुरांना डॉक्टरकडून सर्टिफिकिट घेणं अनिवार्य करण्यात आलं होतं. तो निर्णय आता बदलण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 10 हजार पासांचं वाटप
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 10 हजार 694 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत.
तसंच राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 6 मे या कालावधीत कलम 188 नुसार 96,231 गुन्हे नोंद झाले असून 18,858 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.