You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत दारुची दुकानं बंद राहणार, केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
मुंबई, पुण्यात सरकारी ऑफिसात 5 टक्के स्टाफ
लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एम.एम.आर.), मालेगाव महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एम.एम.आर. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मालेगाव महानगरपालिका हद्दीतील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उर्वरित संपूर्ण राज्यामधील शासकीय कार्यालयात उपसचिव तसेच त्यावरील दर्जाचे अधिकारी यांची 100 टक्के उपस्थिती आणि उर्वरित अधिकारी-कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार 33 टक्क्यांपर्यंत उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, संरक्षण व सुरक्षा सेवा, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पोलीस, तुरुंग, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि अनुषंगिक सेवा, राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एनआयसी), सीमाशुल्क, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र (एनवायके) आणि महानगरपालिका सेवा हे उपस्थितीबाबतच्या प्रतिबंधाशिवाय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील.
शासकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं आवश्यक आहे.
अमेरिकेत जूनपर्यंत कोरोनामुळे दररोज होऊ शकतात 3000 मृत्यू
अमेरिकेत जूनपर्यंत कोरोनामुळे दररोज 3000 जणांचा मृत्यू होऊ शकतो असं राष्ट्राध्यक्ष ट्रंप प्रशासनाच्या एका अंतरिम अहवालात म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
हे आकडे फेडरल इमर्जन्सी मॅनेममेंट एजन्सीकडून मांडण्यात आलेला असून, सरकारी माहितीवर आधारित आहे. सध्या कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 1750 आहे. त्यापेक्षा केलेल्या भाकिताचा आकडा 70 टक्क्यांनी जास्त आहे.
मे महिन्याच्या अखेरीपर्यंत दोन लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होऊ शकते. आता ही संख्या 25 हजार आहे.
अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक राज्यं लॉकडाऊनच्या अटी शिथिल करत असतानाच ही आकडेवारी समोर आली आहे. फ्लोरिडातील समुद्रकिनाऱ्यांवर लोक मोठ्या प्रमाणात एकत्र जमल्याचे चित्र आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 80 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 68000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इंडो-तिबेटियन बॉर्डर दलातील 45 पोलिसांना कोरोना
दिल्लीत तैनात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या तुकडीतील 45 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दिल्ली शहरात अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेसाठी यापैकी 43 जण तैनात करण्यात आले होते तर दोघे दिल्ली पोलिसांतर्गत कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न उद्धवू नये म्हणून कार्यरत होते.
दिल्लीतल्या तिगडी भागात कार्यरत तुकडीतील 43 पैकी दोघांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तर 41 जणांना ग्रेटर नोएडातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. 76 जणांना चावला इथं क्वांरटीन केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान रोहिणी इथल्या केंद्रात कार्यरत दोघांना झज्झर इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित 91 जणांना चावला इथल्या केंद्रात क्वारंटीन करण्यात आलं आहे. या 91 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
कोरोना: आपलं जगणं पुन्हा नॉर्मल केव्हा होईल? - सोपी गोष्ट
NEET ची परीक्षा 26 जुलैला होणार
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी NEET ची परीक्षा 26 जुलैला होईल.
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठीची JEE-Mains ही परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान, तर JEE-Advanced ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात होईल.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची याबाबत माहिती दिली.
तसंच, CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
लोकांची क्रयशक्ती कायम राहिली पाहिजे – अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी
कोरोना व्हायरसमुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील आणि त्यावर काय उपाय आहेत, याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला.
राहुल गांधी आणि अभिजित बॅनर्जी यांच्यातील संपूर्ण संवाद इथे पाहू शकता :
“सरकारनं लोकांच्या हातात पैसा द्यावा. कारण लोकांची क्रयशक्ती कायम राहिली पाहिजे. आपल्या हातात पैसे आहे, हा विश्वास लोकांना लॉकडाऊन उठवल्यानंतर असायला हवा,” असं मत अभिजित बॅनर्जी यांनी मांडलं.
छत्तीसगढ सरकारकडून ग्रीन झोनमध्ये दारुची घरपोच सेवा
छत्तीसगढ सरकारनं दारुची घरपोच सेवा देण्याचं ठरवलंय. ही सेवा केवळ ग्रीन झोनमधील लोकांसाठीच आहे.
यासाठी छत्तीसगढ सरकारकडून ऑनलाईन ऑर्डरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, 5000 मिली इतकी दारू एका ऑर्डरमध्ये मागवता येईल. मात्र, त्यासाठी 120 रुपये डिलिव्हरी चार्जेस सुद्धा आकारले जाणार आहेत.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत जगातील सुमारे 187 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झालाय.
जगभरातील जवळपास 35 लाख 84 हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय.
सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेत. एकट्या अमेरिकेत 68 हजार 934 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
दिल्ली : केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातील कायदेविषयक विभागातील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. 23 एप्रिल रोजी ते शेवटचे कार्यालयात आले होते.
खबरदारी म्हणून कायदेविषयक विभागाचं कार्यालय असलेलं शास्त्री भवन सील करण्यात आलंय.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला देशातील स्थितीचा आढावा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेत देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडली. दिल्लीतल्या निर्माण भवनात ही बैठक झाली.
देशातील सद्यस्थिती, आवश्यक उपाययोजना इत्यादी गोष्टींवर या बैठकीत चर्चा झाली.
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी दारुच्या दुकानांबाहेर गर्दी
दिल्लीत आजही दारुच्या दुकानांबाहेर रांगा पाहायला मिळाल्या. तळीरामांनी गर्दी केली होती.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना या व्यक्तीनं आपल्या कशा भावना मांडल्या, तुम्ही या ट्वीटमधील व्हीडिओतून ऐकू शकता :
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 46 हजारावर पोहोचली
भारतातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 46 हजाराहून अधिक झालीय, तर मृतांची संख्या 1568 वर पोहोचलीय.
भारतातील बरे झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत 12,727रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात भारतात 3,900 नवे रुग्ण आढळले, तर 195 जणांचा मृत्यू झाला.
मंत्रालयात केवळ 5 टक्के कर्मचारी उपस्थित राहणार
शासकीय कर्मचारी कार्यालय उपस्थितीवर सरकारने आदेश जारी केलाय.
मुंबई (MMR), पुणे (PMR) परिक्षेत्र, मालेगाव महापालिका, पिंपरी चिंचवड या क्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह मंत्रालयात 5 टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आलेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलंय.
तसंच, शासकीय कार्यालयात हॅन्ड सॅनिटाझयर, साबण याची योग्य सोय करण्याचेही आदेश देण्यात आलेत.
'कोकणचा राजा' तुमच्यापर्यंत असा पोहोचतोय
कोरोनानं यंदाच्या हापूसची मोठी कसोटी पाहिली. आंबा पोहोचवण्याचे रस्तेच त्यानं अडवून ठेवले, लॉकडाऊननं राज्यातले बाजार बंद केले. काहींना त्याचा तोटा झाला, तर काहींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग सापडला.
या नव्या मार्गांबाबतच सविस्तर तुम्हाला इथे वाचता येईल आणि त्यासंदर्भातील व्हीडिओही पाहता येईल.
लॉकडाऊन शिथील, पण मोलकरणींना घरकामाला यायला सांगायचं की नाही?
कोरोनानंतर परिस्थिती रुळावर कधी येईल?
राहुल गांधी साधणार 'नोबेल' विजेते अभिजित बॅनर्जींशी संवाद
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसमुळं देशावर घोंघावणाऱ्या आर्थिक संकटाबाबत ते या संवादात चर्चा करतील.
आज सकाळी 9 वाजता राहुल गांधी यांच्या यूट्यूब चॅनेलवरून हा संवाद सगळ्यांना पाहता, ऐकता येईल.
अमेरिका 3 ट्रिलियन डॉलरचं कर्ज घेणार
कोरोना व्हायरसनं अवघ्या अमेरिकेला घेरलंय. या आरोग्य संकटासोबतच आर्थिक संकटाशीही अमेरिकेला सामना करावा लागतोय.
कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी अमेरिका तीन ट्रिलियन डॉलरचं कर्ज घेणार आहे. नुकसान भरपाई आणि इतर खर्चांना डोळ्यांसमोर ठेवून अमेरिकेनं कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय.
2008 साली आलेल्या आर्थिक संकटावेळीही अमेरिकेनं एका तिमाहीत असं कर्ज घेतलं होतं. मात्र, त्यावेळच्या कर्जाच्या तुलनेत आताचं कर्ज पाचपट अधिक आहे.
आरोग्य सेवा, नुकसान भरपाई, लोकांच्या खात्यात थेट मदतनिधी पाठवणं अशा गोष्टींसाठी हा पैसा वापरला जाईल.
या नव्या कर्जामुळे अमेरिकेवरील एकूण कर्जाची रक्कम आता 25 ट्रिलियन डॉलर एवढी झालीय.
बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजमध्ये तुमचं स्वागत
सुप्रभात मंडळी!!!
बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
कोरोना व्हायरससंदर्भातील राज्य, देश आणि जगभरातील सर्व अपडेट तुम्हाला इथं वाचायला मिळतील.
नवीन अपडेटपूर्वी काल दिवसभरात काय घडलं, हे एकदा पाहूया :
- सशर्त परवानगी मद्यविक्रीला सुरुवात, दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी दारुच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा. सोशल डिन्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांची कारवाई
- परदेशात अडकलेल्या भारतीयांना 7 मेपासून टप्प्याटप्प्याने परत आणणार असल्याची माहिती केंद्र सरकारने काल दिली.
- लॉकडाऊन वाढवल्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमण्यावरचे निर्बंध 17 मे पर्यंत कायम राहतील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
- काल देशात 42 हजार 533 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोव्हिड-19 चे 11,706 रुग्ण बरे झाले आहेत.
- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 31 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असं केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
- 4 मे 2020च्या दुपारपर्यंत जगभरात 35 लाख 5 हजार 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 49 हजार जणांचा बळी गेला आहे.
काल दिवसभरातील सर्व अपडेट विस्तृतपणे तुम्हाला इथे वाचता येतील.