You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत दारुची दुकानं बंद राहणार, केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
शाहू महाराजांकडून कोरोना व्हायरसच्या काळात काय शिकण्यासारखं आहे?
मुंबईत खासगी डॉक्टरांना कोव्हिड-19 वॉर्डात सेवा देणं अनिवार्य - शासनाचा निर्णय
आज दिवसभरात काय काय घडलं?
- मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरू राहणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानंच खुली राहतील असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 4 मे पासून नियम शिथिल होऊन काही सेवांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. दारुविक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन फक्त जीवनावश्यक सेवाच सुरू राहतील असा आदेश काढण्यात आला आहे.
- मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण डोंबिवलीत नो एंट्री
8 मे नंतर मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत एंट्री नसेल. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. मुंबईत काम करणाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे त्यांच्या ऑफिसजवळच करण्यात येणार आहे.
- लायन्सस संपतंय, चिंता नको
लॉकडाऊन काळात अनेकांच्या लायसन्सची मुदत संपते आहे. परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मुदत 30 जूनपर्यंत ग्राह्य धरली जाईल असं म्हटलं आहे.
- श्रमिक स्पेशल ट्रेन्सची वाहतूक
स्थलांतरित कामगारांसाठी देशभरात 67 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
- जगभरात अडकलेले भारतीय परत येणार
दरम्यान जगभरात विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ६४ विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. 7 ते 13 मे या कालावधीत विविध देशांमधून भारतीय मायदेशी परततील. आरोग्य तपासणीनंतर त्यांना 14 दिवस क्वारंटीन फॉलो करावं लागणार आहे.
राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोरोनाचे अपडेट्स तुम्हाला बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर वाचायला मिळतील.
आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. 6 मे च्या लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या या लाइव्ह पेजला भेट द्या.
शुभरात्री.
ब्रिटनमध्ये 24 तासात 693 लोकांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात, 693 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत 29,427 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक रॉब यांनी याबाबत माहिती दिली.
ब्रेकिंग, मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार
महाराष्ट्र शासनाने दि. 4 मे पासून लाॅकडाऊन कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली होती. परंतु या शिथिलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.
इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. सबब अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, उद्या पासून मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे.
मॉल्स, मार्केट्स संकुलं, मार्केट्स बंद राहतील. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकानं सुरू राहतील असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
दारू विक्रीच्या दुकानांनी दिलेली सवलत रद्द करण्यात आली आहे. दारू विक्रीची दुकानं उघडल्यामुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रेड झोन अर्थात कोरोना संसर्गाचा धोका असणाऱ्या मुंबईत अशी गर्दी होणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे आयुक्तांनी दारूविक्रीच्या दुकानांना दिलेली परवानगी रद्द केली आहे. केवळ किराणा, भाजीपाला, दूध, मेडिकल यांचीच दुकानं खुली राहतील.
राज्यात कोरोनाचे 841 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 15,525
महाराष्ट्रात आज कोरोनाचा संसर्ग झालेले 841 रुग्ण आढळले. कोरोनामुळे आज 34 रुग्णांचा मृत्यू झाला, तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 354 आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 15,525 झाली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक म्हणजे 9945 आहे.
ब्रेकिंग, ८ मे नंतर मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली शहरात 'नो-एन्ट्री'
कल्याण-डोंबिवलीत राहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी.
कामानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना 8 मे नंतर शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत आज एक आदेश जारी केला आहे.
आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे, मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कामाजवळच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिका करणार आहे.
बॅंका, खासगी कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांनी त्यांची व्यवस्था मुंबईत करावी ८ मे पासून महापालिका क्षेत्रातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या लोकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे.
मुंबई पाठोपाठ कल्याण-डोंबिवली परिसरातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सध्या कल्याण-डोंबिवलीमध्ये 228 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली शहरातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आपली नावं, घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता, फोन नंबर, आधारकार्ड याची माहिती महापालिकेकडे देण्याची सूचना केली आहे.
मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशावर राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटलं, "नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागातून मुंबईत कामासाठी गेलेल्यांना 7 मे नंतर घरी परतण्यास मिळणार नाही. त्यांची जागा राज्य सरकारने केली नाहीये. यामुळे परवापासून अर्धी रुग्णालयं बंद पडतील, पोलीस कामावर हजर होऊ शकणार नाहीत. याबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी अशी माझी मागणी आहे".
कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेही असा आदेश जारी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त अनिल गलगली यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.
अनिल गलगली यांनी म्हटलं, "मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या परिसरातील अधिकारी कर्मचारी कोव्हिड-19 च्या विरोधात मोठा लढा देत आहेत. आपला जीव पणाला लावून काम करत आहेत. पण, दुर्दैवाने सरकारी निर्णय नसताना एका आयुक्तांनी असा निर्णय घेणं चुकीचं आहे."
मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य कारवाई करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कर्मचाऱ्यांवर घातलेली बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाचं अस्तित्त्व पहिल्यांदा शोधणाऱ्या शास्त्रज्ञाबद्दल तुम्हाला माहितीये?
सध्या जगभरात 'कोरोना' याच नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर संशोधनही सुरू आहे. पण तुम्हाला माहितेय का स्कॉटलंडमधल्या एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरात पहिल्यांदा कोरोनाचं अस्तित्त्व शोधून काढलं?
या महिला शास्त्रज्ञाबद्दल माहिती घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
लॉकडाऊन काळात लायसन्स एक्स्पायर होतंय? काळजी करू नका
लॉकडाऊन काळात, अनेकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते आहे. मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. लॉकडाऊन काळात लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया बंद होती. 1 फेब्रुवारी ते 30 जून या काळात ज्यांचं लायसन्सची मुदत संपते आहे त्यांचा परवाना 30 जूनपर्यंत वैध मानला जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
इटलीत पुुन्हा कोरोनाचं थैमान?
इंपीरियल कॉलेज, लंडनच्या एका रिपोर्टनुसार इटलीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू थैमान घालू शकतो.
इटलीत लॉकडाऊन शिथिल होऊन जनजीवन सुरू झालं तर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होऊ शकतो. संसर्गाचा हा दुसरा टप्पा अतिशय भयावह आणि वेगाने पसरणारा असेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
9 मार्चपासून इटलीत लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी इटली सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात असं इंपीरियल कॉलेजच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
इटलीत आतापर्यंत 211, 938 इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इटलीत आतापर्यंत कोरोनामुळे 29,079 जणांचा मृत्यू झाला आहे तर 82,879 जण या संसर्गातून बरे झाले आहेत.
कोरोनावरील उपचार म्हणून चर्चेत आलेली प्लाझ्मा थेरपी घातकही ठरू शकते?
परवानगी देण्यात आलेली दुकानं सकाळी 7 ते रात्री 7 उघडी राहणार
राज्यात ज्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे ती दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ७ उघडी राहतील.
मुंबई-पुणे, मुंबई महानगर प्राधिकरणातील अन्य महापालिका तसंच नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्हाधिकारी ग्रामीण भागात यांनाच वेळ, दिवस ठरवण्याची मुभा.
यांच्याशिवाय इतर कोणीही दुकानांबाबत निर्णय घेऊ नये असं परिपत्रक मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी काढलं आहे.
कामगारांसाठी रेल्वे तिकीट कोण काढणार?- आजचं कार्टून
दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला घरी दिल्या जाणार?
दहावी,बारावी परिक्षांचे निकाल वेळेत लागावेत यासाठी उत्तरपत्रिका घरी दिल्या जाव्यात अशी विनंती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने केली आहे.
बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रश्न निर्माण झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दहावी आणि बारावी परिक्षांचा निकाल 10 जूनपूर्वी घोषित करणं अनिवार्य आहेय. त्या नियमाचे पालन करण्यादृष्टीने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांच्या घरी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
त्याकरता कामाचे स्वरुप कसे आखता येईल याचा तपशील देण्यात आला आहे.
-उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवरून कनिष्ठ महाविद्यालय तसंच शाळेकडे पाठवण्यात येतील,
-शिक्षक अथवा शिपायांमार्फत उत्तरपत्रिका परीक्षकांच्या घरी नेऊन दिल्या जातील.
-परीक्षकांकडून नियामकांकडे उत्तरपत्रिका पोहोचवल्या जातील.
-नियामकांकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे.
-उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी अधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवासाचे पास देण्याची विनंती करण्यात आली आहे.
24 तासात कोरोनामुळे 195 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात, देशभरात कोरोनाचे 3,900 नवे रुग्ण सापडले असून, 195 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,020 जण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचं हे सर्वाधिक प्रमाण आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितलं.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 46, 433 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,558 लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्थलांतरित कामगारांसाठी 67 श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना
देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी पाठवण्यासाठी आतापर्यंत 67 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
बेंगळुरू, सुरत, जालंधर, कोटा, एर्नाकुलम इथून आज अनेक श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना झाल्या.
आणखी 21 ट्रेन पुढच्या काही दिवसात रवाना होण्याची शक्यता आहे.
या देशात अडकलेले भारतीय परतणार
कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जगभरात अनेक ठिकाणी भारतीय माणसं अडकली आहेत. नोकरी-व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, कौटुंबिक सोहळे अशा निमित्ताने परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 7 ते 13 मे या कालावधीत 64 विमानं परदेशातल्या भारतीयांना परत आणतील. हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.
खालील देशांमधून भारतासाठी विमानं सुटतील.
संयुक्त अरब अमिराती 10
कतार-2
सौदी अरेबिया-5
युके-7
सिंगापूर-5
फिलीपीन्स-5
अमेरिका-7
बांगलादेश-7
बहरीन-2
मलेशिया-7
कुवेत-5
ओमान-2
परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्याची प्रक्रिया 7 मे पासून
7 ते 13 मे या कालावधीत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 64 विमानं फेऱ्या करणार असल्याचं हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवासाचं स्क्रीनिंग अर्थात आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यांना 14 दिवस क्वारंटीनमध्ये राहावं लागेल असंही त्यांनी सूचित केलं.
लंडन-दिल्ली प्रवासाकरता 50,000 रुपये, ढाका-दिल्ली प्रवासाकरता 12,000 रुपये इतकं शुल्क आहे.
अकरा विविध देशात अडकलेले भारतीय विमानसेवेच्या माध्यमातून मायदेशी परततील.