You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

दारू विक्री, स्थलांतरितांसाठीच्या रेल्वेवरून राजकारणाने गाजला दिवस

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. आज दिवसभरात काय काय घडलं?

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपण दिवसभरातले अपडेट पाहिले. दारुविक्रीला सुरूवात झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे वाजलेले तीन तेरा आणि स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या खर्चावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीघेतलेले आक्षेप, त्यावरुन झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे आजचा दिवस चर्चेत राहिला. या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवून आजच्या लाइव्ह पेजमध्ये इथेच थांबतोय.

    पण गुड नाइट, बाय-बाय म्हणण्याआधी दिवसभरात अजून काय काय घडलं ते अगदी थोडक्यात...

    • सशर्त परवानगी मद्यविक्रीला सुरुवात, दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी दारुच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा. सोशल डिन्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांची कारवाई
    • परदेशात अडकलेल्या भारतीयांना 7 मेपासून टप्प्याटप्प्याने परत आणणार असल्याची माहिती केंद्र सरकारने आज दिली.
    • लॉकडाऊन वाढवल्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमण्यावरचे निर्बंध 17 मे पर्यंत कायम राहतील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
    • देशात 42 हजार 533 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोव्हिड-19 चे 11,706 रुग्ण बरे झाले आहेत.
    • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 31 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असं केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
    • 4 मे 2020च्या दुपारपर्यंत जगभरात 35 लाख 5 हजार 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 49 हजार जणांचा बळी गेला आहे.

    यापुढील अपडेटसाठी इथे क्लिक करा.

  2. अलिप्त राष्ट्रांच्या बैठकीत मोदींची पाकिस्तानवर नाव न घेता टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिप्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली.

    जेव्हा सर्व जग कोव्हिड-19 सोबत लढत असताना काही जण मात्र दहशतवाद, फेक न्यूज आणि बनावट व्हीडिओंना प्रोत्साहन देत आहेत.

    आमच्या देशाच्या गरजा भागवून आम्ही अलिप्त राष्ट्र समूहातील 59 देशांसह 123 देशांना वैदयकीय मदत करत आहोत.

    कोरोनावर लस शोधण्यासाठी आम्ही जगासोबत प्रयत्न करत आहोत.

  3. जर्मनीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दहापट अधिक असण्याची शक्यता

    जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा अधिकृतरित्या सांगितल्या गेलेल्या आकड्यापेक्षा दहापट अधिक असू शकतो. बॉन विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे.

    या संशोधकांच्या मते जर्मनीतील 18 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो.

    जर्मनीतील हेंसबर्ग शहरात हे संशोधन करण्यात आलं आहे. या शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.

    या संशोधनानुसार दर पाच व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणंच आढळून येत नाहीयेत.

    सध्या जर्मनीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 1,60,000 आहे.

  4. रेल्वेच्या विशेष गाड्या मजुरांसाठी, अन्य पॅसेंजर गाड्या मात्र बंद

    रेल्वेनं इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.

    या गाड्यांमध्ये राज्यांकडून ज्यांची यादी देण्यात आली आहे, अशा प्रवाशांचीच व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारांकडून तिकिटाची रक्कम घेतली जात आहे. ती रक्कम रेल्वेला गाडी चालवण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या 15 टक्के असल्याचं रेल्वेकडून सांगितलं गेल्याचं ANI या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

    शिवाय या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती किंवा गटाला स्टेशनवर प्रवेश दिला जाणारा नाही. या गाड्या राज्य सरकारच्या विनंतीवरून सोडण्यात आल्या असून अन्य पॅसेंजर गाड्या बंद असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

    दरम्यान, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी 2 मे रोजीच त्यासंबंधीचं ट्वीट केलं होतं.

  5. मुंबईकरांनो, लॉकडाऊन शिथील करायचा असेल तर हे 5 नियम पाळा

  6. स्थलांतरित मजूर का भिडले पोलिसांना?

  7. आजचा #CoronaPodcast

    लाॅकडाऊन 3.0च्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात काय काय सुरू झालं? सांगतायत विनायक आणि आशिष

  8. 'या' आकड्यावरून घेतला जातो लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय

  9. लॉकडाऊन उठवण्यासाठी R0 हा नंबर महत्त्वाचा का आहे?

    कोरोना व्हायरस किती पसरतोय, ही साथ आटोक्यात येतीये का, लॉकडाऊन कधी उठवायचा...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका आकड्यात दडली आहेत. जगभरातले देश याच आकड्याचा आधार घेत आहेत.

    काय आहे हा आकडा जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

  10. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, औषध विभाग वगळता नवीन पदभरती नाही

    सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, विद्यापीठ स्टाफ (ड गट वगळता) यांचा पगार दोन टप्प्यात होईल, असा निर्णय राज्य सरकारच्या वित्त विभागानं घेतला आहे.

    कोरोनामुळे विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी सावरण्याच्या दृष्टिनं हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध पाहता दोन ते तीन महिने परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

    आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, औषध विभाग वगळता नवीन पदभरती करता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

  11. ब्रेकिंग, परदेशात अडकलेल्या भारतीयांना 7 मेपासून परत आणणार

    परदेशात अडकलेल्या भारतीयांना 7 मेपासून टप्प्याटप्प्याने परत आणणार असल्याची माहिती केंद्र सरकारने आज दिली.

    विमान तसंच जहाजाद्वारे या प्रवाशांना आणण्याची सोय केली जाईल. त्यासाठी त्या त्या देशांमधील भारतीय दूतावास आणि हाय कमिशन भारतीय लोकांची तशी यादी करत असल्याचं केंद्र सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं.

    भारतात प्रवेश करताच या प्रवाशांना आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करावी लागेल, तसंच गरजेनुसार त्यांना एकतर घरी किंवा सरकारी व्यवस्थेत क्वारंटाईन केलं जाईल.

  12. मुंबईत चारपेक्षा अधिक जणांच्या एकत्र जमण्यावर 17 मे पर्यंत निर्बंध

    कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील जमावबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    लॉकडाऊन वाढवल्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमण्यावरचे निर्बंध 17 मे पर्यंत कायम राहतील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

  13. दारू खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा- आजचं कार्टून

  14. रशियात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे 10 हजाराहून अधिक रुग्ण

    रशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी रशियात कोरोनाचा संसर्ग झालेले 10 हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

    गेल्या चोवीस तासात रशियात कोरोनाचे 10, 581 रुग्ण आढळले.

    रशियात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 1,45,268 झाली आहे. रशियातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं चीन, तुर्कस्तान आणि इराणमधील रुग्णांच्या संख्येला मागे टाकत आहे.

  15. 'कोकणचा राजा': लॉकडाऊनमध्येही तुमच्यापर्यंत असा पोहोचतोय कोकणातला हापूस

  16. गेल्या चोवीस तासात 1074 रुग्ण बरे झाले - आरोग्य मंत्रालय

    आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणि सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे-

    • देशात 42 हजार 533 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोव्हिड-19 चे 11,706 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात 1074 रुग्ण बरे झाले असून हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. भारताचा रिकव्हरी रेट आता 27.52 टक्के आहे.
    • गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचा संसर्ग झालेले 2553 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1373 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 67 जणांचा मृत्यू झाला आहे.
    • देशाची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली असून या तिन्ही भागात रुग्णसंख्येचा आणि संसर्गाचा विचार करूनच निर्बंध लादण्यात आले आहेत.
    • हवाई वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो वाहतूक तसंच रस्ते वाहतूक बंद राहील. आंतरराज्य प्रवासावर निर्बंध असून जिल्ह्या-जिल्ह्यातील वाहतुकीवरही बंद राहील.
  17. कोरोना व्हायरसवर रेमदेसिव्हिरऔषध रामबाण ठरेल? - सोपी गोष्ट

  18. UPSC कडून सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा स्थगित

    केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा स्थगित केली आहे. ही परीक्षा 31 मे रोजी होणार होती. मात्र आता 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असं केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.

  19. उठवलेली दारूबंदी हे शासनाचे अतर्क्य पाऊल – डॉ अभय बंग

    भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी आतापर्यंत अतिशय स्तुत्य पावलं उचलली. पण रविवारी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा आहे.

    भारतात 42 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 1300 हून अधिक मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याच वेळी भारतात दर वर्षी दारूमुळे पाच लक्षं मृत्यू होतात. भारतातील 5 कोटी लोक दारूच्या व्यसनाच्अया आधीन असल्याचं जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहे.

    कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल आहे. दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच हिंसाही घेऊन येतील.

    कोरोनामुळे शासनाने महिनाभरापासून दारू, खर्रा व तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय?

  20. जगभरात कोरोनाचे 35 लाखांहून अधिक रुग्ण

    नवीन आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत म्हणजेच 4 मे 2020च्या दुपारपर्यंत जगभरात 35 लाख 5 हजार 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 49 हजार जणांचा बळी गेला आहे.

    कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले देश -

    1. अमेरिकेत कोरोनाते 11 लाख 57 हजार 945 रुग्ण, 67 हजार 680 व्यक्तींचा मृत्यू

    2. स्पेनमध्ये 2 लाख 17 हजार 466 रुग्ण, 25 हजार 264 व्यक्तींचा मृत्यू

    3. इटलीत 2 लाख 10 हजार 717 रुग्ण, 28 हजार 884 व्यक्तींचा मृत्यू

    4. इंग्लंडमध्ये 1 लाख 87 हजार 842 रुग्ण, 28 हजार 520 व्यक्तींचा मृत्यू

    5. फ़्रान्समध्ये 1 लाख 68 हजार 925 रुग्ण, 24 हजार 900व्यक्तींचा मृत्यू