You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रातील आज 221 नवे रुग्ण, एकूण आकडा 1982 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. पुण्याच्या एका नर्सला कोरोनाची लागण

    पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका 45 वर्षीय नर्सला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या नर्सच्या संपर्कात आलेल्या 30 नर्सना रुबी हॉल हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती संचालक संजय पठारे यांनी दिली आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली नर्स नुकतीच सुट्टीवरून परतली होती. तिला कोव्हिडची सौम्य लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी घेण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आढळली.

  2. जयपूरमध्ये आढळले 35 नवे रुग्ण

    राजस्थानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 796 वर पोहोचली आहे.

    रविवारी जयपूरमध्ये 35 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर टोंकमध्ये 11 नवे रुग्ण आढळून आले.

    राजस्थानात एकूण 96 नव्या रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

  3. नागपूरमध्ये 14 नवे रुग्ण आढळले

    नागपूरमध्ये रविवारी कोरोना व्हायरसची लागण झालेले 14 नवे रुग्ण आढळल्याची माहिती नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

  4. देशात गेल्या 24 तासात 909 नवे, 34 मृत्यू

    केंद्र सरकारची पत्रकार परिषद सुरू असूून यात आरोग्य मंत्रालय, भारतीय आरोग्य संशोधन परिषद अर्थात ICMR आणि गृहमंत्रालयातर्फे संयुक्तरीत्या माहिती दिली जात आहे.

    आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल माहिती देत आहेत. प्रमुख मुद्दे -

    • कालपर्यंत देशात 1,86,906 जणांचं टेस्टिंग झालं आहे, ज्यापैकी 7,963 पॉझिटिव्ह आढळले आहेत. दररोज सरासरी 15,707 जणांचं टेस्टिंग होत आहे.
    • गेल्या 24 तासात देशभरात 909 नवे रुग्ण आढळले असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 8,356 पॉझिटिव्ह रुग्ण असून 273 मृत्यू झाले आहेत. तसंच, 716 बरे झाले आहेत
    • देशभरातील टेस्टिंग यंत्रणा वाढवण्यासाठी 14 मेडिकल कॉलेजेसमध्ये टेस्टिंग लॅब्स उभारण्यात येत आहेत, यात एम्स आणि निम्हन्स सारख्या संस्थाही सहभागी आहेत.
    • देशातील 80 टक्के रुग्णांमध्ये अगदी सौम्य लक्षण आहेत किंवा लक्षणं दिसतच नाहीत. त्यामुळे रुग्णांची व्यवस्थित ओळख करून त्यांना आम्ही आवश्यक त्या आरोग्य केंद्रात पाठवत आहोत, जेणेकरून सर्वच रुग्णांना अगदी काळजीच्या केसेसला पुरेशी सेवा देणं शक्य असेल.
    • त्याशिवाय आम्ही पुरेसे हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र उभारत आहोत. मुंबईत सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 700 खाटांची सोय केली जात आहे.
    • याशिवाय, खासगी आरोग्य संस्था जसे की अपोलो आणि मॅक्स केअर यांना सोबत घेऊन सरकार काम करत आहे. एवढंच नव्हे तर सैन्याचे हॉस्पिटलसुद्धा पूर्णपणे सज्ज आहेत.
    • रुग्णांचा वाढता आकडा पाहता आम्ही प्रयत्न करतोय की गरजेपेक्षा जास्त तयारी करून ठेवावी. जेणेकरून मोठं संकट ओढवलं तरी आपण ते सक्षमपणे पेलू शकू.
  5. HCQ देशाबाहेर पाठवल्याने भारतीय रुग्णांचे हाल होणार का?

  6. '81 कोटी लाभार्थींसाठी 9 महिने पुरेल एवढा धान्यसाठा'

    केंद्राकडे 81 कोटी लाभार्थींसाठी 9 महिने पुरेल एवढा धान्यसाठा असल्याची माहिती केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं.

  7. काश्मीर कसा करतोय कोरोनाचा सामना - पाहा व्हीडिओ

  8. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सर्वांसाठी नाही – एम्स संचालक

    हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोव्हिड-19 वर परिणामकारक ठरू शकतं, अशी माहिती काही प्रयोगशाळांनी दिली आहे. पण हे अद्याप खात्रीशीरपणे सांगू शकत नाही, असं दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले.

    "हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध सर्वांवर लागू होईल, असंही नाही. त्यामुळे रुग्णांवर इतर दुष्परिणाम दिसू शकतात. अशा स्थितीत ते उपयोगी ठरण्यापेक्षा धोकादायक ठरू शकतं," असंही गुलेरिया म्हणाले.

  9. कोरोनाचं संकट कधी संपेल?

  10. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

    चीनमध्ये कोरोना व्हायरसचे 99 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढलीय. मागच्या आठवड्याभरातली ही मोठी वाढ आहे.

    या 99 जणांमध्ये 97 जण हे परदेशातून आलेले आहेत.

    चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 82,052 झालीय.

  11. पुण्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू

    पुण्यात कोरोनाच्या संसर्गाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना अन्यही काही आजार होते अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

    दरम्यान पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 31 झाली आहे. यापैकी प्रत्येकी एक ठाणे आणि अहमदनगरचे होते मात्र त्यांचा मृत्यू पुण्यात झाला.

  12. आपल्या पोटातली अॅसिड्स कोरोनाला मारु शकतात?

  13. महाराष्ट्रात रविवारी १३४ कोरोना रुग्ण सापडले

    राज्यात रविवारी 134 कोरोना रुग्णांची भर पडली. यामध्ये मुंबईत तब्बल 113 तर रायगड, अमरावती, पिंपरी चिंचवड, भिवंडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

    पुण्यात 4 तर मीरा भाईंदरमध्ये 7 रुग्ण आढळले.

    ठाणे आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले.

    राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1895 झाल्याचं राज्य आरोग्य विभागाने सांगितलं.

  14. मालेगावमध्ये कोरोनामुळं एका रुग्णाचा मृत्यू

    नाशिकमधील मालेगावात कोरोना व्हायरसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

    नाशिकमध्ये एकूण रुग्णांची संख्या 33 वर पोहोचलीय. त्यातील सर्वाधिक रुग्ण मालेगावात आहेत. गेल्या 24 तासात मालेगावात रुग्णांची संख्या 18 झालीय.

  15. कधीच न थांबणारी मुंबई कोरोनामुळं अशी सामसूम झालीय...

  16. मालेगावमध्ये 13 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

  17. पंजाब : जखमी पोलिसावर तातडीनं शस्त्रक्रिया सुरू

    पंजाबमधील पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणारे 'निहाग' या सशस्त्र पंथातील होते, अशी माहिती पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी ट्विटरवरून दिली.

    हल्ल्यात जखमी झालेल्या हरिजित सिंह यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू झालीय. हरिजित सिंह यांचे हल्लेखोरांनी हात तोडले आहेत.

  18. साताऱ्यात 11जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

    सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या एक आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड इथं दाखल असणाऱ्या 10 अशा एकूण 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितलं.

    कृष्णा मेडिकल कॉलेज कराड इथल्या 13 आणि उपजिल्हा रुग्णालय फलटण इथल्या 5 अशा 18 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले आहेत.

  19. पंजाबमध्ये जमावानं पोलीस अधिकाऱ्याचे हात तोडले

    पंजाबच्या पटियालामधील भाजी मार्केटमध्ये जमावानं पोलिसांवर हल्ला केला. या जमावानं पोलीस अधिकाऱ्याचे हात तोडले, तर इतर दोन पोलीस अधिकारीही या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

    सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिजित सिंह यांचे हात जमावाने तोडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून, डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

    लॉकडाऊनची अंमलबजावणीसाठी तैनात असताना पोलिसांवर जमावानं हा हल्ला केला. पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी ही माहिती दिली.

    पंजाबमध्ये परदेशातून परतलेले नागरिक जास्त असल्यानं तिथं लॉकडाऊन एक मे पर्यंत वाढवण्यात आलंय.

    पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सात जणांना अटक करण्यात आलीय. यातील एकजण पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. हल्लेखोरांना पकडण्याचं ऑपरेशन पटियालाचे पोलीस महानिरीक्षक जतिंदर सिंग औलाख यांच्या नेतृत्त्वात पार पडलं.

  20. डॉक्टर, नर्सेसचा आभारी आहे- बोरिस जॉन्सन

    माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचा आभारी आहे अशा शब्दांत युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    NHS कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असं जॉन्सन म्हणाले.

    कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर जॉन्सन यांच्यावर लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं.

    त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरीही पुढचे काही दिवस ते काम करू शकणार नाहीत.

    जॉन्सन यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्री डॉमिनिक हे कार्यभार सांभाळत आहेत.