You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातील आज 221 नवे रुग्ण, एकूण आकडा 1982 वर
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
नव्या पेज वर नवे अपडेट्स
हे लाईव्ह पेज आता बंद करण्यात आलं आहे. या पुढील अपडेट्ससाठी इथं क्लि करा
आज दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी –
अखेर जाता-जाता पाहू या आजच्या पाच महत्त्वाच्या घडामोडी -
- महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर, एकूण मृत्यूंची संख्या 149
- देशात आतापर्यंत 8356 जणांना कोरोना व्हायरसची लागण, 273 जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय - दहावीची भूगोल आणि कार्यशिक्षण परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही रद्द
- 13 देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्यास सरकारची मान्यता, भारतात कमी पडू देणार नाही - केंद्र सरकारची ग्वाही
- युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ICUमध्ये होते भरती.
शुभरात्री.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना गृहमंत्र्यांचा इशारा
कोरोनाग्रस्ताच्या दफनविधीविरोधात रांचीत शेकडो लोक रस्त्यावर
कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा दफनविधी या स्मशानभूमीत करण्यात येऊ नये, यासाठी रांचीमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले. यानंतर पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये खटके उडाल्याचं दिसून आलं.
यापुढे याठिकाणी कोरोना व्हायरसग्रस्तांचे मृतदेह आणले जाणार नाहीत, लोकांनी लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असं आवाहन रांचीचे पोलीस अधीक्षक (वाहतूक) ए. पी. दुर्ग यांनी केलं आहे.
लॉकडाऊन काळात व्हिसा उल्लंघनकरणी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या काळात व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आलेल्या परदेशी नागरिकांनी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मर्कजमध्ये भाग घेतला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपूर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये एकूण 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभागी सर्व परदेशी नागरिक इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनमध्ये असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.
गुन्ह्यांत कजाकस्तान 9, दक्षिण आफ्रिका 1, बांगलादेश 13, ब्रूनेई 4, आयवोरियन्स 9, इराण 1, टोगो 6, म्यानमार 18, मलेशिया 8, इंडोनेशिया 37, बेनिन 1, फिलीपीन्स 10, अमेरिका 1, टांजानिया 11, रशिया 2, जिबोती 5, घाना 1, किर्गिस्तान 19 या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर, एकूण 149 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. रविवारी महाराष्ट्रात 221 नवे रुग्ण आढळून आले. तर 22 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण 149 मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाले आहेत.
मुंबई 1298 रुग्ण, 92 मृत्यू
ठाणे 140 रुग्ण, 06 मृत्यू
नवी मुंबई मनपा 45 रुग्ण, 03 मृत्यू
पालघर - 25 रुग्ण, 04 मृत्यू
रायगड (पनवेल) - 12 रुग्ण, 01 मृत्यू
नाशिक - 18 रुग्ण, 02 मृत्यू
अहमदनगर - 26 रुग्ण, 00 मृत्यू
जळगाव 02 रुग्ण, 01 मृत्यू
धुळे 01 रुग्ण, 01 मृत्यू
पुणे 263 रुग्ण, 30 मृत्यू
सातारा 06 रुग्ण, 02 मृत्यू
सोलापूर 01 रुग्ण, 01 मृत्यू
कोल्हापूर 06 रुग्ण, 00 मृत्यू
सांगली 26 रुग्ण, 00 मृत्यू
सिंधुदूर्ग 01 रुग्ण, 00 मृत्यू
रत्नागिरी 05 रुग्ण, 01 मृत्यू
औरंगाबाद 19 रुग्ण, 01 मृत्यू
जालना 01 रुग्ण, 00 मृत्यू
हिंगोली 01 रुग्ण, 00 मृत्यू
लातूर 08 रुग्ण, 00 मृत्यू
उस्मानाबाद 04 रुग्ण, 00 मृत्यू
बीड 01 रुग्ण, 00 मृत्यू
अकोला 12 रुग्ण, 00 मृत्यू
अमरावती 05 रुग्ण, 01 मृत्यू
यवतमाळ 04 रुग्ण, 00 मृत्यू
बुलडाणा 13 रुग्ण, 01 मृत्यू
वाशिम 01 रुग्ण, 00 मृत्यू
नागपूर 28 रुग्ण, 01 मृत्यू
गोंदिया 01 रुग्ण, 00 मृत्यू
इतर राज्य 09 रुग्ण, 00 मृत्यू
आजचा #CoronaPodcast
कोरोनासंदर्भात गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात आणि भारतात काय घडलं सांगतायत विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित
जग कधी असं दिसेल, याची कल्पनाही केली नव्हती... - पाहा फोटो
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 197 कोटी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या शासनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला दानशूर व्यक्ती व संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोव्हिड-19 या स्वतंत्र बँक खात्यात आतापर्यंत 197 कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती राज्याच्या जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.
तसंच ज्यांना मदत करायची इच्छा आहे, ते खालील खात्यावर मदत जमा करू शकतात, असं शासनाने कळवलं आहे.
रेशनसंबंधित तक्रारींसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधा
रेशनबाबत अधिक माहितीसाठी किंवा रेशनसंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचं मुख्यमंत्री कार्यालयाचं आवाहन...
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन रद्द करणं परवडणार नाही कारण...
पंजाबात 170 तर हरयाणात 181 कोरोनाग्रस्त
पंजाबमधली कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारपर्यंत 170 वर पोहोचली आहे. यापैकी 23 रुग्ण बरे झाले आहेत. तर पंजाबच्या शेजारील राज्य हरयाणामध्ये ही संख्या 181 असून 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
सोलापुरात कोरोनामुळे पहिला मृत्यू
सोलापुरात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली. सदर रुग्णाचं वय 56 असून ते पाच्छा पेठेत एक किराणा दुकान चालवत होते.
शुक्रवारी 10 एप्रिलला हा रुग्ण शहरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता. शनिवारी पहाटे 1 वाजता म्हणजे दिनांक 11 रोजी तो मरण पावला.
आज दुपारी 3.30 वाजता या रुग्णाची कोव्हिड-19ची टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पोलिसांनी हा सर्व परिसर आता कंटेनमेंट झोन घोषित करून सीलबंद केला आहे. रुग्णाच्या संपर्कातील आजूबाजूच्या लोकांची तसेच कुटुंबीयांची माहिती घेण्यात येत आहे, असंही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितलं.
शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे निर्णय
लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने रद्द केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
त्यांनी जाहीर केलेले तीन महत्त्वाचे निर्णय -
- दहावीची भूगोल व कार्यशिक्षण परीक्षा रद्द
- नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही रद्द
- राज्य उच्च माध्यमिक मंडळ निकालाबाबत निर्णय घेणार
दिल्लीत 33 ते 35 कंटेनमेंट झोन
राजधानी दिल्लीत ज्या-ज्या भागात कोरोना व्हायरसबाधित रुग्ण आढळून येत आहेत, असे भाग कटेंनमेंट झोन म्हणून सीलबंद करण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे 33 ते 35 कटेंनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
13 देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्यास सरकारची मान्यता
काही देशांनी भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांची मागणी केली आहे. देशांतर्गत आवश्यकता किती असेल, त्याचा विचार करून 13 देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यास सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती सरकारचे मुख्य प्रवक्ते के. एस. धतवालिया यांनी दिली.
यासाठी देशातील साठा आणि लागणारा मुबलक माल बाजूला ठेवूनच सोय करण्यात आल्याचं धतवालिया यांनी स्पष्ट केलं.
जादुगाराचे ससे आणि मान खाली घालून काम करणारे नायक