You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात कोरोनाचे 120 नवीन रुग्ण, एकूण 868 कोरोनाबाधित

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. दिल्लीत कोरोनाचे 20 नवीन रुग्ण, 10 जण तबलीगीशी संबंधित

    दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले आहेत.

    दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 523 झाला आहे. 25 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून दिल्लीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  2. दक्षिण कोरियाने कोरोनाला कसा आळा घातला?

    एकीकडे इटली आणि अमेरिकेत कोव्हिड-19 च्या रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढतायत. चीनमध्ये आताते कमी होऊ लागले आहेत. पण चीनच्या जवळ असूनही आणि जगाशी कनेक्टेड असूनही दक्षिण कोरियामध्ये या कोरोना व्हायरसचा मोठा उद्रेक झाला नाही.

    कोरोना विषाणूचा बिमोड करण्यासाठी दक्षिण कोरियाने काय पावलं उचलली आहेत? पाहा हा व्हीडिओ...

  3. आता तरी घरातच थांबा!, आजचं कार्टून कीर्तीशच्या कुंचल्यातून

  4. सांगली, कोल्हापूरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण

    कोल्हापूरमध्ये CPR इथं उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 आणि 21 मार्चला सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती.

    28 मार्चला ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आल्यामुळे संबंधित महिलेने 31 मार्चला खासगी रुग्णालयात उपचार घेतले. 4 एप्रिलला CPRमध्ये दाखल करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

    दरम्यान, सांगलीतही एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. इस्लामपूरमधील ज्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती, त्या कुटुंबाच्या संपर्कात ही महिला आल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. लक्षणं दिसून आल्यानंतर या महिलेची स्वॅब टेस्ट करण्यात आली, त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

  5. 5G तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरसचा जास्त प्रसार झाला का?

  6. 60 वर्षांवरील पुरुषांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त

    देशात आतापर्यंत 109 जणांचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला आहे. त्यापैकी 73 टक्के पुरुष आणि 27 टक्के महिला आहेत, असं केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

  7. गेल्या 24 तासात कोरोनाचे 693 नवीन रुग्ण, रुग्णांचा एकूण आकडा 4,067

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसंच देशातील रुग्णांच्या संख्येची माहिती दिली. या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

    • गेल्या 24 तासात कोव्हिड-19चे 693 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,067 झाली आहे. या रुग्णांपैकी 1,445 जण हे तबलीगी जमातशी संबंधित आहे.
    • कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांचं प्रमाण 76 असून 24 टक्के महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
    • कोरोनामुळे आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये वृद्ध रुग्णांचं प्रमाण अधिक आहे.
    • राज्यांना राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत 3 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्यांना यापूर्वी 1100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
    • राज्यांना राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निधी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
    • राज्यांना रेल्वेनं धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
  8. खासदारांच्या वेतनामध्ये 30 टक्के कपात- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    सर्व खासदारांच्या वेतनामध्ये 30 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. 1 एप्रिल 2020 पासून हा निर्णय लागू होईल.

    एक वर्षापर्यंत ही वेतन कपात करण्यात आली आहे. खासदारांचे भत्ते आणि निवृत्तीवेतन यामध्येही कपात करण्यात आली आहे. दोन वर्षांपर्यंत खासदारांना खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत.

    राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यांच्या राज्यपालांनीही आपल्या वेतनामध्ये कपात करण्यासंबंधी पुढाकार घेतला असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

  9. विषाणूंना नावं कशी दिली जातात?

    सध्या आपण एकच नाव वाचत, पाहात आणि ऐकत आहोत, ते म्हणजे कोरोना. पण हे नाव आलं कुठून? अमक्या एका विषाणूला हेच नाव द्यायचं हे कसं ठरलं असेल? यापूर्वीही आपण H1N1, एबोला अशी विषाणूची नावं ऐकली आहेत. विषाणूंना ही नाव कशी दिली जातात? त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे?

    जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ…

  10. चीनमधल्या या शहरात आता कुत्रा आणि मांजर खाण्यावर बंदी

  11. प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्राणिसंग्रहालयांना विशेष सूचना

    न्यूयॉर्कमधील प्राणिसंग्रहालयात एका वाघाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलयानंतर भारतातील प्राणिसंग्रहालयांनी प्राण्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी सेंट्रल झू ऑथॉरिटीनं सर्व प्राणिसंग्रहालयांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

  12. कोरोना व्हायरसमुळे हवामान बदलावर काय परिणाम होईल? - पाहा व्हीडिओ

  13. सुप्रीम कोर्टात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

    सुप्रीम कोर्टात आता अत्यंत महत्त्वाच्याच प्रकरणांची सुनावणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एक परिपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात केवळ महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रकरणांवरच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

  14. 'एनजीओने दिलं तरंच आम्हाला खायला मिळतं'

    लॉकडाऊनमुळे आम्हाला काहीच रेशन मिळत नाही. एनजीओनी मदत केली तरच आम्ही जेवू शकतो अशी व्यथा कामाठीपुऱ्यातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांनी मांडली आहे.

  15. कोरोनामुळे येत्या काळात बेरोजगारी वाढेल?

    कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन संपल्यावर बेरोजगारीचं प्रमाण वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. पाहा व्हीडिओ-

  16. सर्व सरकारी शिपिंग पोर्टने (बंदर) केली 52 कोटींची मदत

    सर्व सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पोर्टस् (बंदरे) नी पीएमकेअर फंडाला 52 कोटी रुपयांची मदत दिली आहे.

  17. अमृतसरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू

    अमृतसरमध्ये एका 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

  18. हे माणुसकी वाचवण्यासाठी चाललेलं युद्ध आहे- नरेंद्र मोदी

    भूतकाळातील युद्धकाळांमध्ये आपल्या माता-भगिनींनी आपले दागिने दान केले होते. ही स्थिती युद्धापेक्षा वेगळी नाही. हे मानवता वाचवण्यासाठी चाललेलं युद्ध आहे. भाजप सदस्यांनी पीएमकेअर फंडात मदत पाठवावी आणि आणखी 40 जणांना आवाहन करावे अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

  19. भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का?

    कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटरची अनेकदा गरज लागते. भारताची लोकसंख्या आणि कोरोनाचा प्रसार पाहाता भारतात व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात आहेत का हे पाहाणे गरजेचे आहे. पाहा व्हीडिओ-

  20. कार्यकर्त्यांनी आणखी सेवा केली पाहिजे - पंतप्रधान

    भाजप कार्यकर्त्यांनी लोकांची अधिकाधिक सेवा केली पाहिजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस, बँक, आवश्यक सेवामध्ये काम करणाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत. पक्षाच्या 40 व्या स्थापनादिना निमित्त प्रत्येक पोलिंग बूथ विभागातील 40 संबंधित घरात अशी आभार व्यक्त करणारी पत्रं दिली पाहिजेत.