तैवान : या अब्जाधीशाला 3,00,000 शार्पशूटर तयार करायचेत, कारण...

    • Author, फ्रान्सिस माओ
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

यावर्षी सप्टेंबरमध्ये तैवानमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्स मध्ये वयाची पंच्याहत्तरी गाठलेला, डोक्यावर पांढरे केस, डोळ्यांवर काळा चष्मा, अंगावर बिजनेस शर्ट आणि त्यावर बुलेटप्रूफ जॅकेट चढवलेल्या वेशात एक व्यक्ती येतो. आणि चीन विरुद्ध लढण्यासाठी तैवानने नागरी सैन्य तयार करावं म्हणून एक अब्ज तैवान डॉलर्स देण्याचं वचन देतो.

ही व्यक्ती म्हणजे तैपेईमधील टेक अब्जाधीश, रॉबर्ट त्साओ. चीनविरुद्ध लढण्यासाठी त्यांना त्यांच्या देशवासीयांना आणि महिलांना मदत करायची आहे.

त्यांना तीन वर्षांत 30 लाखांचं नागरी सैन्य उभं करायचं आहे. ही संख्या म्हणजे तैवानच्या लोकसंख्येचा जवळपास सातवा भाग म्हणता येईल. यात कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, दुकानदार या सर्वांना बंदूक चालवता आली पाहिजे. तसेच त्यांना 3,00,000 शार्पशूटर हवे आहेत.

आता असं उद्दिष्ट ठेवणं ही खरं तर खूप मोठी महत्त्वाकांक्षी गोष्ट असल्याचं त्यांनी मान्य केलंय. पण ते हे करूनच दाखवतील असा निश्चय त्यांनी केलाय.

त्यांनी सिंगापूरच्या पासपोर्टचा त्याग केल्यावर तैवानचं ओळखपत्र मिळावं म्हणून अर्ज केला होता. आणि आता ते त्यांना मिळालंय. यावर ते म्हणतात, मी घाबरलो नव्हतो, ना मी पळून गेलो होतो.

बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, "मला वाटतं जोपर्यंत लोक तैवानमध्ये आहेत, ते त्यांच्या देशाचं रक्षण करायला समर्थ आहेत. ते चीनच्या लष्करी आक्रमणाला घाबरत नाहीत."

टेक अब्जाधीश रॉबर्ट त्साओ यांचा जन्म चीनमधला, पण ते वाढले तैवानमध्ये. तैवानची जागतिक स्तरावर ओळख खरंतर सेमीकंडक्टरच्या उद्योगामुळे आहे. याच उद्योगात त्यांनी आपलं नशीब आजमावत युनायटेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक कॉर्प सेमीकंडक्टर कंपनीची स्थापना केली.

एक उद्योजक म्हणून चीनशी त्यांचे अनेक व्यवहार आहेत. पण सोबतच इतिहासाचे विद्यार्थी असलेले त्साओ नेहमीच आपली मतं व्यक्त करताना दिसतात. 2007 मध्ये ते म्हटले होते की, जर चीन आणि तैवानचं एकीकरण करायचं असेल तर तैवानमध्ये सार्वमत घेण्याची कल्पना त्यांनी मांडली होती.

पण चीनच्या संभाव्य आक्रमणासाठी आपण तयार असलं पाहिजे असं आता त्यांना वाटतंय. किंबहुना तैवानच्या बहुतांश लोकांना तसंच वाटतं.

चीनचे शासक आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाचे (CCP) नेते शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला आता सुरुवात होईल. याआधी चीनचे नेते माओ झेडोंग यांनीच तिसरी टर्म केली होती. त्यांच्या नंतर जिनपिंग हे एकमेव आहेत. साहजिकच तैवानचं विलिनीकरण हा जो काही अजेंडा आहे तो जिनपिंग पुढे रेटतीलच.

जिनपिंग यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत चीनची लष्करी क्षमता कैक पटींनी वाढली. लष्कराचं प्रचंड आधुनिकीकरण आणि विस्तार झाला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने तैवानचा समुद्र आणि मुख्य भूभागादरम्यानच्या 160 किमी (100 मैल) परिसरात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.

चीनच्या या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे तैवानची जनता प्रक्षुब्ध झाली आहे.

2019 मध्ये चीनने हाँगकाँगमध्ये सुरू असलेलं चीनविरोधी आंदोलन मोडून काढलं. तसंच हाँगकाँगच्या एक देश दोन प्रणालीला मान्यता दिली. चीनचे समर्थक म्हणतात त्याप्रमाणे तैवानने हाँगकाँगचं उदाहरण समोर ठेवावं.

त्साओ म्हणतात, रशियाने युक्रेनवर जो हल्ला केलाय त्याचे पडसाद तैवानमध्ये उमटले आहेत. आणि आमच्यासाठी हा एक वेक अप कॉल आहे.

अमेरिकीन काँग्रेसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यावर अमेरिका आणि चीन मधील तणाव वाढला होता. हा तणाव या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता.

यावर चीनने प्रत्युत्तरादाखल युद्ध सरावाचं जोरदार प्रदर्शन केलं होतं. विश्लेषकांना वाटतं की, ही केवळ धमकी नसून चीन तैवानवर कशाप्रकारे हल्ला करेल याची ती तालीम होती.

त्या आठवड्यात 100 हून जास्त एअरक्राफ्ट्स, दहा विनाशिका आणि जहाज तैवानच्या आजूबाजूला घिरट्या घालत होते. चीनने पाणबुडी आणि विमानवाहू जहाज पाठवली, डझनभर क्षेपणास्त्रे डागली.

त्साओच्या नजरेत चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष हा माफिया आहे. हा पक्ष राष्ट्रीय सरकारच्या वेशात गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो.

ते सांगतात, "माझी माझ्या देशाप्रती जबाबदारी आहे. मला असं वाटतं की यातून अनेक लोकांना प्रोत्साहन मिळेल. तसंच इतर व्यावसायिक लोक किंवा नेते मदत करायला पुढे येतील."

त्साओ यांनी लष्करी ड्रोन विकसित करण्यासाठी पैसे देण्याचंही मान्य केलंय. हे ड्रोन तैवानच्या "पोर्क्युपिन" संरक्षण धोरणासाठी महत्त्वपूर्ण आहे.

तैवान त्यांच्या जीडीपीच्या 2 टक्के संरक्षणावर खर्च करतो. अमेरिकेने तैवानला 2010 साली 23 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रं विकली आहेत. एकट्या 2020 सालात अमेरिकेने 6 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रं तैवानला विकली.

पण चीन याच्या 15 पट खर्च संरक्षणावर करतो आहे. चीनचं नौदल जगात सर्वांत मोठं नौदल आहे. त्यांच्याकडे 20 लाख सैनिक पगारावर काम करतात. तर 5,00,000 हून अधिक सैनिक राखीव आहेत.

त्यामुळे तैवानही आपल्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.

त्साओ सांगतात, "युक्रेनमध्ये आपण जे युद्ध पाहतोय त्याप्रमाणे सैनिक, रणगाडे यांची तुलना करता येण्यासारखी नाही. पण हे युद्ध बुद्धीच्या जोरावर लढलं जातंय."

पण त्यासाठी लढण्याची इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे. 1990 पासून तैवानच्या सैन्यात कपात झाली. तसंच सरकारनेही गेल्या काही वर्षांत सैन्यातील अनिवार्य सेवा दोन वर्षांवरून चार महिन्यांपर्यंत कमी केली. आता ही सेवा पुन्हा वाढवण्याच्या चर्चा आहेत.

नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर त्साओ यांना कुमा अकॅडमी विषयी समजलं. ही अकॅडमी 2021 ला सुरू झाली. यात नागरिकांना संरक्षण प्रशिक्षण देण्यात येतं. त्साओ यांनी या अकॅडमीला ही मदत करण्याचं आश्वसन दिलं आहे.

तैवानचे खासदार आणि संसदेच्या सुरक्षा आणि संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष वांग टिंग-यू सांगतात की, त्साओ असे एकमेव नाहीयेत. म्हणजे मला म्हणायचं आहे की, ते समाजाचं प्रतिबिंब आहेत. तैवानच्या लोकांनाही असंच वाटतंय.

स्थानिक लोकांनाही लष्करी प्रशिक्षण हवंय. तैवानमध्ये बंदुक वापरण्याचे कायदे कडक आहेत. मात्र अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या गुआमच्या प्रदेशात सराव करण्यास लोक उत्सुक आहेत.

वांग म्हणतात, "आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी तरुण पुढे सरसावले आहेत. ते देशाची सेवा करायला उत्सुक आहेत."

क्लेअर ली 27 वर्षांची तरुणी आहे. ती तिच्या देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती स्वतःला देशभक्त म्हणवून घेते. पण चीन इतक्या लवकर आक्रमण करेल असं तिला वाटत नाही.

ती म्हणते की, "त्साओ यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलंय. खरंच त्यांच्यात खूप हिंमत आहे. कोणीतरी असं पाऊल उचलेल किंवा भरपूर पैसे देईल असं अजिबात वाटलं नव्हतं. तैवानमध्ये जे बहुतेक श्रीमंत लोक आहेत ते एकतर चीनचे समर्थक आहेत किंवा मग आपल्या व्यवसायाचे."

"त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचीच चर्चा सुरू आहे. पण कोणी हे प्रशिक्षण घ्यायला जाणार आहे असं मी तरी अजून ऐकलेलं नाही. आणि मी हे करेन असंही मला वाटत नाही."

ती म्हणते "तुमच्या तोंडासमोर बंदूक येईल असं दृश्य बघण्याची कोणाचीच इच्छा नसेल."

"आमच्यापैकी बहुतेक जणांना तरी असंच वाटतं की, आम्हाला ना लढायचं आहे, नाही चीन मध्ये सामील व्हायचं आहे. आम्हाला फक्त जगायचंय."

पण गोष्टी अपेक्षेपेक्षा खूप लवकर बदलल्या असल्याचं तिने मान्य केलंय. तिला वाटतं की, तैवानची ही परिस्थिती सोडवण्यासाठी शक्यतो युद्ध हाच पर्याय वापरला जाईल.

यावर आम्ही चीनच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तैवानला मदत करू, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन दोनदा म्हटलेत. पण अमेरिकेचं तैवान बाबतीतलं धोरण मात्र संदिग्धच आहे.

त्साओ म्हणतात की, तैवानच्या लोकांनी स्वतःच स्वतःचा बचाव करण्याची गरज आहे.

ते पुढे सांगतात, "तैवानच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी हे करतोय. चायनीज मध्ये याला 'पाओ झुआन यिन यू' म्हणतात." ही एक म्हण आहे.

या म्हणीप्रमाणे, पाचू आकर्षित करण्यासाठी तुम्हाला त्या दिशेने वीट फेकावी लागेल. पण त्साओ यांना वाटतं की, मी देणगी देऊन एक वीट फेकली आहे. त्या बदल्यात तैवानमध्ये लढाऊ भावनेची लाट निर्माण होईल. आणि त्याचं मोल पाचूपेक्षा ही खूप मोठं असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)