You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेतल्या ऑस्ट्रेलिया संघाचं काय होणार?
आर्थिक संकटामुळे श्रीलंकतेली परिस्थिती चिघळली आहे. आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांचं घर पेटवलं आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभये राजपक्षे यांनी पलायन केलं आहे.
आंदोलकांनी निषेध तीव्र केल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशा वातावरणात श्रीलंकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरी टेस्ट गॉल इथे सुरू आहे. शनिवारी सकाळी आंदोलकांचा जत्था गॉल क्रिकेट स्टेडियममध्येही शिरला होता. पण सुरक्षायंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरळीतपणे पार पडला. रविवार सकाळी तिसऱ्या दिवसाचा खेळही सुरू झालाय.
दुसरी टेस्ट सुरू राहणार का अर्धवट राहणार यासंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्ड, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने यांनी अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या बरोबरीने अंपायर मायकेल गॉफ (इंग्लंड) आणि नितीन मेमन (भारत) तसंच मॅचरेफरी जवागल श्रीनाथ काम पाहत आहेत. मॅच सुरू ठेवण्यासंदर्भात अंतिम निर्णय मॅचरेफरी श्रीनाथ यांच्या हाती असेल. खेळाडूंची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असेल असं दौरा सुरू होण्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटलं होतं.
दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 364 धावा केल्या. स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लबूशेन या दोघांनी शतकी खेळी साकारल्या. प्रबाथ जयसूर्याने पदार्पणात 6 विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने 184/2 अशी मजल मारली आहे. कुशल मेंडिस 84 तर अँजेलो मॅथ्यूज 6 धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रलियाच्या संघाला वनडे सीरिजदरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी याचा विशेष उल्लेख केला होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने श्रीलंकेतल्या परिस्थितीसंदर्भात एक पोस्ट टाकली होती. पॅट कमिन्सने एक फोटो शेअर करताना लिहिलं की, "काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. शहरातला वीजपुरवठा पूर्ववत व्हावा याची वाट पाहत होतो. जेणेकरून आम्हाला जेवता येईल. श्रीलंका एक देश म्हणून अतिशय कठीण कालखंडातून जात आहे. पण चाहत्यांचं प्रेम विलक्षण असं आहे. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही ऋणी आहोत".
ऑस्ट्रेलियाचा संघ महिनाभरापासून श्रीलंकेत आहे. श्रीलंकेतली परिस्थिती बिकट असल्याने या दौऱ्यावर जायचं की नाही अशी साशंकता होती परंतु खेळाडूंनी जाण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ट्वेन्टी20 सीरिज 2-1 अशी जिंकली. वनडे मालिकेत श्रीलंकेने जबरदस्त प्रदर्शन करत 3-2 अशी सीरिज जिंकली. पहिल्या टेस्टमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)