You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी कोणालाही ठार करणार नाही' म्हणत बंदूकही न उचललेल्या सैनिकाला शौर्यपदक का मिळालं?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"मला लहानपणी प्रश्न पडायचा, एक व्यक्ती दुसऱ्याला, एक भाऊ दुसऱ्याला कसा काय मारू शकतो, त्याचा खून करू शकतो? त्या विचारांनी माझा थरकाप उडायचा आणि मग मी ठरवलं की आयुष्यात कधीही कोणाला ठार करणार नाही, इतकंच काय कधीच कोणाला इजाही करणार नाही."
काही वर्षांपूर्वी बीबीसीच्या रायन डेली यांच्याशी बोलताना डेसमंड डॉस यांनी उच्चारलेले हे शब्द.
लहानगा डेसमंड धार्मिक वातावरणात मोठा झाला.
त्या दिवसांच्या आठवणी सांगताना ते म्हणतात की, "माझा जन्म झाला तेव्हा वडिलांनी टेन कमांडमेंट्स (ख्रिश्चन धर्मातल्या देवाने सांगितलेल्या आणि माणसाने पाळायच्या असलेल्या 10 आज्ञा) ची चित्रं आणली. घरात ती दर्शनी भागात लावली होती. सहाव्या आज्ञेत केन एबलचा खून करतो असं दिसतं आणि म्हटलंय की, तुम्ही दुसऱ्या माणसाचा खून करणार नाही. ही चित्रं मी मोठा होत असताना हजारदा पाहिली आणि ते मनात ठसलं."
आता हे डेसमंड बाबा कोण असा प्रश्न पडून तुम्ही पुढे वाचणं बंद करण्याचा आधी सांगते, डेसमंड डॉस दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या सैन्यात होते. त्यांची तुकडी जपानी सैन्याशी लढत होती, अगदी फ्रंटलाईनवर जिथे बंदुकीच्या गोळ्या आणि तोफगोळे उडत होते, तिथे होते पण तरीही त्यांनी धार्मिक कारणांमुळे शस्त्र उचलायला नकार दिला.
डेसमंड डॉस यांनी भर युद्धात, लढाईत, क्षणाक्षणाला आसपास लोक मरत असताना, कित्येकदा स्वतःसोबत ट्रेनिंग घेतलेले मित्र डोळ्यादेखत मृत्युमुखी पडत असताना शत्रुसैनिकांना ठार करायला नकार दिला. ही त्यांचीच गोष्ट.
डेसमंड डॉसचा जन्म 1919 साली झाला. पहिलं महायुद्ध तेव्हा नुकतंच संपलं होतं. त्याची सावली या कुटुंबावर पडली होती. डेसमंडच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र पहिल्या महायुद्धात मारले गेले आणि याचा आघात पचवणं त्याच्या वडिलांसाठी कठीण गेलं. ते दारूच्या आहारी गेले.
डेसमंड याच वातावरणात मोठा झाला. त्याचे वडील सुतारकाम करायचे आणि आई एका बुटांच्या फॅक्टरीत कामगार होती. घरात ना श्रीमंती होती ना सुबत्ता. होती ती फक्त ठाम धार्मिक श्रद्धा.
ख्रिश्चन धर्मात अनेक पंथ आहेत. त्यातला एक पंथ म्हणजे सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्ट. या पंथाच्या चालीरिती वेगळ्या आहेत. मुख्य फरक म्हणजे या पंथातले लोक रविवार हा देवाचा दिवस न समजता शनिवार हा देवाचा दिवस समजतात. शनिवार - कारण हा आठवड्याचा सातवा दिवस आहे. यावरूनच या पंथाचं नाव पडलं आहे.
या पंथांचे लोक असंही मानतात की जीझस पुन्हा एकदा अवतार घेणार आहे.
शनिवारी सुटी घेऊन धार्मिक गोष्टी करणं, अहिंसा आणि शाकाहार अशी या पंथाची मुल्यं आहेत. डेसमंड याच मुल्यांवर मोठा झाला.
आठवीपर्यंत त्याने चर्चच्या शाळेत शिक्षण घेतलं पण पहिल्या महायुद्धानंतर जी महामंदी आली त्यामुळे घरात पैसे कमवण्यासाठी त्याला काम करावं लागलं.
दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा डेसमंड एका जहाज कंपनीत काम करत होते.
त्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणतात, "जेव्हा अमेरिकेने जपान आणि जर्मनीविरोधात युद्ध घोषित केलं, तेव्हा काही अपवाद वगळता सगळ्या तरुणांना सैन्यात भरती होणं आवश्यक होतं. माझ्या बॉसने मला सांगितलं की तुझी इच्छा नसेल तर तुला सैन्यात जाण्याची गरज नाही कारण तू 'अत्यावश्यक सेवा' कामगार आहेस."
"पण मला मागे राहायचं नव्हतं, लोकांनी मला भित्रा म्हणावं अशी माझी इच्छा नव्हती. मला देशाची आणि देवाची सेवा करायची होती, पण ते मला सैनिक म्हणून न करता वैद्यकीय मदतनीस म्हणून करायचं होतं. मला लोकांना जीवदान द्यायचं होतं, कोणाचे जीव घ्यायचे नव्हते."
डेसमंडनी जेव्हा सैन्यात भरती होण्याचा अर्ज भरला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला 'नॉन-कॉम्बॅटंट' व्हायचं आहे. म्हणजे ते सैन्यात असतील पण शस्त्र उचलून लढाई लढणार नाहीत.
त्यांना सांगण्यात आलं की असं काहीही सैन्यात नसतं. जर धार्मिक कारणांमुळे त्यांनी शनिवारी काम केलं नाही किंवा शस्त्र उचललं नाही तर सरळ कोर्ट मार्शल करण्यात येईल.
"मला त्यांचं म्हणणं मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता."
पण त्यांच्या या श्रद्धेमुळे त्यांना त्याच्या सहकाऱ्यांकडूनही अपमान आणि टोमण्यांचा सामना करावा लागला. "ज्या माणसाचा शस्त्र उचलण्यावर विश्वास नाही, त्याने आपल्या सैन्य तुकडीत असावं असं त्यांना वाटत नव्हतं. मी त्यांना आवडत नव्हतो."
एका सैन्य अधिकाऱ्याने तर डेसमंडला सैन्यातून काढून टाकण्यासाठी 'वेडेपणाचा' शिक्का मारला. त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की डेसमंडच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे तो सैन्यात काम करू शकत नाही.
पण जेव्हा त्यांची तुकडी युद्धावर पाठवली गेली, तेव्हा डेसमंडच्या सहकाऱ्यांनी त्यांचं काम पाहिलं.
युद्धात वैद्यकीय मदतनीस म्हणून काम करताना त्यांनी अनेक अमेरिकन सैनिकांचे जीव वाचवले. ग्वाम आणि फिलिपिन्समध्ये डेसमंड यांनी जे काम केलं त्यासाठी त्यांना ब्रॉन्झ स्टार मेडल्सही मिळाले.
"त्यांच्या लक्षात आलं की ते जेव्हा जखमी होतील, तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. मी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासाठी धावून येईन. मग आमचे संबंध सुधारले."
"मग माझ्या सहकाऱ्यांना वाटायला लागलं की मी स्वसंरक्षणार्थ जवळ शस्त्र बाळगावं. त्यावर मी एकच उत्तर द्यायचो की देव माझं रक्षण करायला समर्थ आहे. तुम्ही युद्ध लढा, मी तुमची शुश्रुषा करेन."
पण खरी परीक्षा अजून बाकी होती.
मे 1945 मध्ये डेसमंडच्या सैन्य तुकडीला जपानमधल्या ओकिनावातल्या एका 400 फुट उंच कड्यावर पाठवलं. जपानी सैनिक तिथे दबा धरून बसायचे आणि खालून जाणारी मित्रराष्ट्रांची रसद तोडायचे.
तसा कठीण प्रदेश होता. आसपास डोंगररांगा होत्या, थोडं खाली गेलं की पठार आणि खालून रस्ता जायचा. या कड्यावरच्या जपानी सैनिकांना हटवण्याचं काम डेसमंडच्या तुकडीकडे होतं.
इतिहासात ही लढाई 'हॅकसॉ रिज बॅटल' म्हणून प्रसिद्ध आहे. इतकी की हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मेल गिब्सन यांनी 2016 साली याच नावाने डेसमंड डॉस यांच्यावर चित्रपट काढला.
'हॅकसॉ रिज' चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
काय झालं होतं या लढाईत?
डेसमंड म्हणतात, "आम्हाला वाटलं हे काम सोपं आहे, पण सगळंच बिघडत गेलं. त्यांनी (जपानी सैन्याने) आमच्यावर कडाडून हल्ला चढवला."
डेसमंडने तेव्हाही बंदूक हातात घेतली नाही. त्याला स्पष्ट आदेश देऊनही त्याने नकार दिला. इथून जिवंत परत गेला तर त्याचं कोर्ट मार्शल होणार हे नक्की होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
निकराची लढाई सुरू होती पण डेसमंडच्या तुकडीला माघार घ्यावी लागली, पण या लढाईत साधारण 50-100 सैनिक जखमी होऊन युद्धभूमीवर पडले. त्यांना कडा उतरता येणार नव्हता.
पुढे काय झालं याची एकतर आपण कल्पना करू शकतो किंवा 'हॅकसॉ रिज' चित्रपटात दाखवलेला प्रसंग डोळ्यापुढे आणू शकतो.
डेसमंड अंधाऱ्या खंदकांतून जीवाच्या आकांताने धावतोय. अधेमध्ये जपानी सैनिक येतात हल्ला करायला पण त्यांना चुकवतोय, तरीही कोणालाही मारत नाही ना बंदूक उचलत.
हा तो सैनिक आहे जो ना बंदूक हातात घेऊ शकत, ना रायफल ना चाकू. त्याला फक्त पळायचं आहे. पण तो युद्धातून पळ काढत नाहीये. तो भित्रा नाहीये. तो त्या कड्यावर जातो, जखमी सैनिकाला पाठीवर घेतो आणि खाली आणून पठारावर सुरक्षित ठिकाणी ठेवतो. असं तो कित्येक तास करक राहतो. पळत राहातो, जखमी सैनिकाला उचलतो, खाली येतो. स्वतःचा जीव धोक्यात घालत राहातो... परत.. परत.
बीबीसीशी बोलताना डेसमंड म्हणाले होते, "मी प्रार्थना करत होतो, देवा, मला अजून एकाला वाचवू दे, मला अजून एकाला खाली आणू दे. आणि देवाने माझं ऐकलं. मी सगळ्यांना खाली आणू शकलो. पण इतकी भयानक लढाई चालू होती की सगळीकडून गोळ्या झाडल्या जात होत्या. मला अक्षरक्षः चेहऱ्यासमोर त्या सपसप जात आहेत असं जाणवत होत."
युद्ध संपल्यावर डेसमंडच्या अमेरिकेतल्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या काँग्रेशल मेडल ऑफ ऑनर' ने सन्मान झाला. बंदूक उचलली नाही म्हणून ज्याचं कोर्टमार्शल होणार होतं त्या तरुण सैनिकाला शौर्य पदक बहाल करण्यात आलं. संपूर्ण युद्धात डेसमंडने कधीच बंदूक हातात घेतली नाही.
अमेरिकन सैन्याचं म्हणणं होतं की डेसमंडने 100 सैनिकांचा जीव वाचवला आहे, तर डेसमंडचं स्वतःचं म्हणणं होतं की त्यांनी 50 लोकांच्या जीव वाचवला आहे. शेवटी त्यांच्या मानपत्रावर त्यांनी 75 सैनिकांचा जीव वाचवला असं लिहिलं गेलं.
"अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हेन्री ट्रुमन यांनी जेव्हा ते पदक माझ्या छातीवर लावलं तेव्हा ते म्हणाले, हा राष्ट्रध्यक्ष असण्यापेक्षा मोठा सन्मान आहे."
डेसमंड युद्धातून सुखरूप घरी आले तरी त्यांचं नंतरचं आयुष्य सोपं नव्हतं. त्यांना पुढे सुतारकाम सुरू ठेवायचं होतं, पण युद्धात हाताला गोळी लागल्याने त्यांचा डावा हात निकामी झाल्यात जमा होता.
हॅकसॉ रिजमध्ये त्यांनी एका हातगोळ्याला लाथ मारून तो पुढे भिरकवण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ठरला, तो बॉम्ब फुटला आणि त्याचे तुकडे डेसमंडच्या पायात घुसले.
युद्धानंतर एकाच वर्षांनी त्यांना टीबी झाला. पाच वर्षं उपचार झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात घरी सोडण्यात आलं पण तोवर त्यांचं एक फुफ्फुस निकामी झालं होतं.
औषधांच्या माऱ्यानी त्यांना पूर्णपणे बहिरेपण आलं होतं. अशा परिस्थितीतही त्यांनी अमेरिकेतल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांनी आपलं कुटुंब चालवलं, वाढवलं.
सैन्यात नर्स म्हणून काम करणाऱ्या डोरेशी पाल्मर यांच्याशी त्यांची भेट झाली होती, युद्ध संपल्यावर या दोघांनी लग्न केलं.
सगळ्या संकटांना समर्थपणे तोंड देत डेसमंड डॉस यांनी 2006 साली जगाचा निरोप घेतला.
त्याआधी बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते की, "युद्धात गेल्यावर मला कळालं की युद्ध, तो रक्तपात, मृत्यू सगळं किती दुःखद असतं. जे लोक इतरांना युद्धात ठार करतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट भावना नाही. कदाचित त्यांना ते योग्य वाटत असेल. पण माझ्यासाठी ते सर्वर्था चुकीचं होतं. प्रत्येक सैनिकाने त्याच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हा निर्णय स्वतः घेतला पाहिजे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)