श्रीलंकेत एक दिवस पुरेल एवढाच पेट्रोल साठा शिल्लक, पुढे काय होणार?

    • Author, पीटर हॉसकीन्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

श्रीलंकेत आताच्या घडीला एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक आहे, अशी माहिती देशाचे नवे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी दिली आहे. श्रीलंका गेल्या 70 वर्षांतील सर्वाधिक भयंकर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

देशाला संबोधित करताना रनिल विक्रमसिंघे म्हणाले की, काही आयातींचा खर्च उचलण्यासाठी देशाला तातडीने 75 मिलियन डॉलर परकीय चलनाची आवश्यकता आहे.

तसंच सरकारी वेतन देण्यासाठी मध्यवर्ती बँकेला पैसे छापावे लागतील. तसंच सरकारी मालकीच्या श्रीलंकन एअरलाईन्सचे खासगीकरण केले जाऊ शकते असंही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संकट, ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि कर कपातीचा मोठा फटका बसल्याने श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. परकीय चलनाची तीव्र टंचाई आणि भयंकर महागाईमुळे औषधं, इंधनं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे.

राजधानी कोलंबोमध्ये प्रवासासाठी सर्वाधिक वापरली जाणारी ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांची पेट्रोल स्टेशन्सबाहेर मोठी रांग पहायला मिळतेय.

"आताच्या घडीला आमच्याकडे केवळ एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल आहे. पुढचे काही महिने आमच्यासाठी खूप कठीण असणार आहेत." असंही विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केलं. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या शिपमेंटसाठी भारतासोबत क्रेडिटलाईन वापरून इंधन पुरवठा केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले.

ते पुढे सांगतात, देशाच्या मध्यवर्ती बँकेला नोटा छापाव्या लागतील जेणेकरून सरकारी वेतन आणि इतर खर्च भागवता येऊ शकेल.

"सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी माझ्या स्वत:च्या इच्छेविरोधात मला पैसे छापण्याची परवानगी द्यावी लागत आहे. पण आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पैसे छापल्याने रुपयाचे अवमूल्यन होते,"

देशाच्या अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी श्रीलंकन एअरलाईन्स विकण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी ठेवला आहे. 2021 या आर्थिक वर्षांत एअरलाईन्सला 45 बिलियन श्रीलंकन रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या काही आठवड्यात श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आहेत.

गेल्या आठवड्यात सत्ताधारी पक्षाचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर गोटाबाया राजपक्षे यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. या हिंसक संघर्षात 9 जणांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक लोक जखमी झाले.

शुक्रवारी (13 मे) बीबीसीशी बोलताना विक्रमसिंघे म्हणाले, 'आर्थिक संकटातून बाहेर येण्यापूर्वी ते अधिक भयानक होईल.'

पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत ते असंही म्हणाले की, देशातील नागरिकांना दिवसाचे तीन वेळचे अन्न पुरवण्यासाठी ते बांधिल आहेत.

आर्थिक मदतीचे आवाहन करत असताना ते असंही म्हणाले, "देशात भूकेचे संकट निर्माण होणार नाही, आम्ही अन्नाची व्यवस्था करू."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)